(मंचाचे निर्णयान्वये, श्रीमती कल्पना किशोर जांगडे (कुटे), सदस्या)
(पारीत दिनांक : 26 डिसेंबर 2013)
1. अर्जदार हिने, सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये दाखल केली. अजर्दाराची संक्षिप्त तक्रार येणेप्रमाणे.
2. अर्जदार मय्यत तुळशिराम कुले पुडो यांची पत्नी आहे. मय्यत तुळशिराम कुले पुडो हे शेतकरी होते. दि.22.4.2009 रोजी शेतातील कठाण मालाची विक्री करुन नेताजी नगर वरुन परत जात असतांना एम.एच.-33/394 या काळी-पिवळी वाहनाने धडक दिल्याने जखमी होऊन त्यांचा चामोर्शी येथील ग्रामिण रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच मृत्यु झाला. सदर अपघात मृत्यु संबंधाने अर्जदाराने दि.22.7.2009 रोजी शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई मिळण्याबाबत गैरअर्जदार क्र.3 तहसिलदार चामोर्शी मार्फत गैरअर्जदार क्र.2 कृषिअधिकारी, चामोर्शी यांच्याकडे अर्ज केला होता. गैरअर्जदार क्र.2 कडे अर्ज सादर केल्यापासून कोणतीच माहिती वा नोटीस अर्जदारास प्राप्त झाली नाही, चौकशी केली असता, प्रकरण बंद केल्याचे तोंडी सांगण्यात आल्याने अर्जदाराने दि.21.4.2011 रोजी जिल्हा ग्राहक मंचात कलम 12 अन्वये तक्रार दाखल केली होती. परंतु, मतदान ओळखपञामध्ये आडनावात फरक व कबाल इन्शुरन्स कंपनीला पक्ष केले नाही हे लक्षात येताच अर्जदाराने सदर तक्रार परत दाखल करण्याच्या परवानगीसह काढून घेतली.
3. अर्जदाराने रुपये 100/- च्या स्टॅम्पवर आडनावाचे दुरुस्तीबाबत शपथपञ केले व सदरहू शपथपञ इतर कागदपञासहीत गैरअर्जदार क्र.4 कबाल इन्शुरन्स कं. ला प्राप्त देखील झाले. परंतु, गैरअर्जदार क्र.4 ने कोणतीही कार्यवाही केलेली नाही. तसेच अर्जदाराने, गैरअर्जदार क्र.1 ला दि.9.1.2012 ला नोटीस देऊनही त्यांनी नोटीसची पूर्तता केलेली नाही वा कोणतीच दखल घेतली नाही. अर्जदारबाईस विमा योजनेच्या लाभापासून वंचित ठेवले हि गैरअर्जदाराची अर्जदाराच्या सेवेतील न्युनता आहे म्हणून अर्जदारबाईने गैरअर्जदार क्र.1 ते 4 विरुध्द तक्रार दाखल करुन, गैरअर्जदाराने विमा रक्कम अदा न करणे ही सेवेतील न्युनता आहे असे घोषीत करावे. तसेच विमा दाव्याची रक्कम रुपये 1,00,000/- व त्यावर द.सा.द.शे.18 % प्रमाणे व्याज, विमा दावा दाखल करण्यासाठी लागलेला खर्च रुपये 10,000/-, मानसिक ञासापोटी रुपये 25,000/- आणि सदर तक्रारीचा खर्च रुपये 5000/- असा आदेश गैरअर्जदाराविरुध्द व्हावा अशी मागणी केलेली आहे.
4. गैरअर्जदार क्र.1 ओरियन्टल इन्शुरन्स कंपनीने आपले लेखी उत्तर प्राथमिक आक्षेपासह नि.क्र.24 नुसार दाखल करुन, अर्जदार यांनी दि.28.9.2011 रोजी याच कारणावरुन दाखल केलेली तक्रार क्र.12/2011 परत घेतली होती. मामला परत घेतेवेळी मंचानी अर्जदारास पुन्हा अर्ज दाखल करण्याचे आदेश पारीत केले नाही व पक्षानी आपआपला खर्च सोसावा असा आदेश केला. त्यामुळे, सदर तक्रार प्रथम दर्शनीय खारीज होण्यास पाञ आहे. गैरअर्जदाराने अर्जदाराची तक्रार खोटी असल्याने अमान्य केली आहे.
5. गैरअर्जदार क्र.1 ने लेखी बयानातील विशेष कथनात पुढे नमूद केले की, गैरअर्जदार क्र.1 यांनी नियमाप्रमाणे मृतकाच्या अपघाती मृत्यु संबंधी नुकसान भरपाई मिळण्याकरीता आवश्यक असलेले दस्ताऐवज सादर करणे आवश्यक आहे. सदर दस्ताऐवज प्रथम तहसिलदार यांनी तपासून योग्यता व सत्यताचे पडताळणी करुन सदर दस्त कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्विसेस प्रा.लि. यांच्याकडून तपासून गैरअर्जदार क्र.1 यांचेकडे पाठवितात. त्यानंतर, असलेल्या ञुट्या पूर्ण करण्याचे काम तहसिलदार व कबाल इन्शुरन्स यांचे असते. गैरअर्जदार क्र.1 यांचे कार्य फक्त पूर्ण दस्ताऐवज प्राप्त झाल्यानंतर रकमेचा धनादेश संबंधीत व्यक्तीच्या खात्यात धनादेशाव्दारे जमा करण्याचे किंवा संबंधीत तहसिलदार यांना देण्याचे असते. गैरअर्जदार क्र.1 यांना कबाल इन्शुरन्सकडून दि.4.1.2010 च्या पञान्वये प्राप्त झालेले दस्ताऐवजामध्ये ञुट्या होत्या व अर्जदाराने सदर ञुट्या पूर्ण केल्या नाही. याआधीचे संपूर्ण व्यवहार अर्जदार, गैरअर्जदार क्र.2, 3 व 4 कडून प्राप्त न झाल्यामुळे प्रकरण मंजुरीस पाञ नव्हते. त्यामुळे, गैरअर्जदार क्र.1 यांनी कोणतेही विलंब न करता दि.22.1.2010 रोजी अर्जदार व कबाल इन्शुरन्स यांना माहिती दिली व अर्जदाराचा क्लेम नस्ती केले. अर्जदाराच्या दस्ताऐवजावरुन स्पष्ट होते की, अर्जदाराचा मृतकाशी कुठलाही संबंध नाही व अर्जदाराला नुकसान भरपाई मागण्याचा अधिकार नाही. अर्जदाराने अर्ज 12/2011 स्वतःच्या चुकीमुळे व दस्ताऐवज न पुरविल्यामुळे परत घेतला आहे, त्यात गैरअर्जदार क्र.1 यांची कुठलीही चुक नाही. गैरअर्जदार क्र.1 कुठलेही नुकसान भरपाई देण्यास जबाबदार नाही व अर्जदाराचा अर्ज गैरअर्जदार क्र.1 विरुध्द खारीज करण्यात यावा.
6. गैरअर्जदार क्र.2 (कृषि अधिकारी) ने त्यांचा लेखी जबाब नि.क्र.10 नुसार दाखल केला. लेखी उत्तरात नमूद केले की, अर्जदार मय्यत तुळशिराम कुले पुडो, यांची विधवा पत्नी असून तुळशिराम यांचा दि.22.4.2009 रोजी अपघाताने मृत्यु झाला. अर्जदाराचा शेतकरी जनता अपघात विमा योजने अंतर्गत नुकसान भरपाई मिळण्याकरीता प्रस्ताव जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, गडचिरोली कार्यालयाव्दारे सदर प्रस्ताव क्र.सां.शे.अ.वि./प्रस्ताव/2441, दि.30.6.2009 अन्वये कबाल इन्शुरन्स प्रा.लि. यांना आवश्यक सर्व दस्ताऐवजासह सादर करण्यांत आला.
7. गैरअर्जदार क्र.3 (तहसिलदार चामोर्शी) ने आपले लेखी उत्तर नि.क्र.12 नुसार दाखल केले आहे. त्याचे म्हणणे असे की, अर्जदारबाईकडून प्राप्त विमा दावा त्यांनी दि.22.7.2009 रोजी पुढील कार्यवाहीसाठी तालुका कृषि अधिकारी, चामोर्शी यांचेकडे पाठविलेला आहे. या कार्यालयाकडील संबंधीत दाव्यासंबंधातील कार्यवाही पूर्ण झालेली आहे.
8. गैरअर्जदार क्र.4 कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हिसेसने आपले लेखी उत्तर नि.क्र.13 नुसार दाखल केले आहे. त्यांचे म्हणणे असे की, अर्जदारबाईकडून दि.20.8.2009 रोजी विमा दावा प्राप्त झाल्यानंतर सदरहू प्रस्ताव हा पुढील कार्यवाहीकरीता गैरअर्जदार क्र.1 ओरियन्टल इन्शुरन्स कं., नागपूर यांच्याकडे पाठविण्यात आला. सदरील प्रस्ताव विमा कंपनीने आपल्या दि.22.1.2010 च्या पञाव्दारे बंद केल्याचे अर्जदारास कळविले आहे. त्यामुळे त्यांनी तक्रारीतून निर्दोष मुक्तता करावी, तसेच योग्य त्या दोषीकडून अर्जाचा खर्च रुपये 5000/- मिळण्याची विनंती केली आहे.
9. अर्जदाराने निशाणी क्र.21 नुसार आपले शपथपञ दाखल केले असून, गैरअर्जदार क्र.1 ते 4 यांनी पुरावा/शपथपञ दाखल केलेले नाही. अर्जदाराने नि.क्र.4 नुसार एकूण 34 व नि.क्र.16 नुसार एकूण 5 दस्तऐवज दाखल केलेले आहेत. तसेच अर्जदार व गैरअर्जदार क्र.1 यांनी अनुक्रमे निशाणी क्र.26 व 25 नुसार लेखी युक्तीवाद दाखल केला. अर्जदार व गैरअर्जदार यांच्या परस्पर विरोधी कथनावरुन आणि दाखल केलेले दस्ताऐवज व तोंडी युक्तीवादावरुन खालील कारणे व निष्कर्ष निघतात.
10. सदरच्या प्रकरणात अर्जदार मनाबाई विधवा तुळशिराम पुडो हिचे पती मय्यत तुळशिराम कुले पुडो हे शेतकरी होते. त्यांच्या मालकीची शेत जमीन ‘’मौजा – हळवाही, ता. चामोर्शी, जि. गडचिरोली येथील भू.क्र.161/3 असल्याचा पुरावा म्हणून अर्जदाराने दस्ताऐवजाची यादी नि.क्र.4 वर दस्त क्र.अ-13 ते अ-15 वर 7/12 उतारा आणि गांव नमुना आठ - ‘अ’ व वारसा प्रकरणाची नोंदवहीची प्रत दाखल केली आहे. मय्यत तुळशिराम हे शेतकरी होते व त्यांना शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना लागु होती याबाबत वाद नाही.
11. अर्जदाराचे पती मय्यत तुळशिराम दि.22.4.2009 रोजी त्याच्या शेतातील कठाण मालाची विक्री करुन नेताजीनगर वरुन परत जात असतांना नेताजीनगर जवळ भरधाव वेगाने येत असलेल्या एम.एच.33/394 या काळी-पिवळी वाहनाने धडक दिल्याने जखमी झाले व त्यामुळे त्यांचा चामोशी येथील रुग्णालयात पोहचण्याच्या पूर्वीच मृत्यु झाला. गैरअर्जदार क्र.1 ने जरी मय्यत तुळशिराम यांचा अपघाती मृत्यु झाल्याचे नाकारले असले तरी अर्जदाराने दाखल केलेले दस्ताऐवज म्हणजे शवविच्छेदन अहवाल अ-12, मरणान्वेषन प्रतिवृत्त अ-18, मृत्यु प्रमाणपञ अ-8, घटनास्थळ पंचनामा अ-17, एफ.आय.आर. अ-19 सदरहू दस्ताऐवजाचे अवलोकन केले असता, तुळशिराम यांचा अपघाती मृत्यु झाला हे सिध्द होते.
12. अर्जदार बाईने नि.क्र.4 नुसार वारसान प्रमाणपञ अ-7, शिधापञिका अ-24 वर दाखल केले असून त्यावर अर्जदार ही मृतक तुळशिराम यांची पत्नी असल्याचे सिध्द होते.
13. अर्जदार बाईने शेतकरी विमा योजने अंतर्गत नुकसान भरपाई मिळण्याकरीता गैरअर्जदार क्र.2 कृषि अधिकारी, चामोर्शी यांच्याकडे दि.22.7.2009 रोजी गैरअर्जदार क्र.3 मार्फत अर्ज सादर केला. गैरअर्जदाराने अर्जदाराला कोणतीही ञुटी संदर्भात नोटीस वा अर्जाची पुर्तता केली नाही, म्हणून अर्जदार बाईने चौकशी केली असता, सदर मामला बंद केला अशी तोंडी माहिती मिळाली म्हणून अर्जदार बाईने दि.21.4.2011 रोजी ग्राहक मंचात गैरअर्जदार क्र.1 ते 3 विरुध्द तक्रार दाखल केली, परंतु दावा चालू असतांना अर्जदार बाईस मतदान ओळख पञामध्ये आडनावात फरक असल्याचे व कबाल इन्शुरन्स कंपनीला पक्ष बनविले नाही हे लक्षात आल्याने अर्जदाराने अर्ज नव्याने दाखल करण्याच्या परवानगीसह तक्रार क्र.12/2011 काढून घेतली. तक्रार मागे घतल्याचा दि.28.9.2011 चा आदेश दस्त क्र.अ-35 वर दाखल आहे.
14. गैरअर्जदार क्र.1 ने, अर्जदार बाईने तक्रार मागे घेतल्याने परत तक्रार दाखल करण्याचा अधिकार नाही असा आक्षेप घेतला. परंतु, अर्जदार हिने दि.28.9.2011 रोजी तक्रार मागे घेतांना नवीन तक्रार दाखल करण्याचा अधिकार राखून ठेवून काढल्याने गैरअर्जदार क्र.1 चा अर्जदार हिला तक्रार दाखल करण्याचा अधिकार नाही, ही बाब ग्राह्य धरण्यासारखी नाही.
15. अर्जदार बाईने मय्यत तुळशिराम शेतकरी असल्याने अपघात विमा योजने अंतर्गत नुकसान भरपाई मिळण्याकरीता गैरअर्जदार क्र.3 तहसिलदार, चामोर्शी मार्फत व गैरअर्जदार क्र.2 कृषि अधिकारी गडचिरोली मार्फत गैरअर्जदार क्र.4 कबाल इन्शुरन्सकडे आवश्यक सर्व दस्ताऐवज पाठविलेले आहे व तसेच, गैरअर्जदार क्र.2 चे लेखी उत्तरामध्ये परिच्छेद क्र.2 मध्ये नमूद आहे. तसेच गैरअर्जदार क्र.4 कबाल इन्शुरन्स कंपनीचे लेखी उत्तरात अर्जदाराचा दावा गैरअर्जदार क्र.1 ओरियंटल इंन्शुरन्स कंपनी लि., नागपूर यांच्याकडे पुढील कार्यवाहीकरीता पाठविण्यात आला, असे नमूद केले आहे. गैरअर्जदार क्र.1 चे आपले लेखी उत्तरात नमूद केले आहे की, गैरअर्जदार क्र.2, 3 व 4 कबाल इन्शुरन्सकडून दस्ताऐवज प्राप्त न झाल्याने प्रकरण मंजूरीस पाञ नव्हते व तशी गैरअर्जदार क्र.1 ने दि.22.1.2010 रोजी अर्जदाराला व कबाल इन्शुरन्स यांना माहिती दिली. परंतु, अर्जदाराला प्रकरण बंद केल्याचे वा नाकारल्याचे संदर्भात लेखी पञ पाठवून कळविल्याचे गैरअर्जदार क्र.1 ने कोणतेच दस्त, पोष्टाची पावती वा पोचपावती पञ काहीही दाखल केलेले नाही व अर्जदारास सदर माहिती कळविली होती त्यासंदर्भात कोणताच ठोस पुरावा दिला नाही. अशा परिस्थितीत, गैरअर्जदार क्र.1 चे कथन विश्वासार्ह नाही, त्यामुळे अर्जदाराने केलेले कथन कि, गैरअर्जदार क्र.2 कडे दि.30.6.2009 रोजी सर्व दस्ताऐवज दाखल केल्यानंतर दोन वर्षापर्यंत ञुटीची नोटीस वा दाव्यासंबंधी माहिती न मिळाल्याने गैरअर्जदाराकडे वारंवार चौकशी केली असता, अर्जदार व तिचे मय्यत पतीच्या आडनांवात चुकीचे नोंद आढळून आल्याने गैरअर्जदाराने प्रस्ताव बंद केल्याचे तोंडी सांगितले, त्यामुळे अर्जदारबाईने त्याअनुषंगाने परत नव्याने कागदपञांची पुर्तता केली या अर्जदाराचे कथनास पुष्टी मिळते.
16. अर्जदार बाई हिने मनाबाई तुळशिराम पुडो व मय्यत तुळशिराम कुले पुडो यांचे निवडणूक आयोगाचे मतदान कार्डावर मनाबाई तुळशिराम पुरावि आणि तुळशिराम कुले पुरावि अशी नोंद झालेली असून आडनांव ‘पुरावि’ ही नोंद चुकीची आहे व अर्जदार व मय्यतचे आडनांव ‘पुडो’ असून ते बरोबर आहे असे प्रतिज्ञापञ दिले. सदर असस्ल प्रतिज्ञापञ नि.क्र.16 च्या दस्त क्र.अ-1 वर दाखल आहे. तसेच अर्जदाराने दाखल केलेल्या इतर सर्व दस्ताऐवजामध्ये जसे तहसिलदाराचे प्रमाणपञ, वारसान प्रमाणपञ, मृत्यु प्रमाणपञ, 7/12 उतारा, शवविच्छेदन अहवाल यामध्ये तुळशिराम पुडो या नावाचाच उल्लेख आहे. अर्जदार हिने सदर आडनांव संबंधीचे दि.6.7.2011 चे प्रतिज्ञालेख, तसेच दि.6.7.2011 रोजी तहसिलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी चामोर्शी यांचेकडे निवडणूक ओळखपञामध्ये आडनांव चुकीचे असल्याने दुरुस्ती करण्यासाठी केलेला अर्ज केला. सदरहू दस्ताऐवज निशाणी क्रमांक 16 वर अनुक्रमे अ-1 व अ-2 वर दाखल आहे. अर्जदाराने आडनांव संबंधी दिलेले प्रतिज्ञापञ, तसेच नि.क्र.21 वरील अर्जदाराचा शपथेवर पुरावा, गैरअर्जदार क्र.1 ने शपथपञ वा इतर कुठलाही पुरावा देऊन खोडून काढलेले नाही. गैरअर्जदार क्र.1 ने त्याचे कथना पृष्ठ्यर्थ कोणताच पुरावा दिलेला नाही. त्यामुळे गैरअर्जदारास हे मान्य आहे असे गृहीत धरण्यात येते व अशा परिस्थितीत, अर्जदारबाईचे आडनांव ‘पुरावि’ नसून ‘पुडो’ आहे हे दाखल दस्ताऐवजावरुन सिध्द होते. अर्जदार हिने दि.14.9.2011 रोजी सदर आडनांव संबंधीचे प्रतिज्ञापञ व विमा दावा पुर्ततेसाठी लागणारे संपूर्ण दस्ताऐवज परत गैरअर्जदार क्र.4 कडे कुरीअर मार्फत पाठविले व सदर पावती दस्त क्र.अ-4 वर दाखल आहे. तसेच गैरअर्जदार क्र.1 ला सुध्दा अर्जदाराने संपूर्ण दस्ताऐवज पाठविले. परंतु गैरअर्जदाराने अर्जदार हिला विमा दाव्याची रक्कम दिली नाही.
17. अर्जदारबाईने दि.6.7.2011 चे आडनांवा संबंधीचे प्रतिज्ञापञ गैरअर्जदार क्र.4 ला पाठवून अर्जाचे पुर्णअवलोकन करुन विमा योजनेचा लाभ मंजूर करण्यास विनंती केली. सदर अर्ज दस्त क्र.अ-3 वर दाखल आहे. अर्जदाराने गैरअर्जदार क्र.1 च्या मागणी प्रमाणे दस्ताऐवजाच्या ञुटी पूर्ण केल्यावरही गैरअर्जदार क्र.1 ने विमा दावा मंजूर केला नाही, अर्जदाराचे हे कथन दाखल दस्ताऐवज व अर्जदाराचा नि.क्र.21 वरील पुरावा/शपथपञ, गैरअर्जदार क्र.1 ते 4 ने शपथपञ वा इतर कोणताच ठोस पुरावा देऊन खोडून काढलेले नाही. अशा परिस्थितीत, अर्जदाराचे कथन गैरअर्जदारासही मान्य आहे असे ग्राह्य धरण्यास हरकत नाही.
18. गैरअर्जदाराने विमा दाव्याची रक्कम न दिल्याने अर्जदार हिने दि.24.10.2011, 9.1.2012 रोजी गैरअर्जदार क्र.1 यांना कायदेशिर नोटीस पाठविला. सदर दोन्ही नोटीसची प्रत, पोष्टाची पावती, पोचपावती नि.क्र.4 वरील दस्त क्र. अ-30, अ-32, अ-28, अ-29, अ-33 व अ-34 वर दाखल आहे व दि.9.1.2012 ची नोटीसची प्रत निशाणी 16 वरील दस्त क्र.अ-5 वर दाखल आहे.
19. सदर नोटीस प्राप्त झाल्यावरही गैरअर्जदार यांनी नोटीसची पुर्तता केली नाही, तसेच विमा दाव्याची रक्कम ही अर्जदाराला दिली नाही, गैरअर्जदारानी अर्जदाराचा विमा दावा नाकारला अथवा मंजूर केलेला नाही. गैरअर्जदार क्र.1 चे अधिवक्ता श्री राजेश ठाकूर यांनी सुध्दा तोंडी युक्तिवादा दरम्यान हे मान्य केले की, अर्जदाराने विमा दावा रक्कम मिळणे संबंधी दस्ताऐवज पाठविल्यानंतर गैरअर्जदार क्र.1 ओरियन्टल इन्शुरन्स कंपनीने विमा दावा नामंजूर अथवा मंजूर केलेला नाही.
20. एकंदरीत, उपलब्ध रेकॉर्डवरुन तक्रारीस कारण हे मय्यत तुळशिराम यांचा मृत्यु झाल्यापासून सतत चालू आहे. अर्जदारबाई ही वृध्द निराधार असून ती विमा योजनेच्या लाभापासून आतापर्यंत वंचित राहिली. गैरअर्जदार क्र.1 ने विम्याचा दावा अर्जदारबाईने सर्व दस्ताऐवज परत पाठविल्यानंतरही मंजूर केला नाही, ही गैरअर्जदार क्र.1 ने विमा ग्राहकाप्रती अनुसरलेली सेवेतील न्युनता आहे, या निष्कर्षाप्रत मंच आल्याने व अर्जदाराचे पती मय्यत तुळशिराम यांचा अपघाती मृत्यु झाल्याचे शवविच्छेदन अहवालावरुन निर्णायकरित्या सिध्द होत असल्याने, अर्जदार शेतकरी अपघात विम्याची रक्कम रुपये 1,,00,000/- मिळण्यास पाञ आहे.
21. गैरअर्जदार क्र.1 ने, अर्जदाराचा विमा दावा सर्व दस्ताऐवज असतांना सुध्दा आजपर्यंत मंजूर केलेला नाही व त्यामुळे अर्जदारास मानसिक व शारिरीक ञास झाला त्याबद्दल नुकसान भरपाई रुपये 5000/- आणि या तक्रार अर्जाचा खर्च रुपये 1000/- मंजूर करणे न्यायोचित होईल, या निर्णयाप्रत हे न्यायमंच आलेले आहे.
22. गैरअर्जदार क्र.2 ते 4 यांनी शासनाची शेतकरी अपघात विमा योजना राबविण्यासाठी अर्जदारास बिनामोबदला मदत केली. अर्जदार हे गैरअर्जदार क्र.2 ते 4 चे ग्राहक नाहीत, त्यामुळे गैरअर्जदार क्र.2 ते 4 यांचेवर अर्जदारास विमा देय रक्कम देण्याची कोणतीही जबाबदारी येत नाही.
वरील कारणे व निष्कर्षावरुन अर्जदाराची तक्रार ही अंशतः मंजूर करुन खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यांत येत आहे.
- अंतिम आंदेश -
(1) अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर.
(2) गैरअर्जदार क्र.1 ने अर्जदारास शेतकरी अपघात विम्याची राशी रुपये 1,00,000/- तक्रार दाखल केल्याच्या दि.16.3.2012 पासून रक्कम अर्जदाराच्या हातात पडेपर्यंत द.सा.द.शे.9 % व्याजासह आदेशाचे दिनांकापासून 30 दिवसाचे आंत द्यावे.
(3) गैरअर्जदार क्र.1 ने अर्जदारास झालेल्या शारीरीक व मानसिक ञासापोटी रुपये 5000/- व तक्रारीचा खर्च रुपये 1000/- आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसाचे आंत द्यावे.
(4) वरील आदेशाची पुर्तता आदेशाच्या तारखेपासून 30 दिवसाचे आंत करावी, मुदतीचे आंत रक्कम देण्यास कसूर केल्यास 1 महिन्यानंतर वरिल देय रकमेवर गैरअर्जदार द.सा.द.शे.12 % प्रमाणे व्याज देण्यास पाञ राहील.
(5) गैरअर्जदार क्र.2 ते 4 यांचे विरुध्द कोणताही आदेश नाही.
(6) उभय पक्षांना आदेशाची प्रत विनामुल्य देण्यात यावी.
गडचिरोली.
दिनांक :- 26/12/2013