::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, मा. सौ. किर्ती वैदय (गाडगीळ) मा.सदस्या) (पारीत दिनांक :- 19/09/2018)
1. अर्जदार हयाने ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 चे कलम 12 तील तरतुदीनुसार प्रस्तूत तक्रार दाखल केली असून तक्रारीतील मजकूर असा आहे की, अर्जदाराचे नांवे मौजा दपेटके, ता.नागभिड, जि. चंद्रपूर येथे भुमापन क्र.93 ही शेतजमीन आहे व शेतीव्यवसाय करून अर्जदार त्याच्या कुटूंबाचे पालन पोषण करतो. शासनाने अपघातग्रस्त शेतक-यांचे कुटूंबीयांस लाभ देण्याकरीता काढलेल्या शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत अर्जदाराचे पतीचा रू.1,00,000/- चा विमा उतरविला होता.
2. अर्जदार पुढे नमूद करतो की तो दिनांक 25/5/2012 रोजी सायकलने जात असतांना एका वाहनाने धडक दिल्यामुळे अपघात होवून त्यात झालेल्या जखमांमुळे डॉक्टरांना त्याचा एक हात कापावा लागला. हात कापला गेल्यामुळे आता अर्जदाराला कायमचे अपंगत्व आले असून त्याला शेतीचा व्यवसाय करता येत नाही. सबब अर्जदाराने विरूध्द पक्ष क्रं. 2 मार्फत गैरअर्जदारक्र.1 विमा कंपनीकडे विम्याची रक्कम मिळण्याकरीता अर्ज केला. तसेच गैरअर्जदार यांनी मागणी केलेल्या दस्तावेजांची पुर्तता केली. परंतु अर्जदाराने रीतसर अर्ज व आवश्यक दस्तावेज दिल्यानंतरही गैरअर्जदार क्रं. 1 यांनी अर्जदाराचा विमादावा भुगतान न करता प्रलंबीत ठेवला व च्या दाव्याबाबत काहीही कळविले नाही. गैरअर्जदार क्रं. 1 व 2 यांनी सदर विमा दाव्याबाबत निर्णय न घेवून अर्जदाराला न्युनतापूर्ण सेवा दिली आहे. सबब अर्जदाराने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल केली आहे.
3. अर्जदाराने तक्रारीत अशी मागणी केली आहे कि, गैरअर्जदारांनी विमा दाव्याची रक्कम रु. 1,00,000/- व त्यावर प्रस्ताव दाखल केल्यापासून 18 टक्के द.सा.द.शे. व्याजासह देण्याचे आदेश व्हावे, तसेच शारिरीक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई रु. 20,000/- व तक्रारीचा खर्च रु. 10,000/- विरूध्द पक्षांकडून मिळण्याचा आदेश व्हावा.
4. अर्जदाराची तक्रार स्विकृत करुन गैरअर्जदार क्रं 1 व 2 यांना नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदार क्रं. 1 यांनी हजर होवून त्यांनी आपले लेखीउत्तर दाखल केले. गैरअर्जदार क्र. 1 यांनी विमा पॉलीसी मान्य केली परंतु अर्जदाराचे तक्रारीतील उर्वरीत कथन नाकबूल करून पुढे नमूद केले की अर्जदाराने गैरअर्जदार क्र.1 कडे सदर दाव्याबाबत कोणतीही आवश्यक कागदपत्रे दाखल केली नाहीत. अर्जदाराने शेती असल्याबाबत वर्ष 2001-02 चा 7/12 दाखल केला परंतु त्याच्या नांवे अपघाताच्या वर्षात 2012 मध्ये शेती होती हे दर्शविण्यासाठी त्या वर्षाचा 7/12 वा अन्य कोणताही कागदोपत्री पुरावा दाखल केला नाही. अर्जदाराचा अपघात हा पडल्यामुळे झाला. परंतु शेतकरी विमा योजनेअंतर्गत विमादाव्याबाबत अर्जदाराने कोणताही रीतसर अर्ज दाखल केला नाही.त्यामुळे अर्जदाराची तक्रार खारीज करण्यांत यावी.
5. गैरअर्जदार क्रं. 2 हयांनी त्यांचे लेखी उत्तर दाखल करून् कथन केले की अर्जदाराने दिनांक18/1/2013 रोजी सादर केलेल्या प्रस्तावाची तपासणी करून दिनांक 18/1/2013 ला जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, चंद्रपूर हयांना सादर केला व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, चंद्रपूर हयांनी सदर प्रस्ताव विमा कंपनीला सादर केला. सदर प्रस्तावाची छाननी विमा कंपनी करते व विमा मंजूर वा नामंजूर करण्याचा अधिकार विमा कंपनीस आहे. त्यामुळे या प्रकरणात त्यांचा दोष नसून त्यांचेविरूध्द तक्रार खारीज करावी अशी त्यांनी विनंती केली आहे.
6. अर्जदाराची तक्रार, दस्तावेज, शपथपञ, लेखी युक्तीवाद, तसेच गैरअर्जदार क्रं 1 व 2 यांचे लेखीउत्तर, शपथपत्र व लेखी युक्तिवाद, अर्जदार व गैरअर्जदार यांचे परस्पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील निष्कर्ष आणि त्याबाबतची कारण मिमांसा पुढील प्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
(1) तक्रारकर्ती गैरअर्जदार क्रं. 1 यांची ग्राहक आहे काय ? होय.
(2) तक्रारकर्ती गैरअर्जदार क्रं.2 यांची ग्राहक आहे काय ? नाही.
(3) गैरअर्जदार क्रं. 1 यांनी तक्रारकर्तीस न्युनतापूर्ण
सेवा दिली आहे काय ? होय.
(4) आदेश काय ? अंतीम आदेशाप्रमाणे.
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. 1 व 3 बाबत :-
8. अर्जदार हिने दाखल केलेल्या दस्त क्र9 वरील कागदपत्राच्या यादीमध्ये फेरफार नोंदवही नक्कल दाखल केलेली असून त्याचे अवलोकन केले असता असे निदर्शनांस येते की अर्जदार हा दपेटके, ता.नागभिड, जि. चंद्रपूर येथे भुमापन क्र.13 ही शेतजमीनीचा मालक असून सदर जमीन त्याच्या नांवावर आहे. सबब अर्जदार हा गैरअर्जदार क्र.1 चा सदर विमा योजनेनुसार ग्राहक असून गैरअर्जदाराचे लेखी उत्तरातील म्हणणे की अर्जदाराने तक्रारीत शेती मालक असल्याबाबत पुरावा दाखल केला नाही, हे म्हणणे ग्राहय धरण्यासारखे नाही. तसेच अर्जदाराने दाखल केलेल्या दस्तावेजाचे अवलोकन केले असता असे दिसून येते की दिनांक 25/5/2012 रोजी सायकलने जात असतांना एका वाहनाने धडक दिल्यामुळे अपघात होवून त्यात झालेल्या जखमांमुळे डॉक्टरांना त्याचा एक हात कापावा लागला.
गैरअर्जदार क्रं. 2 हयांनी त्यांचे लेखी उत्तरात असे कथन केले की अर्जदाराने दिनांक18/1/2013 रोजी सादर केलेल्या प्रस्तावाची तपासणी करून दिनांक 18/1/2013 ला जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, चंद्रपूर हयांना सादर केला व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, चंद्रपूर हयांनी सदर प्रस्ताव विमा कंपनीला सादर केला. सबब गैरअर्जदाराचे म्हणणेग्राहय धरता येत नाही की अर्जदाराने कोणताही विमा प्रस्ताव विमा कंपनीकडे दिला नाही. सबब मंच या निष्कर्षाप्रत आले आहे की, अर्जदाराचा सायकलने जात असतांना गाडीने धक्का दिल्यामुळे पडल्याने हाताला मार लागला व त्यामुळे अर्जदाराचा एक हात कापावा लागला, ही बाब अर्जदाराने दाखल केलेल्या दस्त क्र.14 व दिनांक 23/8/2018 रोजी दाखल दस्तऐवजांवरून सिध्द होत आहे व शासनाच्या परिपत्रकानुसार शासन निर्णय, कृषी व पद्म विभाग क्र.1, पीआयएस-1207/प्र.क्र.24/11-ए/दिनांक 24 ऑगस्ट,2007 चे सहपत्र प्रपत्र ‘अ’ शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेनुसार विमा योजनेअंतर्गत मिळणारे लाभात (ड) नुसार अपघातामुळे 1 अवयव निकामी होणे याकरीता रू.50,000/- नुकसान भरपाई असे नमूद असल्यामुळे अर्जदार हा सदर योजनेअंतर्गत लाभार्थी होतो. यासंदर्भात तक्रारकर्त्याने रू.1 लाख विमा रकमेची मागणी केलेली असली तरीदेखील सदर विमा योजनेनुसार केवळ अपघाती मृत्यु ओढवल्यास रू.1 लाख विमा रक्कम देय होते. अर्जदाराला अपघातात एक हात कायमस्वरूपी गमवावा लागला असून सदर अपंगत्वास्तव शेतकरी जनता अपघात विमा योजनेअंतर्गत मिळणारी लाभाची रक्कम रू.50,000/- मिळण्यांस तक्रारकर्ता हक्कदार आहे या निष्कर्षाप्रत मंच आलेले आहे.
. मुद्दा क्रं. 2 बाबत :-
गैरअर्जदार क्रं. 2 यांनी महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत शेतक-यांचा गैरअर्जदार क्र.1 कडे विमा काढला व सदर विमा काढण्याकरीता गैरअर्जदार क्र. 2 ने विना मोबदला मदत केली असल्याने अर्जदार ही गैरअर्जदार क्र. 2 यांची ग्राहक नाही. शिवाय विरूध्द पक्ष क्र.2 हे शासकीय कार्यालय असून त्यांनी शासनाने नेमून दिलेले कर्तव्य व्यवस्थीतरीत्या पार पाडले असल्यामुळे व त्यांचेकडून कोणताही सेवेत त्रुटीपूर्ण व्यवहार झाल्याचे दिसून येत नसल्यामुळे गै.अ.क्र.3 विरूध्द कोणताही आदेश नाही. सबब मुद्दा क्रं. 2 चे उत्तर हे नकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 3 बाबत :-
11. मुद्दा क्रं. 1 ते 3 च्या विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
अंतीम आदेश
(1) अर्जदाराची तक्रार क्र.17/2018 अंशतः मंजूर करण्यात येते.
(2) गैरअर्जदार क्र.1 यांनी अर्जदारांस शेतकरी विमा योजनेअंतर्गत अपंगत्वाकरीता विमा रक्कम रू.50,000/- अर्जदारांस द.सा.द.शे. 9 टक्के व्याजासह तक्रार दाखल तारखेपासून रक्कम अदा करेपर्यंत द्यावी.
(3) गैरअर्जदार क्र.1 यांनी अर्जदारांस शारिरीक व मानसीक त्रासाकरीता नुकसान-भरपाई रू.5,000/- व तक्रारखर्चापोटी रू.5,000/- द्यावे.
(4) उभय पक्षांना आदेशाची प्रत विनामुल्य पाठविण्यात यावी.
चंद्रपूर
दिनांक – 19/09/2018
(श्रीमती.कल्पना जांगडे(कुटे)) (श्रीमती. किर्ती वैदय (गाडगीळ)) (श्री. श्री.अतुल डी. आळशी)
सदस्या सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, चंद्रपूर.