1. अर्जदाराने ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 अंतर्गत गैरअर्जदाराविरूध्द प्रस्तूत तक्रार दाखल केली आहे. 2. अर्जदार ही रा.खेमजाई, तह.वरोरा, जि.चंद्रपूर येथील रहिवासी असून तीचे पती श्री.शंकर नामदेव लांडगे यांच्या मालकीची मौजा खेमजाई, तह.वरोरा, जि.चंद्रपूर येथे भुमापन क्र.34 ही शेतजमीन आहे. गैरअर्जदार क्र. 1 व 2 ही विमा कंपनी असून शासनाच्या वतीने गैरअर्जदार क्र.3 हे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत दावे स्विकारतात. अर्जदार हिच्या पतीचा गैरअर्जदार क्र.3 मार्फत गैरअर्जदार क्र.1 व 2 यांच्याकडे रू.1 लाखाचा विमा उतरविण्यांत आला होता. अर्जदार ही सदर विम्याची लाभधारक आहे. अर्जदाराचा पती दिनांक 13/6/2013 रोजी मित्रासोबत मोटरसायकलने मागे बसून जात असता एका ट्रकने धडक दिल्याने अर्जदाराचे पती जखमी होवून त्यांचा मृत्यू झाला. अर्जदाराच्या पतीचा अपघाती मृत्यु झाल्याने तिने गैरअर्जदार क्र.3 कडे दिनांक 3/3/2013 रोजी रितसर अर्ज केलाव दस्तावेजांची पुर्तता केली. परंतु गैरअर्जदाराने सदर दाव्याबाबत काहीही न कळविल्याने अर्जदाराने दिनांक 9/2/2018 रोजी गैरअर्जदार क्र.1 ते 3 हयांना नोटीस पाठविला परंतु त्यांनी उत्तरही दिले नाही व पुर्तताही केली नाही. अर्जदाराचा विमादावा गैरअर्जदारांनी प्रलंबीत ठेवून अर्जदाराची फसवणूक करून सेवेत त्रुटी केलेली आहे. सबब गैरअर्जदार क्र.1 ते 3 विरूध्द सदर तक्रार मंचात दाखल केलेली आहे. 3. अर्जदाराची मागणी अशी आहे की अर्जदाराचा अर्ज मंजूर करून तिला विमादाव्याची रक्कम रू.1लाख, अर्जदाराने गैरअर्जदाराकडे प्रस्ताव दाखल केल्यापासून द.सा.द.शे. 18 टक्के व्याजासह देण्यात यावे तसेच शारीरिक मानसिक त्रासापोटी रुपये 30,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रू.15,000/- गैरअर्जदारांकडून मिळण्याचे आदेश व्हावेत. 4. अर्जदार यांची तक्रार दाखल करून गैरअर्जदार क्र.1,2 व 3 हयांना नोटीस पाठविण्यात आले. 5. गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांनी प्रकरणात उपस्थीत राहून आपले लेखी उत्तर दाखल करून त्यामध्ये अर्जदार चे म्हणणे खोडून काढीत विशेष कथनात नमूद केले की, अर्जदाराचे पतीचा मृत्यु दिनांक 13/8/2013 रोजी झाला असून प्रस्तूत तक्रार दिनांक 5/3/2018 रोजी म्हणजेच ग्राहक संरक्षण कायद्यानुसार अनुज्ञेय 2 वर्षांच्या मुदतीनंतर दाखल करण्यांत आली आहे. सदर तक्रार मुदतबाहय असल्यामुळे व व अर्जदाराने विलंबमाफीचा वा परवानगीचा कुठलाच अर्ज दाखल न केल्यामुळे सदर अर्ज खारीज होण्यांस पात्र आहे. अर्जदाराने तिचा विमादाव्याचा प्रस्ताव गैरअर्जदार क्र.3 कडे केंव्हा दाखल केला ती तारीख किंवा पोचबद्दल कुठलाही उल्लेख तक्रारीत नाही. सबब अर्जदाराचे तक्रार दाखल करण्याचे कारण केंव्हापासून सुरू झाले हयाचा खुलासा होत नाही तसेच गैरअर्जदारक्र.3 हयांनी अर्जदाराचा विमादावा दाखल केला असल्यास तो दावा कोणत्या विमा सल्लागार कंपनीकडे दिला याचा खुलासा कुठेही नाही. सबब तथाकथीत विमा सल्लागार कंपनी यांनी संपूर्ण दस्तावेजांची पुर्तता करून काही दस्ताऐवज कमी असल्यास गैरअर्जदार क्र.3 कडून त्याची पुर्तता केली किंवा नाही याचा खुलासा होत नाही व तशी पुर्तता करून गैरअर्जदार क्र.1 व 2 कडे दावा केंव्हा प्राप्त झाला याचासुध्दा उल्लेख नाही. सबब यावरून हे सिध्द होत आहे की गैरअर्जदार क्र.1 व 2 यांच्याकडे विमादावा कधीच सादर झाला नाही. सबब गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचेवर कोणतीही जबाबदारी येत नाही. तसेच अर्जदार हिने दिनांक 29/9/2013 रोजी MACT प्राधिकरण, वरोरा येथे पतीच्या अपघाती मृत्युबद्दल नुकसान भरपाई मिळण्याकरीता मोटार अपघात अर्ज क्र.38/3 दाखल केलेला आहे व सदर अर्ज दिनांक 1 जूलै,2017 रोजी निकाली लागून त्यात अर्जदाराला अंदाजे सात ते साडेसात लाख रूपये प्राप्त झाले आहेत. वास्तवीक अर्जदाराला तेंव्हापासून कायदेशीर सल्ला मिळाला होता परंतु अर्जदाराने शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई मिळण्यासाठी कुठलीही कार्यवाही केली नाही. सबब ही मागणी मुदतबाहय झालेली आहे. सबब सदर तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी अशी त्यांनी विनंती केली आहे. 6. गैरअर्जदार क्र.3 हयांनी त्यांचे उत्तर दाखल करून नमूद केले की अर्जदाराने सादर केलेल्या प्रस्तावाची छाननी करून जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी चंद्रपूर यांना प्रस्ताव सादर केला व पुन्हा त्रुटीपुर्ततेचे कागदपत्र पत्र क्र.1666 दिनांक 19/10/2013 ला अधीक्षक कृषी अधिकारी चंद्रपूर यांचे कार्यालयात सादर करण्यांत आले व अधीक्षक कृषी अधिकारी चंद्रपूर यांनी सदर प्रस्ताव विमा कंपनीस सादर केला. 7. अर्जदाराची तक्रार, दस्तावेज, पुरावा शपथपत्र, लेखी युक्तीवाद व गैरअर्जदार क्र. 2 यांचे लेखी म्हणणे, पुरावा शपथपत्र लेखी युक्तीवाद तसेच अर्जदार व गैरअर्जदार यांचे तोंडी युक्तिवादावरून तक्रार निकाली कामी खालील मुद्दे कायम करण्यात येत आहे. मुद्दे निष्कर्ष (1) अर्जदार गैरअर्जदार क्रं. 1 व 2 यांचा ग्राहक आहे काय ? होय. (2) अर्जदार गैरअर्जदार क्रं. 3 यांचा ग्राहक आहे काय ? नाही. (3) गैरअर्जदार क्रं. 1 व 2 यांनी अर्जदारांस न्युनतापूर्ण सेवा दिली आहे काय ? नाही. (4) आदेश काय ? अंतीम आदेशाप्रमाणे. कारण मिमांसा मुद्दा क्रं. 1 बाबत :- 8. अर्जदार हिने निशाणी क्रमांक 4 वर दाखल केलेला 7/12 उतारा, फेरफारपत्रक व शेतीचे दस्ताऐवज यांचे अवलोकन केले असता असे निदर्शनांस येते की अर्जदाराचे पती श्री.शंकर नामदेव लांडगे यांच्या मालकीची मौजा खेमजाई, तह.वरोरा, जि.चंद्रपूर येथे भुमापन क्र.34 ही शेतजमीन आहे. यावरून मयत विमाधारक श्री.शंकर नामदेव लांडगे हे शेतकरी होते व शेतीतील उत्पन्नावर ते कुटूंबाचे पालन पोषण करीत होते हे सिध्द होते. अर्जदाराचे पतीचा शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत 2014-15 या कालावधीकरता रू.1,00,000/- चा शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा काढण्यात आला होता ही बाब स्पष्ट दिसून येत आहे. अर्जदार ही मयत विमाधारक शेतक-याची पत्नी असून सदर विम्याची लाभधारक आहे. सबब अर्जदार ही गैरअर्जदारक्र.1 व 2 ची ग्राहक आहे हे सिध्द होते. सबब मुद्दा क्रं. 1 चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येते. मुद्दा क्रं. 2 बाबत :- 9. गैरअर्जदार क्रं. 3 यांनी महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत शेतक-यांचा गैरअर्जदार क्र.1 व 2 कडे विमा काढला व सदर विमा काढण्याकरीता गैरअर्जदार क्र. 3 ने विना मोबदला मदत केली असल्याने अर्जदार हा गैरअर्जदार क्र. 3 यांचा ग्राहक नाही. सबब मुद्दा क्रं. 2 चे उत्तर हे नकारार्थी नोंदविण्यात येत आहे. मुद्दा क्रमांक 3 बाबत..
10. अर्जदाराने तक्रारीत दाखल केलेले दस्तावेज व गैरअर्जदार क्र.1,2 व 3 हयांनी दाखल केलेले उत्तर हयांचे अवलोकन करून मंच या निष्कर्षाप्रत पोहचले आहे की, जरी अर्जदाराचे म्हणण्यानुसार अर्जदार बाईने गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचेकडे गैरअर्जदार क्र.3 च्या मार्फत तिच्या पतीचा विमादावा पाठविला ही बाब गैरअर्जदार क्र.3 च्या उत्तरावरून स्पष्ट झाली असली तरी गैरअर्जदार क्र.1 व 2 हयांनी अर्जदाराच्या दाव्याबद्दल कुठलाही निर्णय कोणत्या कारणावरून प्रलंबीत ठेवला तसेच सदर प्रस्ताव गैरअर्जदार क्र.1 व 2 यांना केंव्हा व कोणत्या विमा सल्लागार एजेन्सीमार्फत सादर करण्यांत आला हया बाबी तक्रारीतील विवरणावरून तसेच गैरअर्जदारां च्या उत्तरावरून स्पष्ट होत नाहीत. उभय पक्षांच्या तोंडी युक्तिवादावरून मंच या निर्णयाप्रत पोहचले आहे की सदर तक्रारीत गैरअर्जदार क्र.1 व 2 यांना विमाप्रस्ताव प्राप्त झाला काय हीच बाब अनिश्चित असल्यामुळे प्रस्तूत तक्रार ही प्रिमॅच्युअर ठरते. मात्र प्रस्तूत विवादाचे निराकरण होण्याकरीता मंच उभय पक्षांना खालीलप्रमाणे निर्देश देत आहे.
अंतीम आदेश (1) अर्जदार बाईने आदेशाच्या दिनांकापासून 30 दिवसांच्या आत शेतकरी विमा योजनेअंतर्गत तिचे पतीचा अपघात विमा दावा गैरअर्जदार क्र.1 व 2 हयांचेकडे नियमानुसार संपूर्ण दस्तावेजांसह सादर करावा व त्यानंतर गैरअर्जदार क्र.1 व 2 हयांनी सदर दावा, प्रस्ताव प्राप्त झाल्याचे दिनांकापासून 30 दिवसांच्या आत निकाली काढावा. (2) गैरअर्जदार क्र. 3 विरुध्द कोणताही आदेश नाही. (3) उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ पाठविण्यात यावी. |