जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच बीड यांचे
तक्रार क्रमांक – 122/2011 तक्रार दाखल तारीख –02/08/2011
मानसिंग पुतनलाल वाल्मिकी
वय सज्ञान वर्षे धंदा व्यापार .तक्रारदार
रा.येरवडा ता. जि.पुणे-32
मार्फत दादासाहेब पि.दगडूराव मोरे
वय 48 वर्ष, धंदा शेती आणि नौकरी
रा.सिध्दीविनायक नगर,गेवराई ता.गेवराई जि.बीड
विरुध्द
दि ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लि.
मार्फत दि ब्रॅच मॅनेजर . .सामनेवाला
मथुरा कॉम्प्लेक्स, हॉटेल शांताई समोर,
जालना रोड, बीड
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
अजय भोसरेकर, सदस्य.
तक्रारदारातर्फे :- अँड.ए.पी.पळसोकर
सामनेवाला तर्फे :- अँड.ए.पी.कूलकर्णी
निकालपत्र
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदाराची टाटा इंडिया टूरिस्ट टॅक्सी नोंदणी क्रमांक एमएच-12/इएफ-2970 आहे. सदरच्या वाहनाची नोंदणी दि.28.9.2007 रोजी झालेली आहे.
सदर वाहनाचा विमा सामनेवालाकडे विमा पत्र नंबर1619043/31/2010/2930 घेतलेला आहे. त्यांचा कालावधी दि.4.3.2010 ते 3.3.2011 होता.सदर वाहनाचा विमा रक्कम रु.2,40,000/- चा घेतलेला आहे.
दि.14.3.2010 रोजी कारचालक संदिप अशोक सुतार सदरची कार गेवराई कडून बिडकडे येत असताना गेवराई पासून पाच किलोमिटर अंतरावर एकाठिकाणी ट्रॅक्टर क्र.एम.एच.-23-बी/6494 विरुध्द बाजूने भरधाव वेगाने येऊन धडक दिली. त्यात कारचे मोठयाप्रमाणावर नुकसान झाले. अंकूश नानासाहेब चालक रा.किनगांव ता.गेवराई यांनी अपघात घटनेची खबर पोलिस स्टेशन गेवराईला दिली. पोलिसांनी गून्हा रजिस्टर नंबर 37/2010 ने नोंदवून घेतला.
सदरचा अपघात हा ट्रॅक्टर ड्रायव्हरच्या भरधाव वेगाने व निष्काळजीपणाने झालेला आहे. सदर अपघातात वाहनाचे झालेले नूकसान सान्या मोटार्स बीड यांनी दि.4.11.2010 रोजी वाहन दुरुस्ती खर्चाचे अंदाजित इस्टीमेंट रु.2,11,315/- चे दिले. ते सामनेवाला यांचे सर्व्हेअर यांना दाखविले. त्यांनी त्यानुसार मान्यता दिली. याठिकाणी स्पष्टपणे नमूद करण्यात येते की वाहन चालका जवळ वैध व अंमलातील वाहन चालक परवाना अपघाताचे वेळी होता.
सामनेवाला यांनी अचानकपणे तक्रारदाराचा दावा दि.31.3.2011 रोजी (दि.7.4.2011) वाहन चालकाजवळ वैध व अंमलातील वाहन चालक परवाना अपघाताचे वेळी नसल्याकारणाने आणि टॅक्सी बँच नसल्याकारणाने विमा पत्रातील शर्तीचा व अटीचा भंग झालेला असल्याने नाकारला. अपघाताचे वेळी वाहनात प्रवासी नव्हते. सदरचे वाहन दूरुस्तीसाठी वर्कशॉप औरंगाबाद येते जात होते. सामनेवाला यांचा दावा नाकारल्याचे कारणे योग्य नाही. सामनेवाला यांनी दावा नाकारुन तक्रारदारांना दयावयाचे सेवेत कसूर केलेला आहे. तक्रारदारांनी वाहन दूरुस्तीसाठी रक्कम रु.2,11,315/- खर्च केलेला आहे. सदरची रक्कम तक्रारदारांना 18 टक्के व्याजासह अपघाताचे दिनांकापासून व तसेच तक्रारीचा खर्च रु.15,000/- आणि मानसिक त्रासाची रक्कम तक्रारदारांना मिळणे आवश्यक आहे.
विनंती की, सामनेवाला यांनी तक्रारदारांना रक्कम रु.2,11,315/- 18 टक्के व्याज अपघाताचे दिनांकापासून तक्रारदारांना देण्यात बाबत आदेश व्हावेत. तक्रारीचा खर्च रु.15,000/- तक्रारदारांना देण्या बाबत आदेश व्हावेत.
सामनेवाला यांनी त्यांचा खुलासा दि.09.11.2011 रोजी दाखल केला. खुलाशात तक्रारीतील सर्व आक्षेप त्यांनी नाकारलेले आहेत. तक्रारदाराकडून अपघाताची सुचना मिळाल्यानंतर सामनेवाला यांनी ताबडतोब सर्व्हेअर श्री.ए.टी.कूलकर्णी यांची नेमणूक केली. त्यांनी त्यांचा अंतिम अहवाल दि.06.05.2010 रोजी दाखल केला. तसेच त्यांनी त्यांचा बिल चेक रिपोर्टही दाखल केलेला आहे. सामनेवाला यांनी तक्रारदारांना दि.15.11.2010 रोजी पत्र देऊन वैध व अंमलातील वाहना चालक परवाना तसेच टँक्सी बॅच नंबरची मागणी केली. तक्रारदारांनी दि.29.12.2010 रोजी उत्तर दिले आणि मान्य केले की, ड्रायव्हर जवळ अपघाताचे वेळी बँच नंबर नव्हता. ड्रायव्हर संदिप सुतार यांचे जवळ वाहन चालक परवाना नंबर एमएच-23-200900011673 एलएमव्ही (ट्रान्सपोर्ट गूडस) चा आहे. त्यावरुन स्पष्ट होते की, ड्रायव्हर जवळ बॅच नाही. तसेच टयूरिस्ट टॅक्सी वाहन चालक परवाना नाही. त्यामुळे विमा पत्रातील अटीचा भंग झालेला आहे. म्हणून सामनेवाला यांनी योग्य रितीने तक्रारदाराचा दावा नाकारला आहे. त्यात सेवेत कसूर नाही. तक्रार खर्चासह रदद करण्यात यावी.
तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, तक्रारदाराचे शपथपत्र, सामनेवाला यांचा खुलासा, शपथपत्र, यांचे सखोल वाचन केले.
तक्रारदाराचे विद्वान वकील श्री.ए.पी.पळसोकर व सामनेवाला यांचे विद्वान वकील श्री.ए.पी.कूलकर्णी यांचा युक्तीवाद ऐकला.
तक्रारीतील सर्व कागदपत्रे पाहता सामनेवाला यांनी तक्रारदारांचा दावा वाहन चालका जवळ अपघाताचे वेळी वैध व अंमलातील वाहन चालक परवाना नव्हता व बँच नंबर नव्हता. या कारणाने नाकारला आहे.
या संदर्भात वाहन चालकाजवळ एलएमव्ही ट्रान्सपोर्ट गूडस चा परवाना आहे. तसेच अपघात वाहन चालकाच्या चुकीने झालेला नाही. गुन्हा हा ट्रॅंक्टर चालका विरुध्द आहे. अपघाताचे वेळी वाहनात प्रवासी प्रवास करीत नव्हते असे तक्रारदाराचे म्हणणे आहे. सदरचे वाहन दूरुस्तीसाठी नेण्यात येत होते. या विधानाचे समर्थनार्थ तक्रारदारांनी खालील न्यायनिवाडयाचा आधार घेतलेला आहे.
1. 2011 (3) CPR 101 (NC) National Consumer Disputes Redressal Commission, New Delhi, Reliance General Insurance com. Ltd. Vs. Dharwin K. David
Consumer Protection Act, 1986—Sections 2(1)(g), 2(1) (o) 15,17,19 and 21—Motor Vehicle Act, 1988—Section 66 (3)(p)—Insurance—Damage to vehicle in accident—Insurance claim repudiated on the ground that vehicle was being plied without valid permit—State Commission directed petitioner Insurance Company to reimburse amount of Rs.1,39,000/- as assessed by Surveyor with 9 % interest in addition to cost of Rs.5000/- Under section 66(3)(p) of M.V. Act use of a vehicle without permit as mandated under Section 66(1), M.V. Act will not apply in case empty vehicle plies on road for the purpose of repair—At the time of accident complainant was returning from workshop after getting defective lights etc. repaired—No material irregularity or jurisdictional error in impugned order.
2. In The Suprem Court of India at New Delhi, 2010 ACJ 1250
Amalendu Sahoo Vs. Oriental Insurance Co.Ltd.
Motor Insurance—Private vehicle—Damage to vehicle—Comprehensitve policy—Breach of—Repudiation of claim—Owner gave his vehicle insured for private purpose for being used on hire against terms of policy though no payment for hire charges was proved and vehicle met with accident—Claim of owner was repudiated by insurance company on the ground of violation of terms of policy—Owner filed complaint under Consumer Protection Act and all the foras upheld repudiation—Whether insurance company can repudiate the claim in toto—Held; no; claim has to be settled on non standard basis; insurance company directed to pay Rs.2,50,000/- though compensation claimed is Rs.5,00,000/-.
वरील न्यायनिवाडयाचे सखोल वाचन केले.तक्रारीतील तक्रारदाराचे वाहन दूरुस्तीसाठी जात असल्याबाबतचे तक्रार कलम 7 मधील विधान सामनेवाला यांनी काटेकोरपणे नाकारले नाही. त्यामुळे सदरचे वाहन हे दूरुस्तीसाठी जात असल्याची बाब व सदर वाहनात प्रवासी नव्हते ही बाब स्पष्ट होते.यामुळे वरील न्याय निर्णय पैकी पहिला न्यायनिर्णय तक्रारदाराच्या विधानाचे समर्थनाथ लागू होतो असे न्यायमंचाचे मत आहे. वाहन दूरुस्तीसाठी जात असल्याने विमा पत्रातील नियम व अटीचा कोणताही मूलभूत भंग झाल्याचे दिसत नाही.त्यामुळे सामनेवाला यांनी तक्रारदारांचा दावा नाकारुन तक्रारदारांना दयावयाचे सेवेत कसूर केल्याची बाब स्पष्ट होते. त्यामुळे सामनेवाला यांनी तक्रारदारांना सर्व्हे रिपोर्ट रु.1,39,000/- च्या नुकसानीची आकारणी केलेली असल्याने सदरची रक्कम सामनेवाला यानी देणे उचित होईल असे न्यायमंचाचे मत आहे.
वरील न्याय निर्णय क्र.2 चा जरी तक्रारदारांनी आधार घेतलेला असला तरी मा.राष्ट्रीय आयोग कमीशनचे न्यायनिर्णयानुसार व जर नियम व अटीचा भंग होत नाही अशी बाब स्पष्ट झाल्याने वरील न्यायनिर्णय क्र.2 मा.सर्वोच्च न्यायलयाचा न्याय निर्णय लागू होत नाही असे जिल्हा मंच नम्रपणे नमूद करीत आहे.
सामनेवाला यांचे सेवेत कसूरीची बाब स्पष्ट झाल्याने सामनेवाला यांनी तक्रारदारांना तक्रारीचा खर्च रु.5,000/- देणे उचित होईल असे न्यायमंचाचे मत आहे.
सबब, न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाला यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारांना रककम
रु.1,39,000/- (अक्षरी रुपये एक लाख एकोणचाळीस हजार फक्त)
आदेश प्राप्तीपासून 30 दिवसांचे आंत अदा करावी.
3. वरील रक्कम विहीत मुदतीत अदा न केल्यास त्यावर द.सा.द.शे. 9
टक्के व्याज तक्रार दाखल दि.02.08.2011 पासून देण्यास सामनेवाला
जबाबदार राहतील.
4. सामनेवाला यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारांना खर्चाची
रक्कम रु.5,000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्त) आदेश प्राप्ती
पासून 30 दिवसांचे आंत अदा करावी.
5. ग्राहक संरक्षण कायदा- 1986, अधिनियम 2005 मधील कलम-20
(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
(अजय भोसरेकर) (पी.बी.भट)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड