अॅड अमित थिटे तक्रारदारांकरिता
अॅड अनंत अवेकर जाबदेणार क्र.1 करिता
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
द्वारा- श्रीमती, अंजली देशमुख, मा. अध्यक्ष यांचेनुसार,
**निकालपत्र **
दिनांक 30/जुलै/2012
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे-
प्रस्तुतचे प्रकरण सायनेडाय यादीतून काढून दिनांक 23/12/2009 रोजी बोर्डावर घेण्यात आले.
2. तक्रारदार हे कार्डिओलॉजिस्ट आहेत. त्यांनी त्यांच्या व्यवसायासाठी म्हणून Siemens Acuson Cypress Ultrasound Colour Doppler System दिनांक 13/2/2003 रोजी खरेदी केली. या सिस्टीमसाठी तक्रारदारांनी जाबदेणार क्र.1 यांच्याकडून ऑल रिस्क पॉलिसी दिनांक 28/4/2004 ते 27/4/2005 या कालावधीसाठी घेतली. त्यानंतर दिनांक 28/4/2005 ते 27/4/2006 या कालवधीकरिता डॉक्टर्स प्रोटेक्शन शिल्ड पॉलिसी चालू ठेवली. त्यानंतर श्रीमती दंडवते - जाबदेणार यांच्या प्रतिनिधींनी तक्रारदारांना सल्ला दिल्यामुळे स्पेशल कॉन्टीन्जसी पॉलिसी या नावे पॉलिसी चालू ठेवली. दिनांक 6/4/2006 रोजी रुपये 16,275/- चा चेक जाबदेणार यांच्या नावे दिला. तक्रारदारांच्या बँकेच्या खातेउता-यावरुन दिनांक 29/4/2006 रोजी चेक क्लिअर झाल्याचे तक्रारदारांना कळले. जाबदेणार क्र.1 यांनी दिनांक 29/4/2006 रोजी रक्कम प्राप्त झाल्याची पावती तक्रारदारांना दिली. परंतु जाबदेणार क्र.1 यांनी 7 ते 8 महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतर प्रिमीअमची रक्कम प्राप्त झाल्याच्या पावतीसह स्पेशल कॉन्टीन्जन्सी पॉलिसी कालावधी दिनांक 26/4/2006 ते 25/4/2007 करिता तक्रारदारांना पाठविली, ज्यामध्ये कलेक्शनची तारीख 15/12/2006 नमुद करण्यात आली होती. स्पेशल कॉन्टीन्जन्सी पॉलिसी मध्ये चोरी, आग, बरग्लरी व इतर अपघातांपासून संरक्षण देण्यात आलेले होते. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार दिनांक 10/7/2006 रोजी तक्रारदारांच्या मशिनला अपघात झाला. त्याची माहिती तक्रारदारांनी जाबदेणार यांना ताबडतोब कळविली. त्यानुसार जाबदेणार यांनी कमल बियाणी असोसिएट्स यांची सर्व्हेअर म्हणून नियुक्ती केली. सर्व्हेअरनी दिनांक 11/7/2006 व 20/7/2006 रोजी मशिनची पाहणी करुन पत्राद्वारे 8 कागदपत्रांची मागणी केली, ज्यामध्ये पॉलिसीच्या प्रतीचाही समावेश होता. परंतु जाबदेणार क्र.1 यांनी विलंबाने पॉलिसी दिल्यामुळे, सर्व्हेच्या दिनांकापर्यन्त पॉलिसीची प्रत प्राप्त न झाल्यामुळे तक्रारदारांना अतिशय त्रास सहन करावा लागला. सर्व्हेअरनी पूर्वग्रहदुषित होऊन अहवाल दिला. तो अहवाल तक्रारदारांना मान्य नाही. प्रिमीअम भरल्यापासून तिन महिन्यांपर्यन्त सर्व्हेच्या तारखेपर्यन्त तक्रारदारांना पॉलिसी मिळाली नव्हती. म्हणून तक्रारदारांनी दिनांक 23/8/2006 रोजी जाबदेणार यांना पत्र पाठविले परंतु उपयोग झाला नाही. जाबदेणार क्र.1 यांनी दिनांक 15/12/2006 रोजी पॉलिसी दिल्यानंतर, दिनांक 14/12/2006 रोजीचे पत्र पाठवून स्पेशल कॉन्टीन्जन्सी पॉलिसी दिनांक 1/1/2007 पासून रद्य केल्याचे कळविले. तक्रारदार वैद्यकीय व्यावसायिक आहेत. मशिन घेण्यासाठी त्यांनी मोठी रक्कम खर्च केली होती. मशिन दुरुस्तीसाठी, की बोर्ड उजव्या कोप-यात तुटल्यामुळे तक्रारदारांना मोठया प्रमाणात रक्कम खर्च करावी लागली. मशिन पोर्टेबल आहे. तक्रारदारांनी जाबदेणार क्र.2 यांच्यासोबत Annual Maintenance Contract केलेले आहे. जाबदेणार क्र.2 नियमित सर्व्हिसिंग करतात. दिनांक 25/5/2006 रोजी जाबदेणार क्र.2 यांनी नियमित सर्व्हिसिंग केलेली आहे व तोपर्यन्त मशिन चालू स्थितीत होती. दिनांक 10/7/2006 रोजीच्या अपघातामुळे मशिनचे तुकडे झाले, किबोर्ड बदली करणे आवश्यक आहे. किबोर्ड बदलण्यासाठी तक्रारदारांनी रुपये 1,17,658/- खर्च केले. म्हणून सदरील तक्रार. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार अपघाताच्या वेळी मशिन विमाकृत असल्यामुळे, जाबदेणार यांनी दिनांक 15/12/2006 रोजी पॉलिसी दिलेली असल्यामुळे, तक्रारदारांनी दिनांक 26/4/2006 रोजी पॉलिसीचा प्रिमिअम भरलेला असल्यामुळे तक्रारदार जाबदेणार यांच्याकडून किबोर्डची किंमत रुपये 1,17,658/-, तक्रारदार वैद्यकीय व्यावसायिक असल्यामुळे दरमहा रुपये 15,000/- प्रमाणे झालेले नुकसान रुपये 1,65,000/- एकूण रुपये 2,82,658/- द.सा.द.शे 12 टक्के व्याजासह व इतर दिलासा मागतात. तक्रारदारांनी शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली.
3. जाबदेणार क्र.2 यांना दिनांक 23/3/2011 रोजीच्या आदेशान्वे पक्षकार म्हणून वगळण्यात आले.
4. जाबदेणार क्र.1 यांनी लेखी जबाब दाखल करुन तक्रारदारांच्या मागणीस विरोध दर्शविला. तक्रारदारांनी Siemens Acuson Cypress Ultrasound Colour Doppler System खरेदी केली होती. मशिनसाठी ऑल रिस्क पॉलिसी दिनांक 28/4/2004 ते 27/4/2005 या कालावधीकरिता घेतली होती. दिनांक 29/4/2005 ते 28/4/2006 या कालावधीकरिता डॉक्टर्स प्रोटेक्शन शिल्ड पॉलिसी घेतली होती. डॉक्टर्स प्रोटेक्शन शिल्ड पॉलिसीमध्ये फिक्स मशिन्स संदर्भातच रिस्क कव्हर करण्यात येते, पोर्टेबल मशिनसाठी नाही. तक्रारदारांना मशिनमध्ये काही तांत्रिक समस्या – स्क्रिन व हिंग्ज मध्ये निर्माण झाल्याचे कळवून रुपये 2,85,857/- ची मागणी केली. जाबदेणार यांनी श्री. बी. जी. कुलकर्णी यांना सर्व्हेअर म्हणून नियुक्त केले. दिनांक 25/8/2005 रोजी सर्व्हे करुन नुकसानीचे मुल्यांकन रुपये 1,44,072/- करण्यात आले. कागदपत्रांची छाननी करतांना तक्रारदारांना चुकून डॉक्टर्स प्रोटेक्शन शिल्ड पॉलिसी दिल्याचे जाबदेणार यांच्या जरी लक्षात आले तरीदेखील रुपये 1,44,072/- दिनांक 26/4/2006 रोजीच्या चेकद्वारे अदा करण्यात आले होते. तक्रारदारांनी ती रक्कम स्विकारलेली आहे. डॉक्टर्स प्रोटेक्शन शिल्ड पॉलिसी दिनांक 26/4/2006 रोजी संपल्यानंतर तक्रारदार ती पॉलिसी परत चालू ठेवण्यासाठी जाबदेणार यांच्याकडे आले असता ही पॉलिसी फक्त फिक्स मशिन्स संदर्भातच देण्यात येत असल्यामुळे, पोर्टेबल मशिनसाठी पॉलिसी देण्यात येत नसल्यामुळे ही पॉलिसी रिन्यु करता येणार नसल्याचे तक्रारदारांना सांगण्यात आले होते. म्हणून तक्रारदारांनी स्पेशल कॉन्टीन्जन्सी पॉलिसी दिनांक 26/4/2006 ते 25/4/2007 या कालावधीकरिता घेतली होती. दिनांक 10/7/2006 रोजी तक्रारदारांनी मशिनच्या किबोर्डमध्ये अपघातामुळे क्रॅक निर्माण झाल्याचे कळविले. जाबदेणारांनी मे. कमल बियाणी अॅन्ड असोसिएट्स यांची सर्व्हेअर म्हणून नियुक्ती केली. त्यांनी सर्व्हे करुन पुढीलप्रमाणे अहवाल दिला- किबोर्डचे कॅबिनेट उजव्या कोप-यात तुटले होते, हिंग्ज मध्ये डाव्या बाजूस तडा गेला होता, वीज पुरवठा असतांना बॅन्डस दिसत होते काही कालावधीने अदृष्य होत होते, सिस्टीम योग्य स्थितीत नव्हती [System was not in sound condition]. सर्व्हेअरनी दिनांक 12/7/2006 रोजी पत्र पाठवून तुकडे, पाहणीसाठी जतन करुन ठेवण्यास सांगितले होते. दिनांक 20/7/2006 रोजी सर्व्हेअरनी परत सर्व्हे केला. दिनांक 21/7/2006 रोजीचे पत्र पाठवून तक्रारदारांकडून आठ कागदपत्रांची मागणी केली. परंतु तक्रारदारांनी कागदपत्रांची पूर्तता केली नाही. तक्रारदारांजवळ फक्त पॉलिसीची मुळ कागदपत्रे सोडून उर्वरित कागदपत्रे असतांनासुध्दा कागदपत्रांची पूर्तता तक्रारदारांनी केली नाही. दिनांक 27/9/2006 रोजी सर्व्हेअरनी प्राथमिक अहवाल दिला व दिनांक 16/2/2007 रोजी अंतिम अहवाल दिला. सर्व्हेअरच्या अहवालानुसार मशिनला रफ युज मुळे, विअर अॅन्ड टिअर मुळे नुकसान झाले होते. तक्रारदारांचा क्लेम, स्पेशल कॉन्टीन्जन्सी पॉलिसी मध्ये येत नसल्याचे सर्व्हेअरनी अहवालामध्ये नमूद केले होते. सर्व्हेअरच्या अहवालानुसार व पॉलिसीच्या अटी व शर्तीनुसार तक्रारदारांचा क्लेम सेटल करण्यात आलेला नव्हता. जरी तक्रारदारांना विलंबाने पॉलिसी देण्यात आलेली असली तरी देखील पॉलिसीच्या अटी व शर्तीनुसारच तक्रारदारांचा क्लेम सेटल करण्यात आला नव्हता. तक्रारदारांचा क्लेम जुलै 2006 मधील होता व पॉलिसी दिनांक 1/1/2007 पासून रद्य करण्यात आली होती. जाबदेणार यांच्या सेवेत त्रुटी नाही म्हणून तक्रार खर्चासह नामंजुर करावी अशी मागणी जाबदेणार करतात. जाबदेणार यांनी त्यांचे प्रतिनिधी श्रीमती अंजली अद्वैत दंडवते यांचे शपथपत्र दाखल केले तसेच सर्व्हेअर श्री. कमल किशोर बियाणी यांचे शपथपत्र दाखल केले.
5. दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. तक्रारदारांनी जाबदेणारांकडून ऑल रिस्क पॉलिसी, डॉक्टर्स प्रोटेक्शन शिल्ड पॉलिसी त्यानंतर स्पेशल कॉन्टीन्जन्सी पॉलिसी घेतली होती. पॉलिसी कालावधी सतत चालू होता. तक्रारदारांचे मशिन पोर्टेबल असल्यामुळे डॉक्टर्स प्रोटेक्शन शिल्ड पॉलिसी ऐवजी तक्रारदारांना स्पेशल कॉन्टीन्जन्सी पॉलिसी घ्यावी लागली. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार विमा कालावधीत अपघातामुळे मशिन नादुरुस्त झाले तरीही जाबदेणार यांनी क्लेमची रक्कम दिली नाही. परंतु जाबदेणार यांच्या म्हणण्यानुसार डॉक्टर्स प्रोटेक्शन शिल्ड पॉलिसी फक्त फिक्स मशिनसाठी देण्यात येते. तक्रारदारांचे मशिन पोर्टेबल असतांना देखील चुकून पॉलिसी इश्यु झाल्यामुळे तक्रारदारांनी एकदा तांत्रिक समस्या – स्क्रिन व हिंग्ज संदर्भात निर्माण झाल्यामुळे केलेला क्लेम रुपये 1,44,072/- दिनांक 26/4/2006 रोजीच्या चेकद्वारे देऊन सेटल करण्यात आलेला होता. तक्रारदारांनी ही रक्कम स्विकारलेली होती. त्यानंतर तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार अपघातामुळे मशिन नादुरुस्त झाली त्याचा क्लेम जाबदेणार यांनी दिला नाही. यावर जाबदेणार यांनी सर्व्हेअर श्री. कमल किशोर बियाणी यांची सर्व्हेअर म्हणून नियुक्ती केली व त्यांच्या अहवालानुसार मशिन अपघातामुळे नादुरुस्त झालेले नसून व्यवस्थित हाताळणी नसल्यामुळे [rough use, wear and tear] नादुरुस्त झालेले आहे. जाबदेणार यांनी सर्व्हेअर श्री. कमल किशोर बियाणी यांचा अहवाल व त्यांचे शपथपत्र मंचासमोर दाखल केलेले आहे. तक्रारदारांनी मशिन अपघातामुळे नादुरुस्त झाले होते यासंदर्भात कुठलाही कागदोपत्री पुरावा दाखल केलेला नाही. सर्व्हेअरच्या अहवालानुसारच जाबदेणार यांनी तक्रारदारांचा क्लेम सेटल केला नाही, यामध्ये जाबदेणार यांच्या सेवेतील त्रुटी मंचास आढळून येत नाही. म्हणून मंच तक्रारदारांची तक्रार अमान्य करीत आहे.
वरील विवेचनावरुन व दाखल कागदपत्रांवरुन खालीलप्रमाणे आदेश देण्यात येत आहे-
:- आदेश :-
[1] तक्रार नामंजुर करण्यात येत आहे.
[2] खर्चाबद्यल आदेश नाही.
आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.