जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, नंदेड प्रकरण क्र.175/2008. प्रकरण दाखल दिनांक – 13/05/2008. प्रकरण निकाल दिनांक –26/08/2008. समक्ष - मा.श्री.विजयसिंह नारायणसिंह राणे अध्यक्ष. मा.श्रीमती. सुजाता पाटणकर. सदस्या. मा.श्री.सतीश सामते सदस्य. श्री.व्यंकट पि.शामराव जाधव, अर्जदार. वय वर्षे 35, व्यवसाय नोकरी, रा.राणसुगांव पो.घुंगराळा ता.नायगांव बाजार, जि.नांदेड. विरुध्द. व्यवस्थापक, गैरअर्जदार. दि.ओरिएंटल इंश्योरंस कंपनी लि, संतकृपा मार्केट, गुरु गोविंदसिंघ, नांदेड. अर्जदारा तर्फे. - अड.पी.बी. आयचित. गैरअर्जदारा तर्फे - अड.पी.एस.भक्कड. निकालपत्र (द्वारा,मा.श्री.विजयसिंह नारायणसिंह राणे,अध्यक्ष) यातील अर्जदार यांची थोडक्यात तक्रार अशी की, त्यांचे वाहन क्र.टाटा सुमो क्र. एम.एच.26 एल.753 चा गैरअर्जदार यांचेकडे पॉलिसी क्र.16/502/31/2005/5058 द्वारे विमा काढला होता. सदरील वाहनास दि.30/11/2005 रोजी ब-हाणपुर (मध्यप्रदेश) पोलिस स्टेशन शिकारपुरा अंतर्गत ट्रक क्र.ए.आर.38 के 7850 च्या चालकाने धडक दिल्याने अपघात होऊन सदर गाडीचे नुकसान झाले. अपघातानंतर याबाबत अर्जदाराने गैरअर्जदाराचे कार्यालयात माहीती देऊन घटनास्थळाची पाहणी अंतिम पाहणी करण्यात आली. अर्जदार यांना आवश्यक ती कागदपत्र सादर करण्यास सांगितले. अर्जदाराने टाटा मोटर्स कंपनीचे बाफना मोटर्स प्रा.ली. येथे जाऊन अपघातग्रस्त वाहनाचे इस्टीमेट गैरअर्जदार यांचेकडे सादर केले. अर्जदारास ब-हाणपुर) मध्यप्रदेश येथुन इस्टीमेट आणण्यासाठी रु.10,000/- व बाफना मोटर्स येथील पार्कींग चार्जेस म्हणुन रु.6,000/- नगदी भरावे लागले. संपुर्ण वाहनाचे दुरुस्ती इस्टीमेट रु.4,23,877/- चे आहे व गैरअर्जदाराने ते देण्याचे कबुल केले आहे. गैरअर्जदारांनी अचानकपणे दि.17/07/2006 रोजी अर्जदारास एक पत्र पाठवुन असे कळविले की, अपघातग्रस्त वाहनाचे वाहन चालकाकडील परवाना हा दि.24/09/2005 पर्यंत वैध होता आणि तो पुढे नुतनीकरण करण्यात आला नाही व वाहनास दि.31/11/2005 रोजी अपघात झाला त्या दिवशी वाहन चालकाचा चालक परवाना हा नुतनीकरण झालेला नव्हता. त्यामुळे क्लेम देय नाही आणि त्यांचा क्लेम फेटाळला. त्यामुळे अर्जदारास मानसिक त्रास झाला. म्हणुन अर्जदाराने ही तक्रार दाखल करुन तीद्वारे नुकसान भरपाई रक्कम रु.4,23,877/- तीवर 12 टक्के व्याजासह गैरअर्जदार यांचेकडुन मिळावे अशी मागणी केली आहे. यात गैरअर्जदार यांना नोटीस देण्यात आली त्यांनी हजर होऊन आपला लेखी जबाब दाखल केला. त्यांचे म्हणणे असे की, अर्जदारास ही तक्रार दाखल करण्याचा अधिकार नाही. सदरील प्रकरण संक्षिप्त पध्दतीने निकाली निघु शकत नाही. यात तक्रारकर्ते व साक्षीदार यांना जिरा करणे जरुरी आहे म्हणुन हे प्रकरण चालविण्याचा मंचास अधिकार नाही. सदरील प्रकरण मुदत बाहय आहे. अर्जदार यांनी विमा पॉलिसीचे उल्लंघन केलेले आहे. अपघाताच्या वेळेस सदरील वाहन हे श्री.गोविंद आनंदा नादरे हे चालवित होते. अपघाताच्या दिवशी त्यांचेकडे वाहन चालविण्याचा वैध परवाना नव्हता. परवान्याची मुदत संपलेली होती व परवाना नुतनीकरण केलेला नव्हता. गैरअर्जदार यांनी केलेली कार्यवाही कायदेशिर आहे. अपघातानंतर श्री.बी.एस.शिंदे यांना सर्व्हेअर म्हणुन नेमले होते श्री.बी.एस.शिंदे यांनी सर्व्हे रिपोर्ट दि.01/03/2006 रोजी दाखल केलेला आहे. सर्व्हेअरच्या रिपोर्टप्रमाणे अर्जदार यांचे रु.2,51,520.14 चे नुकसान झाले आहे. परंतु अर्जदाराचे वाहन पुर्ण नुकसानीत गेलेले नाही. अर्जदाराने बाफना मोटर्सचा दिलेले इस्टीमेटचे विचार करुन व प्रत्यक्ष पाहणी करुन घसा-याची रक्कम काढुन सर्व्हेअरने आपला रिपोर्ट दिलेला आहे. ब-हाणपुर ते नांदेड येथे वाहन आणण्या करीता लागलेला खर्च व पार्कींग चार्जेस देण्याची जबाबदारी गैरअर्जदाराची नाही. गैरअर्जदार यांनी अर्जदार यांचे क्लेम नाकारुन कोणतीही सेवेत त्रुटी केलेली नाही. अर्जदाराने केलेली इतर सर्व विपरीत विधाने नाकबुल केली आणि असा उजर घेतला की, अर्जदार यांचा तक्रारअर्ज खर्चासह फेटाळण्यात यावा. अर्जदार यांनी आपल्या तक्रारअर्जा सोबत दि.11/03/2006 रोजी गैरअर्जदार यांनी अर्जदारास कागदपत्र सादर करण्यास दिलेले पत्राची झेरॉक्स प्रत, दि.17/07/2006 रोजी विमा क्लेम नाकारल्याचे पत्राची प्रत, अपघातग्रस्त वाहनाचे इस्टीमेटची झेरॉक्स प्रत, पार्कींग चार्जेसची पावती दि.10/01/2006 आणि शपथपत्र दाखल केलेले आहे. गैरअर्जदार यांनी आपल्या जबाबासोबत शपथपत्र आणि वाहन चालकाचे दि.02/05/2006 चे परवान्याची मुळ प्रत, मोटर फायनल सर्व्हे रिपोर्टची मुळ प्रत आणी पॉलिसी इ.कागदपत्र दाखल केले आहेत. अर्जदार व गैरअर्जदार यांचे तर्फे युक्तीवादाच्या वेळी कोणीही हजर नाही. यातील विवादाचा मुद्या एवढाच आहे की, वाहन चालकाकडे अपघाताच्या दिवशी चालक परवाना नव्हता. त्यांचेकडे असलेले वाहन परवाना दाखल दस्तऐवजाप्रमाणे दि.24/09/2005 रोजी संपला होता आणि अपघात हा दि.30/11/2005 रोजी झाला. परवान्याचे नुतणीकरण करण्यात आलेले नव्हते आणि यामुळे विमा कंपनीने क्लेम नाकारला आहे. या संबंधीचा युक्तीवाद करतांना अर्जदारा तर्फे मा.राजस्थान राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग, प्रताप चंद विरुध्द नॅशनल इंशुरन्स कंपनी लि, यांच्यातील प्रकरणांत मा.राज्य आयोगाने दिलेला निकाल जो I (2007) CPJ 26, या ठिकाणी प्रकाशीत झालेला आहे. यावर अर्जदाराने आपली भिस्त ठेवली. त्यामध्ये मा.राज्य आयोगाने संबधीत चालक हा चालक परवाना जरी नुतनीकरण न केल्यामुळे मुदत संपली होती तरी वाहन चालविण्यासाठी अपात्र ठरविलेले नव्हते. त्यामुळे विमा कंपनीची जबाबदारी टळु शकत नाही असा स्पष्ट निकाल दिलेला आहे. आमच्या समोरील प्रकरणांत तीच वस्तुस्थिती आहे, संबंधीत चालक हा वाहनाचा परवाना पुढे नुतनीकरण करुन घेण्यासाठी अपात्र ठरलेला होता हे सिध्द करण्याची जबाबदारी विमा कंपनीची आहे. विमा कंपनीने तसा कोणताही पुरावा समोर आणलेला नाही. त्यामुळे विमा कंपनीच्या सदरील आक्षेपात वीशेष तथ्य नाही. अर्जदाराने या प्रकरणांत एकुण नुकसान भरपाईची किंमत रक्कम रु.4,23,877/- इस्टीमेटप्रमाणे मागीतली आहे मात्र यात सर्व्हेरने वाहनाचा सर्व्हे करुन रिपेअर बेसीसवर विमाकंपनीने देय रक्कम ही रु.2,41,020/- सॉलवेज वगळुन ठरविलेली आहे आणि सदर सर्व्हेअर यांनी काढलेला निष्कर्ष हा चुकीचा आहे असे अर्जदार दर्शवू शकले नाही. यास्तव तेवढी रक्कम विमा कंपनीने अर्जदारांना देणसंबंधी आदेश करणे योग्य होईल असे आम्हास वाटते. वरील सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश. 1. अर्जदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजुर करण्यात येतो. 2. गैरअर्जदार यांनी अर्जदारास रु.2,41,020/- तीवर क्लेम नाकरल्याची तारीख दि.17/07/2006 पासुन प्रत्यक्ष रक्कमेच्या अदायगी पावेतो द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दराने मिळुण येणारी रक्कम द्यावी. 3. गैरअर्जदार यांनी अर्जदारास तक्रारीचा खर्च रु.1,000/- द्यावी. 4. आदेशाचे पालन एक महिन्यात करावे. 5. पक्षकारांना निकाल कळविण्यात यावा. (श्री.विजयसिंह नारायणसिंह राणे)(श्रीमती.सुजाता पाटणकर)(श्री.सतीशसामते) अध्यक्ष. सदस्या सदस्य गो.प.निलमवार, लघुलेखक. |