निकालपत्र :- (दि.22/07/2010) (सौ.प्रतिभा जे.करमरकर,सदस्या)
(1) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी:- यातील तक्रारदार यांचे पती मयत बाळासो विष्णू पाटील हे राधानगरी तालुक्यातील मौजे कांबळवाडी येथील दुर्गम भागात आपल्या कुटूंबासह रहात होते व तेथेच त्यांची स्थावर व जंगम मालमत्ता असून त्यांचा शेती हा मुख्य व्यवसाय होता. त्यांनी सामनेवाला विमा कंपनीकडून शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत विमा उतरवला होता. यातील तक्रारदार हिचे पती श्री बळवंत उर्फ बाळासो विष्णू पाटील हे दि.15/07/2009 रोजी सकाळी 10 वाजणेचे सुमारास जनावरांना वैरण आणणेसाठी गेले असताना अतिवृष्टी झालेने ओढा पार करत असताना अपघाताने पाय घसरुन ओढयातून वाहून जाऊन पाण्यामध्ये गुदमरुन बुडून मयत झाले. ते मयत झालेनंतर दि.17/07/2009 रोजी 10 चे सुमारास कांबळवाडी गावच्या हद्दीत कुसाळे यांच्या विहीरीजवळ असले ओढयाच्या पाण्यात यातील तक्रारदार यांचे पती मयत अवस्थेत आढळून आले. त्यानंतर पोलीस ऑफिसर राधानगरी पोलीस ठाणे यांनी सदर अपघाताबाबत अपघात वर्दी घेऊन घटना स्थळाचा पंचनामा,मरणोत्तर पंचनामा केल्यानंतर मृत्यूचे कारण शोधण्यासाठी सी.पी.आर.हॉस्पिटल,कोल्हापूर येथे पोस्ट मार्टेम रिपोर्ट करणेसाठी पाठविले असता सी.पी.आर.हॉस्पिटल,कोल्हापूर यांनी पोस्ट मार्टेम केल्यानंतर यातील तक्रारदार यांचे पतीचा मृत्यू ओढयाच्या पाण्यामध्ये वाहुन जाऊन बूडून मृत्यू झालेबाबत अहवाल मेडिकल ऑफिसर सी.पी.आर.हॉस्पिटल,कोल्हापूर यांनी दिला आहे.
(2) तक्रारदार आपल्या तक्रारीत पुढे सांगतात, तक्रारदार हिचे पतीचा अपघाताने ओढयाच्या पाण्यामध्ये बुडून मृत्यू झालेनंतर सदर अपघाताची नोंद राधानगरी पोलीस स्टेशन येथे होऊन पोलीस अधिकारी राधानगरी यांनी सदर अपघाताचा तपास केला. सदर पोलीस तपासाअंती यातील तक्रारदार यांचे पतीचा मृत्यू ओढयाच्या पाण्यामध्ये बुडून झाला आहे असे निष्पन्न झाले आहे. यातील तक्रारदार यांचे पतीचा अपघाती मृत्यू झालेनंतर सर्व आवश्यक कागदपत्रांसह क्लेम फॉर्म भरुन यातील सामनेवाला कंपनीकडे दि.11/09/2009 रोजी दाखल केला होता. सदर क्लेमबाबत यातील सामनेवाला कंपनीने तुमचा क्लेम आज मंजूर होईल उदया मंजूर होईल अशी ग्वाही देत होते. यातील तक्रारदार यांचा क्लेम मंजूरीस पात्र असताना सामनेवाला कंपनीने क्लेम मंजूर केलेला नाही अथवा क्लेमबाबत कळविलेले नाही अथवा क्लेमची रक्कम दिलेली नाही. तक्रारदाराने सामनेवाला कंपनीकडे सदर क्लेमचा वारंवार पाठपुरावा केला. परंतु त्यांनी क्लेमबाबत कुठलाही निर्णय कळवला नाही म्हणून अखेर त्यांनी दि.10/02/2010 रोजी सामनेवाला यांना कायदेशीर नोटीस पाठवली. त्याला सामनेवाला यांनी काहीही उत्तर दिले नाही. तक्रारदार ही दुर्गम भागात राहणारी गरीब अशिक्षीत विधवा असून निराधार आहे. तसेच तिच्यावर सर्व कुटूंबाची जबाबदारी आहे. तरीही सामनेवालाने तिच्या क्लेमबाबत अत्यंत बेजबाबदारपणा दाखवला आहे. दि.17/07/2009 रोजी तक्रारदाराच्या पतीचा मृत्यू होऊन वर्ष उलटून गेले व तक्रारदाराने पोलीस पंचनामा, स्पॉट पंचनामा, पोस्ट मार्टेम रिपोर्ट, मृत्यू दाखला इत्यादी सर्व कागदपत्र वेळेवर क्लेमफॉर्मसह सामनेवालांकडे दाखल केले तरीही सामनेवालाने तक्रारदाराचा न्याय्य क्लेम मंजूर केला नाही. त्याबद्दल तक्रारदारांना काहीही कळवले नाही ही सामनेवालाच्या सेवेतील गंभीर त्रुटी आहे. म्हणून त्याविरुध्द दाद मागण्यासाठी तक्रारदाराने सदर मंचाचा दरवाजा ठोठावला आहे व आपल्या पुढील मागण्या मान्य व्हाव्या अशी विनंती केली आहे. विमा क्लेमची रक्कम रु.1,00,000/- द.सा.द.शे. 18 टक्के व्याजासह सामनेवाला यांचेकडून वसुल होऊन मिळावी अशी विनंती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे. (3) तक्रारदाराने आपल्या तक्रारीसोबत क्लेम फॉर्म, तलाठयाचे प्रमाणपत्र, गट नं.166 चा 7/12 चा उतारा, खाते नं.256 चा 8 अ उतारा, वारसा डायरी उतारा, प्रतिज्ञापत्र, शाळा सोडल्याचा दाखला, प्रतिज्ञापत्र, मृत्यूचा दाखला, वर्दी जबाब, पंचनामा, पी.एम.रिपोर्ट, अडव्हान्स डेथ सर्टीफिकेट, इन्क्वेस्ट पंचनामा, पोलीस अहवाल, तक्रारदाराचे बँकेचे पासबुक, दै.सकाळ मधील बातमी, तक्रारदाराचे रेशनकार्ड व मतदान ओळखपत्र, सामनेवाला यांना वकीलांमार्फत पाठविलेली नोटीस, सदर नोटीस सामनेवाला यांना पोहोचलेची पोष्टाची पोच पावती इत्यादी कागदपत्र दाखल केली आहेत. (4) सामनेवाला यांनी तक्रारदारांच्या मयत पतीची विमा पॉलीसी मान्य केली आहे. परंतु इतर सर्व कथनाला तीव्र आक्षेप घेतला आहे. सामनेवाला आपल्या लेखी म्हणणेत पुढे सांगतात, सामनेवालाने अदयापपर्यंत तक्रारदाराचा क्लेम नामंजूर केल्याचा निर्णय घेतला नाही. असे असताना तक्रारदाराने आधीच विनाकारण सामनेवालांवर सेवात्रुटीचा चुकीचा ठपका ठेवला आहे. तक्रारदाराची सदर तक्रार ही प्रिमॅच्युअर्ड आहे. त्यामुळे प्रस्तुत मंचाने तक्रारदाराची तक्रार खर्चासह फेटाळून टाकावी अशी विनंती सामनेवाला यांनी सदर मंचास केली आहे. (5) सामनेवाला यांनी आपल्या लेखी म्हणणेसोबत कोणतेही कागदपत्र दाखल केलेले नाहीत.
(6) या मंचाने दोन्हीं बाजूंच्या वकीलांचा युक्तीवाद ऐकला व कागदपत्र तपासले. सामनेवाला यांनी आपल्या लेखी म्हणणेत तक्रारदाराची विमा पॉलीसी मान्य केली आहे. त्यामुळे तक्रारदार हे सामनेवालांचे विमाधारक ग्राहक आहेत हे सामनेवालाने मान्य केले आहे. तक्रारदाराच्या पतीच्या मृत्यूबद्दल सर्व कागदपत्र जसे पोलीस पंचनामा, पोस्ट मार्टेम रिपोर्ट, मृत्यू दाखला इत्यादी क्लेमफॉर्म सोबत सामनेवालांकडे दिली होती. त्यावरुन तक्रारदाराच्या पतीचा मृत्यू ओढयात वाहून गेल्यामुळे बुडून झाला होता हे सिध्द होत आहे. असे असताना तक्रारदाराच्या पतीच्या मृत्यूला वर्ष होऊन गेले तरी त्याच्या क्लेमबाबत निर्णय सामनेवाला यांनी घेतला नाही ही सामनेवालाच्या सेवेतील अत्यंत गंभीर त्रुटी आहे अशा निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. (7) महाराष्ट्र शासनाने सन 2005 पासून सदर शेतकरी अपघात विमा योजना लागू केली आहे. कुटूंबाचा एकमेव मिळवता आधार असलेला शेतकरी अपघाताने मरण पावला तर त्याचे कुटूंब उघडयावर पडू नये. त्याचे घर उध्वस्त होऊ नये यास उदात्त हेतुने सरकारने ही विमा योजना जाहीर केली आहे. त्याचे हप्तेही राज्य सरकारच भरत असते. सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी राबवण्यात येणारी अतिशय महत्वकांक्षी व कल्याणकारी योजना सामनेवाला विमा कंपनीच्या दप्तर दिरंगाईच्या लालफीतीच्या कारभारात अडकून तिचा फायदा लाभार्थी शेतकरी कुटूंबाला मिळायला कसा विलंब होतो हेच यावरुन दिसून येते. (8) पॉलीसी मान्य असून सर्व कागदपत्रे मिळूनही सामनेवालाने तक्रारदाराच्या क्लेमबाबत निर्णय घ्यायला वर्षापेक्षाही जास्त विलंब लावावा आणि सदर क्लेम प्रिमॅच्युअर्ड आहे म्हणून फेटाळून टाकण्याची विनंती प्रस्तुत मंचाला करावी ही सामनेवाला विमा कंपनीच्या अकार्यक्षम बेजबाबदारपणाची व सेवात्रुटीची गंभीर बाब आहे अशा ठाम निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे व पुढीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते. 2) सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारास विमा क्लेमची रक्कम रु.1,00,000/-(रु.एक लाख फक्त) अदा करावी.सदर रक्कमेवर दि.17/10/2009 पासून ते संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के प्रमाणे व्याज अदा करावे. 3) तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रु.2,000/-(रु.दोन हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चा पोटी रु. 500/-(रु.पाचशे फक्त) अदा करावेत.
| [HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER | |