(आदेश पारित द्वारा मा. अध्यक्ष, श्री. अतुल दि. आळशी)
(पारित दि. 27 जून, 2014)
तक्रारकर्ती श्रीमती लीलाबाई बळीराम सयाम हिने तिच्या पतीच्या अपघाती मृत्युबद्दल महाराष्ट्र शासनाच्या शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजनेअंतर्गत विरूध्द पक्ष यांच्याकडे विमा दावा दाखल केला असता तो विरूध्द पक्ष यांनी मंजूर अथवा नामंजूर केल्याचे तक्रारकर्तीला न कळविल्यामुळे अपघात विम्याची रक्कम रू. 1,00,000/- व्याजासह तसेच नुकसानभरपाई रू. 20,000/- आणि तक्रारीचा खर्च म्हणून रू. 10,000/- मिळण्याकरिता तक्रारकर्तीने सदरहू तक्रार विद्यमान न्याय मंचात दाखल केलेली आहे. तक्रारकर्तीच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालीलप्रमाणेः-
2. तक्रारकर्तीच्या पतीच्या नावाने मौजे खाडीपार, तालुका सडक अर्जुनी, जिल्हा गोंदीया येथे सर्व्हे नंबर 136 या वर्णनाची शेती असून ते व्यवसायाने शेतकरी होते.
3. विरूध्द पक्ष 1 ही विमा कंपनी असून विरूध्द पक्ष 2 ही विमा सल्लागार कंपनी आहे. विरूध्द पक्ष 3 हे शेतकरी व्यक्तिगत अपघात विम्याचे प्रस्ताव अर्ज स्विकारतात. तक्रारकर्ती ही मृतकाची पत्नी असून वारस आहे व तिने विरूध्द पक्ष यांच्याकडे अपघात विम्याचे पैसे मिळण्यासाठी दावा दाखल केला होता. दिनांक 28/04/2009 रोजी त्यांच्या घरचे बैल गोठ्यात बांधत असतांना बैलाने पोटात शिंग मारल्याने जखमी होऊन तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु झाला.
4. तक्रारकर्तीने विरूध्द पक्ष 3 कृषि अधिकारी यांचेमार्फत कागदपत्रासह रितसर अर्ज दिनांक 01/07/2009 रोजी सादर केला. विरूध्द पक्ष 1 यांनी विमा दावा मंजूर अथवा नामंजूर केल्याचे तक्रारकर्तीला न कळविल्यामुळे तक्रारकर्तीने सदरहू प्रकरण विम्याचे पैसे मिळण्यासाठी तसेच शारीरिक व मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई मिळण्यासाठी मंचात दाखल केले आहे.
5. तक्रारकर्तीची तक्रार विद्यमान न्याय मंचाने दिनांक 22/01/2013 रोजी दाखल करून घेतल्यानंतर विरूध्द पक्ष यांना दिनांक 24/01/2013 रोजी मंचामार्फत नोटीसेस बजावण्यात आल्या. विरूध्द पक्ष यांना नोटीस प्राप्त झाल्यानंतर विरूध्द पक्ष 1 व 2 यांनी हजर होऊन त्यांचे लेखी जबाब दाखल केले आहेत. विरूध्द पक्ष 3 यांनी मात्र त्यांचा लेखी जबाब दाखल केलेला नाही.
विरूध्द पक्ष 1 यांनी सदरहू प्रकरणात त्यांचा जबाब दिनांक 27/03/2013 रोजी दाखल केला. विरूध्द पक्ष 1 यांनी त्यांच्या जबाबात असे म्हटले आहे की, तक्रारकर्तीने दाखल केलेली तक्रार ही खोटी असून तक्रारकर्तीची तक्रार मुदतीत दाखल केलेली नसल्यामुळे ती खारीज करण्यात यावी. तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु हा दिनांक 28/04/2009 रोजी झाला असून मृत्युच्या दिनांकापासून 90 दिवसांच्या आंत तक्रारकर्तीने सदरहू विमा दावा अर्ज विरूध्द पक्ष 3 यांच्याकडे तक्रारकर्तीने दाखल करावयास पाहिजे होता. परंतु तक्रारकर्तीने विमा दावा अर्ज 90 दिवसाच्या आंत दाखल न केल्यामुळे तसेच तक्रारकर्तीने मृत व्यक्ती व त्याचे वारस हे शेतकरी असल्याबद्दल कुठलाही पुरावा विमा दाव्यात न केल्यामुळे तक्रारकर्तीची तक्रार खारीज होण्यास पात्र आहे.
विरूध्द पक्ष 2 यांनी आपल्या जबाबामध्ये असे म्हटले आहे की, विरूध्द पक्ष 2 हे सल्लागार असून ते शासनाकडून कुठलाही मोबदला न घेता कार्य करतात. त्यांनी आपल्या जबाबातील परिच्छेद क्र. 4 मध्ये असे म्हटले आहे की, तक्रारकर्तीने 7/12 व जुने फेरफार या त्रुटींची पूर्तता न केल्यामुळे विरूध्द पक्ष 1 यांनी वारसदारास दिनांक 21/01/2010 रोजीच्या पत्रान्वये दावा नामंजूर केल्याचे कळविले.
6. तक्रारकर्तीने तक्रारीसोबत कृषि अधिकारी यांचे पत्र पृष्ठ क्र. 14 वर दाखल केलेले असून अकस्मात मृत्यु समरी पृष्ठ क्र. 16 वर, पोस्टमार्टेम रिपोर्ट पृष्ठ क्र. 25 वर, मृत्यु प्रमाणपत्र पृष्ठ क्र. 33 वर, नमुना 8 पृष्ठ क्र. 34 वर तसेच नमुना 6 पृष्ठ क्र. 35 वर याप्रमाणे कागदपत्रे तक्रारीसोबत दाखल केलेली आहेत.
7. तक्रारकर्तीचे वकील ऍड. उदय क्षीरसागर यांनी लेखी व तोंडी युक्तिवाद केला. तसेच त्यांनी शपथपत्रावरील पुरावा दिनांक 27/05/2013 रोजी दाखल केला. त्यामध्ये तक्रारकर्तीस विरूध्द पक्ष 1 यांचेकडून दावा खारीज झाल्याबद्दल कुठलेही पत्र मिळालेले नाही असे म्हटले आहे. तक्रारकर्तीच्या वकिलांनी युक्तिवादात असे म्हटले आहे की, तक्रारकर्तीने आवश्यक ते कागदपत्र विमा दाव्यासोबत दिली असून विमा दावा अर्ज हा 90 दिवसांच्या आंत दाखल केलेला असल्यामुळे विरूध्द पक्ष 1 यांनी दावा मंजूर अथवा नामंजूर न करणे म्हणजे विरूध्द पक्ष 1 यांच्या सेवेतील त्रुटी दर्शविते. तक्रारकर्तीच्या वकिलांनी माहितीच्या अधिकारात विरूध्द पक्ष 3 यांच्याकडून मागितलेली माहिती असे दर्शविते की, तक्रारकर्तीचा विमा दावा अर्ज विरूध्द पक्ष 3 यांना दिनांक 01/07/2009 ला मिळाला. सदरहू वर्णन हे पृष्ठ क्र. 15 नुसार व संबंधित रजिस्टरमधील entry क्र. 7 नुसार दर्शविते. तक्रारकर्तीने एफ.आय.आर., घटनास्थळ पंचनामा व संबंधित पोलीस स्टेशनचे कागदपत्र तक्रारीत दाखल केलेले असून ते विमा दाव्यासोबत सुध्दा जोडलेले होते. यावरून हे सिध्द होते की, तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु हा अपघाती मृत्यु असून तक्रारकर्ती नुकसानभरपाई मिळण्यास पात्र आहे.
8. विरूध्द पक्ष 1 चे वकील ऍड. आय. के. होतचंदानी यांनी असा युक्तिवाद केला की, ‘The complainant has not come before Forum with clean hands and supress material facts before the forum & therefore the case deserves to be dismissed’. विरूध्द पक्ष 1 यांच्या वकिलांनी असाही युक्तिवाद केला की, तक्रारकर्तीने विरूध्द पक्ष 1 यांना कागदपत्र वेळेत मिळाले असून संपूर्ण कागदपत्र मागणी प्रमाणे दिल्या गेले याबद्दल कुठलाही पुरावा सदरहू प्रकरणात दाखल केलेला नाही. तक्रारकर्तीने विमा दावा विरूध्द पक्ष 3 यांच्याकडे 90 दिवसांत कागदपत्रासह सादर न केल्यामुळे सदरहू प्रकरण खारीज करण्यात यावे. तक्रारकर्ती अपघाताच्या वेळेस शेतकरी होती तसेच वारस सुध्दा शेतकरी होते याबद्दलचा पुरावा विरूध्द पक्ष 1 यांना सादर न केल्यामुळे तक्रारकर्तीचा विमा दावा निकाली काढल्या गेलेला नाही ही विरूध्द पक्ष 1 यांच्या सेवेतील त्रुटी नसल्यामुळे सदरहू प्रकरण खारीज करण्यात यावे.
9. तक्रारकर्तीचा तक्रारअर्ज, विरूध्द पक्ष यांचे लेखी जबाब, तक्रारकर्तीने तक्रारीसोबत दाखल केलेली कागदपत्रे तसेच दोन्ही पक्षांनी दाखल केलेला तोंडी युक्तिवाद यावरून खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ.क्र. | मुद्दे | निर्णय |
1. | तक्रारकर्तीची तक्रार मुदतीत आहे काय? | होय |
2. | तक्रारकर्ती शेतकरी जनता अपघात विम्याचे पैसे मिळण्यास पात्र आहे काय? | होय |
3. | या तक्रारीचा अंतिम आदेश काय? | कारणमिमांसेप्रमाणे |
- कारणमिमांसा –
10. तक्रारकर्तीच्या वकिलांनी माहितीच्या अधिकारामध्ये विरूध्द पक्ष 3 कृषि अधिकारी यांना मागितलेली माहिती व विरूध्द पक्ष 3 यांनी दिलेल्या दिनांक 27/12/2012 रोजीच्या पत्रानुसार दिलेली माहिती ही निश्चितच ग्राह्य धरल्या जाऊ शकते. विरूध्द पक्ष 3 यांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारकर्तीने विरूध्द पक्ष 3 यांच्याकडे शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजनेअंतर्गत दिनांक 01/07/2009 ला म्हणजेच तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु झाल्याच्या दिनांकापासून म्हणजेच दिनांक 28/04/2009 पासून 90 दिवसांच्या आंत दाखल केलेला असल्यामुळे सदरहू विमा दावा अर्ज मुदतीत आहे हे सिध्द होते. विरूध्द पक्ष 3 यांनी माहितीच्या अधिकाराखाली तक्रारकर्तीस दिलेली माहिती व त्यासबंधी दाखल केलेले पृष्ठ क्र. 14 व 15 वरील कागदपत्र हे Public document असल्यामुळे व ते संबंधित कार्यालयातील सक्षम अधिका-याने दिलेली माहिती असल्यामुळे ते कागदपत्र विचारात घेण्याजोगे आहे. त्यामुळे तक्रारकर्तीचा विमा दावा मुदतीत दाखल केलेला असल्यामुळे मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर होकारार्थी दिलेले आहे.
11. तक्रारकर्तीने तक्रारीसोबत दाखल केलेल्या उपविभागीय दंडाधिकारी, गोंदीया यांनी कलम 174 Cr. P. C. नुसार दिलेल्या अहवालानुसार सकृतदर्शनी तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु हा बैलाचे शिंग पोटात लागल्याने झाला असे तपासामध्ये निष्पन्न झाले असे या अहवालात नमूद केलेले आहे. घटनास्थळ पंचनामा व इन्क्वेस्ट पंचनामा यावरून असे सिध्द होते की, तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु हा बैलाचे शिंग पोटात लागल्यामुळे जखमी होऊन झाला. तक्रारकर्तीने पृष्ठ क्र. 25 वर दाखल केलेल्या पोस्टमार्टेम रिपोर्ट वरून सुध्दा हे सिध्द होते की, तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु पोटात जखम होऊन झाला. तक्रारकर्तीने दाखल केलेले संबंधित पोलीस स्टेशनचे कागदपत्र हे Public document असल्यामुळे व त्या कागदपत्राचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु हा बैलाचे शिंग पोटात लागल्याने झालेला आहे. करिता तक्रारकर्तीचा सदरहू दावा मंजूर होण्यास पात्र असल्यामुळे मुद्दा क्रमांक 2 चे उत्तर होकारार्थी देण्यात येत आहे
12. तक्रारकर्तीने तक्रारीसोबत गाव नमुना 7-अ व 12 दाखल केलेला आहे. त्यावरून तसेच फेरफारच्या नोंदीवरून असे सिध्द होते की, तक्रारकर्ती, वारस तसेच तिचे मयत पती यांच्या नावाने शेत जमीन होती. तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु झाल्यानंतर लगेचच त्याचे वारस हे ‘वारस’ या व्याख्येमध्ये समाविष्ट होतात. कागदोपत्री व फेरफार मध्ये त्यांच्या नावाची नोंद होणे ही फक्त तांत्रिक बाब आहे.
13. विरूध्द पक्ष 1 यांनी तक्रारकर्तीचा विमा दावा मंजूर किंवा नामंजूर केल्याबद्दल कुठलेही पत्र अथवा पोस्टाचे रजिस्टर्ड पोस्टल रिसीट सदरहू प्रकरणात दाखल न केल्यामुळे तक्रारकर्तीचा विमा दावा विरूध्द पक्ष 1 यांच्याकडे प्रलंबित आहे हे सिध्द होते. त्यामुळे तक्रारकर्तीची सदरहू तक्रार मंजूर होण्यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे. करिता खालील आदेश.
-// अंतिम आदेश //-
1. तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. विरूध्द पक्ष 1 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्तीला तिच्या मृतक पतीच्या अपघात विम्याची रक्कम रू. 1,00,000/- द्यावी. या रकमेवर विमा दावा दाखल केल्याच्या दिनांकापासून म्हणजेच दिनांक 01/07/2009 पासून ते संपूर्ण पैसे वसूल होईपर्यंत द. सा. द. शे. 7% दराने व्याज द्यावे.
3. विरूध्द पक्ष 1 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्तीला झालेल्या शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासाची नुकसानभरपाई म्हणून रू.5,000/- तक्रारकर्तीला द्यावे.
4. विरूध्द पक्ष 1 यांना आदेश देण्यात येतो की, या तक्रारीचा खर्च म्हणून त्यांनी तक्रारकर्तीला रू. 3,000/- द्यावे.
5. विरूध्द पक्ष 1 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी या आदेशाचे पालन आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसांचे आंत करावे.
6. विरूध्द पक्ष 2 व 3 च्या विरोधात ही तक्रार खारीज करण्यात येते.