नि का ल प त्र :- (दि.29/09/2011) (द्वारा-श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला यांनी म्हणणे दाखल केले. सुनावणीचेवेळेस, दोन्ही बाजूंच्या वकिलांनी युक्तिवाद केला. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी, तक्रारदार यांचे पती बाबुराव धोंडी पाटील यांचा जनता व्यक्तीगत अपघात विमा या योजनेअंतर्गत विमा श्री हनुमान वि.का.स. (विकास) सेवा संस्था मर्यादीत, नाधवडे, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर यांचे माध्यमातून सामनेवाला यांचेकडे उतरविलेला होता. विमा पॉलिसीचा क्र. 161600/47/2008/3528 असा आहे. तक्रारदारांचे पती हे शेतामध्ये शेरडांना पाला आणण्याकरिता पिंपरीच्या झाडावर चढले असता झाडावरुन पडून अत्यवस्थ झाले. त्यावेळी आजूबाजूच्या शेतक-यांनी त्यांना औषधोपचाराकरिता उचलून आणत असताना ते शेतामधील वाटेतच मयत झाले. तक्रारदारांनी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसहीत सामनेवाला विमा कंपनीकडे न्याययोग्य क्लेम दाखल केला असता सामनेवाला यांनी दि. 31/03/2011 रोजी “तक्रारदारांचे पतीचा मृत्यू अपघाती नसून आजारामुळे झालेला आहे”असे चुकीचे कारण देऊन तक्रारदारांचा न्याययोग्य क्लेम नाकारलेला आहे. सबब, तक्रारदारांची विमा क्लेमची रक्कम रु. 1,00,000/- द.सा.द.शे. 18 टक्के दि. 20/10/2009 पासून व्याजासहीत मिळावी, मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 25,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रक्कम रु. 3,000/- देणेबाबत आदेश व्हावेत अशी विनंती केली आहे. (3) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत सामनेवाला कंपनीने क्लेम नाकारलेचे पत्र, श्री. मारुती गोविंद पाटील यांचा जबाब, व श्री. हरी सात्तापा पाटील यांचा जबाब, इन्क्वेस्ट पंचनामा फॉर्म, शवपरिक्षेकरिता पाठवायचा पोलिस अहवाल, फायनल ओपिनियन कॉज ऑफ डेथ, पोस्ट मार्टेम रिपोर्ट इत्यादींच्या प्रती व शपथपत्र दाखल केलेले आहे. (4) सामनेवाला विमा कंपनीने त्यांच्या म्हणण्याअन्वये तक्रारदारांच्या तक्रारीतील कथने नाकारलेली आहेत. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, तक्रारदारांची क्लेम मागणी आल्यानंतर सामनेवाला कंपनीने डॉ. अशोक जाधव यांचा इन्व्हेस्टीगेटर म्हणून नेमणूक केली आहे त्यांनी त्यांचा अहवाल दिलेला आहे. त्यांचे अहवालामध्ये तक्रारदारांचे मयत पती बाबुराव धोंडी पाटील यांचा मृत्यू हा हृदयविकाराने झालेला आहे असे नमूद कले ओ. सबब, तक्रारदारांच्या पतीचा मृत्यू हा अपघात नसून हृदयविकाराने झालेला आहे. त्यामध्ये सामनेवाला यांची कोणतीही सेवा त्रुटी नाही. सबब, तक्रारदारांचा तक्रार अर्ज नामंजूर करणेत यावा अशी विनंती केली आहे. (5) सामनेवाला यांनी त्यांच्या म्हणणेसोबत तक्रारदारांचे पतीचे मृत्यूचे कारणांचा दाखला, डॉ. अशोक जाधव यांचा दाखला व पोस्ट मार्टेम रिपोर्ट इत्यादींच्या प्रती व शपथपत्र दाखल केलेले आहे. (6) या मंचाने दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तीवाद ऐकला तसेच उपलब्ध कागदपत्रांचे अवलोकन केलेले आहे. तक्रारदारांच्या पतीचा मृत्यू झालेनंतर तक्रारदारांनी सामनेवाला विमा कंपनीकडे क्लेमची मागणी केलेली नाही. सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारांच्या पतीचा मृत्यू हा हृदयविकाराने झाला आहे या कारणावरुन विमा क्लेम नाकारला आहे. प्रस्तुत प्रकरणी सामनेवाला विमा कंपनीने डॉ. अशोक जाधव यांची इन्व्हेस्टीगेटर म्हणून नेमणूक केलेली आहे. डॉ. अशोक पाटील, इन्व्हेस्टीगेटर यांनी त्यांचा अहवाल दाखल केलेला आहे व तसे शपथपत्रही दाखल केलेले आहे. सदर अहवालाचे व शपथपत्राचे अवलोकन केले असता तक्रारदारांच्या पतीचा मृत्यू हा अपघाती नसून हृदयविकाराच्या कारणावरुन झाल्याचे दिसून येते. सदर तज्ञ मताचा अहवाल विचारात घेता सामनेवाला कंपनीने तक्रारदारांचा विमा क्लेम नाकारला आहे यामध्ये त्यांची सेवात्रुटी दिसून येत नाही या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, आदेश. - आ दे श - 1. तक्रारदारांची तक्रार नामंजूर करणेत येते. 2. खर्चाबाबत कोणतेही आदेश नाहीत.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |