-- आदेश--
(पारित दि. 21-11-2007)
द्वारा- श्रीमती प्रतिभा बा. पोटदुखे, अध्यक्षा -
तक्रारकर्ता श्रीमती सत्यकला दसाराम मालाधारे यांनी दाखल केलेल्या ग्राहक तक्रारीचा आशय असा की,......................
1. त.क.यांचे पती दासाराम चंदर मालाधारे यांच्याकडे वि.प.क्रं. 1 हे विमा पॉलिसी विकण्याकरिता गेले असतात दसाराम यांनी स्वतःच्या नांवे व त.क.क्रं. 1 ते 3 यांचे नांवे पॉलिसी खरेदी केल्या. त्यांचा क्रमांक असा होता.
1. 1) जे.पी.ए.पॉलिसी क्रं. 74321/0017
2. 74321/0018
3. 74321/0019 व
4. 74321/0020
लाईफ कार्ड नं. एम.एच.34/69424 तर पॉलिसीचा कालावधी हा दि. 09.04.03 ते 08.04.08 म्हणजेच 5 वर्षाचा होता.
- त.क.यांचे पती श्री.दासाराम मालाधारे हे दिनांक 17.09.04 ला आजारी पडल्यामुळे त्यांना उपजिल्हा रुग्णालय तुमसर येथे भरती करण्यात आले व ते दि. 18.09.04 ला मरण पावले. त.क. यांनी वि.प.क्रं. 4 यांना विमाकृत रक्कम मिळण्याकरिता लागणारे आवश्यक कागदपत्र 15 दिवसाच्या आत दिले व त्यांनी ते वि.प.यांचे कार्यालयात जमा केले.
- वि.प.क्रं. 2 यांचे पुणे कार्यालयाकडून दि. 20.04.07 ला त.क.क्रं. 1 यांना पत्र आले व कागदपत्र उशिरा आल्यामुळे विमा दावा रद्द करण्याचे त्याद्वारे सुचित करण्यात आले. विमा दावा रद्द करणे ही वि.प.यांच्या सेवेतील कमतरता आहे.
- त.क.यांनी मागणी केली आहे. त.क. यांचा विमा दावा रक्कम रुपये 1,00,000/- व त्यावर दि. 18.09.2004 ते सदर रक्कम हातात पडे पर्यंत 12% व्याजासह वि.प.कडून देण्याचा आदेश करण्यात यावा. तसेच शारीरिक व मानसिक त्रासापोटी रुपये 20,000/- तर ग्राहक तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 5000/- वि.प.कडून मिळण्याचा आदेश व्हावा.
- वि.प.क्रं. 1 यांनी त्यांचे लेखी बयाण निशाणी क्रं. 18 वर दाखल केले आहे. वि.प.म्हणतात की, त्यांच्या विरुध्द तक्रार दाखल करण्यास कोणतेही कारण घडलेले नाही. त्यांना अनावश्यकरित्या तक्रारीत पक्षकार करण्यात आलेले आहे. तक्रार ही कालबाहय झालेली आहे. त.क.हे कोणतीही विमाकृत रक्कम मिळण्यास पात्र नाही. वि.प.क्रं. 1 यांच्या विरुध्द दाखल करण्यात आलेली तक्रार ही खोटी व बनावट असल्यामुळे ती खर्चासह खारीज करण्यात यावी.
- वि.प.क्रं. 2 यांना दि. 01.10.07 रोजी विद्यमान न्याय मंचाचा नोटीस मिळाला परंतु ते विद्यमान न्याय मंचात हजर झाले नाही व ग्राहक तक्रारीचे उत्तर सुध्दा पाठविलेले नाही. म्हणून त्यांच्या विरोधात प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश दि. 29.10.2007 रोजी पारित करण्यात आला.
- वि.प.क्रं. 3 यांनी त्यांचे लेखी बयाण निशाणी क्रं. 19 वर दाखल केले आहे. वि.प.म्हणतात की, दाव्याचे कारण हे विद्यमान न्याय मंचाच्या कार्य सीमेत घडलेले नाही. वि.प.क्र. 2 यांनी पाच समूह जीवन विमा पॉलिसी या त्यांच्याकडून घेतल्या . त्यापैकी पॉलिसी क्रमांक 636532 ही दि. 16.04.2003 ला सुरु होणारी पॉलिसी सुध्दा होती . या पॉलिसीद्वारा 38 व्यक्तिनां प्रत्येकी रुपये 10,000/- या प्रमाणे विमा संरक्षण देण्यात आले होते. मृतक श्री. दसाराम मालाधारे हे या 38 लोकांच्या यादीत होते इतर पॉलिसीशी वि.प.क्रं. 3 यांचा संबंध नाही. या यादीतील एखाद्या व्यक्तिचा पॉलिसी कालावधीमध्ये मृत्यु झाल्यास ही वि.प.क्रं. 2 यांची जबाबदारी होती की, त्यांनी विमा दावा हा वि.प.क्रं. 3 यांच्याकडे पाठवावयास पाहिजे होता. परंतु वि.प.क्रं. 2 यांच्याकडून मृतक श्री. दसाराम मालाधारे यांच्याबाबत कोणताही दावा पाठविण्यात आला नाही. मृत्यु झाल्यानंतर 3 महिन्याच्या आत विमा दावा हा त्यांच्याकडे पाठविला पाहिजे परंतु मृत्युनंतर तीन वर्ष झाल्यानंतर सुध्दा त.क. यांच्या पतीचा दावा त्यांच्याकडे आला नाही. वि.प.क्रं. 3 यांच्या सेवेत कोणतीही न्यूनता नाही, त्यामुळे सदर ग्राहक तक्रार ही खर्चासह खारीज करण्यात यावी.
- वि.प.क्रं. 4 यांनी त्यांचे लेखी बयाण निशाणी क्रं. 15 वर दाखल केले आहे. वि.प.म्हणतात की, सदर ग्राहक तक्रार ही कालबाहय असून विद्यमान न्याय मंचास ती चालविण्याचा अधिकार नाही. त.क. यांनी वि.प.क्रं. 4 यांना कोणतेही कागदपत्र दिले नाही. वि.प.क्रं. 4 हे कोणत्याही पध्दतीने त.क. अथवा त्यांच्या मृतक पतीशी संबधित नाही. वि.प.क्रं. 2 ही नेटवर्क मार्केटींग करणारी कंपनी आहे. वि.प.क्रं. 4 हे वि.प.क्रं. 2 यांचे एजंट नाही व त्यांनी कधीही पॉलिसी मृतक दसाराम मालाधारे यांना विकलेल्या नाही. दाव्याचे कारण हे तुमसर येथे घडलेले असल्यामुळे विद्यमान न्याय मंचास ही तक्रार चालविता येत नाही. वि.प.क्रं. 4 हे कोणत्याही पध्दतीने सदर ग्राहक तक्रारीस जबाबदार नसल्यामुळे त्यांच्या विरुध्दची तक्रार ही खर्चासह खारीज करण्यात यावी.
कारणे व निष्कर्ष
9. त.क. व वि.प.यांनी रेकॉर्डवर दाखल केलेली कागदपत्रे, शपथपत्र, इतर पुरावा व केलेला युक्तिवाद यावरुन असे निदर्शनास येते की, वि.प.क्रं. 2 यांनी त.क.यांना ग्रुप इन्श्युरन्स कव्हर अंतर्गत बिरला सन लाईफ इन्श्युरन्स या कंपनीचे एकूण रुपये 75000/- चे विमा संरक्षण मिळवून दिले होते. परंतु त.क.यांनी बिरला सन लाईफ इन्श्युरन्स या विमा कंपनीस सदर ग्राहक तक्रारीत पक्षकार (पार्टी) केलेले नाही.
10. वि.प.क्रं. 3 भारतीय जीवन विमा निगम, शाखा- शिवाजीनगर, पुणे यांनी त.क. यांना रुपये 10,000/- चा धनादेश क्रं. 84524 दि. 02.11.2007 रोजी पाठविला असल्याबद्दलची माहिती पुरसीस द्वारा विद्यमान न्याय मंचात सादर केली आहे.
11. वि.प.क्रं. 1 ओरियण्टल इन्श्युरन्स कंपनी यांच्या द्वारे त.क.यांच्यासाठी घेतल्या गेलेली पॉलिसी ही रुपये 1,00,000/- ची असल्याचे दिसून येते. ही पॉलिसी जनता पर्सनल अक्सिडंट पॉलिसी आहे. मात्र त.क.यांनी त्यांच्या ग्राहक तक्रारीत त.क.यांचा मृत्यु दि. 17.09.04 रोजी आजारी पडल्यामुळे उपजिल्हा रुग्णालय तुमसर येथे झाला असे नमूद केले आहे. सदर पॉलिसी ही अपघात पॉलिसी असल्यामुळे व त.क.यांचे पती हे अपघाताने नाही तर नैसर्गिक रित्या मृत पावल्यामुळे सदर पॉलिसीचा फायदा हा त.क.यांना मिळू शकत नाही.
असे तथ्य व परिस्थिती असतांना सदर आदेश पारित करण्यात येत आहे.
आदेश
तक्रारकर्ता यांची तक्रार ही खारीज करण्यात येत आहे.