-ः न्यायनिर्णय ः-
(सदर न्यायनिर्णय मा.सौ.सविता भोसले,अध्यक्षा यानी पारित केला)
1. तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रारअर्ज ग्राहक संरक्षण कायदा 1986च्या कलम 12 नुसार दाखल केला आहे. तक्रारअर्जातील थोडक्यात कथन खालीलप्रमाणे-
तक्रारदार हे वाठार, ता.कराड, जि.सातारा येथील कायमस्वरुपी रहिवासी आहेत तर जाबदार ही विमा कंपनी आहे. तक्रारदारानी दुग्धउत्पादनासाठी म्हैशी व गायी सांभाळल्या होत्या. प्रस्तुत व्यवसाय ते स्वतःचे चरितार्थासाठी करीत होते. तक्रारदाराने त्यांचे गायीचा विमा जाबदार क्र.1 कडे उतरविला होता. तक्रारदाराची एच.एफ.जातीची गाय होती. सदर गायीचा रंग काळा-पांढरा, शिंगे टोकाची व शेपटीचा गोंडा पांढरा होता. गायीची बाजारभावाने किंमत रक्कम रु.10,000/- होती. प्रस्तुत गायीच्या विम्याचा हप्ता तक्रारदाराने दि.29-3-2008 रोजी भरला होता. तक्रारदाराची गाय दि.19-1-2009 रोजी मयत झाली. गाय मयत झालेवर तक्रारदाराने जाबदाराकडे विमा क्लेम फॉर्म भरुन दिला, तसेच पशुधन विकास अधिकारी वाठार यांनी तक्रारदारांचे गायीची किंमत मयत होणेसमयी रक्कम रु.10,000/- केली होती. गाय मयत झालेवर दि.5-2-2009 रोजी गायीचा विमा क्लेम फॉर्म भरुन तक्रारदाराने प्रस्तुत पशुधन विकास अधिकारी यांचेतर्फे जाबदार विमा कंपनीकडे कॅटल क्लेम दाखल केला. गायीच्या विम्याचा कालावधी दि.29-3-2008 ते दि.28-3-2009 पर्यंत होता तर पॉलिसी क्र.एस.टी.आर.ए.109369 असा होता.
तक्रारदाराची गाय दि.16-1-2009 रोजी अचानक आजारी पडली व औषधोपचार करुनही गाय दि.19-1-2009 रोजी सायंकाळी मयत झाली. गायीचे पोस्टमार्टेम दि.20-1-2009 रोजी पशुवैदयकीय अधिकारी, वाठार यांनी केले, तसेच पोलिस पाटील वाठार यांचे उपस्थितीत गाय तक्रारदाराचे मालकीचा गट क्र.1311 मध्ये पुरली. तत्पूर्वी पंचाच्यामार्फत सदर मयत गायीचा पंचनामा केला. प्रस्तुत गायीच्या डाव्या कानात मारलेल्या बिल्ल्याचा क्र.ओ.टी.सी./181100, एस.टी.आर/109369 असा होता व दि.19-1-2009 रोजी पंचनामा केला. तक्रारदाराने पशुवैदयकीय अधिकारी वाठार यांचेमार्फत जा.क्र.9/2009 ने गायीचा विमा क्लेम फॉर्म भरुन दि.5-2-2009 रोजी जाबदार क्र.2 यांचेकडे पाठविला होता. क्लेमफॉर्मसोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे कानातील बिल्ल्यासह पाठवली होती. त्यानंतर तक्रारदाराने जाबदार क्र.1 व 2 यांचेशी फोनवरुन गायीच्या क्लेमबाबत विचारणा केली असता जाबदाराने तक्रारदारास उडवाउडवीची उत्तरे दिली व क्लेम मंजूर करणेस टाळाटाळ करीत आहेत. तक्रारदाराने दि.17-3-2010 रोजी जाबदाराना वकीलांतर्फे नोटीस पाठवली, तरीही जाबदाराने क्लेमची रक्कम तक्रारदारास अदा केली नाही त्यामुळे जाबदाराने तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली असल्याने जाबदाराकडून विमा क्लेमची रक्कम व नुकसानभरपाई मिळणेसाठी सदरचा तक्रारअर्ज दाखल केला आहे.
2. तक्रारदाराने सदर कामी गायीच्या विमा क्लेमपोटी रक्कम रु.10,000/-, जाबदार क्र.1 व 2 यांचेकडून वसूल होऊन मिळावेत, सदर रकमेवर अर्ज दाखल तारखेपासून प्रत्यक्ष रक्कम हाती पडेपर्यंत द.सा.द.शे.18 टक्के व्याजाने होणारी रक्कम जाबदार क्र.1 व 2 कडून वसूल होऊन मिळावी, तसेच मानसिक त्रासासाठी रक्कम रु.5,000/- जाबदाराकडून वसूल होऊन मिळावी, अर्जाचा खर्च म्हणून रक्कम रु.3,000/- जाबदाराकडून वसूल होऊन मिळावा अशी विनंती तक्रारदाराने सदर कामी केली आहे.
3. तक्रारदारानी सदर कामी नि.2 कडे प्रतिज्ञापत्र, नि.5 चे कागदयादीसोबत नि.5/1 ते नि.5/10 कडे अनुक्रमे गायीचा विमा क्लेम मिळणेबाबतचा अर्ज, गायीची इन्शुरन्स पॉलिसी, मयत गायीचे विमा दाव्याचे प्रपत्र, मयत गायीचे उपचाराचे प्रमाणपत्र, गायीचा पोस्टमार्टेम रिपोर्ट, मयत गायीचा मृत्यूचा दाखला, पोलिस पाटील वाठार यांचा गाय पुरलेचा दाखला, मयत गायीचा पंचनामा, मयत गायीवर उपचार केलेल्या औषधोपचाराच्या बिलांची पावती, जायका इन्शुरन्स ब्रोकरेज याना पाठवलेली नोटीस, नि.14 कडे पुराव्याचे प्रतिज्ञापत्र, वगैरे कागदपत्रे तक्रारदाराने सदर कामी दाखल केली आहेत.
4. जाबदारांनी सदर तक्रारअर्जास नि.12 कडे कैफियत/म्हणणे दाखल केले आहे. नि.13 कडे म्हणणयाचे प्रतिज्ञापत्र, नि.15 कडे म्हणण्याचे प्रतिज्ञापत्र व म्हणणे हाच पुरावा समजणेत यावा अशी पुरसीस दाखल केली आहे. नि.17 चे कागदयादीसोबत छाननीचा फॉर्म तसेच नि.18 कडे दाखल केलेले म्हणणे व पुरावा हाच युक्तीवाद समजणेत यावा म्हणून दिलेली पुरसीस, नि.20 चे कागदयादीसोबत विमा पॉलिसीची मूळ प्रत, जाबदाराचे मूळ छाननीपत्र, वगैरे कागदपत्रे जाबदाराने मे.मंचात दाखल केली आहेत. जाबदाराने त्यांच्या म्हणण्यामध्ये तक्रारदाराचे तक्रारअर्जातील सर्व कथने फेटाळली आहेत. त्यांनी पुढे म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाचे वतीने सी.ई.ओ.महाराष्ट्र (Live Stock Development Board Akola) जाबदार यांचे नागपूर डिव्हीजन नं.1 येथील डिव्हीजनल मॅनेजर व मे.जायका इन्शुरन्स ब्रोकरेज प्रा.लि. नागपूर हे ब्रोकर यांचेकडे Agreement for live stock Insurance हा तिघांमध्ये करार झाला. कराराचे वेळी या जादबाराचे सर्व पदाधिका-यांना पॉलिसी देताना सर्व अटी व शर्ती समजावून सांगून शंकांचे निरसन झालेनंतर जाबदाराचे नागपूर येथील ऑफिसने सदर पॉलिसी ही Maharashtra Live stock Board प्रतिष्ठान बंगला, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विदयापीठ अकोला यांना समजावून त्यांच्या सर्व शंकांचे निरसन करुन समाधान झालेनंतर पॉलिसी दिली. करारावर तिघांच्या सहया आहेत, तसेच पॉलिसीवर तक्रारदाराची सही आहे. सदर पॉलिसी क्र.181100/4808/2363 हा असून कालावधी दि.19-3-2008 ते 28-3-2009 चे मध्यरात्रीपर्यंत आहे. गायीचा रु.10,000/-चा विमा काढला आहे. तक्रारदाराने मे.गायका इन्शुरन्स ब्रोकरेज यांना पक्षकार केलेले नाही. तक्रारअर्ज मुदतीत नाही, विमाकृत गाय मयत झालेनंतर बारा तासाचे आत सविस्तर टेलिग्राम, नोटीस विमा कंपनीस देणे ही विमा पॉलिसीतील मुख्य अट आहे. तक्रारदाराने घटना घडल्यापासून 14 दिवसाचे आत सर्टिफिकेटसह विमा कंपनीस माहिती देणे विमा पॉलिसीतील अटीप्रमाणे बंधनकारक आहे. या कामी तक्रारदाराने विमा कंपनीस न कळविता दि.5-2-09 चे पत्राने मॅनेजर जायका इन्शुरन्स ब्रोकरेज यांना कळविले आहे. पण या विमा कंपनीस माहिती दिली नाही, पॉलिसीतील अटीप्रमाणे तक्रारदारानी गायीची काळजी घेतली नाही, तसेच गाय आजारी पडलेपासून 12 तासाचे आत आजारपणाबाबतची माहिती कंपनीस कळवली नाही वगैरे पॉलिसीतील अटींचा भंग तक्रारदाराने केल्यामुळे तक्रारदाराचा विमा क्लेम फेटाळणेत आला आहे असे म्हणणे जाबदाराने या कामी दाखल केले आहे.
5. वर नमूद तक्रारदार व जाबदारानी दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन सदर तक्रारअर्जाचे निराकरणार्थ मे.मंचाने खालील मुद्दयांचा विचार केला-
अ.क्र. मुद्दा उत्तर
1. तक्रारदार व जाबदार हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार
आहेत काय? होय.
2. जाबदार विमा कंपनीने तक्रारदाराना सदोष सेवा पुरवली आहे काय? होय.
3. तक्रारदार हे गायीच्या विमा क्लेमची रक्कम मिळणेस पात्र आहेत काय? होय.
4. अंतिम आदेश? शेवटी नमूद केलेप्रमाणे.
विवेचन मुद्दा क्र.1 ते 3-
6. वर नमूद मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत कारण तक्रारदाराने त्यांचे गायीचा विमा विमा पॉलिसी क्र.181100/4808/2363 ने जाबदार विमा कंपनीकडे उतरविला असून ही बाब जाबदारानेही मान्य केली आहे म्हणजेच तक्रारदार व जाबदारांचे दरम्यान विमा करारपत्र झालेने हे सिध्द होते म्हणजेच तक्रारदार व जाबदारांचे दरम्यान ग्राहक व सेवादेणारा असे नाते आहे. तसेच तक्रारदाराची गाय दि.19-1-2009 रोजी मयत झाली. तक्रारदाराने योग्य ती सर्व पूर्तता करुन कानातील बिल्ल्यासोबत गायीचा विमा क्लेम फॉर्म पशुधन विकास अधिकारी, वाठार, जि.सातारा यांचेमार्फत जाबदार कंपनीकडे विमा क्लेम फॉर्म सर्व कागदपत्रासह दाखल केला होता. सदर पशुधन विकास अधिकारी यांनी सदरचा विमा क्लेम जायका इन्शुरन्स ब्रोकरेज यांचेकडे दि.5-2-2009 चे पत्राने पाठविला आहे असे दिसून येते. सदर कामी जाबदाराने सदर गायीचा विमा क्लेम फेटाळणेसाठी घेतलेली कारणे पहाता नि.20/2 कडे जाबदाराने दाखल केलेल्या छाननीपत्राप्रमाणे जी कारणे विमा क्लेम नाकारणेसाठी घेतली होती ती कारणे जाबदाराने पुराव्यानिशी सिध्द केलेली नाहीत. उलट तक्रारदाराने विमा क्लेमसोबत योग्य ती सर्व कागदपत्रे विमा कंपनीकडे सादर केलेचे दिसून येते. तर नि.5/6 कडील गायीच्या मृत्यू दाखल्यावर पशुधन अधिकारी यांनी स्पष्ट नमूद केले आहे की The animal is cared well and good. तसेच कानातील बक्कल असलेचे म्हटले आहे. त्याचप्रमाणे तक्रारदाराने जायका इन्शुरन्स ब्रोकरेज प्रा.लि. यांना वकीलांतर्फे नोटीस पाठविली आहे. विमा क्लेम अदयाप न मिळालेबाबत यावरुन असे स्पष्ट होते की, तक्रारदाराने सर्व ती पूर्तता केलेनंतर सुध्दा जाबदाराने विमा क्लेम मंजूर केला नाही. तक्रारदार हे शेतकरी असल्याने त्यांना विमा पॉलिसीतील सर्व अटी व शर्तींचे ज्ञान आहे असे गृहित धरणे न्यायोचित होणार नाही, त्यामुळे जाबदार विमा कंपनीने तक्रारदाराचे गायीचा विमा क्लेम मंजूर करणे न्यायोचित झाले असते पण तसे झाले नाही. जाबदाराने तक्रारदाराचा विमा क्लेम फेटाळलेचे नि.20/2 कडील छाननी पत्रावरुन दिसून येते. सबब जाबदारानी तक्रारदारास सदोष सेवा पुरविली असल्याचे स्पष्ट होते.
7. सदर कामी तक्रारदारांना त्यांचे गायीच्या विमा क्लेमपोटी रक्कम रु.10,000/- जाबदारांकडून मिळणे न्यायोचित होणार आहे. तक्रारदाराने योग्य त्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करुन पशुधन विकास अधिकारी यांचेमार्फत जायका इन्शुरन्स ब्रोकरेज यांचेकडे विमा क्लेम फॉर्म पाठविला आहे. जायका ब्रोकरेज हे जाबदार विमा कंपनी व विमाधारक यांचेदरम्यान ब्रोकर आहेत त्यामुळे प्रोसीजरप्रमाणे विमा क्लेम हा सदर जायका इन्शुरन्स ब्रोकरेज यांचेकड पशुधन विकास अधिकारी यांचेमार्फत पाठविला आहे हे योग्यच आहे, तसेच गायीची योग्य ती काळजी तक्रारदाराने घेतलेचे गायीच्या मृत्यूच्या दाखल्यावर पशुवैदयकीय अधिका-यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे, त्यामुळे तसेच जाबदाराने विमा क्लेम फेटाळणेसाठी दिलेली कारणे ही चुकीची आहेत असे आमचे स्पष्ट मत आहे. तक्रारदार शेतकरी आहेत, त्यांना विमा कंपनीच्या अटी व शर्तीबाबत माहिती आहे व होती हे गृहित धरणे न्यायोचित होणार नाही, सबब तक्रारदार हे गायीचा विमा क्लेम मिळणेस पात्र आहेत असे आम्हांस वाटते. सबब आम्ही मुद्दा क्र.3 चे उत्तर होकारार्थी दिलेले आहे.
8. वर नमूद विवेचन विचारात घेऊन जाबदार क्र.1 व 2 यांनी तक्रारदारांना गायीच्या विमा क्लेमपोटी रक्कम रु.10,000/- व्याजासह अदा करणे न्यायोचित होईल. सबब आम्ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करीत आहोत-
-ः आदेश ः-
1. तक्रारदारांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2. तक्रारदारांना जाबदार क्र.1 व 2 यांनी विमा क्लेमची रक्कम म्हणून रु.10,000/-(रु.दहा हजार मात्र) अदा करावेत.
3. जादबार क्र.1 व 2 यांनी प्रस्तुत विमा क्लेम रक्कम रु.10,000/-वर अर्ज दाखल तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष तक्रारदाराचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे.9 टक्के व्याज अदा करावे.
4. तक्रारदारास झालेल्या मानसिक त्रासापोटी रक्कम रु.3,000/-(रु.तीन हजार मात्र) जाबदार क्र.1 व 2 ने अदा करावेत.
5. तक्रारअर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.2,000/- (रु.दोन हजार मात्र) जाबदार क्र.1 व 2 ने तक्रारदारास अदा करावेत.
6. वरील आदेशाचे पालन जाबदारानी आदेश पारित तारखेपासून 45 दिवसात करावे.
7. जाबदारानी विहीत मुदतीत आदेशाचे पालन न केलेस तक्रारदार त्यांचेविरुध्द ग्राहक संरक्षण कायदा कलम 25 व 27 अन्वये दाद मागू शकतील.
8. सदरचा न्यायनिर्णय खुल्या मंचात जाहीर करणेत आला.
9. सदर न्यायनिर्णयाच्या सत्यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्य पाठवणेत याव्यात.
ठिकाण- सातारा.
दि. 31-3-2015.
(सौ.सुरेखा हजारे) (श्री.श्रीकांत कुंभार) (सौ.सविता भोसले)
सदस्या सदस्य अध्यक्षा.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.