न्या य नि र्ण य
व्दाराः- मा. सौ. सविता प्र. भोसले, अध्यक्षा
1. तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा 1986 चे कलम 11 व 12 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील कथन थोडक्यात पुढीलप्रमाणे—
तक्रारदार यांचे पतीचे नांवे शेतजमीन असून त्यांचे शेतजमीनीचा खाते नं. 2114 आहे. तक्रारदार यांचा मुख्य व्यवसाय शेती हाच आहे. तक्रारदार यांचे पतीचा गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत शासनामार्फत विमा उतरविलेला होता. तक्रारदार यांचे पती कै.शिवाजी श्रीपती लाड हे दि. 04/01/2018 रोजी त्यांचे शेतामध्ये शाळू पिकावर औषध फवारणी करणेकरिता गेले होते. सदर औषध फवारणी करीत असताना अपघाताने व अनावधानाने औषधाचा फवारा तक्रारदार यांचे पतीच्या नाका- तोंडात गेलेने त्यांना अस्वस्थ वाटू लागले व ते बेशुध्द झाले. त्यांना औषधोपचाराकरिता सी.पी.आर हॉस्पीटल, कोल्हापूर येथे दाखल केले. तेथे त्यांचे दि. 8/01/2018 रोजी निधन झाले. तदनंतर त्यांचे प्रेताचे शवविच्छेदन करण्यात आले. तसेच सदर घटनेची नोंद राधानगरी पोलिस ठाणे येथे झाली आहे. तदनंतर तक्रारदाराने सर्व कागदपत्रांची पूर्तता करुन विमा प्रस्ताव तालुका कृषी अधिकारी, राधानगरी यांचेमार्फत दाखल केला असता वि.प. यांनी तक्रारदार यांचेकडे व्हिसेरा रिपोर्टची मागणी केली. त्यानुसार तक्रारदारांनी सदर कागदपत्रांची मागणी पोलिस स्टेशन व प्रांत कार्यालय, कोल्हापूर यांचेकडे केली. परंतु सदरचे कागद संबंधीत कार्यालयाने येरवडा कारागृह मुद्रणालय, पुणे येथे पाठविले असलेबद्दलचे यादीची प्रत तक्रारदार यांना दिली व ती तक्रारदार यांनी दि. 4/11/2019 रोजी तालुका कृषी अधिकारी यांचेकडे दाखल केली. परंतु तरीही वि.प. कंपनीने तक्रारदार यांना विमा प्रस्तावाबाबत अद्याप काहीही कळविलेले नाही. अशा प्रकारे वि.प. यांनी सेवात्रुटी केली आहे. म्हणून, तक्रारदाराने प्रस्तुतचा तक्रारअर्ज या मंचात दाखल केला आहे.
2. प्रस्तुतकामी तक्रारदाराने वि.प. यांचेकडून विमाक्लेमची रक्कम रु. 2,00,000/- व सदर रकमेवर द.सा.द.शे. 15 टक्के दराने व्याज, मानसिक त्रासापोटी रु.10,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.10,000/- वि.प. कडून वसूल होवून मिळावा अशी विनंती तक्रारदाराने याकामी केली आहे.
3. तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्हीट, कागदयादी सोबत अ.क्र.1 ते 26 कडे अनुक्रमे तालुका कृषी पर्यवेक्षक यांना दिलेले पत्र व कागदयादी, विमा क्लेम फॉर्म भाग 1 व 2, शेतजमीनीचा 7/12 व 8अ उतारा, जुनी डायरी उतारा, घोषणापत्र, मयताचा दाखला, घटनास्थळ पंचनामा, मरणोत्तर पंचनामा, शवविच्छेदन अहवाल, मयताचे व तक्रारदारांचे आधारकार्ड, रेशन कार्ड, बँक पासबुक, तालुका कृषी अधिकारी यांना दिलेले पत्र, उपविभागीय अधिकारी, राधानगरी यांनी येरवडा जेलला दिलेले पत्र, प्रांत कार्यालय कोल्हापूर यांनी येरवडा जेल यांना दिलेले पत्र वगैरे कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच पुरावा शपथपत्र दाखल केला आहे.
4. वि.प. यांनी सदरकामी म्हणणे/कैफियत व अॅफिडेव्हीट तसेच पुरावा शपथपत्र दाखल केले आहे. वि.प. ने त्यांचे म्हणण्यामध्ये तक्रारअर्जातील सर्व कथने फेटाळलेली आहेत. वि.प. ने तक्रारदाराचे तक्रारअर्जावर पुढील आक्षेप घेतलेले आहेत.
i) तक्रारदाराचा तक्रारअर्ज व त्यातील सर्व मजकूर मान्य व कबूल नाही.
ii) वि.प. यांनी कोणतीही सेवात्रुटी केलेली नाही.
iii) वि.प. यांनी सदकामी दि. 4/09/2020 रोजी विमा रक्कम रु.2 लाख तक्रारदारांचे खात्यावर जमा केली आहे.
iv) वि.प. यांचेकडे महाराष्ट्रातून हजारो दावे प्रलंबित असतात. त्यामुळे प्रत्येक फाईलची शहानिशा करणेस व दाव्याबाबतचे निर्णय घेणेस कालावधी जातो. वि.प. यांनी जाणीवपूर्वक तक्रारदारांची विमा रक्कम देण्यास उशीर केलेला नाही. तक्रारदार हे जाणुनबुजून विमा रक्कम मिळून देखील जादाचा खर्च वि.प. यांचेकडून मागत आहेत. वि.प. हे तक्रारदारांना कोणतीही रक्कम देणे लागत नाहीत. सबब, तक्रारदाराची तक्रार नामंजूर करावी अशी मागणी वि.प. यांनी केली आहे.
अशा स्वरुपाचे आक्षेप वि.प. यांनी तक्रारअर्जावर घेतलेले आहेत.
5. वर नमूद तक्रारदार व वि.प. यांनी दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे. मंचाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.
अ. क्र. | मुद्दे | उत्तरे |
1 | तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय ? | होय. |
2 | वि.प. यांनी तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदार हे वि.प. यांचेकडून मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
4 | अंतिम आदेश काय ? | खालील नमूद आदेशाप्रमाणे. |
वि वे च न –
6. वर नमूद मुद्दा क्र.1 ते 3 ची उत्तरे आम्ही होकारार्थी दिली आहेत कारण तक्रारदार यांचे पती मयत होणेपूर्वी शेती हाच व्यवसाय करीत होते. त्यांचे नावे शेतजमीन असून त्याचा खाते क्र.2114 असा आहे. तक्रारदार यांचे पती कै.शिवाजी श्रीपती लाड यांचा गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत शासनामार्फत विमा उतरविलेला होता. सदरची बाब वि.प. यांनी त्यांचे म्हणण्यामध्ये नाकारलेली नाही. तक्रारदार हे मयत कै.शिवाजी श्रीपती लाड यांचे पत्नी या नात्याने सरळ व कायदेशीर वारस आहेत. सबब, तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत ही बाब निर्विवादपणे स्पष्ट व सिध्द झालेली आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे.
7. प्रस्तुतकामी वि.प. यांनी त्यांचे लेखी म्हणण्यामध्ये, वि.प. यांनी सदकामी दि. 4/09/2020 रोजी विमा रक्कम रु.2 लाख तक्रारदारांचे खात्यावर जमा केली आहे असे कथन केले आहे. सदरची बाब तक्रारदार यांनी नाकारलेली नाही. दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार ही दि. 19/6/2020 रोजी दाखल केली आहे. तक्रारदारांचे पतीचा मृत्यू झालेनंतर तक्रारदारांनी दि.5/9/2018 रोजी तालुका कृषी अधिकारी, राधानगरी यांचेकडे विमा प्रस्ताव दाखल केला होता. सदरचे प्रस्तावावर वि.प. यांनी निर्णय घेवून दि.4/09/2020 रोजी तक्रारदारांना रक्कम अदा केली आहे. म्हणजेच वि.प. यांनी विमा प्रस्ताव मंजूर करणेकरिता दोन वर्षे इतका प्रदीर्घ कालावधी लावलेला आहे ही बाब याकामी दिसून येते. विमा पॉलिसीचा मूळ हेतू विचारात घेता सदरचा विलंब हा अनाठायी आहे असे या आयोगाचे मत आहे. सबब, सदरची बाब विचारात घेता वि.प. यांनी तक्रारदाराचा विमाक्लेम मंजूर करण्यास विलंब केल्यामुळेच तक्रारदारांना प्रस्तुतची तक्रार दाखल करावी लागली ही बाब स्पष्टपणे दिसून येते. सबब, वि.प. यांनी तक्रारदाराचा विमाक्लेम मंजूर करण्यास विलंब करुन तक्रारदारास द्यावयाचे सेवेत त्रुटी केली आहे या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
9. सबब, तक्रारदार हे विमा रक्कम रु.2,00,000/- या रकमेवर तक्रारदारांनी तहसिलदार राधानगरी यांचेकडे विमा प्रस्ताव दाखल केले तारखेपासून म्हणजेच दि. 05/09/2018 पासून वि.प. यांनी तक्रारदाराचे बँक खातेवर रक्कम जमा केले तारखेपर्यंत म्हणजेच दि. 4/09/2020 पर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के व्याजदराने व्याज मिळणेस तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व अर्जाचा खर्च रक्कम रु.5,000/- वि.प. यांचेकडून वसूल होवून मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
सबब, प्रस्तुतकामी आम्ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करत आहोत.
आदेश
1) तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2) वि.प. विमा कंपनीने तक्रारदार यांना अदा केलेली विमा रक्कम रु. 2,00,000/- या रकमेवर दि. 05/09/2018 पासून वि.प. यांनी तक्रारदाराचे बँक खातेवर रक्कम जमा केले तारखेपर्यंत म्हणजेच दि. 4/09/2020 पर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज अदा करावे.
3) मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 10,000/- व अर्जाचा खर्च रु.5,000/- वि.प. विमा कंपनीने तक्रारदारास अदा करावेत.
4) वर नमूद सर्व आदेशांची पूर्तता वि.प. यांनी आदेशाची प्रत मिळाले तारखेपासून 45 दिवसांत करावी.
5) विहीत मुदतीत आदेशांची पूर्तता न केलेस ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदींन्वये कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
6) आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.