निकालपत्र :- (द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष)
(1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला यांनी म्हणणे दाखल केले. सुनावणीचेवेळेस, दोन्ही बाजूंच्या वकिलांनी युक्तिवाद केला.
(2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी, तक्रारदारांनी सामनेवाला विमा कंपनकडून मेडिक्लेम पॉलीसी घेतलेली होती; तिचा नं.161600/48/2008/5893 असा होता. सदर पॉलीसीचा कालावधी दि.14.11.2007 ते दि.13.11.2008 असा होता. तसेच, सदरची पॉलीसी त्यानंतर रिन्यु केलेली आहे. तक्रारदार हे ऑक्टोबर 2008 मध्ये काविळीच्या आजाराने दि.08.10.2008 ते दि.21.10.2008 रोजीपर्यन्त डॉ.एम्.एस्.ठाणेकर यांचे हॉस्पिटलमध्ये अडमिट होते. तक्रारदारांना Infenctine Hepatitis या प्रकारची कावीळ झाली होती. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वेगवेगळया तपासण्या करुन घेतल्या. औषधोपचारासाठी तक्रारदारांना एकूण रुपये 37,118/- इतका खर्च आलेला असून त्यांचे रजेच्या कालावधीतील पगारापोटी रुपये 45,000/- नुकसान सहन करावे लागले. सदर रक्कमांची तक्रारदारांनी सामनेवाला यांचेकडे मागणी केली असता सामनेवाला यांनी सदरच्या रक्कमा अदा केलेल्या नाहीत. सबब, डॉक्टर बिल व औषधोपचाराचा खर्च रुपये 37,118/-, पगाराचे नुकसानीपोटी रुपये 45,000/-, नोटीस खर्च रुपये 1,500/-, मानसिक त्रासापोटी रुपये 10,000/- देणेबाबत आदेश व्हावेत अशी विनंती केली आहे.
(3) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत मेडिक्लेम पॉलीसी, तक्रारदारांनी सामनेवाला यांना पाठविलेली नोटीस, मेडिकल सर्टिफिकेट, मेडिकल बिले व रिपोर्टस् इत्यादीच्या प्रती व शपथपत्र दाखल केले आहे. (4) सामनेवाला विमा कंपनीने त्यांच्या म्हणण्यान्वये तक्रारदारांची तक्रार नाकारली आहे. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, तक्रारदारांनी क्लेम दाखल केला त्यावेळेस त्यांनी कोणत्याही कागदपत्रांची पूर्तता केलेली नाही. त्यामुळे सामनेवाला यांना औषधोपचाराच्या कागदपत्रांची छाननी करता आलेली नाही. तक्रारदारांना झालेल्या नुकसानीची सामनेवाला यांना माहिती नाही. सबब, तक्रारदारांची मागणी चुकीची आहे. सबब, तक्रारदारांची तक्रार खर्चासह फेटाळणेत यावी अशी विनंती केली आहे.
(5) सामनेवाला यांनी त्यांच्या म्हणण्याच्या पुष्टयर्थ सामनेवाला यांचे मेडिकल कन्स्लटंट यांनी तक्रारदारांना दि.26.03.2009 रोजी पाठविलेल्या पत्राची प्रत दाखल केलेली आहे. (6) या मंचाने दोन्ही बाजूंच्या वकिलांचे युक्तिवाद सविस्तर व विस्तृतपणे ऐकले आहेत. या मंचाने उपलब्ध कागदपत्रांचे अवलोकन केले आहे. तसेच, तक्रारदारांनी घेतलेल्या उपचारासंबंधीचे हॉस्पिटलचे केसपेपर्स, वैद्यकिय बिले इत्यादींचेही अवलोकन केले आहे. युक्तिवादाचेवेळेस तक्रारदारांच्या वकिलांनी तक्रारदारांच्या पगाराचे नुकसानीची केलेली मागणी सोडून देत असल्याचे प्रतिपादन केले. सदर प्रतिपादनास सामनेवाला यांच्या वकिलांनी संम्मती दर्शविली आहे. सामनेवाला विमा कंपनीकडे तक्रारदारांनी त्यांच्या क्लेमसोबत कागदपत्रे पाठविली असलेची वस्तुस्थिती या मंचाचे निदर्शनास येते. तसेच, दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तिवाद विचारात घेता तक्रारदार हे औषधोपचाराचा खर्च रुपये 37,118/- व्याजासह मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब आदेश.
आदेश
1. सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारांना रक्कम रुपये 37,118/- (रुपये सदतीस हजार एकशे अकरा फक्त) द्यावेत. सदर रक्कमेवर क्लेम दाखल तारीख 29.10.2008 रोजीपासून तक्रारदारांना संपूर्ण रक्कम मिळेपावेतो द.सा.द.शे.9 टक्के व्याज द्यावे.
2. सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारांना तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 500/- द्यावेत.
| [HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER | |