(घोषित दि. 21.08.2014 व्दारा श्रीमती. नीलिमा संत, अध्यक्ष)
प्रस्तुत तक्रार तक्रारदारांनी ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अंतर्गत सेवेतील कमतरतेसाठी केलेली आहे. तक्रारदारांची तक्रार थोडक्यात अशी की, तक्रारदारांचे पती नामे कैलास गोविंद भालमोडे यांना दिनांक 01.07.2011 रोजी अपघात झाला. तेंव्हा पासून ते कोमात होते. त्यांचा मृत्यू दिनांक 26.12.2011 रोजी झाला. तक्रारदार व त्यांचे पती हे वडगाव वखारी ता.जि.जालना येथील रहिवासी होते. त्यांचे नावे शेत जमीन होती.
पती कैलास यांच्या मृत्यू नंतर तक्रारदारांनी आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करुन तालुका कृषी अधिकारी जालना यांच्या मार्फत प्रस्ताव मंजूरीसाठी गैरअर्जदार यांच्याकडे पाठविला.
तक्रारदारांनी गैरअर्जदार यांच्याकडे वेळोवेळी संपूर्ण कागदपत्रांची पुर्तता केली होती. गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी चुकीचे कारण देऊन तक्रारदारांचा दावा दिनांक 07.08.2013 रोजी नामंजूर केला. तक्रारदारांचे पती रस्ता अपघातामध्ये मरण पावले. हे दाखविण्यासाठी तक्रारदारांनी सिटी केअर हॉस्पीटल यांचे डिस्चार्ज कार्ड, त्यांचे प्रमाणपत्र तसेच दीपक हॉस्पीटलचे प्रमाणपत्र अशी कागदपत्र लावलेली आहेत. तरी देखील गैरअर्जदार यांनी शव-विच्छेदन अहवाल व मरणोत्तर पंचनामा नाही म्हणून तक्रारदारांचा दावा नाकारला आहे. त्याच प्रमाणे गैरअर्जदार म्हणतात की, तक्रारदारांचे ड्रायव्हींग लायसन्स, मयत कैलास अथवा गोरख यांच्या पैकी कोणाचेही ड्रायव्हींग लायसन्स दाखल केलेले नाही. परंतू घटनेच्यावेळी मयत गाडी चालवत नव्हता. त्याच प्रमाणे चालक गोरख यांचे ड्रायव्हींग लायसन्स गैरअर्जदार यांच्याकडे दिलेले आहे. असे असतांनाही गैरअर्जदार यांनी खोटेपणाने व चुकीचे कारण देऊन तक्रारदारांचा विमा प्रस्ताव नाकारला आहे. त्यामुळे तक्रार प्रार्थना करतात की, त्यांना शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजने अंतर्गत रुपये 1,00,000/- ही विमा रक्कम तसेच तक्रारीचा खर्च व इतर खर्चापोटी रुपये 25,000/- एवढी रक्कम देण्यात यावी.
तक्रारदारांनी आपल्या तक्रारी सोबत घटनेची प्रथम खबर, घटनास्थळ पंचनामा, मयत कैलास यांचे मृत्यू प्रमाणपत्र, क्लेम फॉर्म, मयत कैलास शेतकरी होते हे दर्शविण्यासाठी मौजे वडगाव वखारी गट नंबर चा 7/12 चा उतारा, फेरफार उतारा, सिटी केअर हॉस्पीटल औरंगाबाद तसेच दीपक हॉस्पीटल जालना येथील उपचाराची कागदपत्र, गोरख भालमोडे यांचा वाहन चालविण्याचा परवाना अशी कागदपत्र दाखल केली आहेत.
गैरअर्जदार मंचा समोर हजर झाले. गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्या जबाबानुसार मयत कैलास यांचा शव-विच्छेदन अहवाल प्रस्तुत प्रकरणात आवश्यक आहे असे मत त्यांच्या वैद्यकीय अधिका-यांनी व्यक्त केले आहे. त्याच प्रमाणे अपघातग्रस्त गाडी चालविणा-या चालकाचा वाहन परवाना तक्रारदारांनी दाखल केलेला नाही व मरणोत्तर पंचनामा गैरअर्जदार यांनी पाठविलेला नाही. मयत कैलास यांचा मृत्यू अपघाता नंतर सुमारे सहा महिन्यांनी झालेला आहे व घरी झालेला आहे. अशा परिस्थितीत तक्रारदारांचा विमा प्रस्ताव गैरअर्जदार कंपनीने वरील प्रमाणे कागदपत्रांची पुर्तता झालेली नाही म्हणून नाकारला. यात गैरअर्जदार यांची कोणतीही सेवेतील त्रुटी नाही. त्यामुळे तक्रारदारंचा अर्ज खर्चासह नामंजूर करण्यात यावा.
गैरअर्जदार 1 यांनी तक्रारीच्या जबाबासोबत डॉ. अनिल रोंगे यांचे दिनांक 19.06.2013 रोजीचे पत्र दाखल केले आहे.
गैरअर्जदार क्रमांक 2 डेक्कन इन्शुरन्स ब्रोकर्स प्रा.लि.यांनी जवाब दाखल केला आहे. त्यांच्या जवाबानुसार त्यांचे काम केवळ मध्यस्थाचे आहे. महाराष्ट्र शासनातर्फे मराठवाडा विभागातील सल्लागार म्हणून त्या संस्थेची नेमणूक झालेली आहे. कृषी अधिका-याकडून आलेल्या दाव्यांची छाननी करुन संबंधित विमा कंपनीला सादर करणे व सदर छाननीमध्ये काही त्रुटी आढळल्यास तो दावा परत पाठवून त्रुटींची पूर्तता करवून दावा कंपनीकडे पाठविणे एवढे मर्यादीत काम त्यांचे आहे.
तक्रारदारांची तक्रार दाखल कागदपत्र व सुनावणीवरुन खालील गोष्टी स्पष्ट होतात.
- तक्रारदारांचे पती कैलास गोविंद भालमोडे हे शेतकरी होते ही बाब तक्रारदारांनी दाखल केलेल्या 7/12 चा उतारा, फेरफार उतारा, 6 क चा उतारा या कागदपत्रांवरुन स्पष्ट होते. त्याच प्रमाणे गैरअर्जदार विमा कंपनी यांनी ही बाब नाकारलेली नाही.
- मयत कैलास यांना दिनांक 01.07.2011 रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास वडगाव जालना रस्त्यावर अपघात झाला व त्या अपघातात कैलास हे गंभीर जखमी झाले. अपघाता संबंधी प्रथम खबर व घटनास्थळ पंचनामा यावरुन ही गोष्ट सिध्द होते.
- गैरअर्जदार म्हणतात की, तक्रारदारांनी मयत कैलास अथवा गाडी चालविणारे गोरख भालमोडे यांचा वाहन चालविण्याचा परवाना त्यांचेकडे दिला नाही. परंतू तक्रारदारांनी मंचात दाखल केलेल्या कागदपत्रात गोरख कैलास भालमोडे यांचा परवाना दाखल केलेला आहे व तो अपघात समयी वैध होता असे दिसते. त्याच प्रमाणे प्रथम खबरीनुसार व गोरख भालमोडे यांच्या शपथपत्रानुसार अपघाताच्यावेळी गोरख हे वाहन चालवित होते व मयत कैलास भालमोडे हे त्यांच्या पाठीमागे बसलेले होते ही गोष्ट स्पष्ट होते. त्यामुळे तक्रारदारांनी ड्रायव्हींग लायसन्स दिलेले नाही हा गैरअर्जदारांचा आक्षेप मंच विचारात घेत नाही.
- मयत कैलास यांना दिनांक 01.07.2011 रोजी दीपक हॉस्पीटल जालना येथे नेण्यात आले तेंव्हा ते बेशुध्द अवस्थेत होते त्यांची परिस्थिती गंभीर होती. त्यामुळे त्यांना औरंगाबाद येथे जाण्यास सांगण्यात आले. औरंगाबाद येथील सिटी केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल येथे कैलास हे दिनांक 02.07.2011 पासून 22.09.2011 पर्यंत उपचार घेत होते. या संपूर्ण कालावधीत ते कोमात होते व त्यांना डोक्याला गंभीर दुखापत झालेली होती तोंडातून रक्तस्त्राव होत होता. अशा परिस्थितीतच दिनांक 22.09.2011 रोजी त्यांना दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले असे उपचाराच्या कागदपत्रावरुन दिसते. त्यानंतर दिनांक 26.12.2011 रोजी त्यांचा मृत्यू झाला. सिटी केअर हॉस्पीटलच्या वैद्यकीय अधिका-यांनी कैलास यांना अपघातात डोक्याला गंभीर दुखापत झाली होती व ते मृत्यू पर्यंत कोमात होते असे सांगणारे प्रमाणपत्र तक्रारदारांनी दाखल केले आहे. त्याच प्रमाणे गैरअर्जदारांनी दाखल केलेले डॉ. अनिल रोंगे यांच्या पत्रात देखील “From the Submitted documents accidental nature of death is Confirmed. Clam can be Considered.” असे म्हटलेले आहे. वरील गोष्टीवरुन कैलास यांचा मृत्यू दिनांक 01.07.2011 रोजी झालेल्या मोटार अपघातामुळेच झालेला आहे असा निष्कर्ष मंच काढत आहे. अशा परिस्थितीत गैरअर्जदार यांनी तक्रारदारांना शव-विच्छेदन अहवाल व मरणोत्तर पंचनामा दिलेला नाही असे तांत्रिक कारण दाखवून तक्रारदारांचा दावा फेटाळणे न्याय्य नाही असे मंचाला वाटते.
म्हणून मंच खालील आदेश पारित करत आहे.
आदेश
- तक्रारदारांची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
- गैरअर्जदार क्रमांक 1 विमा कंपनी यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी आदेश प्राप्ती पासून 30 दिवसांचे आत तक्रारदारांना शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजने अंतर्गत विमा रक्कम रुपये 1,00,000/- (अक्षरी रुपये एक लाख फक्त) द्यावी.