निकालपत्र :- (दि.25/10/2010) ( सौ.प्रतिभा जे.करमरकर,सदस्या) (1) तक्रारीची थोडक्यात हकीगत अशी की – तक्रारदार यांचे पती व्यवसायाने शेतकरी होते व त्यांनी शासनाच्या शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत सामनेवाला विमा कंपनीकडे विमा उतरविला होता. यातील तक्रारदार यांचे मयत पती श्री एकनाथ ज्ञानदेव मस्कर हे दि.30/10/2007 रोजी आपले मालकीचे शेतात वैरणीचा भारा आणणेसाठी गेले असता बांधावरुन पाय घसरुन खाली पडलेने त्यांच्या मानेच्या मणक्याला गंभीर दुखापत झालेने त्यांना सी.पी.आर.हॉस्पिटल, कोल्हापूर येथे अडमिट केल. तेथून आधार नर्सिंग होम कोल्हापूर येथे उपचारासठी दाखल करुनही त्यांच्या प्रकृतीमध्ये काहीही सुधारणा झाली नाही. त्यांचा दि.22/11/2007 रोजी मृत्यू झाला. त्यानंतर दि.11/04/2008 रोजी सर्व आवश्यक कागदपत्रांवर क्लेम फॉर्म भरुन सामनेवाला विमा कंपनीकडे दाखल केला होता व आहे. परंतु सामनेवाला विमा कंपनीने ‘’मयत एकनाथर ज्ञानदेव मस्कर यांचा मृत्यू शेतात पडल्यामुळे अपघात होऊन उपचार सुरु असताना अर्ध्यातच उपचार डॉक्टरांच्या सल्ल्याविरुध्द जाऊन बंद केल्यामुळे झाला असे सदर कागदपत्रावरुन दिसून येते यामुळे क्लेम नामंजूर केला आहे.’’ असे पत्राने कळवले. तक्रारदाराचे पतीचा अपघाताने मृत्यू झालेला असलेने विमा क्लेम मंजूरीस पात्र होता व आहे. परंतु सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदाराचा विमा क्लेम नामंजूर करुन सेवेत त्रुटी केली आहे व सामनेवाला यांचे सदरचे कृत्य हे बेकायदेशीर आहे. तक्रारदार या गरीब, अर्धशिक्षीत विधवा असून मौजे पारदेवाडी, भुदरगड तालुक्यातील दुर्गम भागात राहतात. पतीच्या अपघाती निधनानंतर कुटूंबाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर पडली. सामनेवालाने अन्यायाने व बेजबाबदारपणे तक्रारदारचा न्याय क्लेम नामंजूर केल्यामुळे तक्रारदार व तिच्या कुटूंबावर उपासमारीची वेळ आली आहे. सामनेवालाच्या या गंभीर सेवा त्रुटी विरुध्द दाद मागण्यासाठी तक्रारदाराने प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे व आपल्या पुढील मागण्या मान्य व्हाव्यात अशी विनंती केली आहे. विमा क्लेमची रक्कम रु.1,00,000/-द.सा.द.शे.18 टक्के व्याजासह सामनेवाला यांचेकडून मिळावी अशी विनंती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे. (3) तक्रारदाराने आपल्या तक्रारीसोबत तहसिलदार यांचेकडे केलेला अर्ज, क्लेम फॉर्म, तलाठयाचे प्रमाणपत्र, प्रतिज्ञापत्र, मृत्यूचा दाखला, मेडिकल बीलाच्या पावत्या, मेडिकल केस पेपर्स(रेकॉर्ड), लॅब रिपोर्टस, केस पेपर, संमत्ती पत्र, अॅपल हॉस्पिटलचे रिपोर्ट, आधार हॉस्पिटलचे पेशंट फाईल, डिस्चार्ज कार्ड, पावती, बील समरी, गावकामगार पोलीस पाटील यांचेसमारचा पंचनामा, व दाखला, डायरी क्र.289 चा उतारा, मयताचे वारसा नोंद डायरी उतारा, गट नं.161, 15, 22 चा 7/12 उतारा, तक्रारदारचे मतदान ओळखपत्र, मयताचे ओळखपत्र,रेशन कार्ड, सामनेवाला यांचे पत्र इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. (4) सामनेवाला यांनी आपल्या लेखी म्हणणेमध्ये तक्रारदाराच्या मयत पतीची विमा पॉलीसी मान्य केली आहे. परंतु इतर सर्व कथनाला तीव्र आक्षेप घेतला आहे. सामनेवाला विमा कंपनी आपल्या कथनात पुढे असे सांगतात, तक्रार अर्जातील कलम 5 व 6 मधील मजकूर चुकीचा व वस्तुस्थितीस सोडून आहे. सबब सामनेवाला यांना मान्य व कबूल नाही. सदर कलमातील मजकूर तक्रारदाराचे पती वैरणीचा भारा आणणेसाठी गेले असता बांधावरुन पाय घसरुन पडलेने त्यांचे मणक्याला मार लागलेने त्यांचा मृत्यू झाला त्याबाबतचा क्लेम दि.11/04/2008 रोजी सर्व कागदपत्रांसह सामनेवाला कंपनीकडे केला आहे. सदरचा क्लेम मंजूरीस पात्र होता व आहे. सदर क्लेमबाबत विनाविलंब सेवा पुरविणेची जबाबदारी सामनेवाला यांची होती व आहे. त्यामध्ये सामनेवाला यांचा प्रचंड हयगय व त्रुटी केली आहे व सामनेवाला कंपनीचे कृत्य हे बेकायदेशीर असून सामनेवाला कंपनीने तक्रारदार यांना सुलभ व विनाविलंब सेवा पुरविली नाही इत्यादी सर्व मजकूर चुकीचा व खोटा आहे. तसेच सामनेवाला कंपनीने सदरचा क्लेम ‘’ मयत एकनाथ ज्ञा.म्हस्कर यांचा मृत्यू शेतात पडल्याने अपघात होऊन उपचार सुरु असताना डॉक्टर सल्लयाविरुध्द जावून मध्यातच उपचार बंद केल्यामुळे झाला आहे असे कागदपत्रावरुन स्पष्ट दिसून येते. त्यामुळे नामंजूर केला आहे व तसे तक्रारदार यांना सामनेवाला विमा कंपनीने ताबडतोब कळविले आहे. यावरुन सामनेवाला कंपनीने आपल्या सेवेमध्ये कोणतीही त्रुटी ठेवलेली नव्हती हे स्पष्ट होते. तसेच मयताच्या मुलगा व मुलगी यांना याकामी पार्टी केले नाही. तसेच तक्रारदाराने आपला क्लेम मुदतीत दाखल केला नसलेने चालणेस पात्र नाही. सबब तो खर्चासह नामंजूर करावा अशी विनंती सामनेवाला यांनी सदर मंचास केली आहे. (5) सामनेवाला यांनी आपल्या लेखी म्हणणेसोबत महाराष्ट्र शासन शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेची प्रत दाखल केली आहे. (6) या मंचाने दोन्ही बाजूंच्या वकीलांचे युक्तीवाद ऐकले. तसेच दोन्ही बाजूंनी दाखल केलेले कागदपत्र तपासले. तक्रारदाराच्या मयत पतीची विमा पॉलीसी सामनेवाला यांना मान्य आहे. मयत एकनाथ मस्कर यांचा मृत्यू अपघाताने पाय घसरुन पडल्यामुळे मानेचा मणका मोडून झाला हे तक्रारदाराने पुराव्याने सिध्द केले आहे व ते सामनेवाला यांना मान्य आहे. सामनेवालाने तक्रारदाराचा क्लेम ‘डॉक्टरांच्या सल्लयाविरुध्द मयत विमाधारकाला हॉस्पिटलमधून हलवले व उपचार बंद केले त्यामुळे मयत एकनाथ मस्कर यांचा मृत्यू झाला. त्यामुळे पॉलीसीतील अटी व शर्तीचा पूर्ण विचार करुन तक्रारदाराच्या पतीचा मृत्यू हा ‘’डॉक्टरांचे सल्ल्याविरुध्द उपचार बंद केल्यामुळे झाला असल्याने सामनेवालाने तक्रारदाराचा क्लेम नामंजूर केल्याचे कथन सामनेवाला यांनी केले आहे. परंतु तक्रारदाराने दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन हे स्पष्ट दिसून होत आहे की दि.05/11/2007 रोजी तक्रारदाराच्या मयत पतीची प्रकृती चिंताजनक झाली. त्यांना श्वासोश्वासास त्रास होऊ लागला त्यामुळेच तक्रारदार व मयत पतीचे भाऊ विश्वनाथ मस्कर यांनी मयत एकनाथ मस्कर यांच्यावर तातडीने व अधिक चांगले उपचार व्हावेत या हेतुने त्यांना दि.13/11/2007रोजी आधार नर्सिंग होम,कोल्हापूर येथे अडमिट केले. तिथे त्यांचा MRI काढण्यात आला. तसेच तेथील तज्ञ डॉक्टरांच्या सल्लयाने त्यांच्यावर पुढील उपचारही सुरु केले. त्यामुळे मयत एकनाथ मस्कर यांचा मृत्यू उपचार बंद केल्यामुळे झाला हे सामनेवाला विमा कंपनीचे म्हणणे हे मंच ग्राहय मानू शकत नाही. त्यामुळे उपचार बंद केल्यामुळे मयत एकनाथ मस्कर यांचा मृत्यू झाल्यामुळे तक्रारदाराचा विमा क्लेम नामंजूर करण्याचे सामनेवाला विमा कंपनीचे कृत्य ही निश्चितच सेवा त्रुटी आहे अशा ठाम निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे व पुढीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करणेत येते. 2) सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारांना नुकसान भरपाईची रक्कम रु.1,00,000/-(रु.एक लाख फक्त) दि.21/01/2009 पासून द.सा.द.शे.9 टक्के व्याजासह दयावे. 3) सामनेवाला यांनी तक्रारदारासमानसिक त्रासापोटी रक्कम रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) दयावेत.
| [HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER | |