नि.36 मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर तक्रार क्र. 39/2011 नोंदणी तारीख – 03/03/2011 निकाल तारीख – 07/07/2011 निकाल कालावधी – 126 दिवस श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्यक्ष श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या श्री सुनिल कापसे, सदस्य (श्री सुनिल कापसे, सदस्य यांनी न्यायनिर्णय पारीत केला) ------------------------------------------------------------------------------------ श्री. रविंद्र शशिकांत पाटील , रा. होली फॅमिली स्कूल, विद्यानगर, कराड, ता. कराड, जि. सातारा ----- अर्जदार ( वकील श्री. कुलकर्णी ) विरुध्द दि न्यू इंडिया इन्शुरन्स कं.लि. तर्फे शाखाधिकारी, पोवई नाका, सातारा, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर,सातारा ----- जाबदार (वकील श्री कालीदास माने) न्यायनिर्णय अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 नुसार केलेला आहे. अर्जदार यांचे अर्जातील कथन थोडक्यात खालीलप्रमाणे- 1. अर्जदार हा ता. कराड येथील कायमचे रहिवासी आहे. अर्जदार यांनी स्वतःचे वापरासाठी “ टोयाटो ” कंपनीची “ इनोव्हा ” कार खरेदी केली होती. तिचा आर.टि.ओ. रजिस्टर नं. एम.एच.13/एन.92असा आहे. सदरचे वाहन हे सन 2005 साली तयार झालेले आहे. या वाहनाची रक्कम रु. 6,56,700/- एवढया रकमेकरीता दि. 03/07/2008 ते दि.02/07/2009 या कालावधीकरीता जाबदार कंपनीच्या कराड शाखेकडे विमा उतरविला होता. सदर वाहनाचे पॉलीसीचा नं. 151702/31/08/01/00004505 असा होता. 2. अर्जदार यांनी सदर वाहनावर जनकल्याण ना.सह.पतसंस्था, कराड यांचे दि.25/5/2007 रोजी रु.5,50,000/- कर्ज काढलेले होते. 3. अर्जदार यांचे मालकीचे वाहन नं.एम.एच. 13/एन. 9269 हे मैत्रीच्या नात्यातून अर्जदार यांचे मित्र प्रशांत गणपती जाधव यांनी अर्जदार यांचे परवानगीने वापरण्यासाठी घेतलेले होते. श्री. प्रशांत जाधव यांचेकडे वाहन असताना दि. 9/9/2008 रोजी सदरचे वाहन वडगांव बुपर गावच्या हद्दीतून चोरीला गेले. सदरचे वाहन चोरीला गेलेनंतर श्री. जाधव यांनी हवेली पोलीस स्टेशन यांचेकडे फिर्याद दाखल केली. तसेच दि.9/9/2008 रोजी गुन्हा रजिस्टर अन्वये कलम 379 नुसार गुन्हा दाखल केला आहे 4. अर्जदार यांनी त्यांचे मालकीच्या वाहनाचा विमा जाबदार कंपनीकडे उतरविला असल्याने सर्व कागदपत्रांची पूर्तता करुन नुकसानभरपाईसाठी अर्ज केला. मात्र सदरचा क्लेम जाबदार कंपनीने दि.25/08/2009 च्या पत्राने वाहनाचा अन्वेषणामार्फत स्वतंत्ररित्या तपास केला असता सदरचे वाहन हे दि.3/6/2008 रोजीचे वाहन खरेदीपत्राने श्री प्रशांत जाधव यांना विकलेले असून वाहनाचा ताबा हा वाहन खरेदीदार यांचेकडे होता. सदर कराराच्या तारखेपासून वाहनाची जबाबदारी ही खरेदीचा व्यवहार पूर्ण झाल्याने खरेदीदाराची जबाबदारी होती. त्यामुळे अर्जदाराने विमा उतरविलेल्या वाहनात स्वास्थ्य नव्हते त्यामुळे विमा कंपनीने अर्जदाराचा क्लेम दि. 25/08/2009 रोजी नामंजूर करणेत आला. सबब नुकसान भरपाईपोटी विमा दावा रक्कम रु.6,56,000/- व्याजासह मिळावेत तसेच मानसिक, शारिरिक त्रासापोटी व अर्जाचे खर्चापोटी एकूण रक्कम रु. 10,000/- मिळावेत म्हणून अर्जदार यांनी या मंचासमोर दाद मागितली आहे. 5. जाबदार यांनी नि.11 कडे म्हणणे देऊन तक्रार नाकारली आहे. जाबदार यांचे कथनानुसार अर्जदार यांनी त्यांचे वाहन क्र. एमएच 13/एन 9269 या वाहनाचा विमा जाबदार कंपनीकडे पॉलीसी क्र. 151702/31/08/01/00004505 या पॉलीसीअन्वये दि.03/07/2008 ते 02/07/2009 या कालावधीसाठी उतरविलेला होता. सदरचा विमा उतरवितेवेळी वाहनाची किंमत ही रु. 6,56,000/- इतकी निश्चित करण्यात आली होती. सदरचा विमा हा पॉलीसीच्या अटी, शर्ती व नियमाय अधिन राहून अर्जदार यांनी मान्य केल्यानंतरच सदरची पॉलीसी जाबदारांनी दिलेली आहे. 6. सदर वाहन चोरीस गेलेले जाबदारांना कळविलेनंतर जाबदार यांनी त्याबाबत वाहनाचे मालकीसंदर्भात इन्व्हेस्टिगेटरची नेमणूक करुन माहीती मिळविली असता असे आढळून आले की, अर्जदार यांनी सदरचे वाहन हे श्री. प्रशांत गणपती जाधव यांना दि. 3/6/2008 रोजी रु. 5,45,000/- इतक्या किंमतीस विकलेले असून याचदिवशी वाहन अर्जदार यांनी श्री. प्रशांत जाधव यांचे ताब्यात दिलेले आहे. सदरचे खरेदी व्यवहारापोटी अर्जदार व श्री. जाधव यांचेमध्ये करार झाला असून सदरचे करारामध्ये असे स्पष्ट नमूद आहे की, वाहन विक्रीचे तारखेपासून म्हणजे दि. 3/6/2008 पासून पुढील आर.टी.ओ.,इन्श्यूरन्स कोर्ट, पोलीस, रिपेइरिंग, अॅक्सीडेंट, इ. सर्व जबाबदारी ही श्री. प्रशांत जाधव यांची राहील . वाहन चोरीचेदिवशी म्हणजे दि.9/9/2008 रोजी सदरचे वाहन हे श्री. प्रशांत जाधव यांचे ताब्यात होते . सदरचे दिवशी अर्जदार हे वाहनाचे मालक नसून श्री. प्रशांत जाधव हे मालक होते. त्यामुळे जरी अर्जदार यांनी जाबदार यांचेकडे वाहनाचा विमा उतरविला असला तरी वाहन चोरीदिवशी अर्जदार हे संबंधित वाहनाचे मालक नसल्यामुळे त्यांचा इन्यूरेबल इंटरेस्ट राहीला नाही त्यामुळे अर्जदार यांना विमादावा दाखल करता येणार नाही व अर्जदार हे कोणतीही रक्कम जाबदारांकडून मिळणेस पात्र नाहीत. तसेच वाहनाच्या विमा दाव्याची रक्कम मिळण्यासाठी वाहनाची मालकी विमाधारकाकडे असणे नियमानुसार आवश्यक असल्याने संबंधित चोरीस गेलेल्या वाहनाच्या विमादाव्याची रक्कम मागणी जाबदारांनी फेटाळलेली आहे. तसेच सदरचे वाहन चोरीस गेलेनंतर श्री. प्रशांत जाधव यांनी पोलीसांकडे दि.9/9/08 रोजी म्हणजेच चोरीच्या दिवशी दिलेल्या फिर्यादी जबाबमध्ये केलेल्या कथनानुसार असे स्पष्ट दिसून येते की, सदरचे वाहनाची चोरी ही श्री. प्रशांत जाधव यांचे निष्काळजीपणाने झालेले आहे. अशापरिस्थिती जाबदार कंपनी नुकसानभरपाई देण्यास जबाबदार नसलेबाबत कथन केले आहे. वाहनाची चोरी दि.9/9/2008 रोजी झालेनंतर अर्जदार यांनी त्याबाबत जाबदार यांना दि.17/10/2008 रोजी एक महिन्यानंतर कळविलेले आहे. वास्तविक पाहता विमा पॉलीसीच्या अटी व शर्तीनुसार वाहनाचा अपघात झालेनंतर किंवा चोरी झालेनंतर लगेचच जाबदार यांना कळविणे बंधनकारक असताना त्यांनी याबाबत जाबदार यांना खूप उशिरा कळविलेले आहे. सबब प्रस्तुतचा तक्रार अर्ज दाखल करण्यास कोणतेही कारण घडलेले नाही. तसेच जाबदार यांनी सेवा देण्यामध्ये कोणतीही त्रुटी ठेवलेली नाही. अर्जदार यांनी प्रस्तुतचा तक्रारअर्ज विनाकारण दाखल केल्यामुळे खर्चासह फेटाळणेत यावा असे जाबदार यांनी कथन केले आहे. 7. अर्जदारतर्फे अभियोक्ता श्री. कुलकर्णी व जाबदारतर्फे वकील श्री माने यांचा युक्तिवाद ऐकला. 8. अर्जदारतर्फे दाखल करण्यात आलेले शपथपत्र नि. 2 ला पाहिले. अर्जदारतर्फे दाखल केलेली नि. 5 सोबतची 5/1 ते 5/7 अशी 7 कागदपत्रे पाहिली. जाबदारतर्फे दाखल शपथपत्र नि. 12 ला पाहिले. तसेच जाबदारतर्फे दाखल नि. 13 सोबतची 11 कागदपत्रे पाहिली. 9. प्रस्तुतचे कामी प्रामुख्याने खालीलप्रमाणे मुद्दे उपस्थित होत आहेत. हे मुद्दे व त्यांना दिलेली उत्तरे खालीलप्रमाणे आहेत. मुद्दे उत्तरे अ) अर्जदार व जाबदार यांचे दरम्यान ग्राहक व सेवा देणारे असे नाते आहे काय ? होय ब) जाबदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केली आहे काय ? नाही क) अंतिम आदेश - खाली दिलेल्या कारणास्तव अर्जदार यांचा तक्रारअर्ज नामंजूर करणेत येत आहे. कारणे 10. निर्वादितपणे जाबदार यांनी त्यांचे कैफियतीमध्ये अर्जदार यांचे मालकीचे वाहन नं.एम.एच. 13/एन. 9269 या वाहनाचा विमा जाबदार कंपनीकडे पॉलीसी क्र. 151702/31/08/01/00004505 या पॉलीसीअन्वये दि.03/07/2008 ते 02/07/2009 या कालावधीसाठी उतरविलेला होता हे मान्य केले आहे. सदरचा विमा उतरवितेवेळी वाहनाची किंमत ही रु. 6,56,000/- इतकी निश्चित करण्यात आली होती. निर्विवादपणे सदरचे वाहन अर्जदार यांचे मित्र श्री.प्रशांत जाधव यांचेकडे असताना दि. 9/9/2008 रोजी चोरीस गेलेनंतर श्री. जाधव यांनी हवेली पोलीस स्टेशन यांचेकडे फिर्याद दाखल केली आहे. जाबदार यांनी अर्जदार यांचे वाहन त्यांचे निष्काळजीपणामुळे चोरीस गेलेले आहे तसेच अर्जदार यांनी त्यांचे वाहन दि. 9/9/2008 रोजी चोरीस गेलेनंतर जाबदार कंपनीला उशिरा कळविलेले आहे. वास्तविक पाहता जाबदार यांचे पॉलीसी शर्ती व अटींनुसार लगेचच कळविणे आवश्यक होते म्हणुन जाबदार यांनी अर्जदाराचा विमादावा नाकारलेला आहे असे स्पष्ट होते. 11. अर्जदार यांनी निशानी 14 सोबतचे प्रतिउत्तर देवून जाबदारांचे कथन शपथपत्रावर नाकारलेले आहे. परंतु मोघमपणे मोटार वाहन कायद्यातील तरतूदीनुसार वाहनाचा जो मालक असतो अगर ज्याचे नावावर वाहन प्रादेशिक परिवाहन कार्यालयात नोंदलेले आहे तीच व्यक्ती वाहनाची मालक आहे असे कथन केले आहे. परंतू अपघात तारखेदिवशी वाहन क्र. एम.एच. 13/एन. 9269 या वाहनाचे मालक श्री. प्रशांत जाधव यांचे ताब्यात होते याबाबत जाबदार यांनी कैफियत सोबतचे फेरिस्तमधील कागद क्र. 6 चे रु.100 च्या स्टँम्प पेपरवरील करारपत्राची प्रत दाखल केलेली आहे. सदरचा करार हा अर्जदार व श्री. प्रशांत गणपती जाधव यांचेमध्ये झालेला आहे. सदरच्या करारपत्रातील अटीनुसार सदरचे वाहन दि. 3/6/2008 पासून श्री. जाधव यांचे ताब्यात दिलेचे स्पष्ट होते. तसेच सदरच्या करारातील अटीनुसार वाहनाची दि.3/6/2008 पासून पुढील आर.टी.ओ.,इन्श्यूरन्स कोर्ट, पोलीस, रिपेअरिंग, अॅक्सीडेंट, इ. सर्व जबाबदारी ही श्री. प्रशांत जाधव यांची राहील असे स्पष्ट नमूद आहे. जाबदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांनुसार पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीची कागदपत्रे दाखल केली आहेत. सदरच्या कागदपत्रांतील FIR मध्ये श्री. जाधव यांनी अर्जदारांचे नावेच तक्रार दिली आहे. तसेच गाडीचे आर.सी.टी.सी बुकवर गाडी अर्जदार यांचेच नावावर असल्याचे दिसून येते. परंतु दि. 3/6/2008 च्या करारानुसार सदरचे वाहन हे श्री.प्रशांत जाधव यांनी त्यांचे ताब्यात असलेल्या वाहनाचे आर.सी. टी.सी. बुकवर त्यांचे नाव लावणे आवश्यक होते व तसे जाबदार कंपनीला कळविणे आवश्यक होते. परंतु अर्जदार यांनी सदरचे वाहन विकलेबाबत कोणतीही माहिती जाबदार कंपनीला दिलेले नाही हे स्पष्ट होते. परंतु अर्जदार यांनी ज्यादिवशी वाहन विक्री करार केला त्यादिवशी वाहन त्यांचे ताब्यात दिल्याने करारानुसार त्यांचा इन्श्यूरेबल इंटरेस्ट राहीलेला नाही हे स्पष्ट होते. अर्जदार यांचेकडे वाहनाची मालकी राहीलेली नाही तसेच वाहन श्री. जाधव यांना विकलेले असताना अर्जदार यांनी पाश्चात बुध्दीने या मे. मंचासमोर तक्रार अर्ज दाखल केला आहे हे दिसून येते. सबब अर्जदार यांना प्रस्तुतचा अर्ज दाखल करणेस कोणतेही कारण घडले नाही असे या मंचाचे स्पष्ट मत आहे. 12. अर्जदार यांनी याकामी दाखल केलेली नि.5 कडील काबदपत्रे पाहीली असता असे स्पष्टपणे दिसून येते की, नि. 5 कडील पतसंस्थेचा दाखला व जाबदार यांनी क्लेम नाकारलेचे पत्र ही मूळ कागदपत्रो दाखल केली आहेत. नि.5/1 ते 5/5 कडील सर्व कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती दाखल केल्या आहेत. सबब सदरची कागदपत्रे पुराव्यात ग्राहय धरता येणार नाहीत असे या मंचाचे मत आहे. 13. जाबदार यांनी याप्रकरणी वरिष्ठ न्यायालयांचे खालील निवाडा दाखल केलेला आहे. 1. 2009 (4) सीपीआर 239 पंजाब स्टेट कन्झूमर रिड्रेसल कमशिन, चंदीगड किशनकुमार व इ. वि युनायटेड इंडिया इन्श्यू कं. व इतर वरील वरीष्ठ न्यायालयाचे न्यायनिवाडयाचा विचार करता जाबदारांनी दोषयुक्त सेवा दिलेली नाही या निर्णयाप्रत हा मे.मंच आलेला आहे. तसेच जाबदार यांनी इतर दाखल केलेले निवाडयांचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, सदरचे निवाडयातील घटनाक्रम व प्रस्तुत प्रकरणातील घटनाक्रम हा भिन्न आहे. सबब जाबदार यांनी दाखल केलेले न्यायनिवाडे याकामी लागू होत नाहीत असे या मंचाचे स्पष्ट मत आहे. 14. या सर्व कारणास्तव व वर नमूद मुद्दयांच्या दिलेल्या उत्तरास अनुसरुन अर्जदार यांचा तक्रारअर्ज नामंजूर करणेत येत आहे. आदेश 1. अर्जदार यांचा तक्रारअर्ज जाबदार यांचेविरुध्द नामंजूर करणेत येत आहे. 2. खर्चाबाबत काहीही आदेश करणेत येत नाहीत. 3. सदरचा न्यायनिर्णय खुल्या न्यायमंचात जाहीर करणेत आला. सातारा दि. 07/07/2011 (सुनिल कापसे) (श्रीमती सुचेता मलवाडे) (विजयसिंह दि. देशमुख) सदस्य सदस्या अध्यक्ष
| Smt. S. A. Malwade, MEMBER | HONABLE MR. Vijaysinh D. Deshmukh, PRESIDENT | Mr. Sunil K Kapse, MEMBER | |