(मंचाचे निर्णयान्वये, अधि. किर्ती प्रकाश गाडगीळ (वैद्य), सदस्या)
(पारीत दिनांक : 29 मार्च 2014)
तक्रारकर्त्याने सदर तक्रार, ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12 अन्वये दाखल केली असून, तक्रारीचा आशय थोडक्यात येणे प्रमाणे.
1. तक्रारकर्त्याची बहीण विठाबाई सखाराम चौधरी यांच्या मालकीचे मौजा – बोदली माल, ता.जि. गडचिरोली येथे सर्व्हे नं.105 शेत जमीन असून ती शेतीचा व्यवसाय करीत होती. तक्रारकर्त्याची बहीण शेतीतील उत्पन्नावर कुटूंबाचे पालनपोषण करीत होती. तक्रारकर्त्याची बहीण दि.9.2.2012 रोजी शेतीच्या कामासाठी दुसरे कोणतेही वाहन उपलब्ध नसल्याने ट्रॅक्टरमधून जात असतांना ट्रॅक्टर पलटल्यामुळे जखमी होऊन मृत्यु झाला. तक्रारकर्त्याच्या बहीणीचा शेतकरी अपघात विमा काढला असल्याने व तक्रारकर्त्याची बहीण शेतकरी असून अपघात झाल्याने तक्रारकर्ता विरुध्दपक्ष क्र.1 कडून रुपये 1,00,000/- चा विमा रकमेसाठी पाञ होते. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र.1 कडे विमा योजने अंतर्गत दि.21.5.2012 ला विरुध्दपक्ष क्र.3 मार्फत रितसर अर्ज केला. विरुध्दपक्ष क्र.1 ने दि.27.6.2013 रोजी पञ पाठवून तक्रारकर्त्यांनी काही दस्तावेज न दिल्याचे कारण दाखवून दावा फेटाळला असल्याचे कळवीले. त्यामुळे तक्रारकर्त्याला मानसीक ञास झाला. विमा पॉलिसी प्रमाणे तक्रारकर्ताला दाव्याची रक्कम मिळणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे मंचाने नुकसान भरपाईची रक्कम रुपये 1,00,000/- दि. 21.5.2012 पासून द.सा.द.शे.18 टक्के व्याजासह द्यावे, तसेच मानसिक व शारिरीक ञासापोटी रुपये 20,000/- व प्रकरणाच्या खर्चापोटी रुपये 10,000/- गैरअर्जदारांकडून मिळवून द्यावेत अशी प्रार्थना केली.
2. अर्जदाराने नि.क्र.2 नुसार 11 दस्ताऐवज दाखल केले. गैरअर्जदार क्र.1 ने नि.क्र.14 नुसार लेखीउत्तर व नि.क्र.16 नुसार 2 दस्तावेज दाखल केले. गैरअर्जदार क्र.2 ने नि.क्र.13 नुसार लेखीउत्तर दाखल केले. गैरअर्जदार क्र.3 ने नि.क्र.9 नुसार लेखीउत्तर दस्ताऐवजासह दाखल केले.
3. गैरअर्जदार क्र.1 ने नि.क्र.14 वर त्याचे लेखी उत्तर दाखल केले आहे. गैरअर्जदार क्र.1 ने त्याचे लेखीउत्तरात तक्रारदाराने तक्रारीत केलेले आरोप फेटाळले. गैरअर्जदार क्र.1 ने त्याचे लेखीउत्तरात तक्रारदाराचे तक्रारीत असे आक्षेप घेतले की, मय्यत विठाबाई दि.2.2.2012 रोजी ट्रॅक्टरमध्ये बसून जात होती आणि सदर ट्रॅक्टर याञी वाहन नसल्यामुळे मय्यतचा सदर ट्रॅक्टरवर याञा करणे कायदेशीर नव्हते व तीने कायदा भंग केलेला होता. तसेच, गैरअर्जदार क्र.1 असा आक्षेप घेतला की, सदर दाखल तक्रार कारण घडल्यापासून कालावधीच्या बाहेर आहे. गैरअर्जदार क्र.1 ने पुढे असा आक्षेप घेतला आहे की, अर्जदाराने गैरअर्जदार क्र.1 कडून सदर विमाचा क्लेम मुदतीत केला नाही. पुढे गैरअर्जदार क्र.1 त्याचे युक्तीवादात नवीन आक्षेप घेतला की, अर्जदार हा मय्यतचा वारस नाही, म्हणून गैरअर्जदार क्र.1 ने दि.27.6.2013 रोजी अर्जदाराचा विमा क्लेम नामंजूर केला होता.
4. गैरअर्जदार क्र.2 ने नि.क्र.13 नुसार दाखल केलेल्या लेखी उत्तरात नमूद केले की, तक्रारदार हे आमचे ग्राहक होऊ शकत नाही. ज्या विमा कंपनीने राज्य शासनाकडून विमा प्रिमियम स्विकारुन ही जोखीम स्विकारलेली आहे, त्याचेच ग्राहक होऊ शकतात. गैरअर्जदार क्र.2 केवळ मध्यस्थ सल्लागार आहे व शासनास विना मोबदला सहाय्य करतो. गैरअर्जदार क्र. 2 ने पुढे नमूद केले की, सदर प्रस्ताव हा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी गडचिरोली मार्फत कबाल नागपूर कार्यालयास प्राप्त झाल्यानंतर तो प्रस्ताव कबाल नागपूर मार्फत न्यु इंडिया इन्शुरन्स कंपनीला दि.8.10.2012 ला पाठविला असता सदर दावा न्यु इंडिया इन्शुरन्स कंपनीने दि.27.6.2013 च्या पञान्वये दावा नामंजूर केला असून तसे वारसदारास कळविण्यात आले. त्यामुळे, कारण नसतांनाही तक्रारीस सामोरे जाण्यास भाग पाडल्याने अर्जाचा खर्च रुपये 5000/- अर्जदाराकडून देण्याचा आदेश व्हावा, तसेच तक्रारीतून पूर्णपणे मुक्त करण्यात यावे अशी विनंती केली.
5. गैरअर्जदार क्र.3 ने नि.क्र.9 नुसार दाखल केलेल्या लेखीउत्तरात नमूद केले की, अर्जदाराचा प्रस्ताव दि.21.5.2012 रोजी कार्यालयास प्राप्त झाला. या कार्यालयाने जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी गडचिरोली यांना दि.21.5.2012 ला सादर केला. प्रकरणात 6–ड नसल्यामुळे विमा कंपनीने ञुटीची पुर्तता करण्यासाठी त्यास कळविले त्याबाबत 6 ड ची मागणी केली असता तक्रारकर्त्याने ञुटीची पुर्तता केली नाही. प्रकरणात गैरअर्जदार क्र.3 तालुका कृषि अधिकारी, गडचिरोली यांची काहीही चुक नसल्याने दोषमुक्त करण्याची विनंती केली .
6. अर्जदाराने नि.क्र.19 नुसार शपथपञ व नि.क्र.20 नुसार लेखी युक्तीवाद, नि.क्र.25 नुसार 3 झेरॉक्स दस्तावेज दाखल केले. गैरअर्जदार क्र.1 ने नि.क्र.22 नुसार 1 झेरॉक्स दस्ताऐवज, नि.क्र.23 नुसार शपथपञ, नि.क्र.27 नुसार 3 झेरॉक्स दस्तावेज व नि.क्र.29 लेखी युक्तीवाद दाखल केले. अर्जदार व गैरअर्जदार क्र.1 ते 3 यांनी दाखल केलेले लेखी बयान, तसेच अर्जदार व गैरअर्जदार क्र.1 ने दाखल केलेले दस्ताऐवज, शपथपञ, लेखी युक्तीवादावरुन खालील मुद्दे निघतात.
मुद्दे : निष्कर्ष
1) अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? : होय.
2) अर्जदाराचा अर्ज कारण घडल्यापासून मुदतीत आहे काय ? : होय.
3) गैरअर्जदार क्र.1 ने लाभार्थ्याप्रती सेवेत न्युनतापूर्ण : होय.
व्यवहार केला आहे काय ?
4) अर्जदार हा गैरअर्जदार क्र.1 कडून विमा पॉलिसीचा लाभ : अंतिम आदेशाप्रमाणे
मिळण्यास पाञ आहे काय ?
- कारण मिमांसा –
मुद्दा क्रमांक 1 बाबत :-
7. तक्रारदाराची बहीण विठाबाई सखाराम चौधरी हिच्या मालकीचे मौजा बोदली माल, ता.व जि. गडचिरोली येथे सर्व्हे न.105 ही शेतीची जमीन आहे. मय्यत विठाबाई सखाराम चौधरी ही शेतीचा व्यवसाय करीत होती व शेतीतील उत्पन्नावर कुटूंबाचे पालनपोषण करीत होती. मय्यत विठाबाई सखाराम चौधरी यांनी गैरअर्जदार क्र.3 व 2 मार्फत गैरअर्जदार क्र.1 कडे शासनाचे व्यक्तीगत अपघात विमा योजने अंतर्गत रुपये 1,00,000/- चा विमा काढलेला होता. तक्रारदार हा मय्यत विठाबाई सखाराम चौधरी हिचा भाऊ आहे असे अर्जदाराने दाखल केलेले नि.क्र.2 दस्त क्र.4 गाव-नमुना 7 याचेवरुन सिध्द होते. म्हणून तक्रारदार/अर्जदार हा त्याची मय्यत बहीण विठाबाई सखाराम चौधरी हिने काढलेल्या शेतकरी व्यक्तीगत अपघात विमाचा वारसदार व लाभार्थी आहे. तक्रारदार हा गैरअर्जदार क्र.1 चा ग्राहक आहे असे सिध्द होत आहे. सबब, मुद्दा क्र.1 होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रमांक 2 बाबत :-
8. तक्रारदाराच्या तक्रारीचे कारण प्रथम दि.9.2.2012 रोजी घडले जेव्हा तक्रादाराराची बहीण मय्यत विठाबाई सखाराम चौधरी हिचा मृत्यु झाला, परत दि.21.5.2012 ला तक्रारदाराने मय्यतचा विमा अपघात विषयी विमादावा मिळण्याकरीता अर्ज केला व नंतर सदर तक्रारीचे कारण परत उद्भवले जेंव्हा दि.27.6.2013 रोजी तक्रारदाराच्या विमा विषयी अर्ज गैरअर्जदार क्र.1 ने नामंजूर केला. सदर तक्रार मंचासमक्ष दि.13.9.2013 रोजी दाखल झाली म्हणून सदर तक्रार कारण घडल्यापासून मुदतीत आहे असे निष्पन्न होते. सबब, मुद्दा क्र.2 होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रमांक 3 व 4 बाबत :-
9. तक्रारदार हा मय्यत विठाबाई सखराम चौधरी हिचा भाऊ आहे असे सिध्द झालेले आहे. मय्यत विठाबाई सखाराम चौधरी ही शेतकरी होती व तीने गैरअर्जदार क्र.1 कडून शासनाच्या मार्फतीने शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजने अंतर्गत रुपये 1,00,000/- चा विमा काढला होता, याबाबत तक्रारदार व गैरअर्जदारांचा कोणताही वाद नाही. तसेच, मय्यत विठाबाई सखाराम चौधरी हिचा मृत्यु दि.9.2.2012 रोजी ट्रॅक्टरमधून जात असतांना ट्रॅक्टर पलटल्यामुळे झाला याबाबत तक्रारदार व गैरअर्जदारांचा वाद नाही. गैरअर्जदाराच्या त्याच्या लेखी बयाणात असे म्हणणे आहे की, सदर ट्रॅक्टर हा याञी वाहन नसल्यामुळे मय्यत त्याचेवर बेकायदेशीर प्रवास करीत होती हे म्हणणे मंचाला समर्थनीय नाही. तसेच तक्रारदाराने विमा दावा 90 दिवसाचे आंत दाखल करावयास पाहिजे होता, परंतु सदर विमाक्लेम अर्जदाराने विनाकारण विलंबाने दाखल केला, त्यामुळे तक्रारदाराचा दि.27.6.2013 रोजी अर्ज नामंजूर केला गेला ते सुध्दा मंचाला खालील शासनाच्या आदेशाप्रमाणे समर्थनीय नाही.
शेतकरी जनता अपघात विमा योजना 2010-11 शासन निर्णय 10 ऑगष्ट 2010 प्रमाणे परिच्छेद क्र.8 मध्ये नमूद आहे ते खालील पमाणे.
‘‘8. विमा प्रस्ताव विहित कागदपञासह योजनेच्या कालावधीत कधीही प्राप्त झाला तरी तो विचारात घेणे तसेच, योजनेच्या अखेरच्या दिवसात झालेल्या अपघातांसाठी योजनेचा चालू वर्षाचा मंजूर कालावधी संपल्यानंतर 90 दिवसापर्यंत तालुका कृषि अधिका-याकडे प्राप्त झालले प्रस्ताव स्विकारणे विमा कंपनीवर बंधनकारक राहील तसेच समर्थनीय कारणांसह 90 दिवसानंतर प्राप्त होणारे विमा प्रस्ताव विमा कंपनीने स्विकारावेत. प्रस्ताव विहित मुदतीत सादर केले नाहीत
या कारणास्तव विमा कंपन्याना प्रस्ताव नाकारता येणार नाहीत.’’
वरील शासनाचा निर्णयाचा आधार घेताना मंचाचे असे मत आहे की, तक्रारदाराचा विमाक्लेम विषयीचा अर्ज गैरअर्जदार क्र.1 नी बेकायदेशीर नामंजूर केलेला आहे. म्हणून गैरअर्जदार क्र.1 ने तक्रारदाराच्या प्रती न्युनतापूर्ण व्यवहार केलेला आहे, हे सिध्द होते. सबब मुद्दा क्र.3 हा होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
10. तक्रारदार हा गैरअर्जदार क्र.1 चा ग्राहक असल्यामुळे व त्याची बहीण मय्यत विठाबाई सखाराम चौधरी यांनी शासनामार्फत शेतकरी अपघात विमा रुपये 1,00,000/- चा विमा गैरअर्जदार क्र.1 कडून काढलेला आहे म्हणून तक्रारदार हा अपघात विमाचे रुपये गैरअर्जदार क्र.1 कडून मागण्यास लाभार्थी आहे. म्हणून मुद्दा क्र.4 खालील आदेशाप्रमाणे होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
गै.अ.क्र.2 व 3 यांनी अर्जदाराला शासन निर्णयाप्रमाणे ‘शेतकरी जनता अपघात विमा योजने अंतर्गत’ विमा रक्कम मिळण्यास विना मोबदला मदत केली. याकारणास्तव गै.अ.क्र.2 व 3 यांचे विरुध्द कोणताही आदेश नाही.
- अंतिम आदेश -
(1) तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर.
(2) गैरअर्जदार क्र.1 नी तक्रारदाराला विमा दाव्याची रक्कम रुपये 1,00,000/- आदेशाच्या दिनांकापासून 30 दिवसाचे आंत द्यावी, विमा रक्कम 30 दिवसाचे आत न दिल्यास द.सा.द.शे. 9 टक्के व्याजासह अर्जदाराला द्यावे.
(3) गैरअर्जदार क्र.1 ने अर्जदाराला मानसिक व शारिरीक ञासापोटी रुपये 5000/- व तक्रारीचा खर्चापोटी रुपये 2000/- आदेशाच्या दिनांकापासून 30 दिवसाचे आत द्यावे.
(4) उभय पक्षांना आदेशाची प्रत विनामुल्य देण्यात यावी.
गडचिरोली.
दिनांक :-29/3/2014