न्या य नि र्ण य
द्वारा – मा. सौ मनिषा सं. कुलकर्णी, सदस्या
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रारअर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रारदार यांनी आपले गायीचा विमा वि.प. विमा कंपनीकडे उतरविलेला होता व आहे. पॉलिसीचे कालावधीतच तक्रारदाराचे विमाधारक गायीचा Septicemia, toxemia, shock and death यामुळे मृत्यू झालेने तक्रारदार यांनी आवश्यक ते सर्व कागदपत्रे वि.प. विमा कंपनीकडे देवून क्लेम फॉर्म दाखल केला. तथापि वि.प. विमा कंपनीने वर्णनात तफावत असल्याच्या खोटया व चुकीच्या कारणास्तव तक्रारदार यांचा न्याययोग्य क्लेम नाकारुन तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत गंभीर त्रुटी केलेली आहे असे तक्रारदार यांचे कथन आहे. सबब, प्रस्तुतची तक्रार तक्रारदारास दाखल करणे भाग पडले.
2. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात पुढीलप्रमाणे—
वि.प. विमा कंपनीकडे तक्रारदार यांनी गायीचा विमा उतरविलेला आहे. सदर विमा पॉलिसीचा क्रमाक 161600/47/2018/189 असा असून गायीच्या कानातील बिल्ल्याचा क्रमांक ओआयसी/161600/169730 असा आहे. सदर पॉलिसीची मुदत ही दि. 17/1/2018 ते 16/01/2019 अशी आहे. पॉलिसीचे कालावधीमध्ये तक्रारदार यांचे गायीचा मृत्यू Septicemia, toxemia, shock and death मुळे झाला. सदरची गाय दि. 27/12/2018 रोजी मयत झाली. तदनंतर तक्रारदार यांनी वि.प. विमा कंपनीकडे रक्कम रु.40,000/- इतकी विमा रकमेची मागणी केली असता, वि.प. विमा कंपनीने दि.7/2/2019 रोजीच्या लेखी पत्राद्वारे मृत गायीचे फोटो आणि पॉलिसी घेताना सादर केलेले फोटो यामध्ये गायीच्या वर्णनात विसंगती असलेने दावा देय होत नाही असे चुकीचे कारण देवून त यांचा न्याययोग्य क्लेम नाकारलेला आहे. तक्रारदार यांचे गायीचे कानामध्ये मारलेला बिल्ल्याचा नंबर देखील सर्व कागदांमध्ये स्पष्ट नमूद केलेला आहे. वि.प. यांना सर्व कागदपत्रेही क्लेमफॉर्मसोबत दिलेली आहेत. मात्र तरीसुध्दा तक्रारदार यांचा विमादावा वि.प. विमा कंपनीने नाकारलेला असल्याकारणाने तक्रारदारास सदरची तक्रार दाखल करणे भाग पडले. याकरिता वि.प. विमा कंपनी यांचेकडून रक्कम रु.40,000/- दि 27/12/2018 पासून ते संपूर्ण रक्कम हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 18 टक्के दराप्रमाणे अदा करावी तसेच मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्कम रु.25,000/- व अर्जाचा खर्च रु.5,000/- वि.प. विमा कंपनीकडून देणेचा आदेश व्हावेत असे तक्रारदार यांचे कथन आहे.
3. तक्रारदाराने तक्रारीसोबत शपथपत्र व कागदयादीसोबत वि.प. चे क्लेम नाकारलेचे पत्र, विमादावा फॉर्म, पशु मृत्यू प्रमाणपत्र, शवविच्छेदन अहवाल, पशु मूल्यांकन दाखला, उपचार प्रमाणपत्र, पोलिस पाटील यांचा दाखला, पंचनामा, ग्रामपंचायतदाखला, दुध संस्थेचा दाखला, जनावर खरेदी पावती, मयत जनावराचे फोटो, विमा पॉलिसी व पावती इ. कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच तक्रारदाराने पुराव्याचे शपथपत्र दाखल केले आहे.
4. वि.प. विमा कंपनीस आयोगाची नोटीस लागू झालेनंतर त्यांनी हजर होवून या आयोगासमोर आपले म्हणणे दखल केले. त्यांचे कथनानुसार सदरची तक्रार पूर्णपणे खोटी व चुकीची असल्याकारणने चालणेस पात्र नाही. तक्रारदार यांनी वि.प. यांच्या गायीचा विमा उतरविलेला होता हे मान्य आहे. मात्र सदर पॉलिसी अंतर्गत येणारा कोणताही दावा हा सदर पॉलिसीचे अटी व शर्ती व नियम यांचेवरच अवलंबून असतो व आहे. तक्रारदार यांची जी कथित गाय मयत झाली व ज्या गायीचा विमा वि.प. यांचेकडे उतरविला होता. त्या गायीचे वर्णन जुळत नव्हते. सबब, तक्रारदार यांचा दावा नाकारणेत आलेला आहे. अशा प्रकारे वि.प. कंपनीने कोणत्याही प्रकारची सेवात्रुटी तक्रारदार यांना दिलेली नाही व तक्रारदार यांचा दावा योग्यरित्या नामंजूर केलेला आहे. उलट तक्रारदार हेच आयोगासमोर विमा न उतरविलेल्या जनावराचा खेाटा दावा मागणी करीत आहेत. तक्रारदार यांनी विमा उतरवितेवेळी गायीचे फोटो सोबत दिलेले हेाते तसेच विमा उतरवितेवेळी भरुन दिलेले फॉर्मवर गायीचे वर्णन नमूद केलेले होते. सदरचे फोटो व वर्णनाप्रमाणे विमा उतरविलेल्या गायीच्या कपाळावर पांढरा ठिपका होता. मात्र दि.27/12/2018 रोजी तक्रारदार यांच्या कथित मयत झालेल्या गायीचे फोटो त्यांनी दावा फॉर्मसोबत सादर केले. सदर फोटोची व विमा उतरविलेल्या गायींच्या फोटोंची पडताळणी करता दोन्ही जनावरांच्या वर्णनामध्ये विसंगती आढळून आलेली आहे. मयत गायीचे कपाळावर सदरचा पांढरा ठिपका नव्हता मात्र विमा उतरविलेल्या गायीच्या कपाळावर पांढरा ठिपका होता व त्याची विचारणा केली असता तक्रारदार यांनी कोणतेही समाधानकारक स्पष्टीकरण दिलेले नाही. सबब, वर नमूद कारणास्तव योग्यरित्या तक्रारदार यांचे गायीचा विमादावा नामंजूर केला आहे. सबब, सदरचा तक्रारअर्ज नामंजूर करणेत यावा असे वि.प. यांचे कथन आहे.
5. वि.प. यांनी या संदर्भात पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
6. तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे तसेच वि.प. यांचे म्हणणे, पुरावा व युक्तिवाद यावरुन आयोगासमोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ.क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | तक्रारदार हा वि.प. यांचा ग्राहक होतो काय ? | होय. |
2 | वि.प. यांनी तक्रारदार यांना सेवा देणेत त्रुटी केली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदारांनी केलेल्या मागण्या मिळणेस तक्रारदार पात्र आहे काय ? | होय, अंशतः. |
4 | अंतिम आदेश काय ? | खालीलप्रमाणे |
विवेचन
मुद्दा क्र.1
7. तक्रारदार यांनी वि.प. विमा कंपनीकडे अर्जात नमूद गायीचा विमा उतरविलेला होता. सदर विमा पॉलिसीचा क्रमाक 161600/47/2018/189 असा असून गायीच्या कानातील बिल्ल्याचा क्रमांक ओआयसी/161600/169730 असा आहे. सदर पॉलिसीची मुदत ही दि. 17/1/2018 ते 16/01/2019 अशी आहे. पॉलिसीबाबत उभय पक्षांमध्ये वाद नाही. सबब, तक्रारदार व वि.प. यांचेमध्ये सेवा घेणार व देणार हे नाते निर्माण झाले आहे. याकरिता तक्रारदार हा ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत ग्राहक होतो या निष्कर्षाप्रत हे आयेाग येत आहे.
मुद्दा क्र.2 ते 4
8. तक्रारदार यांनी तक्रारअर्जासोबत सदर गाय मयत झाले दिवशीचा म्हणजेच दि.27/12/2018 रोजीचा पंचनामा तसेच गाय मयत झालेचा दाखला दाखल केलेला आहे. तसेच तक्रारदार यांनी मयत गायीचे फोटोही दाखल केलेले आहेत व ज्या कारणास्तव वि.प. विमा कंपनीने तक्रारदार यांचा दावा फेटाळलेला आहे, ते दावा नांमंजूरीचे पत्रही दाखल केलेले आहे. मात्र वि.प. विमा कंपनीने तक्रारदार यांचा दावा हा तक्रारदार यांचे विमा उतरवितेवेळी जोडलेले गायीचे फोटो व गाय मयत झालेनंतर म्हणजेच दि. 27/12/2011 रोजी दावा फॉर्मसोबत सादर केलेले फोटो यांची पडताळणी केली असता दोन्ही जनावरांच्या वर्णनामध्ये विसंगती आढळून आली असले कारणाने म्हणजेच मयत गायीचे कपाळावर पांढरा ठिपका नव्हता व विमा उतरविलेल्या गायीचे कपाळावर पांढरा ठिपका असलेचे दिसून आले. या कारणास्तव तक्रारदार यांचा विमादावा नामंजूर केलेला आहे. मात्र वि.प.विमा कपंनीने असे जरी आपल्या म्हणण्यामध्ये तसेच लेखी युक्तिवादामध्ये कथन केले असले तरी वि.प. विमा कंपनीने या संदर्भातील कोणतेही गायीचे फोटो दाखल केलेले नाहीत. तक्रारदार यांचे विमा उतरवितेवेळी दाखल केलेले गायीचे फोटो तसेच गाय मयत झाली त्यावेळी असणारे वर्णन अगर त्या गायीचे फोटो हे वि.प. विमा कंपनीने पुरावा म्हणून या आयोगासमोर आणलेले नाहीत. सबब, हा आक्षेप खरा अगर चुकीचा ठरविणे हे योग्य तो पुरावा आयोगासमोर नसलेने अशक्य आहे. सबब, वि.प. विमा कंपनीने घेतलेला हा आक्षेप हे आयोग फेटाळून लावत आहेत व तक्रारदार यांचा विमादावा मंजूर करणेचे निष्कर्षाप्रत हे आयेाग येत आहे. तसेच सदरची रक्कम विमादावा नाकारले तारखेपासून ते संपूर्ण रक्कम तक्रारदाराचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने देणेचे आदेश वि.प. विमा कंपनीस करणेत येतात तसेच तक्रारदाराने मानसिक त्रासापोटी तसेच तक्रारअर्जाचे खर्चापोटी मागितलेली रक्कम अनुक्रमे रु. 25,000/- व रु.5,000/- ही या आयोगास संयुक्तिक वाटत नसलेने मानसिक त्रासापोटी रु.5,000/- व अर्जाचे खर्चापोटी रु.3,000/- देणेचे निष्कर्षाप्रत हे आयेाग येत आहे. सबब, हे आयोग खालील आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2. वि.प. यांनी तक्रारदार यांना रक्कम रु. 40,000/- देणेचे आदेश करणेत येतात. तसेच सदरचे रकमेवर विमादावा नाकारले तारखेपासून संपूर्ण रक्कम तक्रारदाराचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज देणेचे आदेश करणेत येतात.
3. वि.प. यांनी तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रु.5,000/- व अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.3,000/- देणेचे आदेश करणेत येतात.
4. वर नमूद आदेशांची पूर्तता वि.प. यांनी आदेशाचे तारखेपासून 45 दिवसांत करावी.
5. विहीत मुदतीत आदेशांची पूर्तता न केलेस ग्राहक संरक्षण कायदयातील तदतुदींअन्वये कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
6. जर यापूर्वी वि.प. यांनी काही रक्कम तक्रारदार यांना अदा केली असेल तर त्याची वजावट करण्याची वि.प. यांना मुभा राहील.
7. सदर आदेशाच्या प्रती उभय पक्षकारांना विनाशुल्क पाठवाव्यात.