निकालपत्र :- (दि.14/12/2010) (सौ.प्रतिभा जे. करमरकर,सदस्या) (01) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी:- तक्रारदार यांनी आपल्या म्हैशीचा विमा सामनेवाला विमा कंपनीकडून घेतली होती. सदर पॉलीसीचा क्र.181100/48/08/2134 असा असून बिल्ला क्र.kolp-100269 असा आहे. तक्रारदाराची म्हैस दि.24/05/2008 रोजी मयत झाली. त्यानंतर तक्रारदाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह सामनेवालांकडे क्लेम दाखल केला होता. तरीही सामनेवालाने दि.24/03/2009 रोजी विमाधारकाच्या सहीत फरक असून खरेदी पावती ओरीजनल नाही असे चुकीचे कारण दाखवून तक्रारदाराचा न्याय क्लेम नामंजूर केला आहे. तक्रारदाराने सर्व आवश्यक कागदपत्रे सामनेवालांकडे जमा केली असतानाही सामनेवालाने केवळ तांत्रिक कारण दाखवून तक्रारदाराचा न्याययोग्य क्लेम बेजबाबदारपणे नामंजूर केला आहे व ही सामनेवालांच्या सेवेतील गंभीर त्रुटी आहे. त्यामुळे त्याविरुध्द दाद मागण्यासाठी तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे व आपल्या पुढील मागण्या मान्य व्हाव्यात अशी विनंती केली आहे. विमा क्लेमची रक्कम रु. दि.24/05/08 पासून द.सा.द.शे.18 टक्के व्याजासह, मानसिक त्रासापोटी रक्कम रु.25,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.2,000/- सामनेवाला यांचेकडून वसुल होऊन मिळावेत अशी विनंती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे. (02) तक्रारदाराने आपल्या तक्रारीच्या पुष्टयर्थ सामनेवाला यांचे क्लेम नाकारलेचे पत्र दाखल केले आहे. (03) सामनेवाला यांनी आपल्या लेखी म्हणणेत काही प्राथमिक आक्षेप घेतले आहेत. तक्रारदाराचे विमाधारीत जनावर गाय असूनही तक्रारदाराचे त्याचा उल्लेख म्हैस असा केला आहे. तसेच तक्रारदाराने गाय खरेदीची ओरिजनल(मूळ) पावती वारंवार मागणी करुनही सामनेवालांकडे दाखल केलेली नाही. तसेच विमाधारकाच्या सहीतही फरक आहे. या स्वयंस्पष्ट कारणाने व योग्य विचार करुनच सामनेवालाने तक्रारदाराचा विमा क्लेम नामंजूर केला आहे व त्यामध्ये सामनेवालांच्या सेवेत कुठलीही त्रुटी नाही. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह फेटाळून टाकावी अशी सामनेवालाने सदर मंचास विनंती केली आहे. (04) सामनेवाला यांनी आपल्या लेखी म्हणणेसोबत पॉलीसी कव्हरनोट पावती व क्लेम फॉर्म इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. (05) या मंचाने दोन्ही बाजूंच्या वकीलांचे युक्तीवाद ऐकले. तसेच त्यांनी दाखल केलेले कागदपत्र तपासले. तक्रारदाराने जनावरांच्या खरेदीची पावती सामनेवालांकडे क्लेमसोबत दिल्याचे कागदपत्रांवर असलेल्या सामनेवालांच्या शिक्क्यावरुन दिसून येते. परंतु तक्रारदाराचे विमाधारीत जनावर गाय असूनही तक्रारदाराने आपल्या तक्रारीत सर्व ठिकाणी त्याचा उल्लेख म्हैस असा केला आहे. तांत्रिक चुक असल्याचे मानले तरी त्याप्रमाणे कुठेही दुरुस्तीही करुन घेतल्याचे दिसून येत नाही. तक्रारदाराने आपल्या मागणीच्या पॅरा क्र.6 मध्ये नुकसानभरपाईची मागणी करताना त्या रक्कमेचा उल्लेख केला नाही. सामनेवाला विमा कंपनीकडे असलेला पैसा ही सार्वजनिक मालमत्ता असते व विमा कंपनी ही त्याची विश्वस्त म्हणून काम बघते. त्यामुळे क्लेम दाखल करताना तक्रारदाराने विहीत अटी व शर्तीप्रमाणेच करणे अपेक्षित आहे. तक्रारदाराने तसे न केल्यामुळे सामनेवालाने योग्य कारणानेच तक्रारदाराचा क्लेम नामंजूर केला आहे असे या मंचाचे स्पष्ट मत आहे. सबब हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1) तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्यात येते. 2) खर्चाविषयी आदेश नाही.
| [HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |