जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, धुळे.
ग्राहक तक्रार क्रमांक – २००/२०१०
तक्रार दाखल दिनांक – ०५/०७/२०१०
तक्रार निकाली दिनांक – १८/११/२०१३
श्री. राजेंद्र पंडीतराव ठाकरे,
उ.वय – ४५ धंदा – विटाभट्टी
रा.प्रतापपूर, ता.साक्री,
जिल्हा धुळे. ------------- तक्रारदार
विरुध्द
१) दि न्यू इंडिया एश्योरन्स कं.लि.,
शाखाधिकारी, शाखा, धुळे.
(सामनेवाला नं.२ यांची नोटीस
सामनेवाला नं.१ यांचेवर बजवावी)
रा.धुळे. ता.जि. धुळे.
२) शाखाधिकारी
दि न्यू इंडिया एश्योरन्स कं.लि.,
शाखा नंदुरबार
रा. १, सरस्वती कॉलनी, गिरीविहार गेट
नंदुबार जि. नंदुरबार. ------------ सामनेवाला
न्यायासन
(मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी)
(मा.सदस्या – सौ.एस.एस.जैन)
(मा.सदस्य – श्री.एस.एस.जोशी)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – वकील श्री.आर.एस. भामरे)
(सामनेवाला तर्फे – वकील श्री.सी.पी. कुलकर्णी)
निकालपत्र
(दवाराः मा.सदस्या – सौ.एस.एस.जैन)
सामनेवाला यांनी तक्रारदार यांचा विमा दावा मंजूर न केल्याने तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार या मंचात दाखल केली आहे.
१. तक्रारदार यांची थोडक्यात तक्रार अशी आहे की, तक्रारदार यांची ‘जय संतोषी मॉ’ या नावाने मौजे दिघावे ता.साक्री येथे गट नं.२०४/१ मध्ये विट कारखाना आहे. सदर विटांच्या उत्पन्नाच्या पैशातून त्यांचा उदरनिर्वाह चालतो. त्यांनी सामनेवाला न्यु इंडिया एश्योरन्स कं.लि यांचेकडून फायर इन्शुरन्स अंतर्गत विमा पॉलिसी घेतली आहे. त्याचा कालावधी दि.०८/०८/०९ ते ०७/०८/१० व पॉलिसीचा क्र.१६०८०२/११/०९/००००२४५ आहे.
२. तक्रारदार यांनी पुढे असे म्हटले आहे की, दि.१०/०३/१० ते दि.११/०३/१० या कालावधीत दिघावे परिसरात बेमोसमी पाऊस, चक्रीवादळ तसेच गारपीट झाली होती. त्यामध्ये विटभट्टीतील रू.५,५०,०००/- कच्च्या विटांचे नुकसान झाले होते. पावसाच्या पाण्यामुळे संपूर्ण विटा विरघळल्या होत्या व मातीचा ढीग तयार झालेला होता. सदर घटनेची माहीती तक्रारदार यांनी दि.११/०३/१० रोजी सामनेवाला क्र.२ व सर्व्हेअर यांना मोबाईलद्वारे दिली व दि.१२/०३/१० रोजी सामनेवाला क्र.२ यांना फॅक्सद्वारे माहीती देण्यात आली. तसेच तहसिलदार साक्री व तलाठी यांनाही त्याबाबत कळविण्यात आले. त्यानुसार तलाठी यांनी घटनास्थळावर पंचनामा केला आहे.
३. तक्रारदार यांचे पुढे असे म्हणणे आहे की, विमा कंपनीस घटनेची माहीती दिल्यानंतर देखील २४ तासाच्या आत त्यांचा प्रतिनिधी किंवा सर्व्हेअर घटनास्थळी आले नाहीत. त्यामुळे तक्रारदार यांनी विमा कंपनीची परवानगी घेवून व त्यांना माहिती देवून तक्रारदार यांनी जे.सी.बी. मशिनच्या सहाय्याने कच्च्या विटा विरघळून झालेला मातीचा ढिग व कच्च्या विटा बाजूला काढून ठेवल्या होत्या. दि.१५/०३/२०१० रोजी सर्व्हेअर घटनास्थळी आले त्यावेळी त्यांना सदर नुकसान दाखवणारे फोटोग्राफ दाखवण्यात आले व रू.४,४०,०००/- च्या विटांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले व उर्वरित माल दाखविण्यात आला होता.
४. तक्रारदार यांना विमा कंपनीने दि.१५/०४/२०१० रोजी खोटया मजकुरांचे पत्र पाठविले होते. त्यास तक्रारदारने दि.२६/०४/२०१० रोजी समर्पक उत्तर पाठवले व खुलासा केलेला आहे. त्यानंतर विमा कंपनीने दि.०३/०६/२०१० रोजी पत्र देवून तक्रारदार यास अल्पशी रक्कम मंजूर केल्याचे कळवले व सेवेत कमतरता केलेली आहे व अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला आहे.
५. तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडून बेमोसमी पावसामुळे रू.५,५०,०००/- कच्च्या विटेचे नुकसान झाले आहे. रू.१०००/- विटांसाठी रू.१५००/- खर्च आलेला आहे. त्यामुळे एकूण नुकसान भरपाई पोटी रू.८,२५,००/- शारिरिक व मानसिक भरपाईपोटी रू.५०००/- तसेच सदर रकमेवर तक्रार अर्ज दाखल झाल्यापासून द.सा.द.शे. १०% दराने व्याज व तक्रार अर्जाचा खर्च रू.५०००/- मिळावे अशी विनंती केली आहे.
६. तक्रारदार यांनी आपल्या म्हणण्याच्या पृष्ठयार्थ नि.३ वर शपथपत्रे, तसेच नि.१६ सोबत नि.५/१ वर क्लेम सेटलमेंट व्हाऊचरचे पत्र, नि.१६ सोबत नि.१६/१ वर सर्व्हेअरचे पत्र, नि.१६/२ व १६/३ वर तक्रारदारचे पत्र, नि.१९/२ वर नैसर्गिक आपत्ती पंचनामा पत्र, नि.१९/३ व नि.१९/४ वर साक्षीदारांचे प्रतिज्ञापत्र, तसेच वरिष्ठ कोर्टाचे न्यायनिवाडे, इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
७. विमा कंपनीने आपले लेखी म्हणणे नि.१२ वर दाखल केले असून त्यात त्यांनी तक्रारदार यांची तक्रार, त्यातील म्हणणे व मागणे खोटे आहे. तक्रार दाखल करण्यास कुठेलेही कारण घडलेले नाही व सेवेत त्रृटी केलेली नाही. त्यामुळे सदर तक्रार खर्चासह रद्द करावी.
८. सामनेवाला यांचे पुढे असे कथन आहे की, त्यांनी तक्रारदारला स्टॅन्डर्ड फायर अॅण्ड स्पेशल पेरिल्स पॉलिसी दिली होती. सदर पॉलीसी अन्वये विटभट्टीवरिल कच्चामाल व तयार माल यांना संरक्षण देण्यात आले होते. तक्रारदारचा नुकसान भरपाईचा क्लेम सामनेवाला यांनी मंजूर केला आहे. परंतु तक्रारदारने ती रक्कम अमान्य असल्याचे कळविले आहे. तक्रारदारच्या अपेक्षेप्रमाणे नुकसानभरपाईची रक्कम न मिळणे यास सेवेतील त्रृटी म्हणता येणार नाही. तक्रारदार स्व्च्छ हाताने मंचामुढे आलेला नाही. तक्रारदारचे विटभट्टीचे नुकसान दि.१०/०३/१० रोजी संध्याकाळी झालेले आहे. त्याने दुर्घटनेबाबत फॅक्सद्वारे दि.१२/०३/२०१० रोजी संध्याकाळी ६.२५ वाजता म्हणजे कार्यालयीन वेळेनंतर कळविले आहे. दि.१२/०३/१० रोजी शुक्रवार होता व शनिवार व रविवार रोजी विमा कंपनीचे कार्यालय बंद असल्याने दि.१५/०३/१० रोजी श्री.रॉबर्ट रॉड्रीग्ज सर्व्हेअर व लॉस अॅसेसर यांची नेमणूक केली. त्यामुळे सामनेवाला यांनी सर्व्हेअरची नेमणूक उशिरा केली. या तक्रारदारने केलेल्या आरोपात काहीही तथ्थ नाही. सर्व्हेअर सर्व्हेसाठी गेले असता तक्रारदारने नुकसानग्रस्त कच्च्या विटा अथवा त्याचे अवशेषही सर्व्हेअरला दाखविले नाही व खराब झालेल्या ४ लाखाच्या नुकसानग्रस्त कच्च्या विटा फेकून दिल्या असेही सांगितले. सवर्हेअरने नुकसानग्रस्त मालाची प्रत्यक्ष पाहणी व मोजणी केली असता साधारणतः एक लाखाच्या कच्चा विटा नुकसान झाले असल्याचे दिसून आले. वास्तविक याच पॉलिसी अंतर्गत तक्रारदारने यापुर्वी दोन क्लेम केले होते व ते मंजुरही झाले होते. त्यामुळे तक्रारदारला क्लेम बाबतची कार्यवाही कशी होते. याबाबतची संपूर्ण माहीती होती. सर्व्हेअरची पाहणी होईपर्यंत नुकसानग्रस्त माल आहे त्या परिस्थितीत ठेवणे गरजेचे असते. त्यामुळे तक्रारदारने नुकसानग्रस्त विटा त्वरीत फेकणे आवश्यक नव्हते. कच्च्या विटा भिजून त्याचे नुकसान झाले तरीही तो कच्चा माल पुन्हा वापरता येतो. तक्रारदारने त्यासाठी कुठलाही योग्य तो पुरावा सादर केलेला नाही. अथवा कुठलेही समाधानकारक स्पष्टीकरण तक्रारदार देवू शकलेला नाही.
९. सर्व्हेअर श्री. रॉड्रीग्ज यांनी तक्रारदारकडे त्याच्या उत्पादनासंबंधीच्या कागदपत्रांची तसेच मजुरांना अदा केलेल्या पगाराची व विक्री संबंधीच्या कागदपत्रांची प्रथम तोंडी व नंतर लेखी मागणी करूनही तक्रारदारने कुठलेही कागदपत्र अथवा माहीती सादर केलेली नसल्याने पाहणीच्या आधारावर सर्व्हेअर यांनी नुकसानीचा आकडा रू.५५,०००/- काढला व त्यांचा दि.२६/०५/२०१० रोजीचा सर्व्हे रिपोर्ट सादर केला. सर्व्हेअर यांनी सर्व्हे रिपोर्ट सादर केल्यानंतर नियमाप्रमाणे तसे तक्रारदारास कळविण्यात आले व क्लेम सेटलमेन्ट व्हाऊचरही त्यास पाठविण्यात आले. विमाधारकाने व्हाऊचर सही करून पाठविल्यानंतरच त्या भरपाई रकमेचा चेक मिळू शकतो. सदर क्लेम हा पूर्ण व अंतिम असल्याने उर्वरित रक्कम बाकी ठेवून ही रक्कम स्विकारता येत नाही. परंतु तक्रारदारने मात्र क्लेम सेटलमेंट व्हाऊचर स्विकारतांना मंजूर झालेली रक्कम मान्य नसल्याचे व उर्वरित रकमेबाबतची तक्रार कायम ठेवून रक्कम स्विकारत असल्याचे कळविल्याने त्याचा क्लेम अदा होवू शकला नाही. तक्रारदारने मंजूर झालेला क्लेम घेण्याचे नाकारल्याने सामनेवाला यांनी तक्रारदारला दिलेल्या सेवेत त्रृटी नसल्याने नुकसानभरपाई देण्यास विमा कंपनी बांधील नाही. सबब तक्रार प्रथमदर्शनी खर्चासह रद्द करण्यात यावी अशी विनंती केली आहे.
१०. सामनेवाला यांनी आपले म्हणण्याच्या पृष्ठयार्थ नि.२२ वर प्रतिज्ञापत्र, नि.२४ सोबत नि.२४/१ व २४/२ वर तक्रारदारने विमा कंपनीला दिलेले पत्र, नि.२४/३ व नि.२४/४ वर सर्व्हेअरचे तक्रारदाराला दिलेले पत्र, नि.२४/६ वर तक्रारदारने सर्व्हेअरला दिलेले पत्र, नि.२४/७ वर सर्व्हेअरने तक्रारदाराला दिलेले पत्र, नि.२४/११ वर सर्व्हे रिपोर्ट, नि.२४/१२ वर विमा कंपनीने तक्रारदारला दिलेले पत्र, नि.२४/८ वर क्लेम फॉर्म, नि.२४/१० वर सर्व्हेअरचे प्रोव्हिजन बील, नि.२४/१३ वर सेटलमेंट व्हाऊचर प्रत, नि.२४/१४ वर तक्रारदारने विमा कंपनीला दिलेले पत्र, नि.२४/१५ वर विमा कंपनीचे पत्र, नि.२४/१६ वर सेटलमेंट नोट, नि.२४/१७ वर रिमाईंडर पत्र, तसेच नि.२५ वर सर्व्हेअरचे प्रतिज्ञापत्र, नि.२६ वर लेखी युक्तीवाद, इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
११. तक्रारदार यांची तक्रार, सामनेवाला यांचा खुलासा व युक्तिवाद ऐकल्यानंतर व दाखल कागदपत्रे पाहता आमच्या समोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालीलप्रमाणे देत आहोत.
मुद्दे निष्कर्ष
१. सामनेवाला यांनी तक्रारदार यांना
दयावयाच्या सेवेत त्रृटी केली आहे काय ? नाही
२. आदेश काय ? खालीलप्रमाणे
विवेचन
१२. मुद्दा क्र.१- तक्रारदार यांची मुख्य तक्रार अशी आहे की, त्यांचा वीट तयार करण्याचा कारखाना आहे. सदर विटभट्टीत दि.१०/०३/२०१० ते दि.११/०३/२०१० या कालावधीत वादळीवारा व बेमोसमी पावसामुळे कच्चा मालाचे व तयार मालाचे अतोनात नुकसान झाले. सदर कारखान्याचा विमा सामनेवाला कंपनीने काढलेला असल्याने विमा प्रस्ताव विमा कंपनीकडे पाठवला असता विमा कंपीनीने अल्पशी रक्कम मंजूर केली आहे व सेवेत त्रृटी केली आहे.
या संदर्भात विमा कंपीनीने आपल्या खुलाश्यामध्ये सर्व्हेअरचा रिपोर्ट आल्यानंतर कंपनीच्या पॉलीसीच्या अटी व शर्तीप्रमाणे तक्रारदारास रू.५५,०००/- इतकी रक्कम मंजूर करून त्याबाबतचे क्लेम सेटलमेन्ट व्हाऊचरही त्यास पाठविले होते. परंतु तक्रारदारने क्लेम सेटलमेन्ट व्हाऊचर स्विकारतांना मंजूर झालेली रक्कम मान्य नसल्याचे व उर्वरित रकमेबाबतची तक्रार कायम ठेवून रक्कम स्विकारत असल्याचे कळविल्याने त्याचा क्लेम अदा होवू शकलेला नाही. तसेच सर्व्हे रिपोर्टच्या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारची नुकसानभरपाई विमा कंपनी तक्रारदारास देवू शकत नाही व तक्रारदारने क्लेम घेण्याचे नाकारले असल्याने सेवेत त्रृटी नाही असे नमुद केले आहे.
याबाबत आम्ही सामनेवाला यांनी नि.२४ सोबत दाखल केलेल्या कागदत्रांचे अवलोकन केले आहे. नि.२४ सोबत नि.२४/३ व नि.२४/४ वर सर्व्हेअर श्री.रॉड्रीग्ज यांनी तक्रारदारकडे त्याच्या उत्पादनासंबंधीच्या कागदपत्रांची तसेच मजुरांना अदा केलेल्या पगाराची व विक्री संबंधीच्या कागदपत्रांची वारंवार मागणी करूनही त्यांनी ती सादर न केल्याने सर्व्हेअरने प्रत्यक्ष पाहणीत आढळलेला नुकसानग्रस्त माल विचारात घेवून सर्व्हे अहवाल सादर केला असल्याचे दिसून येत आहे. नि.२४/११ वर श्री.रॉबर्ट रॉड्रीग्ज यांचा आर्थिक नुकसानीबाबतचा सर्व्हे अहवाल दाखल आहे. सदर अहवालात Insurance Liability Rs.55,000/- नमुद आहे. नि.२४/३ व नि.२४/४ वरील सर्व्हे अहवालानुसार विमा कंपीनीने तक्रारदारास दि.०३/०६/२०१० रोजी क्लेम सेटलमेंट व्हाऊचर व त्यासोबत पत्र दिले व त्यानंतरही दि.२३/०६/२०१० व दि.०२/०७/२०१० रोजी स्मरणपत्र पाठविले आहेत. सदरचे दोन्ही पत्रे अनुक्रमे नि.२४/१२ व नि.२४/१७ वर दाखल आहेत. वास्तविक सर्व्हेअरचा अहवाल हा तज्ञ अहवाल असल्याने त्यास प्रमाण मानले जाते हे वरिष्ठ कोर्टाच्या न्यायनिवाडयांद्वारेही स्पष्ट झालेले असूनही तक्रारदारने सर्व्हेअरच्या अहवालात नमुद विमा रक्कम तक्रार कायम ठेवून व उर्वरित रकमेसंबंधी कायदेशीर हक्क अबाधीत ठेवून स्विकारत असल्याबाबतचे पत्र दि.१४/०६/२०१० रोजी सामनेवाला विमा कंपनीला पाठविलेले आहे. सदर पत्र विमा कंपनीने नि.२४/१४ व सेटलमेन्ट व्हाऊचर नि.२४/१३ वर दाखल कलेले आहे. सदर दोन्ही कागदपत्रे पाहता सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारास विमा कंपनीने मंजूर केलेली रक्कम मान्य नसल्याचे दिसून येते व त्यामुळे त्याचा क्लेम अदा होवू शकलेला नाही हे ही निदर्शनास येत आहे. त्यावरून विमा कंपनीने मंजूर केलेला क्लेम घेण्याचे तक्रारदारने नाकारला असल्याने विमा कंपनीने तक्रारदारास दिलेल्या सेवेत कुठलीही त्रृटी केलेली नाही या मतास आम्ही आलो आहोत. म्हणून मुद्दा क्र. १ चे उत्तर आम्ही नकारार्थी देत आहोत.
१३. मुद्दा क्र.२- वरील सर्व विवेचनावरून आम्ही खालीलप्रमाणे आदेश देत आहोत.
आ दे श
१. तक्रारदार यांची तक्रार नामंजूर करण्यात येत आहे.
२. दोन्ही पक्षांनी आपआपला खर्च सोसावा.
धुळे.
दि.१८/११/२०१३.
(श्री.एस.एस. जोशी) (सौ.एस.एस. जैन) (सौ.व्ही.व्ही. दाणी)
सदस्य सदस्या अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, धुळे.