द्वारा- श्रीमती अंजली देशमुख, मा. अध्यक्ष
:- निकालपत्र :-
दिनांक 11 जानेवारी 2012
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे-
1. तक्रारदारांनी दिनांक 22/10/2010 रोजी विलंब माफीचा अर्ज दाखल केला आहे. तक्रारदारांच्या पत्नीस “Acute Calculus Cholecystitis” आजार झाल्यामुळे दिनांक 17/11/2006 रोजी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर तक्रारदारांनी जाबदेणार यांच्याकडे क्लेम फॉर्म दाखल केला. जाबदेणार यांनी दिनांक 3/11/2007 रोजी क्लेम नामंजुर केला. म्हणून तक्रारदारांनी दिनांक 13/10/2010 रोजी मंचात तक्रार दाखल केली. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार जाबदेणार यांनी क्लेमची रक्कम न दिल्यामुळे तक्रारीस कारण सतत घडत आहे. तक्रारदार पुढे असे म्हणतात की त्यांच्या पत्नीस कॅन्सर झाल्यामुळे त्यांच्या उपचारासाठी, मुलांच्या देखभालीसाठी, घरातील कामांमुळे त्यांना तक्रार वेळेत दाखल करता आली नाही. म्हणून विलंब माफ करावा अशी मागणी तक्रारदार करतात. यासाठी तक्रारदारांनी मा. सर्वोच्च न्यायालयाच्या 2000-AIR(SC)-0-380\2000-SCC-1-586 Civil 2418 of 1996 लता कन्स्ट्रक्शन विरुध्द रमेशचंद्र रमणिकलाल शहा या निवाडयाचा आधार घेतला.
2. जाबदेणार यांनी त्यांचे म्हणणे दाखल केले. त्यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदारांचा क्लेम दिनांक 3/11/2007 रोजी नामंजुर करण्यात आला होता. ग्राहक संरक्षण कायदयानुसार घटना घडल्यापासून दोन वर्षांच्या आत तक्रार दाखल करणे आवश्यक आहे. तक्रारदारांनी विलंब माफीसाठी कुठलेही योग्य कारण दिलेले नाही व किती दिवसांचा विलंब झाला याबद्यलही स्पष्ट लिहीलेले नाही. म्हणून विलंब माफीचा अर्ज नामंजुर करावा अशी मागणी जाबदेणार करतात.
3. उभय पक्षकारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. तक्रारदारांनी विलंब माफीच्या अर्जामध्ये त्यांच्या पत्नीस कॅन्सर झाल्यामुळे, उपचार व शस्त्रक्रिया, मुलांची देखभाल, घरातील कामे यामुळे त्यांना तक्रार वेळेत दाखल करता आली नाही असे नमूद केलेले आहे. परंतू सदरहू अर्जामध्ये नक्की किती दिवसांचा विलंब झालेला आहे हे नमूद करण्यात आलेले नाही. विलंब माफीसाठी योग्य ते कारण देण्यात आलेले नाही. तक्रारदारांनी त्यांच्या पत्नीस Acute Calculus Cholecystitis आजार झाल्यामुळे दिनांक 17/11/2006 रोजी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. नंतर त्यांच्यावर कॅन्सरवरील उपचार केमोथेरपी, रेडिएशन चालू झाली असेल. जाबदेणार यांनी तक्रारदारांचा क्लेम दिनांक 3/11/2007 रोजी नामंजुर केला. त्यानंतर दोन वर्षांच्या आत तक्रारदारांनी तक्रार दाखल करणे आवश्यक होते. तक्रारदारांना तक्रार दाखल करण्यास विलंब झाला त्याचे योग्य ते स्पष्टीकरण तक्रारदारांनी दिलेले नाही. विलंब माफीसाठी योग्य ते कारण न दिल्यामुळे व ग्राहक संरक्षण कायदा 1986 मध्ये तक्रारीस कारण घडल्यापासून दोन वर्षांच्या आत तक्रार दाखल करणे आवश्यक असल्यामुळे प्रस्तूतचा विलंब माफीचा अर्ज नामंजुर करुन तक्रार नामंजुर करण्यात येत आहे. तक्रारदारांनी दाखल केलेला निवाडा प्रस्तूत प्रकरणी लागू होत नाही असे मंचाचे मत आहे.
वरील विवेचनावरुन व दाखल कागदपत्रांवरुन खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे-
:- आदेश :-
[1] तक्रारदारांचा विलंब माफीचा अर्ज व तक्रार नामंजुर करण्यात येत आहे.
[2] खर्चाबद्यल आदेश नाही.
आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.