आदेश पारित द्वारा मा. अध्यक्षा श्रीमती आर. डी. कुंडले 1. तक्रार –जनता व्यक्तिगत अपघात विमा पॉलीसीची रक्कम रू. 1,50,000/- मिळण्याबद्दल दाखल आहे.
2. तक्रारकर्ते हे अज्ञान असून सदर तक्रार त्यांनी त्यांचे संरक्षक पालक श्री. हरिश्चंद्र राजुजी गेडाम (आजोबा – आईचे वडील) यांच्यामार्फत दाखल केलेली आहे. जनता व्यक्तिगत अपघात विमा पॉलीसी ही आईवडील व तक्रारकर्ता 1 अशा तिघांच्या नांवे होती व सदर पॉलीसीचा कालावधी हा दिनांक 13/06/2002 ते 12/06/2006 असा होता. तक्रारकर्त्यांच्या आईवडिलांचा दिनांक 09/04/2005 रोजी खून करण्यात आला. दोन्ही तक्रारकर्ते या घटनेनंतर आजोबा-संरक्षक/पालक श्री. हरिश्चंद्र राजुजी गेडाम यांच्याकडे रायपूर येथे राहावयास गेले. पॉलीसीची देय तारीख 12/06/2006 होती. या तारखेपासून दोन वर्षात तक्रार दाखल न केल्याने विलंब माफीचा अर्ज आहे. विलंबाची कारणे वारसान प्रमाणपत्र तसेच उत्तराधिकार प्रमाणपत्र मिळविण्यात वेळ गेला असे नमूद आहे. त्यावर दिनांक 10/03/2011 रोजी मंचाने विलंब तक्रारकर्त्यांनुसार 2 वर्ष 8 महिने 24 दिवस माफ केल्याबाबत (किरकोळ अर्ज क्रमांक 2/2011) आदेश पारित केला. 3. विरूध्द पक्षाने दिनांक 13/06/2011 रोजी उत्तर व दस्त दाखल केले व दिनांक 24/06/2011 रोजी लेखी युक्तिवाद दाखल केला. त्यानुसार तक्रारकर्त्यांना 4 वर्षे 11 महिन्यांचा उशीर. त्यामुळे कालबाह्य, मुदतबाह्य म्हणून तक्रार खारीज होण्यास पात्र ठरते असे ते म्हणतात. विरूध्द पक्ष यांचा दुसरा हरकतीचा मुद्दा असा आहे की, तक्रार अपरिपक्व आहे. कारण अर्जदारांनी विमा कंपनीकडे कागदपत्रांसह दावा सादर केलेलाच नाही. विरूध्द पक्ष यांची प्रार्थना आहे की, प्रथम तक्रारकर्त्यांना रितसर दावा दाखल करण्याचे निर्देश देण्यांत यावे. दावा प्राप्त झाल्यानंतर विरूध्द पक्ष त्यावर योग्य ती शहानिशा करून निर्णय घेतील. युक्तिवादादरम्यान सुध्दा विरूध्द पक्षाने हा मुद्दा प्रथम विचारात घेण्याची विनंती केली. तक्रारकर्तीच्या वकिलांनी सुध्दा युक्तिवादादरम्यान पुन्हा विरूध्द पक्ष विमा कंपनीकडे दावा सादर करण्याची तयारी दर्शविली. त्यांनी मंचाला विनंती केली की, सदर तक्रार तक्रारकर्त्यांचा तक्रार दाखल करण्याचा हक्क अबाधित राखून निकाली काढण्यात यावी. यावर विरूध्द पक्षाच्या वकिलांनी सुध्दा असे करण्यास त्यांची हरकत नाही असे विधान केले. सबब तक्रारीच्या अन्य तपशीलात न जाता सदर तक्रार कोणाच्याही बाजूने अथवा विरोधात मत प्रदर्शन न करता निकाली काढण्यात येते. आदेश 1. तक्रारकर्त्याची तक्रार निकाली काढण्यांत येते. 2. खर्चाबद्दल आदेश नाहीत.
| HONABLE MR. N. V. BANSOD, MEMBER | HONABLE MRS. R. D. KUNDLE, PRESIDENT | HONABLE MRS. Geeta R Badwaik, Member | |