तक्रार क्र. 3/2015.
तक्रार दाखल दि.03-01-2015.
तक्रार निकाली दि.25-02-2016.
श्री. भरत जयवंत पाटील,
रा. 2901, पिलेश्वरी नगर,
म्हसवे रोड, करंजे तर्फे सातारा. .... तक्रारदार.
विरुध्द
दि ओरिएंटल इन्श्यूरन्स कंपनी लि.,
सातारा विभागीय कार्यालय, तर्फे व्यवस्थापक,
सि.स.नं. 513, सदर बझार, जीवनतारा भवन,
कलेक्टर ऑफीस समोर, सातारा. .... जाबदार.
.....तक्रारदारतर्फे- अँड.व्ही.आय.शेट्टी.
.....जाबदार तर्फे- अँड.एस.एस.जाधव.
न्यायनिर्णय
(मा.सौ.सविता भोसले,अध्यक्ष यांनी न्यायनिर्णय पारित केला.)
1. प्रस्तुतचा तक्रार अर्ज तक्रारदार यांनी ग्राहक संरक्षण कायदा,1986 चे कलम 12 नुसार दाखल केला आहे. प्रस्तुत तक्रार अर्जातील थोडक्यात कथन खालीलप्रमाणे-
तक्रारदार हे सातारा येथील रहिवाशी आहेत. ते व्यवसायाने वकील आहेत. जाबदार विमा कंपनीने जिल्हा बार असोसिएशनचे सभासदांकरिता ग्रुप जनता वैयक्तिक अपघात विमा संरक्षण देणेचे मान्य करुन तारीख 19/12/2013 रोजी ते दि.18/12/2018 या कालावधीसाठी विमा पॉलीसी क्र.162400/47/2014/159 ही सातारा जिल्हा बार असोसिएशनचे नावे दिलेली आहे. या पॉलीसी अंतर्गत एकूण 127 सभासद विमेदार समाविष्ट आहेत. त्यामध्ये तक्रारदार यांचादेखील समावेश आहे. जाबदार विमा कंपनीने या विमा पॉलीसीअंतर्गत नमूद कालावधीकरीता प्रत्येक विमेदाराची रक्कम रु.1,00,000/- (रुपये एक लाख मात्र) ची जोखीम स्विकारली होती व आहे. अशाप्रकारे तक्रारदार हे जाबदार यांचेकडून वादातीत विमा पॉलीसी तहत मिळावयाच्या न्याय सेवेचे हक्कदार आहेत. सबब तक्रारदार हे जाबदाराचे ग्राहक आहेत. तक्रारदार हे त्यांचे दुचाकी वाहनावरुन दि.19/7/2014 रोजी मौजे कोरेगांव कोर्टातील कोर्ट कामकाजाकरीता जात असता सातारा कोरेगांव रस्त्यावरील मौजे खवली या गावचे जवळ समोरुन भरधाव वेगाने येणा-या दुचाकी वाहनाने धडक दिली व मोठा उपघात झाला. सदर अपघाताची नोंद सातारा पो.स्टे. भाग क्र. 5 येथे नोंदणेत आली आहे. या अपघातात तक्रारदाराला मोठी दुखापत झाली आहे. तक्रारदाराचे उजव्या गुडघ्याखालील हाड अनेक ठिकाणी मोडले, उजव्या तळपायाच्या बोटांपैकी अंगठा सोडून ऊर्वरित सर्व बोटांची हाडे तुटली व मोठी जखम झाली. तसेच उजव्या तळहाताच्या अंगठया शेजारी बोटाचे पुढील पेराच्या ठिकाणचे हाड मोडून त्याचे तुकडे झाले तर डाव्या खांद्याच्या हाडदेखील मोडले. तक्रारदारावर सातारा येथील मोरया हॉस्पिटल येथे उपचार झाले आहेत. तसेच तक्रारदाराचे पायावर तीनवेळा शस्त्रक्रिया करावी लागली आहे व त्यावेळी जागोजागी स्टील रॉड व पट्टया घालाव्या लागल्या आहेत. उजव्या तळपायाच्या बोटांपैकी अंगठा सोडून ऊर्वरित चारही बोटे निकामी होऊन ती कायमस्वरुपी गमवावी लागली आहेत. तसेच तक्रारदाराचे उजव्या हाताच्या अंगठया शेजारील बोटाच्या पहिल्या पेराच्या जागी स्टील पॅड घालणेत आली आहे. त्यामुळे तक्रारदाराला त्यांच्या व्यवसायानुरुप लिखाणाचे काम करता येत नाही. त्या अपघाताची माहिती तक्रारदाराने संबंधीत कागदपत्रे इ. सातारा जिल्हा बार असोसिएशनमार्फत जाबदार विमा कंपनीकडे सादर करुन विमा दाव्याची मागणी केली. परंतू जाबदार विमा कंपनीने तक्रारदाराचा विमा क्लेम नाकारलेचे पत्र दि.9/9/2014 रोजी सातारा जिल्हा बार असोसिएशन यांना दिले आहे. प्रस्तुत जाबदाराने विमा क्लेम नाकारलेचे चूकीचे व वस्तुस्थितीविरुध्द कारण दिले असून प्रत्यक्षात तक्रारदाराला त्याचे उजव्या पायाची चार बोटे कायमस्वरुपी गमवावी लागली आहेत असे असता जाबदार यांनी त्यांचे दि.9/9/2014 चे पत्रामध्ये तक्रारदाराला केवळ एकच बोट गमवावे लागलेले आहे व हे अपंगत्व 50 टक्के पेक्षा कमी असलेचा बहाणा करुन देय विमा क्लेम नाकारला आहे. प्रस्तुत तक्रारदार यांना 60 टक्के कायस्वरुपी अपंगत्वाचे प्रमाणपत्र डॉ. भोसले यांनी दिलेले आहे. केवळ त्यावर तारीख नव्हती म्हणून पुन्हा डॉ. भोसले यांचेकडे सदर प्रमाणपत्राचरी मागणी केली व पुन्हा दि.22/9/2014 रोजी तक्रारदाराला 60 टक्के कायमस्वरुपी अपंगत्व आल्याचे प्रमाणपत्र डॉ. भोसले यांनी दिलेले आहे. तक्रारदार यांचा विमा क्लेम जाबदाराने चूकीच्या कारणासाठी नाकारला आहे. तक्रारदाराने दि.24/11/2014 रोजी जाबदार विमा कंपनीस रजि.नोटीस देऊन तक्रारदाराला 60 टक्के कायमस्वरुपी अपंगत्व आल्याचे समज देऊन विमा क्लेम अदा करावा असे कळविले आहे. जाबदार यांचेवर विमापॉलीसीच्या अनुषंगाने विमा क्लेम अदा करणेची जबाबदारी होती. परंतू जाबदाराने ती जबाबदारी टाळून दि. 28/11/2014 चे पत्र देऊन claim is not payable under the policy असे म्हणून विमाक्लेम नाकारला आहे. जाबदाराने सातारा जिल्हा बार असोसिएशन यांना अटी व शर्तीसह विमा पॉलीसी दिलेली नव्हती. तक्रारादाराने दि.15/12/2014 रोजी जाबदाराकडे लेखी अर्ज देऊन अटी व शर्तीसह विमा पॉलीसीची मागणी तक्रारदाराने करुनही जाबदाराने विमा पॉलीसी अटी व शर्तीसह तक्रारदाराला दिली नाही मात्र जाबदाराने तथाकथीत पॉलीसीच्या अटी शर्तीपैकी एक कागदाची प्रत दिली आहे ती याकामी हजर केली आहे. जाबदाराने त्यांची जबाबदारी जाणूनबुजून टाळलेली आहे व तक्रारदाराचा विमाक्लेम नाकारुन तक्रारदाराला सेवेत त्रुटी/कमतरता केली आहे. सबब प्रस्तुत तक्रारदार यांच्या विमा क्लेमची रक्कम जाबदार यांचेकडून वसूल होऊन मिळणेसाठी प्रस्तुत तक्रार अर्ज या मे. मंचात दाखल केला आहे.
2. तक्रारदाराने प्रस्तुत कामी जाबदार यांनी देय सेवेत राखलेली कमतरता दूर करुन देववावी, तदनुषंगीक दाद म्हणून तक्रारदाराचे विमा क्लेम रक्कम रु.50,000/- चे झाले नुकसान भरपाईपोटी जाबदार यांना जबाबदार धरुन जाबदारांकडून तक्रारदार यांना रक्कम रु.50,000/- चा विमाक्लेम अदा करावा, प्रस्तुत विमा क्लेमचे रकमेवर ता. 9/9/2014 पासून नुकसानीदाखल द.सा.द.शे. 18 टक्के प्रमाणे व्याज जाबदाराने अदा करावे, मानसिक त्रासापोटी जाबदाराने तक्रारदाराला रक्कम रु.25,000/- अदा करावेत, अर्जाचा खर्च म्हणून तक्रारदार यांना जाबदार यांनी रक्कम रु.10,000/- अदा करावेत अशी विनंती याकामी तक्रारदाराने केलेली आहे.
3. प्रस्तुत कामी तक्रारदाराने नि. 2 कडे अँफीडेव्हीट, नि.5 चे कागदयादीसोबत नि.5/1 ते नि.5/10 कडे अनुक्रमे तक्रारदाराचे अपघाताची फिर्याद, खबरी जबाब, घटनास्थळ पंचनामा, वादातीत पॉलीसीची कव्हरनोट, डॉ.भोसले यांचे अपंगत्वाचो प्रमाणपत्र, जाबदार यांचे विमा दावा नाकारलेचे पत्र, तक्रारदाराने दिलेली नोटीस स्थळ प्रत, जाबदार यांचे आलेले उत्तर, तक्रारदाराने दिलेला नक्कल मागणी अर्ज, जाबदाराने दिलेला कागद, नि.16 कडे तक्रारदाराचे पुराव्याचे शपथपत्र, नि.17 कडे पुरावा संपलेची पुरसीस, नि.20 कडे लेखी युक्तीवाद वगैरे कागदपत्रे तक्रारदाराने याकामी दाखल केली आहे.
4. प्रस्तुत कामी जाबदार यांनी नि.13 कडे म्हणणे/कैफीयत, नि.14 कडे अँफीडेव्हीट, नि.15 चे कागदयादीसोबत नि. 15/1 ते नि.15/6 कडे अनुक्रमे जाबदार यांच्या जनता व्यक्तीगत अपघात विमा पॉलीसीचा आवेदन फॉर्मची प्रत, जनता व्यक्तीगत अपघात विमा पॉलीसी सर्व अटी व शर्तीसह, तक्रारदाराचा दि.3/9/2014 चा अर्ज, जाबदार यांनी ता.9/9/2014 रोजी सातारा जिल्हा बार असोसिएशन यांना पाठवलेले रजि.ए.डी.पत्र, जाबदार यांनी तक्रारदार यांना दि.28/11/2014 रोजी पाठविलेले पत्र, तक्रारदाराने एकाच अपघातासाठी दोन कार्टात मागीतलेली नुकसानभरपाई, तक्रारदाराने सातारा जिल्हा न्यायालयात दाखल केला MACT No. 52/2015 ची झेरॉक्स प्रत, नि.18 कडे पुराव्याचे शपथपत्र नि.19 कडे पुरावा संपलेची पुरसिस, नि.21 कडे मे. वरिष्ठ न्यायालयांचे न्यायनिवाडे, नि.22 कडे जाबदाराचा लेखी युक्तीवाद वगैरे कागदपत्रे जाबदाराने याकामी दाखल केली आहेत.
जाबदाराने तक्रार अर्जातील तक्रारदाराची सर्व कथने फेटाळलेली आहेत. त्यांनी पुढीलप्रमाणे आक्षेप नोंदवलेले आहेत.
i तक्रारदाराचा तक्रार अर्ज व त्यातील मजकूर मान्य व कबूल नाही. तक्रारदार यांचा विमा क्लेम नाकारलेचे पत्र दि.9/9/2014 रोजी सातारा जिल्हा बार असोसिएशन यांना दिले आहे. हा मजकूर बरोबर आहे. तसेच तक्रारदाराला 60 टक्के कायमचे अपंगत्व आहे त्याबाबतचे डॉ. भोसले यांचे प्रमाणपत्र, तसेच तक्रारदाराचा विमादावा जाबदाराने चूकीच्या पध्दतीने नाकारला व देय सेवेमध्ये कमतरता व त्रुटी केली तसेच जाबदार यांनी जिल्हा बार असोसिएशन यांना विमा पॉलीसी देताना अटी व शर्तीसह दिली नव्हती, जाबदाराने विमा जोखीमीचे उत्तरदायीत्व जाणीवपूर्वक टाळलेले आहे इत्यादी मजकूर हा चूकीचा असून मान्य नाही.
ii जाबदार विमा कंपनीने प्रस्तुत विमा पॉलीसी ही अटी शर्ती व सर्व कागदपत्रांसह सातारा जिल्हा बार असोसिएशन यांना दिली होती. जनता पर्सनल अँक्सीडेंट पॉलीसीही जाबदार विमा कंपनी व सातारा जिल्हा बार असोसिएशन सातारा यांचेमध्ये विमाकरार झाला आहे असे असतानाही तक्रारदार यांनी सातारा जिल्हा बार असोसीएशन यांना याकामी सामील केलेले नाही. सातारा जिल्हा बार असोसिएशन, सातारा यांनी विमा कंपनीकडे कोणतीही दाद मागितलेली नाही. सबब तक्रारदार यांना तक्रार अर्ज दाखल करणेचा अधिकार नाही. तक्रार अर्ज खर्चासह फेटाळणेत यावा. जाबदार विमा कंपानीने विमा पॉलीसीच्या अटी शर्ती, विमा रक्कम विमा संरक्षण, अपवाद व मर्यादा यांची सविस्तर माहिती सर्व सभासद व पदाधिकारी यांना दिली होती व या अटी व शर्ती मान्य असलेनेच सदर पॉलीसी सातारा जिल्हा बार असोसिएशन यांनी घेतली होती. तसेच प्रस्तुत विमा पॉलीसीतील अटी व शर्थी विमेदार यांना मान्य नसतील तर पॉलीसी घेतले तारखेपासून 15 दिवसांचे आत प्रस्तुत विता पॉलीसी जाबदार विमा कंपनीस परत करु शकतात. तक्रारदार यांचे उजव्या पायाचे फक्त पाचवे बोट गमवावे लागलेमुळे 60 टक्के अपंगत्वाची रक्कम मागणी केली आहे व त्याचे अपंगत्वाचे खोटे प्रमाणपत्र दाखल केले आहे. तक्रारदार यांना जाबदार विमा कंपनी कोणतीही रक्कम देणे लागत नाही. प्रस्तुत जाबदाराने तक्रारदार यांना कोणतीही सेवात्रुटी दिलेली नाही. सबब तक्रारदाराचा तक्रार अर्ज खर्चासह फेटाळणेत यावा असे म्हणणे जाबदाराने दाखल केले आहे. तसेच तक्रारदाराने दि.19/7/2014 रोजीचे अपघाताबद्दल सातारा येथील मोटर अपघात न्यायधिकरण यांचेकडेही नुकसानभरपाई क्लेम दाखल केला आहे. एम.ए.सी.टी. 52/2015. त्यामुळे दोन कोर्टासमोर एका अपघाताची नुकसानभरपाई मागता येणार नाही. सबब तक्रारदाराचा तक्रार अर्ज खर्चासह फेटाळणेत यावा व तक्रारदाराकडून रक्कम रु.10,000/- खर्च जाबदाराला मिळावा असे म्हणणे जाबदार विमा कंपनीने याकामी दाखल केले आहे.
5. वर नमूद तक्रारदार व जाबदार यांनी दाखल केले सर्व कागदपत्रे, पुराव्याची शपथपत्रे, लेखी व तोंडी युक्तीवाद वगैरेचे काळजीपूर्वक अवलोकन करुन प्रस्तुत तक्रार अर्जाचे निराकरणार्थ मे. मंचाने प्रस्तुत कामी पुढील मुद्दयांचा विचार केला.
मुद्दा उत्तर
1. तक्रारदार व जाबदार हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय?- होय.
2. जाबदाराने तक्रारदार यांना सदोष सेवा पुरविली आहे काय?- होय.
3. तक्रारदार मागणीप्रमाणे विमाक्लेम मिळणेस पात्र आहेत काय?- होय.
4. अंतिम आदेश काय?- खाली नमूद केले
आदेशाप्रमाणे
विवेचन-
6. वर नमूद मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत. कारण- तक्रारदार यांचा सातारा जिल्हा बार असोसिएशनचे तक्रारदार हे वकील सभासद आहेत. प्रस्तुत जिल्हा बार असोसिएशन यांनी असोसिशनच्या सभासदांकरीता जनता वैयक्तिक अपघात विमा संरक्षण देणेचे ठरवून दि. 19/12/2013 ते दि.18/12/2018 या कालावधीकरीता ग्रुप जनता वैयक्तीक अपघात संरक्षण विमा पॉलीसी क्र. 162400/47/2014/159 ही जाबदार यांचेकडून घेतली. प्रस्तुत तक्रारदार हे सदर सातारा जिल्हा बार असोसिएशनचे सभासद आहेत व या विमा पॉलीसीचे सभासद आहेत. जाबदाराने प्रस्तुत तक्रारदार यांची रक्कम रु.1,00,000/- मात्र एवढया रकमेची जोखीम स्विकारली होती व आहे. अशाप्रकारे तक्रारदार हे जाबदार यांचे विमेदार असून ते जाबदार विमा कंपनीचे ग्राहक असून जाबदार हे प्रस्तुत तक्रारदार यांचे सेवापुरवठादार आहेत हे नि.15/2 कडील विमा पॉलीसीवरुन स्पष्ट होत आहे. सबब आम्ही मुद्दा क्र. 1 चे उत्तर होकारार्थी दिली आहे. तसेच प्रस्तुत तक्रारदार यांचा दि.19/7/2014 रोजी दुचाकीला समोरुन येणारे भरधाव दुचाकीने धडक देऊन अपघात झाला. प्रस्तुत अपघाताची नोंद सातारा पोलीस भाग 5 कडे झाली आहे. या अपघातात तक्रारदार हा गंभीर जखमी होऊन तक्रारदाराचे उजव्या पायाचे गुडघ्याखालील हाड अनेक ठिकाणी मोडले, उजव्या तळपायाच्या बोटांपैकी अंगठा सोडून ऊर्वरीत सर्व बोटांची हाडे तुटली व तेथे मोठी जखम झाली. तसेच उजव्या तळहाताच्या अंगठयाशेजारील बोटाच्या पहिल्या पेराच्या जागी हाड मोडून तुकडे झाले तर डाव्या खांदयाचे हाडदेखील मोडले. तक्रारदारावर सातारा येथील मोरया हॉस्पिटल येथे उपचार झाले आहेत. तक्रारदाराचे पायावर तीनवेळा शस्त्रक्रिया करावी लागली आहे व त्यावेळी जागोजागी स्टील पॅड बसवावे लागले आहेत. तक्रारदाराचे उजव्या पायाचे बोटांपैकी अंगठा सोडून उर्वरीत चारही बोटे निकाली झाली आहेत. अंगठा सोडून चारही बोटे तक्रारदाराला गमवावी आगली आहेत व त्यास कायमस्वरुपी अपंगत्व प्राप्त झाले आहे. नि.5/5 कडे तक्रारदार यास 60 टक्के अपगंत्व आल्याचे प्रमाणपत्र डॉ. आशुतोष भोसले या डॉक्टरांनी दिलेले आहे. प्रस्तुत प्रमाणपत्रात तक्रारदार यास 60 टक्के कायस्वरुपी अपंगत्व आलेचे स्पष्ट केले आहे. सबब प्रस्तुत प्रमाणपत्राप्रमाणे तक्रारदार यांना 60 टक्के कायमस्वरुपी अपंगत्व आले आहे. याचेवर विश्वासार्हता दाखविणे न्यायोचीत होणार आहे. प्रस्तुत अपंगत्वाचे प्रमाणपत्र तक्रारदाराने विमाक्लेम फॉर्म सोबत जाबदारंकडे सादर केले होते. परंतू प्रस्तुत डॉक्टरांच्या 60 टक्के अपंगत्वाचे प्रमाणपत्र जाबदार यांनी बिलकूल विचारात घेतले नाही अथवा जाबदाराने संबंधीत डॉक्टरांकडे जाऊन शहानिशा केलेली नाही. तर परस्पर मनमानी पध्दतीने तक्रारदाराचे केवळ एकच बोट निकामी झालेचा निष्कर्ष जाबदाराने काढला व तक्रारदाराचा विमा क्लेम फेटाळला आहे व तक्रारदाराचा देय विमा क्लेम नाकारला आहे. सबब तक्रारदार यांचा विमा क्लेम फेटाळून जाबदार विमा कंपनीने तक्रारदार यांना सदोष सेवा पुरविली आहे. तसेच तक्रारदाराने जाबदारांकडे लेखी अर्ज जाबदारांकडे देऊनही जाबदाराने विमा पॉलीसीची संपूर्ण प्रत अदा केली नाही. विमा पॉलीसीतील अटींपैकी (सी) अट पाहता त्यामध्ये पुढीलप्रमाणे कथन केले आहे.
C) If such injury shall within 12 (twelve) calendar months of its occurrence, be the sole & or direct cause of Total and irrecoverable loss of sight of one eye or the actual loss by physical separation of the one entire foot or one entire hand 50% of sum insured. असा आहे. तक्रारदाराने दाखल केले पुराव्याचे शपथपत्र ही बाब तक्रारदाराचे स्पष्ट केली आहे. जाबदाराने या पुराव्याच्या विरुध्द दुसरा पुरावा मे. मंचात दाखल केलेला नाही अगर तक्रारदाराचा प्रस्तुत पुरावा नाकारलेला नाही. सबब जाबदार हे त्यांचा बचाव सिध्द करणेस पूर्ण अपयशी ठरले आहेत. प्रस्तुत कामी आम्ही पुढील मे. वरिष्ठ न्यायालयांच्या न्यायनिवाडयांचा आधार घेतला आहे.
1. 2011 IV CPJ 176 NC
2. 2012 II CPJ 27 Punjab
3. 2002 III CPR 217 N.C.
1. IV (2011) CPJ 176 NC
National Insurance Co. Ltd., V/s. Guntaka Subba Reddy ad Anrs.
Head Note:- Consumer Protection Act,1986 Sec. 2(1)(g), 21(b) Insurance Group Personal Accident Master Policy – Accident – claim repudiated- forum allowed complaint – State Commission absolved respondent No.2 from any liability but upheld order of forum against Insurance company. Hence revision- contention, complainant suffered disability of 30%- Not accepted- clause – of policy specifically refers to total and irrecoverable loss of one eye would be applicable to facts of this case rather than general clause – complainant would be entitled to 50% of capital- sum assured – order of forum upheld.
2. II ( 2012) CPJ 27
National Insurance Co. Ltd., V/s. Hari Singh
Head Note:- Consumer Protection Act,1986 Sec. 2(1)(g), 14 (1) (d) 15- Insurance- Personal Accident Policy- left hand came in saw blade- All fingers except little finger amputated – 50% permanent disability- claim repudiated – Deficiency in service- District forum allowed complaint- Hence appeal – Disability certificate was issued by office of civil surgeon due to amputation of entire left hand except little finger – No evidence that despite amputation respondent was still doing work at his saw mill- A appellant had wrongly, illegally and against the terms & conditions of policy, repudiated the claim of respondent-Handicapped/Poor policy, repudiated the claim of respondent- Handicapped/Poor policy holder was dragged in litigation- Repudiation not justified- cost awarded.
3. 2002 (3) CPR 217 (N.C.)
M/s. Oriental Insurance Co.Ltd., V/s. Shri. Rajak Bhat Gafarbhai Manshri.
Head Note:- Consumer Protection Act,1986 Sec. 21(b) Insurance claim Janta Personal Accident Insurance Policy conversing risk against accidental death or disability- complainant insured driver suffered accident and his both legs were not such as was covered under policy- district forum allowed claim holding complainant entitled to 50% of insurance amount- State commission upheld award- Revision – Contention that claimant had filed motor Accident claim petition was of no avail as claim under insurance policy was an independent cause of action-other contention that complainant suffered partial disability was also rightly repelled as complainant being driver by profession was unable to follow his profession as driver- Award called for no interference.
वरील सर्व न्यायनिवाडयांचा विचार करता प्रस्तुत तक्रारदार हे जाबदार विमा कंपनीकडून विमा क्लेमची रक्कम मिळणेसाठी प्रस्तुत मे. मंचात तक्रार अर्ज दाखल करु शकतात. तसेच तकारदार हे जाबदार विमा कंपनीकडून विमा क्लेमची रक्कम रु.50,000/- (रुपये पन्नास हजार मात्र) मिळणेस पात्र आहेत. कारण तक्रारदाराला अपघातामुळे 60 टक्के कायमस्वरुपी अपंगत्व आल्याचे डॉ. आशुतोष भोसले (एम.एस.आर्थो) यांचे प्रमाणपत्र याकामी तक्रारदाराने नि.5/5 कडे दाखल केली आहे. त्यामुळे तक्रारदाराला 60 टक्के अपंगत्व आले आहे हे स्पष्ट व सिध्द होत आहे. प्रस्तुत जाबदाराने या अपंगत्वाच्या प्रमाणपत्राची शहानिशा करणेसाठी प्रस्तुत प्रमाणपत्र देणारे डॉक्टरांकडून शहानिशा केली नाही अगर त्याविरुध्द कोणताही पुरावा मे. मंचात दाखल केलेला नाही. सबब तक्रारदार हे जाबदार विमा कंपनीकडून रक्कम रु.50,000/- नुकसानभरपाई मिळणेस पात्र आहेत असे या मे. मंचाचे स्पष्ट मत आहे.
8. सबब प्रस्तुत कामी आम्ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
1. तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2. जाबदार विमा कंपनीने तक्रारदार यांना विमाक्लेमची रक्कम रु. 50,000/- (रुपये पन्नास हजार मात्र) अदा करावी.
3. प्रस्तुत वर नमूद रकमेवर जाबदार विमा कंपनीने विमा क्लेम फेटाळलेचे तारखेपासून प्रस्तुत सर्व रक्कम तक्रारदाराचे प्रत्यक्ष हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के व्याज जाबदार विमा कंपनीने तक्रारदाराला अदा करावे.
4. तक्रारदाराला झाले मानसीक व शारिरीक त्रासापोटी रक्कम रु.20,000/- (रुपये वीस हजार मात्र) जाबदारानी तक्रारदाराला अदा करावेत.
5. जाबदाराने तक्रार अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.5,000/- तक्रारदाराला अदा करावेत.
6. वरील सर्व आदेशांची पूर्तता जाबदार यांनी आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसात करावे.
7. विहीत मुदतीत आदेशाचे पालन करणेत जाबदारांनी कसूर केलेस अर्जदार यांना ग्राहक संरक्षण कायद्यातील कलम 25 किंवा 27 नुसार वसुलीची प्रक्रिया करणेची मुभा राहील.
8. सदरचा न्यायनिर्णय खुल्या मंचात जाहीर करणेत आला.
9. प्रस्तुत आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्य द्याव्यात.
ठिकाण- सातारा.
दि. 25-02-2016.
सौ.सुरेखा हजारे श्री.श्रीकांत कुंभार सौ.सविता भोसले
सदस्या सदस्य अध्यक्षा
सातारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच.