न्या य नि र्ण य
(व्दाराः- मा. सौ. रुपाली धै. घाटगे, सदस्या)
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा 1986 चे कलम 11 व 12 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे—
तक्रारदार या मयत मारुती नागाप्पा घेज्जी यांच्या पत्नी होत. मयत मारुती नागाप्पा घेज्जी यांच्या नावे मौजे माद्याळ कसबा नूल ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर येथे शेतजमीन आहे. मयत मारुती नागाप्पा घेज्जी हे शेतकरी होते. ते दि. 04/04/2018 रोजी त्यांचे घराजवळील शेतात गवताची गंजी रचत असताना सायंकाळी 5.15 चे दरम्यान अचानक पाऊस आल्याने गंजी झाकत असताना गंजीवरुन तोल जावून खाली पडले. त्यांना उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज येथे उपचाराकरिता दाखल केले होते तथापि ते उपचारापूर्वीच मयत झाल्याचे सांगण्यात आले. सदर बाबत मरणोत्तर पंचनामा तसेच पोस्ट मॉर्टेम करण्यात आले. तसेच शामराव शिवाप्पा घेज्जी यांनी वर्दी जबाबही नोंदविला आहे. उपजिल्हा रुग्णालय, गडहिंग्लज यांनी पोस्ट मॉर्टेम व अॅडव्हान्स सर्टिफिकेटमध्ये मृत्यूचे कारण Intracranial Haemorrhage असे नमूद केले असले तरी मयत मारुती नागाप्पा घेज्जी हे आपल्या शेतात गंजी झाकत असताना गंजीवरुन तोल जावून खाली पडून अपघात झालेने त्यात ते मयत झाले आहेत. महाराष्ट्र शासनातर्फे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा याजना राबविण्यात येत आहे. सदर योजना राबविण्यासाठी दि. 5/12/2017 च्या निर्णयान्वये वि.प.क्र.1 यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तक्रारदार यांनी सदर विम्याचा लाभ मिळणेकरिता विमाप्रस्ताव वि.प.क्र.2 मार्फत वि.प.क्र.1 यांना पाठविला. तथापि वि.प. यांनी तक्रारदाराचा दावा हा मयत मारुती नागाप्पा घेज्जी यांच्या मृत्यूचे कारण आंतरिक रक्तस्त्राव असे वैद्यकीय अहवालामध्ये नमूद असलेचे कारण नमूद करुन रद्द केलेचे कळविलेले आहे. अशा प्रकारे वि.प.क्र.1 यांनी योग्य ती शहानिशा न करता तक्रारदारास विम्याची रक्कम देणे नाकारले आहे. म्हणून तक्रारदारांनी दि. 26/12/2018 रोजी वि.प. यांना वकीलामार्फत नोटीस पाठविली. परंतु सदर नोटीसीस वि.प. यांनी कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. सबब, तक्रारदारास वि.प.क्र.1 विमा कंपनीकडून विमा क्लेमपोटी रक्कम रु.2,35,000/-, मानसिक त्रासापोटी रक्कम रु.30,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रु.5,000/- देणेचा आदेश व्हावा अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.
2. तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्हीट, कागदयादी सोबत आधार कार्ड, रेशनकार्ड, शेतीचा 7/12 उतारा, 8अ उतारा, मंडल कृषी अधिकारी, गडहिंग्लज यांनी तालुका कृषी अधिकारी, गडहिंग्लज यांना दिलेले पत्र, मरणोत्तर पंचनामा, ठाणे अंमलदार यांनी दिलेला फॉर्म, उपजिल्हा रुग्णालय, गडहिंग्लज यांनी दिलेली वर्दी, वि.प. क्र.1 चे पत्र, वि.प. यांना पाठविलेली नोटीस, सदर नोटीसच्या पोस्टाच्या पावत्या व पोहोच पावत्या, शासन निर्णय दि. 31/1/18 इ. कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच तक्रारदाराने पुराव्याचे शपथपत्र, साक्षीदार बसगोंडा सोमगोंडा पाटील यांचे शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
3. वि.प.क्र.1 यांचेविरुध्द ता. 20/5/2019 रोजी नो से चा आदेश पारीत झालेला होता. ता. 13/6/2019 रोजी रक्कम रु.200/- ची कॉस्ट तक्रारदार यांना अदा करणेचे अटीवर सदर वि.प.क्र.1 यांचेविरुध्द नो से चा आदेश रद्द करणेत आला. वि.प.क्र.1 यांचे म्हणणे दाखल करुन घेण्यात आले. वि.प.क्र.2 यांचेविरुध्द ता.20/5/2019 रोजी एकतर्फा आदेश पारीत करणेत आला आहे.
4. वि.प.क्र.1 यांनी याकामी दि.13/6/19 रोजी तक्रारदाराचे तक्रारअर्जास म्हणणे दाखल केले असून तक्रारअर्जातील बहुतांशी कथने नाकारली आहेत. वि.प. यांचे कथनानुसार, मयत हे कधीही शेतकरी नव्हते व त्यांचेकडे कधीही कोणतीही शेतजमीन नव्हती. कथित अपघातादिवशीमयत हे त्यांचे शेतीमध्ये काम करीत नव्हते तर ते त्यांच्यामामाच्या शेतामध्ये त्यांना मदत करत होते. परंतु सदरची महत्वाची बाब तक्रारदाराने या आयोगापासून लपवून ठेवली आहे. कयत हे अपघाताने मृत्यू पावलेले नाहीत. त्यांचा मृत्यू हा नैसर्गिक आहे. त्यामुळे त्यांना शेतकरी अपघात योजनेअंतर्गत नुकसान भरपाई मागता येणार नाही. आंतरिक रक्तस्त्राव हा रक्तदाब वाढल्यामुळ होतो. त्यामुळे मयत यांचा मृत्यू हा अपघाती नसून नैसर्गिक आहे. सदर पॉलिसी अंतर्गत नैसर्गिक मृत्यू कव्हर होत नाही. त्यामुळे पॉलिसी नियमांना अधीन राहून तक्रारदारयांचा दावा वि.प.क्र.1 यांनी नामंजूर केला आहे. सबब, वि.प. क्र.1 विमा कंपनीने कोणतीही त्रुटी न दिल्याने तक्रारअर्ज खर्चासह नामंजूर करण्यात यावा अशी मागणी वि.प. यांनी केली आहे.
5. वि.प. यांनी याकामी पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
6. तक्रारदारांचा तक्रारअर्ज, वि.प. क्र.1 यांचे म्हणणे, दाखल केलेली अनुषंगिक कागदपत्रे, तक्रारदाराचे व वि.प. यांचे पुराव्याचे शपथपत्र, लेखी युक्तिवाद यांचा विचार करता निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ. क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत काय ? | होय. |
2 | वि.प. यांनी तक्रारदाराला द्यावयाच्या सेवेत त्रुटी केली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदार हे विमा रक्कम मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
4 | तक्रारदार हे मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्कम मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
5 | अंतिम आदेश काय ? | अंशतः मंजूर. |
कारणमिमांसा –
मुद्दा क्र. 1 –
7. प्रस्तुतकामी मयत मारुती नागाप्पा घेज्जी यांच्या नावे मौजे माद्याळ, कसबा नुल, ता.गडहिंग्लज, जि. कोल्हापूर येथे गट नं.450, एकूण क्षेत्र हे.00.41 आर. पोटखराब हे.00.06 आर. एकूण आकार रु. 00.59 पैसे पैकी हे.00.17 आर इतके क्षेत्र आहे. मयत मारुती नागाप्पा घेज्जी हे शेतकरी होते. सदर मयत मारुती नागाप्पा घेज्जी यांचा व कुटुंबियांचा उदरनिर्वाह सदर शेती उत्पन्नातून होत होता. मयत मारुती नागाप्पा घेज्जी हे तक्रारदार यांच्या घरातील कर्ता व्यक्ती होती. तक्रारदार व त्यांची मुले ही मयत मारुती नागाप्पा घेज्जी यांच्यावरच अवलंबून होती असे कथन तक्रारदाराने केले आहे. वि.प.क्र.1 यांचे म्हणणेचे अवलोकन करता मयत हे कधीही शेतकरी नव्हते. मयत यांचेकडे कधीही कोणतीही शेतजमीन नव्हती. सबब, सदरची पॉलिसी अपघातग्रस्त शेतक-यास व त्याच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरिता असलेने सदरचे पॉलिसी अंतर्गत मयत मारुती नागाप्पा घेज्जी विमा मिळणेस पात्र आहेत का ? तसेच मयत मारुती नागाप्पा घेज्जी हे शेतकरी आहेत का ? हा वादाचा मुद्दा उपस्थित होतो. सदरचे मुद्याचे अनुषंगाने आयोगाने तक्रारदारांचे पुराव्याचे शपथपत्र तसेच दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता तक्रारदार यांनी नि.3 सोबत अ.क्र.1 व 2 वर आधारकार्ड व रेशनकार्डची झेरॉक्स प्रत दाखल केलेली आहे. तसेच अ.क्र.3 व 4 ला 7/12 उतारा व 8अ उता-याची प्रत दाखल केली आहे. सदरचे 7/12 उता-यावर मयत मारुती नागाप्पा घेज्जी यांचे नांवे मौजे माद्याळ, कसबा नुल, ता.गडहिंग्लज, जि. कोल्हापूर येथे गट नं.450, एकूण क्षेत्र हे.00.41 आर. पोटखराब हे.00.06 आर. एकूण आकार रु. 00.59 पैसे पैकी हे.00.17 आर इतके क्षेत्र असलेचे स्पष्टपणे दिसून येते. सदरची कागदपत्रे Public documents असून सदरची कागदपत्रे वि.प. यांनी पुराव्यानिशी नाकारलेली नाहीत. सबब, 7/12 उतारा व 8अ उता-यावरील प्रतीवर तक्रारदारांचे मयत पती मारुती नागाप्पा घेज्जी यांचे नाव असलेने मयत मारुती नागाप्पा घेज्जी हे शेतकरी असलेचे सिध्द होते. त्याकारणाने तक्रारदार हे सदरचे विमा पॉलिसी अंतर्गत लाभ मिळणेस पात्र आहेत. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.2
8. उपरोक्त मुद्दा क्र.1 मधील विस्तृत विवेचनाचा विचार करता तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत. तक्रारदारांचे पती मयत मारुती घेज्जी हे दि. 04/04/2018 रोजी त्यांचे घराजवळील शेतात गवताची गंजी रचत असताना सायंकाळी 5.15 चे दरम्यान अचानक पाऊस आल्याने गंजी झाकत असताना गंजीवरुन तोल जावून खाली पडून अपघात झाला. त्यानंतर पती मयत मारुती घेज्जी यांना उपजिल्हा रुग्णालय, गडहिंग्लज येथे उपचाराकरिता दाखल केलेले होते. तथापि रुग्णालयातील डॉक्टरांनी पती मयत मारुती घेज्जी यांना तपासले असता उपचारापूर्वीच मयत झालेचे सांगितले. त्याप्रमाणे गडहिंग्लज पोलिस ठाणेकडून मरणोत्तर पंचनामा केलेला आहे. सन 2015-2016 पासून सदर योजना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना या नावाने रक्कम रु.2,00,000/- विमा संरक्षणासह राबविण्यात येत आहे. सदरची योजना राबविण्यासाठी ता. 5/12/20917 च्या शासन निर्णयान्वये वि.प.क्र.1 दि ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी लि. यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सदर विम्याचा लाभ मिळणेकरिता तक्रारदार यांनी मंडळ कृषी अधिकारी, गडहिंग्लज यांचेकडे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा अंतर्गत प्रस्ताव सादर केलेला होता. त्याअनुषंगाने सदरचा प्रस्ताव तालुका कृषी अधिकारी, गडहिंग्लज व वि.प.क्र.2 जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर यांचे मार्फत वि.प.क्र.1 यांच्याकडे पाठविण्यात आलेला होता. तथापि वि.प.क्र.1 कडील दि. 29/09/2018 रोजीच्या पत्राने तक्रारदार यांनी पॉलिसी नं. 163500/47/2018/49 व क्लेम नं. 163500/47/2018/000906 अंतर्गत दाखल केलेला दावा मयत मारुती नागाप्पा घेज्जी यांच्या मृत्यूचे कारण आंतरिक रक्तस्त्राव असे वैद्यकीय अहवालामध्ये नमूद असलेचे कारण नमूद करुन रद्द केलेचे कळविले. सबब, वि.प. यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली का ? हा वादाचा मुद्दा उपस्थित होतो. सदर मुद्याचे अनुषंगाने वि.प.क्र.1 यांचे म्हणणेचे अवलोकन करता वि.प.क्र.1 यांचेकडे दाखल केलेले कागदपत्रांवरुन मयत मारुती नागाप्पा घेज्जी यांचा मृत्यू हा आंतरिक रक्तस्त्राव झालेने झालेला आहे. आंतरिक रक्तस्त्राव हा रक्तदाब वाढल्यामुळे होतो. त्यामुळे त्याचा झालेला मृत्यू हा अपघाती नसून नैसर्गिक आहे. सदर पॉलिसी अंतर्गत नैसर्गिक मृत्यू कव्हर होत नाही असे कथन केले आहे. तसेच त्या अनुषंगाने तक्रारदार यांनी दि. 29/9/2018 रोजी तक्रारदाराचा दावा रद्द केलेचे पत्र दाखल केलेले आहे. सबब, तक्रारदार यांनी तक्रारीसोबत ता. 4/4/2018 रोजीचा मरणोत्तर पंचनामा, वर्दी जबाब, अॅडव्हान्स सर्टिफिकेट इ. कागदपत्रे दाखल केलेली आहेत. सदरचे कागदपत्रांचे अवलोकन करता पोलिस व पंच मरणाबाबत मत – यातील मयत हा आजरोजी आपला मामा बसगोंडा सोमगोंडा पाटील यांचे शेतात गवताची गंजी पाऊस आलेने झाकत असताना त्याचा 17.15 चे सुमारास तोल जावून खाली पडलेने त्यास उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय, गडहिंग्लज येथे अॅडमिट केले असता उपचारापूर्वी मयत झाला असे नमूद आहे. तसेच पोस्ट मॉर्टेमचे अवलोकन करता Cause of death – Intrracranial Haemorrhage नमूद आहे. Intrracranial Haemorrhage चे मेडीकल Literature नुसार अवलोकन करता High blood pressure can weaken the blood vessels in your brain, causing the to leak or rupture. Head trauma असे दिसून येते. प्रस्तुतकामी मयत मारुती नागाप्पा घेज्जी यांना High Blood pressure/उच्च रक्तदाब असलेचे अनुषंगाने वि.प. यांनी कोणताही वैद्यकीय पुरावा आयोगात दाखल केलेला नाही. तथापि तक्रारदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन तसेच तक्रारदारतर्फे बसगोंडा सोमगोंडा पाटील यांचे शपथपत्रावरुन मयताचा गंजी झाकत असताना गंजीवरुन तोल जावून खाली पडलेचे दिसून येते. त्या कारणाने मयताचा मृत्यू हा गंजीवरुन तोल जावून खाली पडलेने डोक्यास मार Head trauma लागून झालेची बाब सिध्द होते. मयतास आंतरिक रक्तस्त्राव हा रक्तदाब वाढल्यामुळे होता ही सदरची कथने वि.प. यांनी पुराव्यानिशी शाबीत केलेली नसून मयतास पूर्वीपासून रक्तदाबाचा त्रास होता. सदरच्या रक्तदाबाच्या त्रासाने आंतरिक रक्तस्त्राव झालेची बाब वि.प. यांनी पुराव्यनिशी शाबीत न केलेने सदरची कथने पुराव्याअभावी हे आयेाग विचारात घेत नाही. सदर मुद्याचे अनुषंगाने आयोग तक्रारदार यांनी दाखल केलेल्या पुढील न्यायनिवाडयाचा आधार घेत आहे.
National Consumer Disputes Redressal Commission.
Anjali Prasad Vs. The New India Assurance Co. decided on 1 Sept. 2017
There is no evidence produced by O.P. that the patient was suffering from uncontrolled hypertension which may cause, intra cerebral bleed. In my view, the insurance company has made unflappable attempts, to correlate the accidental death to the hypertensive etiology.
9. सबब, वरील सर्व बाबींचा बारकाईने विचार करता, मयत मारुती नागाप्पा घेज्जी यांचा मृत्यू गंजी झाकत असताना गंजीवरुन तोल जावून खाली पडलेने (Head Trauma) आंतरिक रक्तस्त्राव झालेला असून तो अपघाती मृत्यू असलेची बाब शाबीत होत असलेने वि.प. यांनी सदरचे पॉलिसीचा मूळ हेतू विचारात न घेता तक्रारदारांचा क्लेम चुकीचे कारणास्तव नाकारुन तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेली आहे या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.2 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.3
10. उपरोक्त मुद्दा क्र.1 व 2 मधील विस्तृत विवेचनाचा विचार करता वि.प. यांनी तक्रारदार यांचा विमा क्लेम नाकारुन तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेली आहे. प्रस्तुतकामी तक्रारदार यांनी वि.प.क्र.1 यांचेकडून रक्कम रु. 2,35,000/- विमा रकमेची मागणी केलेली आहे. तथापि तक्रारदार यांनी अ.क्र. 11 ला शासन निर्णय क्र. 2010/प्र.क्र.181/11 ता. 31/1/2018 दाखल केलेला आहे. सदर निर्णयामध्ये गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना अंतर्गत रु. 2.00 लाख विमा संरक्षण राबविण्यात येत आहे असे नमूद आहे. सबब, या बाबीचा विचार करता तक्रारदार हे सदर विमा पॉलिसीअंतर्गत रक्कम रु. 2,00,000/- मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. तसेच सदर रकमेवर तक्रार दाखल ता. 12/4/2019 पासून सदरची संपूर्ण रक्कम तक्रारदार यांना मिळेपावेतो द.सा.द.शे. 6 टक्के प्रमाणे व्याज मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.3 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.4
11. वि.प. क्र.1 यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेने तक्रारदार हे वि.प.क्र.1 यांचेकडून मानसिक त्रासापोटी रक्कम रु.8,000/- व अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.3,000/- मिळणेस पात्र आहेत. सबब, मुद्दा क्र.4 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.5 - सबब आदेश.
- आ दे श - - तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो.
- वि.प.क्र.1 विमा कंपनी यांनी तक्रारदार यांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना अंतर्गत विमाक्लेमची रक्कम रु.2,00,000/- अदा करावी व सदर रकमेवर तक्रार दाखल तारीख 12/4/19 पासून सदरची संपूर्ण रक्कम तक्रारदार यास मिळेपावेतो द.सा.द.शे.6 टक्के प्रमाणे व्याज अदा करावे.
- वि.प.क्र.1विमा कंपनी यांनी तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रक्कम रु.8,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.3,000/- अदा करावी.
- वर नमूद सर्व आदेशांची पुर्तता वि.प.क्र.1 यांनी आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसांत करावी.
- विहीत मुदतीत आदेशांची पुर्तता न केलेस ग्राहक सरंक्षण कायदा, 2019 मधील तरतुदीप्रमाणे वि.प. विरुध्द कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
- आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.
|