नि.30 मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर तक्रार क्र. 268/2010 नोंदणी तारीख – 19/11/2010 निकाल तारीख – 21/3/2011 निकाल कालावधी – 122 दिवस श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्यक्ष श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या श्री सुनिल कापसे, सदस्य (श्री सुनिल कापसे, सदस्य यांनी न्यायनिर्णय पारीत केला) ------------------------------------------------------------------------------------ वैशाली जयवंत साळुंखे रा.हमदाबाज, पो.कोंडवे ता.जि.सातारा ----- अर्जदार ( वकील स्वाती जाधव ) विरुध्द 1. श्री नरेश कांकरिया, डीव्हीजनल मॅनेजर, दी ओरिएन्टल इन्शुरन्स कं.लि. विभागीय कार्यालय, 1-15, ए.डी.कॉम्प्लेक्स, पहिला मजला, माऊंट रोड, सदर, नागपूर – 01 2. श्री के.एस.गाडेकर, डीव्हीजनल मॅनेजर, दी ओरिएन्टल इन्शुरन्स कं.लि. एल.आय.सी. बिल्डींग, जिल्हाधिकारी ऑफिससमोर, सातारा ता.जि.सातारा 3. सी.यजूलू राव मुख्य कार्यकारी अधिकारी, मे.जाईका इन्शुरन्स ब्रोकरेज प्रा.लि. दुसरा मजला, जाईका बिल्डींग कमर्शियल रोड, सिव्हील लाईन्स, नागपूर-440 001 4. डॉ एस.एस. कुचेवार मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र लाईव्हस्टॉक बोर्ड, प्रतिष्ठाण बंगलो, डॉ पंजाबराव कृषी विद्यापीठ, कृषीनगर, अकोला – 444104 ----- जाबदार क्र.1 व 2 (वकील श्री कालीदास माने) न्यायनिर्णय अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 नुसार केलेला आहे. अर्जदार यांचे अर्जातील कथन थोडक्यात खालीलप्रमाणे - 1. अर्जदार ही मौजे हमदाबाज ता.जि.सातारा येथील कायमचे रहिवासी आहे. अर्जदार यांचा शेती हा व्यवसाय असून त्याला पूरक दुग्ध व्यवसाय आहे. अर्जदार यांनी त्यांचे मालकीच्या म्हैसाणा म्हैशीचा विमा जाबदार यांचेकडे उतरविला आहे. सदरचे पॉलिसीचे कालावधीत अर्जदार यांची संबंधीत म्हैस दि. 8/8/2008 रोजी आजारी पडली. तिचेवर औषधोपचार चालू असताना दि. 10/8/2008 रोजी ती मरण पावली. तदनंतर जाबदार यांचे सूचनेप्रमाणे मृत म्हैशीचे शवविच्छेदन करण्यात आले. सदर म्हैशीचे नुकसानीपोटी भरपाई मिळावी म्हणून अर्जदार यांनी जाबदार यांचेकडे विमा दावा प्रस्ताव गायीचे कानातील बिल्ला व आवश्यक त्या कागदपत्रांसोबत दाखल केला. परंतु जाबदार यांनी कानाच्या तुकडयासह बिल्ला सादर न केल्याचे कारण दाखवून अर्जदार यांचा विमादावा नामंजूर केला. सबब म्हैशीचे नुकसान भरपाईपोटी विमा दावा रक्कम रु.35,000/- व्याजासह मिळावेत, मानसिक, शारिरिक त्रासापोटी व अर्जाचे खर्चापोटी रक्कम मिळावी म्हणून अर्जदार यांनी या मंचासमोर दाद मागितली आहे. 2. जाबदार क्र.1 व 2 यांनी नि.13 कडे म्हणणे देऊन तक्रार नाकारली आहे. जाबदार यांचे कथनानुसार महाराष्ट्र शासनाचे महाराष्ट्र लाईव्हस्टॉक डेव्हलपमेंट बोर्ड, अकोला यांनी व जाईका इन्शुरन्स ब्रोकरेज प्रा.लि. यांचेबरोबर जाबदार यांनी समझोता करार केला असून सदरचे करारानुसार अर्जदारचे म्हैशीचा विमा उतरविण्यात आला आहे. सदरचे पॉलिसीची मुलभूत अटीनुसार तसेच समझोता करारातील अट क्र.6 नुसार जर विमा उतरविलेल्या जनावराचा मृत्यू झाला तर त्याचे कानात बसविलेला टॅग हा intact स्वरुपात जाबदार यांचेकडे संबंधीत मालकाने सादर करणे आवश्यक आहे. सबब अर्जदारने त्यांचे संबंधीत जनावराचा मृत्यू झालेनंतर कानाच्या तुकडयासह टॅग जाबदार यांचेकडे सादर करणे आवश्यक होते. परंतु अर्जदार यांनी मृत म्हैशीचे कानातील टॅगच जाबदार यांना सादर केलेल्या असल्याने अर्जदारने पॉलिसीचे अटींचा भंग केलेला आहे. म्हणून जाबदार यांनी अर्जदारचा विमादावा नाकारलेला आहे. सबब जाबदार यांनी सेवा देण्यामध्ये कोणतीही त्रुटी ठेवलेली नसल्याने तक्रारअर्ज फेटाळणेत यावा असे जाबदार यांनी कथन केले आहे. 3. जाबदार क्र.3 यांनी प्रस्तुत तक्रारअर्जाची नोटीस स्वीकारली नाही. जाबदार क्र.4 यांना याकामी प्रस्तुत तक्रारअर्जाचे नोटीसची बजावणी होवूनही ते याकामी हजर झाले नाहीत, तसेच त्यांनी त्यांचे लेखी म्हणणे व शपथपत्र दाखल केले नाही. सबब जाबदार क्र.3 व 4 यांचेविरुध्द एकतर्फा आदेश करण्यात आला. 4. अर्जदारतर्फे अभियोक्ता श्रीमती स्वाती जाधव व जाबदारतर्फे वकील श्री माने यांचा युक्तिवाद ऐकला. तसेच अर्जदार व जाबदारतर्फे दाखल करण्यात आलेली कागदपत्रेपाहिली. 5. प्रस्तुतचे कामी प्रामुख्याने खालीलप्रमाणे मुद्दे उपस्थित होत आहेत. हे मुद्दे व त्यांना दिलेली उत्तरे खालीलप्रमाणे आहेत. मुद्दे उत्तरे अ) अर्जदार व जाबदार यांचे दरम्यान ग्राहक व सेवा देणारे असे नाते आहे काय ? होय. ब) जाबदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केली आहे काय ? होय. क) अंतिम आदेश - खाली दिलेल्या कारणास्तव अर्जदार यांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येत आहे. कारणे 7. जाबदार यांनी त्यांचे कैफियतीमध्ये असे कथन केले आहे की, महाराष्ट्र शासनाचे महाराष्ट्र लाईव्हस्टॉक डेव्हलपमेंट बोर्ड, अकोला यांनी व जाईका इन्शुरन्स ब्रोकरेज प्रा.लि. यांचेबरोबर जाबदार यांनी केलेल्या समझोता करारातील अट क्र.6 नुसार जर विमा उतरविलेल्या जनावराचा मृत्यू झाला तर संबंधीत विमाधारकाने जाबदार यांचेकडे त्यांचे संबंधीत जनावराच्या कानाच्या तुकडयासह टॅग सादर करणे आवश्यक आहे, परंतु अर्जदार यांनी संबंधीत म्हैशीचे कानातील टॅग हा कानाच्या तुकडयासह जाबदार यांना सादर केलेला नसल्याने अर्जदारने पॉलिसीचे अटींचा व समझोता करारातील अटीचा भंग केलेला आहे व या कारणामुळे जाबदार यांनी अर्जदारचा विमादावा नाकारलेला आहे. परंतु अर्जदार यांनी त्यांचे तक्रारअर्जामध्ये असे कथन केले आहे की, त्यांनी जाबदार यांना कानाच्या तुकडयासह म्हैशीचे कानातील टॅग सादर केला आहे. जाबदार क्र.1 व 2 यांनी अर्जदारकडून टॅग मिळाला असल्याचे मान्य केले आहे परंतु तो टॅग कानाच्या तुकडयासह दिलेला नाही असे जाबदार यांचे कथन आहे. परंतु जाबदार यांनी सदरकामी सदरचा टॅग पुराव्यात दाखल केलेला नाही. जर जाबदार यांना सदरचा टॅग हा कानाच्या तुकडयाशिवाय अर्जदारकडून प्राप्त झाला असेल तर तो त्यांनी याकामी दाखल करणे आवश्यक होते. परंतु तसा टॅग याकामी जाबदार यांनी दाखल केलेला नाही. सबब अर्जदार यांनी कानाच्या तुकडयाशिवाय टॅग जाबदार यांना सादर केला ही बाब पुराव्यानिशी सिध्द झालेली नाही. अर्जदार यांनी सादर केलेला टॅग हा अर्जदारचे म्हैशीचे कानात बसविलेला टॅग नाही असे जाबदार यांचे कोठेही कथन नाही किंवा अर्जदारने सादर केलेला संबंधीत टॅग हा खोटा आहे, त्यावरील नंबर चुकीचा आहे असेही जाबदार यांचे कथन नाही. वरील सर्व कारणांचा विचार करता अर्जदारची विमा उतरविलेली जी म्हैस मरण पावली, त्याच म्हैशीचे कानातील टॅग अर्जदार यांनी जाबदार यांना सादर केला आहे ही बाब स्पष्ट होते. असे असतानाही जाबदार यांनी अर्जदारचा विमा दावा नाकारलेला आहे. सबब अर्जदार यांचा विमा दावा नाकारण्याची जाबदार यांची कृती ही अयोग्य आहे असे या मंचाचे मत आहे. 8. जाबदार यांनी त्यांचे कैफियतीमध्ये असे कथन केले आहे की, अर्जदार यांनी आवश्यक ती कागदपत्रे जाबदार यांना सादर केली नाही. परंतु निश्चित कोणती कागदपत्रे अर्जदार यांनी सादर केली नाहीत याबाबत जाबदार यांनी काहीही नमूद केलेले नाही. त्यामुळे सदरचे कारण हे विमादावा नाकारणेसाठी योग्य व संयुक्तिक नाही असे या मंचाचे मत आहे. वरील बाबींचा विचार करता जाबदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये त्रुटी केलेली आहे असे या मंचाचे मत आहे. 9. जाबदार यांनी त्यांचे कैफियतीत असे कथन केले आहे की, पॉलिसीचे अट क्र.12अ नुसार तक्रारदार यांनी मुदतीत म्हणजे 12 महिन्यांचे आत जाबदार यांचे विरुध्द दाद मागितलेली नाही, सबब तक्रारअर्ज मुदतीत नाही. परंतु ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदीप्रमाणे तक्रारीस कारण घडल्यापासून दोन वर्षाचे आत ग्राहकास या मंचाकडे दाद मागता येते. प्रस्तुतचा तक्रारअर्ज अर्जदार यांनी तक्रारीस कारण घडल्यापासून दोन वर्षाचे आत दाखल केलेला आहे. सबब प्रस्तुतचा तक्रारअर्ज मुदतीत आहे असे या मंचाचे मत आहे. जाबदार यांनी त्यांचे कथनाचे समर्थनार्थ वरिष्ठ न्यायालयाचे जे निवाडे याकामी दाखल केले आहेत, त्यातील घटनाक्रम व प्रस्तुत तक्रारअर्जातील घटनाक्रम हा भिन्न असल्याने सदरचे निवाडे हे प्रस्तुत तक्रारअर्जाचे कामी लागू होत नाहीत असेही या मंचाचे मत आहे. 10. या सर्व कारणास्तव व वर नमूद मुद्दयांच्या दिलेल्या उत्तरास अनुसरुन अर्जदार यांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येत आहे. आदेश 1. अर्जदार यांचा तक्रारअर्ज जाबदार क्र.1 व 2 यांचेविरुध्द अंशतः मंजूर करणेत येत आहे. 2. आजपासून 30 दिवसांचे आत जाबदार क्र. 1 व 2 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तरित्या अर्जदार यांना खालीलप्रमाणे रकमा द्याव्यात. अ. म्हैशीचे विमादाव्यापोटी रु.30,000/- द्यावेत व सदरचे रकमेवर दावा दाखल तारीख दि. 19/11/19 पासून संपूर्ण रक्कम पदरी पडेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्केंप्रमाणे व्याज द्यावे. ब. मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 3,000/- द्यावेत. क. अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु. 2,000/- द्यावेत. 3. सदरचा न्यायनिर्णय खुल्या न्यायमंचात जाहीर करणेत आला. सातारा दि. 21/3/2011 (सुनिल कापसे) (सुचेता मलवाडे) (विजयसिंह दि. देशमुख) सदस्य सदस्या अध्यक्ष
| Smt. S. A. Malwade, MEMBER | HONABLE MR. Vijaysinh D. Deshmukh, PRESIDENT | Mr. Sunil K Kapse, MEMBER | |