निकालपत्र :- (दि.10/11/2010) (सौ.प्रतिभा जे.करमरकर,सदस्या) (1) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी:- तक्रारदार यांचे पती मयत रमेश दादू गुरव यांनी महाराष्ट्र शासनामार्फत सामनेवाला विमा कंपनीकडे शेतकरी वैयक्तिक अपघात विमा पॉलीसी उतरवली असून सदर पॉलीसीचा क्र.181200/48/2009/939 असा आहे. सदर पॉलीसीच्या कालावधीतच दि.15/09/2008 रोजी तक्रारदारचे पती रमेश दादु गुरव हे मोटरसायकलवरुन प्रवास करत असताना टेंम्पोच्या जोरदार धडकेमुळे गंभीर जखमी झालेने त्यांना त्वरीत दवाखान्यात उपचार सुरु केले. परंतु सदर उपचाराच्या दरम्यानच ते दि.23/12/2008 रोजी मयत झाले. तदनंतर तक्रारदारांनी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसहीत सामनेवालांकडे शासनाने नियुक्त केलेल्या अधिकारीमार्फत क्लेम केला असता सामनेवाला यांनी दि.05/04/2010 रोजी ‘’अपघातावेळी तक्रारदाराचे पतीकडे वाहनाचा परवाना नव्हता’’ अशा अत्यंत चुकीच्या कारणाने क्लेम नाकारलेला आहे. वास्तविक तक्रारदाराचे पती मयत रमेश गुरव यांचेकडे वाहन चालवण्याचा वैध परवाना होता व अपघाताच्या वेळी तो त्यांच्याबरोबरच होता. परंतु सदर अपघातामध्ये तो गहाळ झाला व त्यानंतर तक्रारदारांना तो मिळू शकला नाही. सामनेवालाने विमा क्लेम फॉर्मसोबत वाहनाच्या परवान्याची मागणी केली नसल्यामुळे तक्रारदाराने त्याबाबत आर.टी.ओ.यांचेकडून संबंधीत परवान्याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला नाही. तसेच तक्रारदार या अडाणी अशिक्षीत असल्यामुळे व त्यांना पतीच्या ड्रायव्हींग लायसन्सचा नंबर माहित नव्हता. नंबर असल्याशिवाय आर.टी.ओ.कडून त्यासंबंधी माहिती मिळू शकत नाही.पंरतु मयत रमेश गुरव यांच्याकडे अधिकृत ड्रायव्हींग लायसन्स असूनही त्यांचा न्याययोग्य क्लेम बेजबाबदारपणे नाकारणे ही सामनेवालाच्या सेवेतील गंभीर त्रुटी आहे. म्हणून त्याविरुध्द दाद मागण्यासाठी तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे व आपल्या पुढीलप्रमाणे मागण्या मान्य व्हाव्यात अशी विनंती केली आहे. पॉलीसीची रक्कम रु.1,00,000/- द.सा.द.शे.18 व्याजासह तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु.25,000/-व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.2,000/- सामनेवाला यांचेकडून वसुल होऊन मिळावेत अशी विंनती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे. (02) तक्रारदाराने आपल्या तक्रारीसोबत सामनेवाला यांचे क्लेम नाकारलेचे पत्र, सी.पी.आर.हॉस्पिटलचा पोस्ट मार्टेम रिपोर्ट, खबरी जबाब, पोलीस पंचनामा, इन्क्वेस्ट पंचनामा, पोलीस अहवाल इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. (03) सामनेवाला यांनी आपल्या लेखी म्हणणेमध्ये तक्रारदाराची विमा पॉलीसी मान्य केली आहे. परंतु तक्रारदाराच्या इतर सर्व कथनाला तीव्र आक्षेप घेतला आहे. सामनेवालांच्या वकीलांनी आपल्या युक्तीवादारत पुढे असे म्हटले आहे की, शेतकरी अपघात विमा योजनेसंदर्भात 6 सप्टेंबर-2008 च्या शासन निर्णयाव्दारे नियमात सुधारणा करण्यात आली असून अ.क्र.23(इ)8 या कलमाव्दारे ‘’ जर शेतक-याचा मृत्यू वाहन अपघातामुळे झाला असेल व अपघातग्रस्त शेतकरी स्वत: वाहन चालवत असेल तर अशा प्रकरणी वैध वाहन चालवण्याचा परवाना (Valid driving license) सादर करणे आवश्यक राहील.’’ अशी अट घालण्यात आली आहे. उपरोक्त अटीप्रमाणे सामनेवाला यांनी तक्रारदाराकडे मागणी करुनही तक्रारदाराने मयत रमेश गुरव यांचे ड्रायव्हींग लायसन्स हजर केले नाही. त्यामुळे पूर्ण विचार करुनच सामनेवालाने तक्रारदाराचा क्लेम नामंजूर केला आहे व त्यामध्ये सामेनवालांच्या सेवेची कुठलीही त्रुटी नाही. सबब प्रस्तुतची तक्रार खर्चासह नामंजूर करावी अशी मागणी सामनेवालाने केली आहे. (04) सामनेवाला यांनी आपल्या लेखी म्हणणसोबत महाराष्ट्र राज्य शासनाचा जी.आर. व सामनेवाला विाम कंपनीचे पॉलीसी शेडयुल दाखल केले आहे. (05) या मंचाने दोन्ही बाजूंच्या वकीलांनी दाखल केलेले कागदपत्र तपासले तसेच दोन्ही बाजूंच्या वकीलांनी केलेला युक्तीवादही ऐकला. (06) सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदाराची विमा पॉलीसी मान्य केली आहे. त्यामुळे तक्रारदाराचे मयत पती सामनेवालाचे ग्राहक होते हे निर्विवाद आहे. सामनेवाला विमा कंपनीच्या वकीलांनी शेतकरी अपघात विमा योजनेच्या अटी संदर्भातील शुध्दीपत्रक दाखल केले असून त्याप्रमाणे अपघातग्रस्त शेतक-याचे ड्रायव्हींग लायसन्स क्लेमपेपर्ससोबत दाखल करणे आवश्यक आहे हे सामनेवालाचे कथन आम्ही ग्राहय धरतो. तक्रारदाराच्या वकीलांनी अपघाताच्या वेळी मयत रमेश गुरव स्वत: वाहन चालवत होते असे कथन केले आहे. पोलीस पंचनाम्यातही सदर बाब स्पष्ट झाली आहे. वाहनचालकाने ड्रायव्हींग लायसन्स स्वत: जवळ बाळगणे आर.टी.ओ.च्या नियमाप्रमाणे आवश्यक आहे. त्याप्रमाणे मयत रमेश गुरव यांचे ड्रायव्हींग लायसन्स त्यांच्याजवळच होते व ते अपघाताच्या वेळी गहाळ झाले आहे असे तक्रारदाराचे कथन आहे. मयत रमेश गुरव यांच्या विधवा पत्नी या अशिक्षीत अडाणी असल्याने त्यांना आपल्या पतीच्या ड्रायव्हींग लायसन्सचा नंबर माहित नव्हता असे त्यांचे कथन आहे. ड्रायव्हींग लायसन्सचा नंबर माहित नसल्यास लायसन्सबाबत माहिती देता येत नाही असे पत्र आर.टी.ओ.ऑफिसने प्रस्तुत मंचा समोर दाखल केलेल्या ग्राहक तक्रार क्र.300/2009(मिनाक्षी शिंदे वि. ओरिएन्टल इन्शु. कं.) व ग्राहक तक्रार क्र.133/2009(मिनाक्षी शिंदे वि.बजाज अलायन्स इन्शु. कं.) या कामामध्ये दि.18/06/2008 रोजी दाखल केले होते. त्यामुळे लायसन्सचा क्रमांक माहित नसल्यामुळे त्यासंबंधी माहिती देता येत नाही हे तक्रारदाराचे कथन हे मंच ग्राहय धरत आहे. (07) सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदाराची विमा पॉलीसी, अपघाताची घटना व पतीचा अपघाताने झालेला मृत्यू इत्यादी सर्व घटना मान्य केल्या आहेत. केवळ वैध लायसन्स तक्रारदार हजर करु शकत नसल्यामुळे तक्रारदाराचा क्लेम सामनेवालाने नामंजूर केला आहे. मा. सर्वोच्च न्यायालयाने पूनमदेवी विरुध्द दि न्यु इंडिया अशोरन्स 2004 या केसमध्ये निकाल देताना असे स्पष्ट केले आहे की, अपघातातील ड्रायव्हरकडे वैध लायसन्स नव्हते अशा कारणाने जर विमा कंपनीने एखादया विमाधारकाचा विमा क्लेम नाकारला तर ड्रायव्हरजवळ वैध लायसन्स नव्हते हे सिध्द करण्याची जबाबदारी (Burden of Proof) सामनेवाला विमा कंपनीवर राहते. (08) मा. सर्वोच्च न्यायालयाच्या वरील निकालपत्राच्या प्रकाशझोतात प्रस्तुत तक्रारीचा विचार करता प्रस्तुत प्रकरणी तक्रारदाराचा न्याय विमा क्लेम नामंजूर करणे ही सामनेवालाच्या सेवेतील निश्चित व गंभीर त्रुटी आहे या स्पष्ट निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे व पुढीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते. 2) सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारास विमा क्लेमची रक्कम रु.1,00,000/-(रु.एक लाख फक्त) अदा करावी.सदर रक्कमेवर दि.05/04/2010 पासून ते संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के प्रमाणे व्याज अदा करावे. 3) तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चा पोटी रु. 1,000/-(रु.एक हजार फक्त) अदा करावेत.
| [HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER | |