निकालपत्र :- (दि.20.12.2010)(द्वारा - सौ.प्रतिभा जे. करमरकर, सदस्या) (1) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी, तक्रारदारांचे मयत पती शंकर गोपाळ परीट हे शेतीचा व्यवसाय करत होते व त्यांनी कदारलिंग विकास सेवा संस्थेमार्फत सामनेवाला विमा कंपनीकडे ग्रुप इन्श्युरन्स उतरविला होता. सदर पॉलीसीचा नं.47/2008/3546 असा होता. तक्रारदारांचे पती शंकर गोपाळ परीट हे दि.23.08.2009 रोजी शेतातील झाडावर चढून केवडा काढत असताना झाडावरुन तोल जावून पडून मयत झाले. त्यांच्या मृत्युची नोंद राधानगरी पोलीस स्टेशन येथे 40/2009 (अ.म.र.ण.) झाली आहे. राधानगरी पोलीसांनी त्या घटनेचा पूर्ण तपास करुन रिपोर्ट दिला आहे. तक्रारदार हिने केदारलिंग विकास सेवा संस्थेच्या माध्यमातून दि.21.10.2009 रोजी सर्व कागदपत्रांसह क्लेम फॉर्म सामनेवाला कंपनीकडे दाखल केला आहे. (2) तक्रारदाराने वेळोवेळी चौकशी केली असताही सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारास काहीही कळवले नाही. म्हणून तक्रारदारांने दि.26.04.2010 रोजी वकिलांचे मार्फत कायदेशीर नोटीस देवून विमा क्लेमची मागणी केली. तरीही सामनेवाला यांनी क्लेम दिला नाही किंवा नोटीसीला उत्तरही दिले नाही. ही सामनेवाला यांच्या सेवेतील गंभीर त्रुटी आहे. तक्रारदार ही अशिक्षित, दुर्गम भागातील असून तिची उपासमार होत आहे. त्यामुळे तिने आपल्या तक्रारीची दाद मागण्यासाठी प्रस्तुत मंचाचा दरवाजा ठोठावला आहे व आपल्या पुढील मागण्या मान्य व्हाव्यात म्हणून विनंती केली आहे. (अ) सामनेवाला कंपनीकडून तक्रारदारांना त्यांचे पतीचे मृत्युपश्चात जनता अपघात विमा योजनेअंतर्गत मिळणारी विमा क्लेमची रक्कम रुपये 1,00,000/- द.सा.द.शे.15 टक्के दराने वसुल होवून मिळावी. (ब) तक्रारदारांना शारिरीक व मानसिक त्रासापोटी रुपये 5,000/- सामनेवाला यांचेकडे वसुल होवून मिळावेत. (क) तक्रारीचा खर्च रुपये 3,000:- सामनेवाला यांचेकडून वसुल होवून मिळावा. (3) तक्रारदारांनी आपल्या तक्रारीसोबत क्लेम फॉर्म, तक्रारदाराचे पतीचा मृत्यू दाखला, घटनेचा प्राथमिक अहवाल, वर्दी जबाब, पंचनामा, इन्क्वेस्ट पंचनामा, मेडिकल रिपोर्ट, पी.एम्.रिपोर्ट, सामनेवाला यांना दिलेली नोटीस इत्यादीच्या प्रती व शपथपत्र दाखल केले आहे. (4) सामनेवाला विमा कंपनीने आपल्या कथनामध्ये तक्रारदारांची विमा पॉलीसी अमान्य केली नाही. परंतु, तक्रारदाराच्या इतर सर्व कथनाला तीव्र आक्षेप घेतला आहे. सामनेवाला विमा कंपनी आपल्या कथनात पुढे म्हणतात की, तक्रार अर्जातील कलम 4 मधील मजकूर ‘यातील तक्रारदार हिने सामनेवाला कंपनीकडे वेळोवेळी त्यांचे क्लेमची चौकशी केली असता, तक्रारदार हिस सामनेवाला विमा कंपनीने काहीही कळविले नाही’ वगैरे मजकूर खोटा असून सामनेवाला सर्व मजकूराचा इन्कार करतात. अर्जातील पुढील मजकूराबाबत सत्य वस्तुस्थिती अशी की, यातील सामनेवाला यांना तक्रारदारांची नोटीस मिळालेवर सामनेवाला यांनी तक्रारदारांना कंपनीत येवून काही आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणेविषयी फोनवरुन कळविले होते. परंतु, तक्रारदार यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता अद्याप केलेली नाही म्हणून सदरची केस कंपनीने पेंडिंग ठेवलेली आहे. (5) सामनेवाला आपल्या कथनात पुढे असे म्हणतात की, सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारास सेवा देण्यास कुठलीही त्रुटी केलेली नाही. त्यामुळे सदरची तक्रार काढून टाकावी अशी मागणी सामनेवाला कंपनीने केली आहे. (6) आम्ही दोन्ही बाजूंच्या वकिलांचे युक्तिवाद ऐकले. तसेच, दोन्ही बाजूंनी दाखल केलेले कागदपत्र तपासले. तक्रारदारांचे पॉलीसी सामनेवाला विमा कंपनीने अमान्य केली नाही. तक्रारदारांने पोस्ट मॉर्टेम रिपोर्ट, पोलीस पंचनामा, मयताचे सर्टिफिकेट इत्यादी सर्व कागदपत्रे क्लेम फॉर्मसह सामनेवाला कंपनीकडे दि.21.10.2009 रोजी दाखल केलेचे शपथेवर सांगितले आहे. सामनेवाला यांनी आवश्यक कागदपत्रे आपल्याकडे पाचली नसल्यामुळे क्लेमचा निर्णय घेता येत नाही असे कथन केले आहे. परंतु, सदर कागदपत्रे पाठवून देण्याबद्दल सामनेवाला यांनी तक्रारदारास कळविल्याबद्दल कुठलाही पुरावा दाखल केलेला नाही. तक्रारदाराने दि.26.04.2010 रोजीअखेर सामनेवाला यांना कायदेशीर नोटीस पाठवली. त्यावेळीही तक्रारदाराला सदर कागदपत्रे पाठवण्याबद्दल सामनेवाला यांनी कळवल्याचा कुठलाही पुरावा दिला नाही. त्यामुळे सदर आवश्यक कागदपत्रे सामनेवाला यांना मिळाली नसल्यामुळे तक्रारदारांच्या विमा क्लेमबाबत निर्णय घेता येत नाही हे सामनेवाला यांचे कथन आम्ही ग्राहय धरु शकत नाही. (7) महाराष्ट्र शासनाने सदर शेतकरी अपघात योजना ही एखाद्या शेतक-याचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याचे कुटुंब उघडयावर पडून त्याची उपासमार होवू नये या हेतूने सुरु केली. विमा कंपनीने कुठल्याही तांत्रिक सबबी न दाखविता शेतक-यांचे क्लेम मार्गी लावावेत अशी अपेक्षा केली आहे. परंतु, तरीही सामनेवाला यांनी प्रस्तुत तक्रारदाराचा क्लेम विमाधारकाच्या अपघाती मृत्यूनंतर दिड वर्षे होवून गेले तरीही त्याबद्दल कुठलाही निर्णय घेतला नाही व ही सामनेवाला यांच्या सेवेतील निश्चित त्रुटी आहे अशा निर्णयाप्रत आम्ही आलो आहोत व पुढीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. तक्रारदारांची तक्रार मंजूर करणेत येते. 2. सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारांना विमा क्लेमची रक्कम रुपये 1,00,000/- (रुपये एक लाख फक्त) द्यावी. सदर रक्कमेवर तक्रारदारास संपूर्ण रक्कम मिळेपावेतो द.सा.द.शे.9 टक्के व्याज द्यावे. 3. सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रुपये 1,000/- द्यावेत. 4. सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारांना तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 1,000/- द्यावेत.
| [HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER | |