नि.क्र. २५
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – अनिल य.गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
तक्रार अर्ज क्र.३८/२०११
----------------------------------------
तक्रार नोंद तारीख : १०/०२/२०११
तक्रार दाखल तारीख : १७/०२/२०११
निकाल तारीख : १९/१२/२०११
--------------------------------------------
१. श्रीमती मेघमाला प्रकाश थोरात
वय वर्षे – ४७, व्यवसाय – शेती व घरकाम
रा.गोटखिंडी, ता.वाळवा, जि. सांगली. ...... तक्रारदार
विरुध्द
१. दी ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी लि.,
सांगली डिव्हीजनचे डिव्हीजनल मॅनेजर
श्री अरुणाभ बर्धन,
वय वर्षे-सज्ञान, व्यवसाय – नोकरी
डिव्हीजन ऑफिस नं.२, ८, हिंदुस्थान कॉलनी,
अजनी चौकाजवळ, वर्धा रोड, नागपूर – ४४० ०१५
२. कबाल इन्शुरन्स सर्व्हिसेस प्रा.लि. चे विभागीय प्रमुख
श्रीमती सुचेता प्रधान,
वय वर्षे – सज्ञान, व्यवसाय – नोकरी,
१०१, शिवाजी नगर, ३ रा मजला,
मंगला टॉकीज जवळ, पुणे – ४११००५
३. महाराष्ट्र शासन तर्फे मा.जिल्हाधिकारी
श्री शाम वर्धने सो,
वय वर्षे – सज्ञान, व्यवसाय – नोकरी,
जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली ..... जाबदार
तक्रारदार तर्फेò : +ìb÷. एम.एन. शेटे
जाबदारक्र.१ तर्फे : +ìb÷. श्री के.ए.मुरचिटे,
व्ही.एम.पाटील
जाबदारक्र.२ : एकतर्फा
जाबदारक्र.३ : स्वत:
- नि का ल प त्र -
द्वारा: मा. अध्यक्ष: श्री. अनिल य.गोडसे
१. तक्रारदाराने सदरचा तक्रार अर्ज शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेनुसार दाखल केला आहे.
२. सदर तक्रार अर्जाचा तपशिल पुढीलप्रमाणे-
महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील शेतक-यांच्या अपघातासंदर्भात शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेनुसार शेतक-यांना विमा संरक्षण देण्यासाठी जाबदार क्र.१ विमा कंपनी यांचेबरोबर विमा करार करण्यात आला आहे. तक्रारदार यांचे पती कै.प्रकाश गोविंदराव थोरात हे शेतकरी होते व त्यांना दि.१६/८/२००८ रोजी दत्ताजीराव थोरात व नारायण थोरात यांच्यातील भांडणे सोडविण्यास गेले असताना डोक्यास जबर मार लागला व त्यामुळे त्यांचा दि.१७/८/२००८ रोजी मृत्यू झाला. तक्रारदार या त्यांच्या पत्नी या नात्याने कायदेशीर वारस आहेत. तक्रारदार यांनी शेतकरी अपघात विमा योजनेनुसार रक्कम मिळणेसाठी गावकामगार तलाठी, गोटखिंडी यांचेकडे दि.२/१/२००९ रोजी प्रस्ताव दाखल केला. गावकामगार तलाठी यांनी सदरचा प्रस्ताव तहसिलदार वाळवा यांचेकडे पाठविला. तहसिलदार वाळवा यांनी सदरचा प्रस्ताव जाबदार क्र.१ यांचेकडे पाठविला. सर्व पूर्तता करुनही जाबदार यांनी तक्रारदार यांचा विमादावा दि.२/८/२०१० रोजीच्या पत्राने नाकारला आहे. त्यामुळे तक्रारदार यांनी विम्याची रक्कम व्याजासह मिळणेसाठी तसेच शारीरिक, मानसिक ञासापोटी नुकसानभरपाई व तक्रार अर्जाचा खर्च मिळणेसाठी तक्रारदार यांनी सदरचा तक्रार अर्ज दाखल केलेला आहे.
तक्रारदार यांनी तक्रार अर्जासोबत नि.३ च्या यादीने ८ कागद दाखल केले आहेत.
३. जाबदार क्र.१ यांनी याकामी नि.१५ वर आपले म्हणणे शपथपत्राच्या स्वरुपात दाखल केले आहे. जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्ये तक्रारदारांच्या तक्रार अर्जातील बहुतांश मजकूर नाकारला आहे. जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्ये महाराष्ट्र शासनाबरोबरशेतक-यांना अपघाती विमा संरक्षण देणेबाबत करार झाला आहे ही बाब मान्य केली आहे. मयत हे शेतकरी असल्याची बाब जाबदार यांनी नाकारली आहे. तक्रारदार यांचा मृत्यू हा कौटुंबिक वादविवादातून झालेली हत्या आहे. मयत स्वत: वादविवाद व भांडणामध्ये गुंतले होते. त्यामुळे पॉलिसीतील अटीनुसार करारपत्रातील Exclusion सदरानुसार प्रकाश यांचा मृत्यू शेतकरी अपघात विमा योजनेमध्ये समावेश होत नाही. या कारणास्तव तक्रारदार यांचा अर्ज फेटाळणेस पात्र आहे. सबब प्रस्तुतचा तक्रारअर्ज फेटाळणेत यावा असे जाबदार यांनी आपल्या म्हणण्यात नमूद केले आहे. जाबदार क्र.१ यांनी नि.१६ चे यादीने १ कागद दाखल केला आहे.
४. जाबदार नं.३ मार्फत तहसिलदार वाळवा यांनी नि.१३ वर आपले म्हणणे दाखल केले आहे. सदर म्हणण्यामध्ये जाबदार यांनी तक्रारदार यांचा विमादावा योग्य त्या कागदपत्रांसह तात्काळ जाबदार क्र.२ यांचेकडे दि.२३/१/२००९ रोजी पाठविला असल्याचे नमूद केले आहे.
५. जाबदार क्र.२ यांनी याकामी आपले म्हणणे दाखल न केल्यामुळे त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश नि.१ वर करण्यात आला.
६. तक्रारदार यांनी याकामी नि.१८ ला दुरुस्तीचा अर्ज दाखल केला. त्याप्रमाणे जाबदार यांच्या नावामध्ये दुरुस्ती करण्यास परवानगी देण्यात आली. तक्रारदार यांनी नि.१९ ला लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. तसेच नि.२० च्या यादीने २ कागद दाखल केले आहेत. नि.२२ वर तोंडी युक्तिवाद करणेचा नाही अशी पुरसिस दाखल केली आहे. जाबदार क्र.१ यांनी नि.२४ ला आपला लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
७. तक्रारदारांचा तक्रार अर्ज, दाखल कागदपत्रे, जाबदार यांनी दिलेले म्हणणे यांचे अवलोकन केले. जाबदार क्र.१ यांच्या विधिज्ञांचा युक्तिवाद ऐकला. प्रस्तुत तक्रारअर्जातील तक्रारअर्ज व कागदपत्रे यांचे अवलोकन केले असता सर्व शेतक-यांच्या वतीने महाराष्ट्र शासनाने जाबदार क्र.१ यांचेबरोबर विमा करार केला आहे त्यामुळे अपघातग्रस्त शेतकरी व त्यांचे वारस हे सदर विमा करारानुसार लाभार्थी होतात व ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदीनुसार लाभार्थी हा सुध्दा ग्राहक या सदरात येतो त्यामुळे तक्रारदार हे जाबदार नं.१ यांचे ग्राहक आहेत असा या मंचाचा निष्कर्ष आहे.
८. तक्रारदार यांनी त्यांना शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेनुसार रक्कम रु.१,००,०००/- मिळावेत अशी मागणी केली आहे. जाबदार क्र.१ यांनी नि.१५ वर आपले म्हणणे दाखल केले आहे. जाबदार क्र.१ यांनी आपल्या म्हणण्यामध्ये विम्याचा करार हा दि.२९/८/२००७ रोजी करण्यात आल्याचे नमूद केले आहे. जाबदार क्र.१ यांनी नि.१६/१ वर विमा कराराबाबत झालेल्या करारपत्राची प्रत दाखल केली आहे. जाबदार यांचे करारपत्र पाहता तक्रारदार यांचे पती यांचा मृत्यू दि.१७/८/२००८ रोजी विमा मुदतीत झाला आहे ही बाब स्पष्ट होते. जाबदार यांनी दाखल केलेल्या म्हणण्यानुसार महाराष्ट्र शासनाचे वतीने जाबदार क्र.१ यांच्या बरोबर राज्यातील शेतक-यांसाठी विमा योजना राबविण्यात आली असल्याचे स्पष्ट होते. जाबदार क्र.१ यांनी याकामी नि.१६/१ वर करारपत्र दाखल केले आहे. सदर करारपत्रानुसार अपघातग्रस्त व्यक्ती ही शेतकरी असणे गरजेचे आहे व अपघातसमयी तिचे वय १२ ते ७५ वयोगटातील असणे आवश्यक आहे. मृत्यू दाखला व इंक्वेस्ट पंचनाम्याचे अवलोकन केले असता तक्रारदार यांचे पतीचे वय ५२ असे नमूद आहे. जाबदार यांनी तक्रारदार यांचे पतीच्या वयाबाबत कोणताही वाद उपस्थित केला नाही. त्यामुळे तक्रारदार यांचे पतीचे वय निश्चितच १२ ते ७५ या दरम्यानचे आहे या निष्कर्षाप्रत सदरचा मंच येत आहे. अपघातग्रस्त व्यक्ती शेतकरी असलेबाबत तक्रारदार यांनी सात-बारा उतारा व खाते उतारा याकामी दाखल केला आहे. सदर उता-यावर तक्रारदार यांचे पतीचे नाव नमूद आहे. त्यामुळे तक्रारदार यांचे पती हे शेतकरी आहेत ही बाब समोर येते.
९. तक्रारदार यांचा विमा दावा ज्या कारणास्तव नाकारला ते विमा दावा नाकारल्याचे पत्र तक्रारदार यांनी नि.३/८ वर दाखल केले आहे. विमा दावा नाकारण्यासाठी दिलेले कारण हे मयताचा जवळच्या नातेवाईकांनी खून केला असल्याने सदरच्या पॉलिसीच्या अटीनुसार विमा दावा मंजूर होणेस पात्र नाही. सदर विमा दावा नाकारण्यासाठी दिलेले कारण संयुक्तिक आहे काय? हे प्रस्तुत प्रकरणी पहाणे गरजेचे आहे. विमा दाव्याच्या अटी व शर्ती दर्शविणारे करारपत्र याकामी जाबदार यांनी नि.१६ चे यादीने दाखल केले आहे. सदरच्या करारपत्रामधील Exclusion Clause मध्ये अनु.क्र.१५ येथे Murder by immediate beneficiary असे नमूद आहे. तक्रारदार यांचा त्यांच्या चुलतभावांनी खून केला आहे. त्यामुळे सदरच्या Exclusion Clause नुसार विमा दावा मंजूर होणेस पात्र नाही असे जाबदार यांचे विधिज्ञांनी युक्तिवादामध्ये नमूद केले. तक्रारदार यांचे पती हे भांडणे सोडविण्यासाठी गेले असताना त्यांच्या डोक्याला मार लागून त्यांचा मृत्यु झाला आहे असे तक्रारदार यांनी आपल्या तक्रार अर्जामध्ये नमूद केले आहे. जाबदार यांच्या कथनाप्रमाणे तक्रारदार यांचे पती यांचा खून झाला असे जरी मानले तरी सदरचा खून immediate beneficiary म्हणजे जवळचे लाभार्थी यांनी केला आहे का? हे पहाणे गरजेचे आहे. पॉलिसीच्या अटी व शर्तीमध्ये immediate beneficiary कोण ? हे नमूद नाही. चुलतभाऊ हे जवळचे नातेवाईक आहेत परंतु ते पॉलिसीसाठी लाभार्थी ठरणार नाहीत असे या मंचाचे मत आहे. त्यामुळे तक्रारदार यांचा विमा दावा जाबदार यांनी ज्या कारणास्तव नाकारला ते कारण मंचास योग्य व संयुक्तिक वाटत नाही. तक्रारदार यांचा विमा दावा अयोग्य कारणास्तव नाकारुन जाबदार यांनी तक्रारदार यांना सदोष सेवा दिली आहे या निष्कर्षाप्रत सदरचा मंच आला असल्याने तक्रारदार हे मागणीप्रमाणे रक्कम रु.१,००,०००/- मिळणेस पात्र आहेत असे या मंचाचे मत झाले आहे. सदरची रक्कम विमा दावा नाकारलेचे तारखेपासून म्हणजे दि.०२/०८/२०१० पासून व्याजासह मंजूर करणेत येत आहे.
१०. तक्रारदार यांनी शारीरिक मानसिक ञासापोटी नुकसानभरपाई व तक्रार अर्जाचा खर्च मिळावा अशी मागणी केली आहे. तक्रारदार यांचा विमादावा जाबदार यांनी अयोग्य कारणास्तव नाकारल्याने तक्रारदार यांना या न्याय मंचात तक्रार अर्ज दाखल करावा लागला ही बाब विचारात घेता सदरची मागणी अंशत: मंजूर करणे योग्य ठरेल असे या मंचाचे मत आहे.
११. यातील जाबदार ३ हे महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी आहेत. महाराष्ट्र शासनाने जाबदार २ यांची सल्लागार म्हणून नेमणूक केली आहे. विम्याचे संरक्षण देण्याची जबाबदारी व करार जाबदार १ यांचेबरोबर झालेला आहे त्यामूळे सदरचा आदेश जाबदार नं.१ यांचेविरुध्द करणेत येतो.
वरील सर्व विवेचनावरुन सदरचा मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
१. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येत आहेत.
२. तक्रारदार यांना जाबदार नं.१ यांनी विमा दाव्यापोटी रक्कम रुपये १,००,०००/-(अक्षरी रुपये
एक लाख माञ) दि.०२/०८/२०१० पासून द.सा.द.शे.९% दराने व्याजासह अदा करावेत.
३. तक्रारदार यांना जाबदार क्र.१ यांनी शारीरिक मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई व तक्रार
अर्जाचा खर्च म्हणून रुपये ५,०००/- (अक्षरी रुपये पाच हजार माञ) अदा करावेत.
४. वर नमूद आदेशाची पुर्तता जाबदार नं.१ यांनी दिनांक ४/०२/२०१२ पर्यंत करणेची आहे.
५. जाबदार नं.१ यांनी आदेशाची पुर्तता विहीत मुदतीत न केल्यास तक्रारदार त्यांचे विरुध्द
ग्राहक संरक्षण कायदयातील तरतूदीनुसार दाद मागू शकतील.
सांगली
दि. १९/१२/२०११
(गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली.
प्रत – तक्रारदार यांना हस्तपोहोच/रजि.पोस्टाने दि. / /२०११
जाबदार यांना हस्तपोहोच/रजि.पोस्टाने दि. / /२०११