निकालपत्र :- (दि.22/07/2010) (सौ.प्रतिभा जे.करमरकर,सदस्या)
(1) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी:- यातील तक्रारदाराच्या पतीने सामनेवाला विमा कंपनीकडून शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत विमा उतरवला होता. मयत बळवंत गोपाळ मोळे दि.07/5/2008 रोजी आपल्या ताब्यातील ट्रक नं. MH-09-A-9575 मध्ये बॉक्साईट भरुन रत्नागिरी कोल्हापूर रोडने जात असताना वाटेत झाडावर ट्रक धडकून अपघात झाला व ते गंभीर जखमी झाले. त्यांना लगेच सी.पी.आर.हॉस्पिटल, कोल्हापूर येथे आणून उपचार करण्यात आले. परंतु दि.17/08/2008 रोजी त्यांचा मृत्यू झाला. सदर अपघाताबाबत शाहूवाडी पोलीस येथे नोंद झाली आहे. तक्रारदाराने दि.14/10/2008 रोजी सामनेवाला विमा कंपनीकडे स्थळ पंचनामा, पोलीस रिपोर्ट, पोस्ट मार्टेम रिपोर्ट, मृत्यू दाखला इत्यादी सर्व कागदपत्रांसह विमा क्लेम दाखल केला. सदर क्लेम लौकरच मंजूर होईल असे सामनेवाला विमा कंपनी तक्रारदारांना चौकशी केल्यावर त्यांना सांगत राहिली.परंतु त्यांच्याकडून काहीच समजेना म्हणून अखेर दि.20/02/10 रोजी सामनेवाला यांना कायदेशीर नोटीस पाठवली. सदर नोटीस मिळूनही तक्रारदारांना सामनेवालने काहीच कळवले नाही. अथवा विमा क्लेमची रक्कमही दिली नाही. ही सामनेवालाच्या सेवेतील गंभीर त्रुटी आहे. णून तक्रारदाराने त्याविरुध्द दाद मागण्यासाठी मंचाचा दरवाजा ठोठावला आहे व आपल्या पुढीलप्रमाणे मागण्या मान्य व्हाव्या म्हणून विनंती केली आहे.विमा क्लेमची रक्कम रु.1,00,000/-व्याजासह सामनेवाला यांचेकडून वसुल होऊन मिळावी अशी विनंती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे. (2) तक्रारदाराने आपल्या तक्रारीसोबत क्लेम फॉर्म, तलाठयाचे प्रमाणपत्र, प्रतिज्ञापत्र, गट नं.70 चा 7/12 उतारा, खातेनंबर 161 चा 8 अ उतारा, वारसा डायरी उतारा, मृत्यू प्रमाणपत्र, शाळेचे बोनाफाईड, क्रि.केसमधील अंतिम अहवाल, इन्क्वेस्ट पंचनामा, पोलीस अहवाल, पावती, पी.एम.रिपोर्ट, तक्रारदारांचे बँकेचे पासबुक, रहिवाशी दाखला, वारसा दाखला, तक्रारदाराचे पतीचे ड्रायव्हींग लायसन्स, व मयत झाल्याचा दाखला, सामनेवाला यांना पाठविलेली नोटीस व त्याची पोच पावती इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.तसेच दि.30/06/2010 रोजी वर्दी जबाब, अपघात पंचनामा, व मृत्यूचे कारण सर्टीफिकेट दाखल केले आहे. (3) सामनेवाला विमा कंपनीने आपल्या लेखी म्हणणेत तक्रारदाराची विमा पॉलीसी मान्य केली आहे. परंतु तक्रारदाराच्या इतर सर्व कथनाला तीव्र आक्षेप घेतला आहे. सामनेवाला आपल्या लेखी म्हणणेत पुढे सांगतात, तक्रारदाराच्या क्लेमबाबत सामनेवालाने त्यांना अजून कुठलाच निर्णय कळवला नाही. त्यामुळे तक्रारदाराला तक्रार करण्यास कारणच घडले नसतानाही तक्रारदाराने प्रस्तुतची तक्रार केली आहे. (4) सामनेवाला आपल्या लेखी म्हणणेत पुढे सांगतात, तक्रारदाराच्या पतीचा मृत्यू हा त्याने अत्यंत निष्काळजीपणाने भरधाव वाहन चालवल्यामुळेच झालेला आहे. त्यामुळे सदरच्या अपघाताला तो स्वत:च जबाबदार आहे. मयत विमाधारक हा शेतकरी होता हे तक्रारदाराचे म्हणणेही चुकीचे आहे. कारण त्याचा मुख्य व्यवसाय शेती हा होता. या सर्व परिस्थितीचा विचार करता प्रस्तुत तक्रारदाराचा क्लेम प्रिमॅच्यूअर आह. क्लेमसाठी कुठलेही कारण घडलेले नाही. त्यामुळे सदरची तक्रार खर्चासह फेटाळून टाकावी अशी विनंती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे. (5) सामनेवाला यांनी आपल्याल लेखी म्हणणेसोबत महाराष्ट्र शासन शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेची प्रत दाखल केली आहे. (6) या मंचाने दोन्ही बाजूच्या वकीलांचे युक्तीवाद ऐकले. तसेच त्यांनी दाखल केलेले कागदपत्रही तपासले. तक्रारदाराचे पती हे विमाधारक होते हे सामनेवाला यांनी मान्य केले आहे. सामनेवाला यांनी तक्रारदाराच्या पतीचा मृत्यू त्यांनी स्वत:च बेदरकार वाहन चालवल्यामुळे झाला आहे. तसेच सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदाराच्या क्लेमबाबत अजून कुठलाच निर्णय घेतला नाही. त्यामुळे तक्रारदाराची तक्रार ही प्रिमॅच्युअर्ड असल्यामुळे काढून टाकावी असे सामनेवाला यांचे म्हणणे आहे. (7) शेतकरी अपघात विमा योजनेच्या अटी व शर्तीप्रमाणे सदर विमाधारक शेतक-याचा अपघाती मृत्यू झाला आहे याची शहानिशा सामनेवाला यांनी करणे आवश्यक आहे. सदर तक्रारीत मयत विमाधारक हा बेदरकार ड्रायव्हींग करत होता किंवा कसे याचा निर्णय करण्याची जबाबदारी सामनेवालावर नाही. तसेच प्रस्तुत विमाधारक शेती करत नव्हता, ड्रायव्हींग हाच त्याचा व्यवसाय होता याबद्दल आक्षेप घेऊन विमा क्लेम नामंजूर करण्याबद्दल कुठलाही अधिकार पॉलीसीतील अटी व शर्तीप्रमाणे सामनेवाला यांना नाही. प्रस्तुत तक्रारदार ही अल्पशिक्षीत, गरीब,विधवा आहे. तिच्यावर पती निधनानंतर घराची व मुलांची संपूर्ण जबाबदारी आहे. पतीच्या अकस्मात मृत्यूनंतर तिच्या मनावर जबर आघात झाला आहे ही सर्व परिस्थिती ज्ञात असून व तक्रारदाराने वेळेवर सर्व कागदपत्रांसह क्लेमफॉर्म दाखल केला असूनही सामनेवालाने सुमारे दोन वर्षाचा अवधी उलटूनही सदर क्लेमवर निर्णय घेतला नाही. तक्रारदाराने पाठपुरावा करुन कायदेशीर नोटीस पाठवून प्रस्तुत मंचासमोर दाखल केलेली तक्रार प्रिमॅच्युअर्ड असल्यामुळै काढून टाकावी असे म्हणणे म्हणजे सामनेवाला विमा कंपनीच्या अकार्यक्षम, बेजबाबदार व गलथान कारभाराचा कळसच आहे. (8) महाराष्ट्र शासनाने आकस्मिक अपघाताने एखादया शेतक-यांचा मृत्यू झाला तर त्याची बायकामुले उघडयावर पडू नयेत. त्याचे घर उध्वस्त होऊ नये या उदात्त हेतुने सदर योजना चालू केली. परंतु सामनेवाला विमा कंपनी आपल्या बेजबाबदार वागण्यामुळे सदर योजनेच्या मूळ पायाभूत हेतुलाच सुरुंग लावत आहे असे या मंचाचे स्पष्ट मत आहे. तक्रारदाराचा क्लेम वेळेवर निर्णय न घेण्यात व सर्व कागदपत्रांसह विमाधारकाचा मृत्यू सिध्द झाल्यानंतरही तक्रारदाराचा विमा क्लेम मंजूर न करण्यात सामनेवालाच्या सेवेत अतिशय गंभीर त्रुटी आहे अशा ठाम निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे व पुढीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते. 2) सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारास विमा क्लेमची रक्कम रु.1,00,000/-(रु.एक लाख फक्त) अदा करावी.सदर रक्कमेवर दि.14/12/2008 पासून ते संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के प्रमाणे व्याज अदा करावे. 3) तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रु.2,000/-(रु.दोन हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चा पोटी रु. 500/-(रु.पाचशे फक्त) अदा करावेत.
| [HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER | |