जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच बीड यांचे
तक्रार क्रमांक –173/2010 तक्रार दाखल तारीख –03/12/2010
सुभाष पि.मारुती क्षीरसागर
वय 45 वर्षे धंदा व्यवसाय .तक्रारदार
रा.रायमोहा, ता.शिरुर (का.) जि.बीड
ह.मु.विद्यानगर (पु.) बार्शी रोड,बीड ता. जि.बीड
विरुध्द
दि न्यु इंडिया अँश्युरन्स कंपनी लि.
मार्फत शाखाधिकारी .सामनेवाला
अण्णाभाऊ साठे चौक, जालना रोड,
बीड ता.जि.बीड
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
अजय भोसरेकर, सदस्य.
तक्रारदारातर्फे :- अँड.एन.पी.मोरे
सामनेवालातर्फे :- अँड.एस.एल.वाघमारे
निकालपत्र
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदारांनी स्वतःचे वैयक्तीक वापरासाठी सन 2008 चे ऑगस्ट महिन्यात अँल्टो एल.एक्स.आय. ही गाडी खरेदी केली. तिचा नोंदणी क्रमांक एम.एच.-23-ई-6594 आहे. सदर वाहनाचा विमापत्र नंबर450081187 ने घेतला आहे. सदर गाडीवर जनार्धन विष्णुपंत क्षिरसागर चालक म्हणून नौकरीस आहे. दि.8.6.2009 रोजी तक्रारदाराचे मुलाचे लग्न धुळे येथे होते. त्यासाठी तक्रारदाराच्या मालकीची मारुती आल्टो वरील नबरची कार बीडहून धुळे येथे घेऊन गेला होता. दि.9.6.2009 रोजी धुळे येथून परत येत असताना 9.30 चे सुमारास सदर वाहन जप्ती पारगावचे शिवारात आले असता, मयत जनार्धन क्षिरसागर व्यवस्थित काळजीने गाडी चालवत असताना समोरुन आलेल्या वाहनाच्या चुकीने दूर्देवाने गाडी पुलावर पलटी झाली व पुलाखाली पडली. त्यात जर्नाधन यांस गंभीर दुखापत झाली. त्यांला तात्काळ बीड येथील सरकारी दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी त्यांस मयत घोषित केले.
अपघातानंतर गाडी तक्रारदारानी स्वतः दूसरे वाहनाने आणली. सामनेवाला यांनी अपघाताची व अपघातात गाडीचे झालेल्या नूकसानीची माहीती दिली. सामनेवाला यांचे सर्व्हेअर गाडीचा सर्व्हे केला. सदर अपघातग्रस्त गाडी महाराष्ट्र अँटो अँन्ड बॉडी वर्क्स औरंगाबाद कडे दूरुस्त केली.
गाडी पुलावरुन खाली पडल्याने पूर्ण गाडी खराब झाली होती. ती दूरुस्त करणे देखील अवघड होते. त्यामुळे सामनेवाला कडे संपूर्ण नूकसान झाले असल्याने विमा रक्कमेची मागणी केली. सामनेवाला यांनी मागणी फेटाळली. गाडीला दूरुस्त करुन पेपर पाठवा असे सांगितले.
वरीलप्रमाणे औरंगाबाद येथून गाडी दूरुस्त केल्यानंतर दूरुस्तीसाठी आवश्यक पार्टसची किंमत रु.1,89,365/- झाली, त्यासाठी रक्कम रु.71300/- मजूरी झाली. एकूण रु.2,60,665/- खर्च झाला. वाहन औरंगाबाद येथे आणण्यासाठी रक्कम रु.3,000/- खर्च आला. तक्रारदारांनी रोख खर्च करुन गाडी दूरुस्त केली व सामनेवालाकडे वाहन दावा दाखल केला. त्यांचा नंबर 312600/31/10/96002047.
दावा दाखल केल्यानंतर सामनेवाला यांनी तक्रारदाराकडे मागणी केल्यानुसार आवश्यक ते सर्व कागदपत्राची पूर्तता केली. परंतु सामनेवाला यांनी तक्रारदाराचा दावा लवकर निकाली न काढता सूमारे 18 महिने रक्कम देण्यास टाळाटाळ केली.
दि.24.09.2010 रोजी तक्रारदार सामनेवाला यांचे कार्यालयात गेले. दाव्या बाबत माहीती विचारली.सामनेवाला यांनी वाहनाची पासिंग 4 + 1 अशी असल्याची अपघाताचे वेळी सदरी वाहनात 6 + 1 = 7 म्हणजेच दोन व्यक्ती जास्त असल्याने दावा देता येणार नाही. त्यामुळे सामनेवाला यांनी त्यांच दिवशी तक्रारदाराचा दावा नो क्लेम या सदराखाली बंद केला.
अपघाताचे वेळी अपघातग्रस्त वाहनात एकूण ड्रायव्हरसह 7 प्रवाशी होते. पैकी तिन मूले होते. सदरचा अपघात प्रवाशाचे चूकीमूळे न होता समोरुन आलेल्या वाहनाचे चूकीमूळे झालेला आहे. सामनेवाला यांनी सेवा देण्यास कसूर केलेला आहे. त्यामुळे खालील प्रमाणे नूकसान भरपाई मिळण्यास तक्रारदार पात्र आहेत.
अ) स्पेअर पार्टसची किंमत रु.1,89,365/-
ब) मजूरी रु.71,300/-
क) वाहतूक खर्च रु.3,000/-
ड) मानसिक त्रासापोटी रु.5,000/-
इ) तक्रार खर्च रु.2,000/-
एकूण रु.2,70,665/-
विनंती की, वर नमूद केल्याप्रमाणे नूकसान भरपाई द.सा.द.शे. 12 टक्के व्याजासह सामनेवाला यांनी तक्रारदारांना देण्याबाबत आदेश व्हावेत.
सामनेवाला यांनी त्यांचा खुलासा नि.10 वर दि.10.03.2011 रोजी दाखल केला. खुलाशात तक्रारीतील सर्व आक्षेप सामनेवाला यांनी नाकारलेले आहेत. पोलिस पेपर तक्रारदारांनी दाखल केलेले आहेत. त्यात तक्रारदारांनी उघड केले आहे की,अपघाताचे वेळी वाहनातूर सात व्यक्ती प्रवास करीत होत्या. सदर अपघातात ड्रायव्हर मयत झालेला आहे.सदरचा अपघात हा जास्त भार झाल्यामुळै अपघात झाला आहे व सदरची बाब ही विमा पत्रातील शर्ती व अटीचा भंग करणारी आहे. त्यामुळे तक्रारदार कोणतीही नूकसान भरपाई मिळण्यास पात्र नाहीत. तक्रारदाराकडून आक्षेपित अपघाताची सूचना कंपनीला मिळाल्यानंतर सर्व्हेअर यांची नेमणूक करण्यात आली. त्यांनी सदर वाहनाची पाहणी केली व त्यांचा अहवाल दाखल केला. त्या नूकसानीची आकारणी रु. 88,474/- आणि त्यातून 15 टक्के घसारा वजा जाता उर्वरित रक्कमेची आकारणी तक्रारदारांनी रक्कम रु.2,70,665/- ची वाहनाचे किंमतीपेक्षा जास्त रक्कमेची मागणी केलेली असल्याने तक्रार सदर नूकसान भरपाई मिळण्यास पात्र नाही. कंपनीने सर्व्हेअर इन्व्हीस्टेगेटर मार्फत चौकशी केली आणि उपलब्ध कागदपत्रावरुन तक्रारदारांचा दावा योग्य रितीने नाकारलेला आहे. त्यामुळे तक्रारदारांना दयावयाचे सेवेत कसूर केलेला नाही. तक्रारदारांनी स्वतःहून विमा पत्र दिले. शर्ती व अटीचा भंग केलेला असलयाने तक्रारदारांना नूकसान भरपाई मिळू शकत नाही. विनंती की, तक्रार खर्चासह रदद करण्यात यावी.
तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, तक्रारदाराचे शपथपत्र, सामनेवाला यांचा खुलासा,शपथपत्र, दाखल कागदपत्र यांचे सखोल वाचन केले.
तक्रारदाराचे विद्वान वकील श्री.भोसले व सामनेवाला यांचे विद्वान वकील श्री.वाघमारे यांचा यूक्तीवाद ऐकला.
तक्रारीतील सर्व कागदपत्रे पाहता तक्रारदारांनी सामनेवालाकडून त्यांचा अँल्टो वाहनाचा तक्रारीत नमूद केलेल्या विमापत्रानुसार विमा घेतलेला आहे, हीबाब सामनेवाला यांना मान्य आहे.
दि.09.06.2009 रोजी सदर वाहनाचा अपघात झालेला आहे व अपघातात वाहनाचे नूकसान झालेले आहे. या संदर्भात तक्रारदारांनी विमा कंपनीला वेळीच कळवलेले आहे व विमा कंपनीने सर्व्हेअर नेमून अपघातग्रस्त वाहनाची पाणी केलेली आहे व त्यांचा अहवाल विमा कंपनीकडे आलेला आहे. त्यानंतर विमा कंपनीकडे तक्रारदाराने नूकसान भरपाईसाठी दावा केलेला आहे व त्यासोबत आवश्यक ती कागदपत्र दाखल केली. त्यातील पोलिस रेकॉर्ड वरुन वाहनात अपघाताचे वेळी सात व्यक्ती प्रवास करीत असल्याचे कारणावरुन सामनेवाला यांनी तक्रारदाराचा दावा नाकारलेला आहे.
या संदर्भात विमा कंपनीने दावा नाकारल्याचे पत्राचे अवलोकन केले असता त्यात त्यांनी सात व्यक्तीची नांवे आणि त्यांचे वय दिलेले आहे. ती पाहता त्यापैकी अनूक्रमांक 2 आदित्य नंदकूमार, 7 वर्ष, अनूक्रमाक 4 अस्थी जनार्धन वय 10 वर्ष, अनूक्रमांक 6 संकेत जनार्धन वय 6 वर्ष, या व्यक्तीची वय विचारात घेता त्यात लहान व्यक्ती आहेत.
तक्रारदाराच्या वाहनाचे पाहणी दिनांका नोंदणी करते वेळी सदर वाहनाचा आसन क्षमता 4 + 1 = 5 अशी मंजूर करण्यात आलेली आहे. अपघाताचे वेळी सदर पत्रानुसार 7 व्यक्ती दिसत असल्या तरी नमूद केलेल्या व्यक्तीचे वय विचारात घेता दोन व्यक्ती जास्त असल्याचे कारणावरुन सदरचा अपघात झालेला असल्याचा निष्कर्ष विमा कंपनीने काढला आहे. तथापी या संदर्भात पोलिस पेपर व तक्रारदाराची तक्रार विचारात घेता समोरुन येणा-या वाहनाचे चूकीने तक्रारदाराची गाडी पूलावर पलटी झाली. वाहनातील व्यक्तीचे भारामुळे गाडी पलटी झाल्या बाबतपोलिस रेकार्ड नाही.तसेच दोन प्रवासी जास्त बसल्यामूळे (परवाना पेक्षा) तो मूलभूत विमा पत्रातील अटीचा भंग होत नाही. त्यामुळे सामनेवाला यांनी योग्य रितीने तक्रारदाराचा दावा नाकारला असे सामनेवाला यांनी विधान ग्राहय धरणे उचित होणार नाही. सामनेवाला यांनी तक्रारदाराचा दावा नाकारुन तक्रारदाराना दयावयाचे सेवेत कसूर केल्याची बाब स्पष्ट होते. सामनेवाला यांनी सर्व्हेअर यांचा अहवाल दाखल केलेला आहे. त्यांचे अवलोकन केले असता समरी या सदरात मूळ इस्टीमेट आणि असेसमेंट आकारणी
SUMMERY
Original Estimate Amount
Total Labour Charges Rs.109,571.00 Rs.36,425.00
Less Excess Rs.500.00
Rs.35.925.00
Plus total cost of parts Rs.514,764.87 Rs. 88,747.00
Total Depreciation Rs.17,359.00
Net Cost of parts Rs.71,388.00
Total estimate and assessment Rs.624,335.87 Rs.107,313.00
For insurers information only
Aprox value of spare parts at list price Rs.88,747.00
Depreciated value Rs.71,388.00
Salvage Rs.5,000.00
यांचे बारकाईने अवलोकन केले असता लेबर चार्जेस मध्ये रु.500/- एक्सेस म्हणून दाखविण्यात आलेले आहे. तसेच घसारा एकूण रु.17,359/- वजा करण्यात आलेला आहे. त्यानुसार इस्टीमेंट आणि असेसमेंट या सदरात एकूण रु.1,07,313/- नूकसान भरपाईची आकारणी करण्यात आलेली आहे परंतु त्यानंतर पून्हा स्पेअर पार्टस म्हणून रु.88,747/- आणि नेट कास्ट रु.71,388/- व साल्व्हेज रु.5,000/- दाखविण्यात आलेले आहे.
वर नमूद केल्यानुसार एकूण रु.1,07,313/- तक्रारदार मिळण्यास पात्र असताना सर्व्हेअर यांनी रु.35,925/- लेबर चार्जेस आकारणी केलेली का कमी केली या बाबतचा कोणताही उल्लेख नाही. त्यामुळे तक्रारदार यांनी रक्कम रु.71,388/- न मिळता सामनेवाला यांनी सर्व्हेअर यांनी आकारणी केल्यानुसार रु.1,07,313/- देणे उचित होईल असे न्यायमंचाचे मत आहे.
सेवेत कसूरीची बाब स्पष्ट झाल्याने तक्रारदारांना मानसिक त्रास रु.5,000/- व तक्रारीचा खर्च रु.2,000/- देणे उचित होईल असे न्यायमंचाचे मत आहे.
सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाला यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारांना रक्कम
रु.1,07,313/- (अक्षरी एक लाख सात हजार तिनशे तेरा फक्त)
आदेश मिळाल्यापासून एक महिन्याचे आंत अदा करावी.
3. सामनेवाला यांना आदेश देण्यात येतो की, मानसिक त्रासाची रक्कम
रु.5000/-(अक्षरी रु.पाच हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चाची रककम
रु.2000/-(अक्षरी रु.दोन हजार फक्त) आदेश प्राप्तीपासून
30 दिवसांचे आंत अदा करावी.
4. ग्राहक संरक्षण कायदा- 1986, अधिनियम 2005 मधील कलम-20
(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
(अजय भोसरेकर) (पी.बी.भट)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड