नि. १७
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा. अध्यक्ष - श्री अनिल य. गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
ग्राहक तक्रार अर्ज क्र. ६७/२०११
--------------------------------------------
तक्रार नोंद तारीख: - १४/३/२०११
तक्रार दाखल तारीखः - १६/३/२०११
निकाल तारीखः - २८/११/२०११
-------------------------------------
सुरवंता दादासो बंडगर
वय वर्षे – सज्ञान, धंदा – शेती
रा.ता.कवठेमहांकाळ जि.सांगली ..... तक्रारदार
विरुध्द
दि ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी लि.
विभागीय कार्यालय – १५ ए.डी.कॉम्प्लेक्स,
माऊंट रोड, एक्स्टेन्शन, सदर, नागपुर – ४४० ००१
(सदरचे समन्स सांगली शाखा-कृष्णा कमर्शिअल कॉम्प्लेक्स
आमराई रोड, सांगली येथे बजावण्यात यावे) ..... जाबदार
ग्राहक तक्रार अर्ज क्र. ६८/२०११
--------------------------------------------
तक्रार नोंद तारीख: - १४/३/२०११
तक्रार दाखल तारीखः - १६/३/२०११
निकाल तारीखः - २८/११/२०११
-------------------------------------
श्री व्यंकटराव पांडुरंग भोसले
वय वर्षे – सज्ञान, धंदा – शेती
रा.रांजणी, ता.कवठेमहांकाळ जि.सांगली ..... तक्रारदार
विरुध्द
दि ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी लि.
विभागीय कार्यालय – १५ ए.डी.कॉम्प्लेक्स,
माऊंट रोड, एक्स्टेन्शन, सदर, नागपुर – ४४० ००१
(सदरचे समन्स सांगली शाखा-कृष्णा कमर्शिअल कॉम्प्लेक्स
आमराई रोड, सांगली येथे बजावण्यात यावे) ..... जाबदार
तक्रारदार तर्फे – +ìड.पी.एस परीट
जाबदार तर्फे – +ìड.बी.बी.खेमलापुरे
ए क त्रि त नि का ल प त्र
द्वारा- मा. सदस्या- गीता घाटगे.
दोन्ही प्रकरणातील तक्रारदारांनी त्यांच्या जनावरांचा विमा जाबदार विमा कंपनीकडे उतरविला होता. त्यांची जनावरे मयत झालेनंतर त्यांनी विमा रकमेची मागणी विमा कंपनीकडे केली तथापि, विमा कंपनीने ती मागणी नाकारली. म्हणून तक्रारदारांनी सदरहू प्रकरणे दाखल केली आहेत. याबाबत थोडक्यात हकीकत खालीलप्रमाणे -
१. दोन्ही प्रकरणांतील तक्रारदार हे शेतकरी असून शेतीस पूरक म्हणून ते दुग्धव्यवसायही करतात. त्यासाठी तक्रारअर्ज क्र.६८/११ मधील तक्रारदार श्री भोसले यांनी गाय तर तक्रारअर्ज क्र.६७/११ मधील तक्रारदार सुरवंता बंडगर यांनी म्हैस पाळली होती. या म्हैशीचा व गायीचा विमा तक्रारदारांनी जाबदार विमा कंपनीकडे दि.३१/०३/२००८ रोजी उतरविला होता. या विम्याचा कालावधी तीन वर्षासाठी होता. म्हैशीच्या कानामध्ये जाबदार कंपनीने क्रमांक १००९१५ चा बिल्ला मारला होता तर गायीच्या कानामध्ये जाबदार कंपनीने क्र.१००९९७ चा बिल्ला मारला होता. दि.२३/५/२००८ रोजी गाय मयत झाली तर दि.१/६/२००८ रोजी म्हैस मयत झाली. जनावरे मयत झालेनंतर तक्रारदारांनी या जनावरांचा पंचनामा डॉक्टरांमार्फत केला. गायीचा पंचनामा व पोस्टमॉर्टेम दि.२३/५/२००८ रोजी पंचासमक्ष केला तर म्हैशीचा दि.२/६/२००८ रोजी केला. त्यानंतर तक्रारदारांनी सविस्तर माहितीसह व आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह विमा रकमेची मागणी करणारा क्लेम जाबदार कंपनीकडे सादर केला. परंतु जनावराच्या कानाचा तुकडा बिल्ल्यासोबत नसल्याने दोन्ही तक्रारदारांचा विमाक्लेम जाबदारांनी नाकारला. तक्रारदारांच्या कथनानुसार जाबदारांनी हेतुपुरस्सर त्यांचा विमाक्लेम नाकारला आहे व त्यांना सदोष सेवा पुरविली आहे आणि म्हणून त्यांनी सदरहू प्रकरणे दाखल करुन गायीची व म्हैशीची प्रत्येकी विमा रक्कम रु.३०,०००/- तसेच त्यांना झालेल्या मानसिक व आर्थिक त्रासापोटी प्रत्येकी रक्कम रु.१५,०००/- अशी एकूण प्रत्येक प्रकरणी रक्कम रु.४५,०००/- ची मागणी केली आहे. तक्रारअर्जाचे पुष्ठयर्थ दोन्ही तक्रारदारांनी प्रतिज्ञापत्र दाखल करुन नि.४ अन्वये अर्ज क्र.६७/११ मध्ये एकूण ६ कागद तर अर्ज क्र.६८/११ मध्ये नि.४ अन्वये एकूण ३ कागद दाखल केले आहेत.
२. मंचाच्या नोटीशीची बजावणी दोन्ही प्रकरणी जाबदार यांचेवर झाल्यावर ते विधिज्ञांमार्फत हजर झाले व त्यांचे म्हणणे त्यांनी दाखल केले. दोन्ही प्रकरणी त्यांनी सदरहू तक्रारअर्ज हा मुदतीत नसल्याचा आक्षेपाचा मुद्दा उपस्थित केलेला आहे. तक्रारदारांनी विमा क्लेमसोबत जो बिल्ला पाठविलेला होता त्यासोबत कानाचा तुकडा नसल्याकारणाने विषयाधीन जनावरांचा विमा उतरविण्यात आला होता ही बाबच जाबदारांनी नाकारलेली आहे. त्यामुळे या अनुषंगे तक्रारदारांच्या ज्या तक्रारी आहेत त्या, त्यांनी दाखल केलेली जी कागदपत्रे आहेत ती व त्या अनुषंगे करण्यात आलेल्या तक्रारदारांच्या मागण्या या सर्वच बाबी जाबदारांनी जोरदारपणे नाकारलेल्या आहेत. त्याचप्रमाणे जाबदारांच्या म्हणण्यानुसार तक्रारदारांनी आवश्यक ती कागदपत्रे तक्रारदारांच्या तक्रारीच्या पुष्ठयर्थ दाखल केलेली नाहीत. म्हणून देखील जाबदारांनी तक्रारदारांच्या तक्रारी त्यांच्या म्हणण्यामध्ये नाकारलेल्या आहेत व या सर्व कारणांमुळे तक्रारदारांचा तक्रारअर्ज हा शंकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केलेले आहे. आणि म्हणून जाबदारांनी तक्रारदारांचा विमाक्लेम नाकारुन, कोणतीही दूषीत सेवा दिलेली नाही असे म्हणणे मांडून, तक्रारदारांचे दोन्ही तक्रारअर्ज नामंजूर करण्यात यावेत अशी विनंती केलेली आहे. म्हणण्याच्या पुष्ठयर्थ जाबदारांनी प्रतिज्ञापत्र दाखल केलेले आहे.
३. दोन्ही प्रकरणी जाबदारांचे म्हणणे दाखल झाल्यावर उभय पक्षकारांतर्फे लेखी युक्तिवाद दाखल करणेत आला व त्यानंतर उभय पक्षकारांनी त्यांचा लेखी युक्तिवाद हाच तोंडी युक्तिवाद समजणेत यावा अशी पुरसिस दाखल केली. त्यानंतर दोन्ही प्रकरणे निकालासाठी नेमणेत आली.
४. अर्ज क्र.६७/११ व ६८/११ मधील तक्रारअर्जांचे, दाखल कागदपत्रांचे, म्हणण्याचे व लेखी युक्तिवादाचे अवलोकन करता जाबदारांनी दोन्ही प्रकरणे मुदतीत नसल्याचा आक्षेप त्यांच्या म्हणण्यामध्ये घेतलेला असल्याचे दिसून येते. परंतु दोन्ही प्रकरणी तक्रारदारांनी विमा कंपनीचे विमा नामंजूर केल्याचे जे पत्र दाखल केले आहे, ते दि.१४/८/२००९ चे आहे तर दोन्ही तक्रारअर्ज हे दि.१४/३/२०११ रोजी दाखल करण्यात आलेले आहेत. या बाबींची दखल घेता तक्रारदारांचा तक्रारअर्ज हा कायदेशीर मुदतीत असल्याचा मंचाचा निष्कर्ष निघतो व जाबदारांचा हा आक्षेपाचा मुद्दा तथ्यहीन ठरतो.
५. दोन्ही तक्रारदारांनी गायीचा व म्हैशीचा विमा हा जाबदार विमा कंपनीकडे उतरविलेला होता असे त्यांच्या तक्रारअर्जात नमूद केलेले आहे व या त्यांच्या म्हणण्यावर आधारुन त्यांनी विमा रकमेची मागणी केलेली आहे. तक्रारदारांच्या या मागणीच्या अनुषंगे प्रस्तुत प्रकरणाचे अवलोकन करता मंचास केवळ दोनच परंतु अत्यंत महत्वाच्या अशा बाबी आढळून येतात. त्यापैकी एक ही की, तक्रारदारांनी विमा पॉलिसीची प्रत दोन्ही प्रकरणी दाखल केलेली नाही. तर दुसरी व अत्यंत महत्वाची बाब म्हणजे दोन्ही प्रकरणांमध्ये तक्रारदारांनी
विमा पॉलिसीचा क्रमांक म्हणून क्रमांक १८११००/४८/२००८/२३९५ असा क्रमांक नमूद केलेला आहे. प्रस्तुत दोन्ही प्रकरणी एक बाब लक्षात घेणे महत्वाचे आहे ते म्हणजे प्रत्येक विमा पॉलिसीचा क्रमांक हा वेगवेगळा असतो ही बाब सर्वश्रुत आहे. एकच क्रमांक एकापेक्षा जास्त पॉलिसींना असू शकत नाही. त्यातूनही विमा कंपनीने दोन वेगवेगळया विमा पॉलिसींना एकच क्रमांकदिला असता तर ती बाबही पॉलिसीच्या प्रतींवरुन लक्षात आली असती. परंतु दोनही तक्रारदारांनी विमा पॉलिसीच्या प्रतीही दाखल केलेल्या नाहीत. दोन्ही प्रकरणात तक्रारदारांनी विमा कंपनीबरोबर त्यांनी केलेला पत्रव्यवहार दाखल केलेला आहे. या पत्रव्यवहारामध्ये देखील गायीचा व म्हैशीचा विमा पॉलिसी क्रमांक म्हणून हाच क्रमांक नमूद करण्यात आलेला आहे. त्यामुळे दोन्ही प्रकरणी एकच पॉलिसी क्रमांक नमूद होणे म्हणजे ती टंकलेखनातील चूक असू शकते असा निष्कर्षही निश्चितच निघू शकत नाही.
दोनही प्रकरणांतील तक्रारअर्ज व दाखल कागदपत्रांची अवलोकन करता अन्य काही बाबीही मंचास आढळून आल्या, त्या खालीलप्रमाणे –
दोनही प्रकरणी तक्रारदारांनी जनावरे कोणत्या कारणाने मयत झाली, त्यांचे पोस्ट मार्टेम रिपोर्ट, डॉक्टरांचा दाखला इ. महत्वाची कागदपत्रे दाखल केलेली नाहीत. तसेच तक्रारअर्ज क्र. ६८/११ मध्ये तक्रारअर्जात तक्रारदारांनी “म्हशीच्या विम्याची रक्कम मिळणेबाबत अर्ज” असे नमूद केले आहे. मात्र अन्य ठिकाणी गायीचा उल्लेख करुन, तिच्या वर्णनात शेपूट गोंडा पांढरा असे नमूद केले आहे. तथापि नि.४/१ अन्वये दाखल पंचनाम्याच्या प्रतीमध्ये शेपूट गोंडा काळा पांढरा असल्याचे नमूद केले आहे. हा विरोधाभासही मंचाचे लक्ष वेधून घेतो. तर तक्रारअर्ज क्र.६७/११ मध्ये म्हशीचे वर्णन नाही. या सर्व बाबींची एकत्रितपणे दखल घेता सदरहू दोनही प्रकरणी तक्रारदार हे मंचापुढे स्वच्छ हाताने आलेले नाहीत ही बाब अत्यंत ठळकपणे शाबीत होते. अशा परिस्थितीमध्ये तक्रारदारांचे दोन्ही तक्रारअर्ज नामंजूर करणे अत्यंत योग्य व न्याय्य ठरेल असा मंचाचा निष्कर्ष निघतो व त्यानुसार अंतिम आदेश पारीत करण्यात येतो. तक्रारअर्ज नामंजूर केल्याने जाबदारांनी उपस्थित केलेल्या आक्षेपाच्या अन्य मुद्यांचा ऊहापोह प्रस्तुत निकालपत्रात करण्यात आलेला नाही.
दोन्ही प्रकरणांमध्ये वेगवेगळया जनावरांचा एकच पॉलिसी क्रमांक दोन्ही तक्रारदारांनी नमूद करुन जाबदार विमा कंपनीविरुध्द तक्रारअर्ज दाखल केलेला आहे ही बाब अत्यंत गंभीर असून मंचाच्या निदर्शनास आल्याने या दोन्ही प्रकरणांमध्ये एकत्रित निकालपत्र देण्यात येत आहे.
सबब, मंचाचा आदेश की,
आ दे श
१. तक्रारदारांचे दोन्ही तक्रारअर्ज क्र.६७/२०११ व ६८/२०११ नामंजूर करण्यात येत आहे.
२. खर्चाबाबत कोणतेही आदेश नाहीत.
सांगली
दि. २८/११/२०११
(गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली.
प्रतः-
तक्रारदार यांना हात पोहोच/रजि ए.डी.ने दि. / /२०११
जाबदार यांना हात पोहोच/रजि ए.डी.ने दि. / /२०११