व्दारा सौ. अलका उ. पटेल, सदस्या तक्रारकर्ता श्रीमती ललिता चैतराम बोहरे यांनी दाखल केलेल्या ग्राहक तक्रारीचा आशय असा की, 1. तक्रारकर्ता यांनी नोव्हेंबर 2008 मध्ये वि.प.क्र. 2 यांच्या मार्फत दोन गायी विकत घेतले व त्या गायीचा वि.प.क्र. 1 व्दारा प्रत्येकी रुपये 25,000/- चा विमा काढण्यात आला व त्याचे विमा क्रमांक 160302/47/08/01/00000719, दिनांक 21/11/2008 ते 20/11/2009 या कालावधीसाठी होता व त्यांना बिल्ला क्रमांक 22801 व 22082 असे देण्यात आले. दिनांक 31/01/2009 ला बिल्ला क्रमांक 22801 असलेली गाय अकस्मीतपणे मरण पावल्यामुळे विमा कंपनीकडे विमा दावाच्या रक्कमेची मागणी करण्यात आली, परंतू वि.प.क्र. 1 व्दारा विमा दावा नाकारला. 2. तक्रारकर्ता मागणी करतात की, वि.प. यांच्या सेवेत त्रुटी आहे. वि.प.क्र. 1 यांनी मृत्यू पावलेल्या गाईच्या विमा रक्कम रुपये 25,000/- व्याजासह दयावी व शारीरिक व मानसिक त्रासासाठी रुपये 5000/- तर न्यायालयीन खर्च म्हणून रुपये 3000/- देण्यात यावे. 3. वि.प.क्र. 1 आपल्या लेखी जबाबात म्हणतात की, वि.प.क्र. 2 यांच्या 13/05/2009 पत्राव्दारे असे कळविले की, तक्रारकर्ता यांनी त्यांच्याकडे कर्जासाठी अर्ज केला होता परंतू वैयक्तीक कारणामुळे कर्ज न घेता प्रकरण रद्द केले. गाईच्या विम्याची योजना ही केवळ वि.प.क्र. 2 यांच्या मार्फत कर्जातून जर गाई विकत घेतल्या असतील तरच लागू होते. कारण वि.प.क्र. 2 यांनी दिलेले कर्ज हे संरक्षीत असावे म्हणून ही योजना होती. 4. वि.प.क्र. 1 म्हणतात की, तक्रारकर्ता यांनी मृतक गायीच्या शव विच्छेदन अहवाल सादर न केल्यामुळे गाईच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. या संदर्भात मागीतलेल्या कागदपत्रांची योग्य पुर्तता करण्यात आलेली नाही व दाव्या संबधी संभ्रम निर्माण होत असल्यामुळे दावा नाकारण्यात आला आहे. 5. वि.प.क्र. 2 म्हणतात तक्रारकर्ता यांचे कर्ज प्रकरण रद्द केल्यामुळे दिनांक 01/08/2009 रोजी विमा कंपनीला पत्र देण्यात आले आहे व पुढील व्यवहार तकारकर्ता यांच्याशी करण्यात यावे असे म्हणण्यात आले कारण विम्याची मुळ प्रत पण त.क. ला परत करण्यात आले आहे. कारणे व निष्कर्ष 6. तक्रारकर्ता व वि.प. यांनी रेकॉर्डवर दाखल केलेल्या दस्ताऐवज, कागदपत्र व शपथपत्र व केलेला युक्तीवाद यावरुन असे निदर्शनास येते की, तक्रारकर्ता यांनी वि.प.क्र. 2 यांच्या तर्फे कर्ज घेवून दोन गाई घेतल्या होत्या व वि.प.क्र. 1 तर्फे सदर गाईचे विमा काढण्यात आला होता. दिनांक 31/01/2009 रोजी बिल्ला क्रमांक 22801 ही गाय आकस्मीतपणे मरण पावली. त.क. यांनी वि.प.क्र. 1 यांना विमादावासाठी मागणी केली. वि.प.क्र. 1 यांनी दिनांक 07/02/2011 च्या पत्राव्दारे विमादावा नाकारला आहे. 7. वि.प.क्र. 1 यांना वि.प.क्र. 2 यांनी कर्ज प्रकरण रद्द केल्याबाबत पत्र पाठविले होते पंरतू वि.प.क्र. 1 यांनी त.क.ला विमा योजनेचा लाभ मिळणार नाही असे कळविले नाही. गाईचा विमादावा अस्तीत्वात होता व त.क. यांनी मृत गाईचा बिल्ला क्रमांक 22801 वि.प.क्र. 1 कडे जमा केला आहे. सोबत सरपंच व पोलीस पाटील यांनी गाईच्या मृत्यूबद्दल दिलेले प्रमाणपत्र दाखल केले आहे. 8. त.क. यांनी दाखल केलेला न्यायनिवाडा II(2004)CPJ 290 मध्ये माननिय केरला राज्य ग्राहक वाद निवारण आयोग यांनी असे प्रतिपादन केले आहे की, अपरिहार्य कारणाने तक्रारकर्ता मृत गाईचे पोस्टमार्टम रिपोर्ट दाखल करु शकले नाही मात्र बिल्ला दिला आहे त्यावेळी इतर पुरावा ग्राहय धरुन वि.प. त.क.ला मृत्यू दाव्याची रक्कम देण्यास बाध्य आहे. तसेच तक्रारकर्ता यांनी I (2010) CPJ 299 हा केस लॉ सुध्दा रेकॉर्डवर दाखल केला आहे. 9. असे तथ्य व परिस्थितीत वि.प.क्र. 1 यांनी त.क. ला विमा दाव्याची रक्कम दयावी असे मंचाचे मत आहे. आदेश 1. वि.प.क्र. 1 यांनी त.क.ला विमा दाव्याची रक्कम रुपये 25,000/- विमादावा नाकारल्यापासून म्हणजेच दिनांक 07/02/2011 पासून रक्कम प्राप्त होईपर्यंत 9% व्याजासह दयावी. 2. वि.प.क्र. 1 यांनी त.क.ला शारिरीक व मानसिक त्रासासाठी रुपये 3000/- व न्यायालयीन खर्च म्हणून रुपये 1000/- दयावे. 3. आदेशाचे पालन विरुध्दपक्ष यांनी आदेश पारीत झाल्यापासून 30 दिवसांचे आत करावे.
| [HONORABLE Smt. Patel] Member[HONORABLE Smt. Potdukhe] PRESIDENT[HONORABLE Shri. Ajitkumar Jain] Member | |