निकालपत्र
( पारीत दिनांक :23/07/2014 )
( द्वारा प्रभारी अध्यक्ष श्री.मिलींद भि.पवार(हिरुगुडे) )
01. अर्जदार यांनी प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 12 अन्वये गैरअर्जदार यांच्या विरुध्द दाखल केली असून, तीद्वारे पुढील प्रमाणे मागण्या केलेल्या आहेत.
1. गैरअर्जदार क्र. 1 ते 3 यांनी ‘शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा’ योजने अंतर्गत मिळणारी राशी रु.1,00,000/- ही
18 टक्के व्याजदराने द्यावी.
2. मानसिक व शारिरीक त्रासाकरीता रु.20,000/-
3. तक्रारीचा खर्च रु.10000/-
अर्जदाराच्या तक्रारीचा थोडक्यात आशय खालीलप्रमाणे आहे.
अर्जदारांनी सदर तक्रार अर्जामध्ये नमुद केले आहे की, अर्जदार, मयत श्री साहेबराव बारकुजी चतुर यांची पत्नी असून मयत श्री साहेबराव बारकुजी चतुर यांचे नावे मौजा शेरपुर, ता.आष्टी, जि.वर्धा येथे भुमापन क्र.12 अंतर्गत शेतजमीन आहे. शासनाने अपघातग्रस्त शेतक-यांस व त्याच्या कुटुंबियास लाभ देण्याकरीता 15 ऑगस्ट 2011 ते 14 ऑगस्ट 2012 या कालावधीकरिता ‘शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना’ काढली.
1. अर्जदार यांनी नमुद केले आहे की, मयत श्री साहेबराव बारकुजी चतुर यांचा दिनांक 30/06/2012 रोजी पावसाळयात चिंचेचे झाड मुळासहित अंगावर पडल्याने मृत्यु झाला. अर्जदार यांनी पुढे नमुद केले आहे की, त्यानी ‘शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना’ अंतर्गत राशी मिळण्याकरीता गैरअर्जदार क्र.2 यांचे मार्फत दिनांक 31/07/2012 ला गैरअर्जदार क्र.1 विमा कंपनीला विमा दाव्यासोबत सर्व कागतपत्रे सादर केले. मात्र गैरअर्जदार क्र.1 यांनी अर्जदारांचा विमा दावा दि.29/05/2013 रोजी अर्जदार हिने 6-ड कागदपत्र न दिल्याने विमा दावा खारीज केला. सदर बाब ही गैरअर्जदार यांच्या सेवेतील त्रृटी असुन त्यांनी अनुचित व्यापार प्रणालीचा अवलंब केलेला आहे. त्यामुळे अर्जदारांनी गैरअर्जदारांविरुध्द प्रस्तुत तक्रार मंचामध्ये दाखल केली आहे व वरीलप्रमाणे मागणी केली आहे.
02. गैरअर्जदार क्र. 1/विमा कंपनी यांनी आपला लेखी जवाब दाखल केलेला आहे. त्यानुसार गैरअर्जदार क्र. 1 यांनी तक्रारीतील विपरित विधाने / आरोप अमान्य करुन पुढे असे नमुद केले की, अर्जदार हिने आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करणे अनिवार्य होते, परंतु अर्जदाराने विमा दाव्या साठी आवश्यक दस्तावेज सादर केलेले नाही. त्यामुळे विमा पॉलिसीच्या अटी व शर्तीच्या अधीन राहुन विमा कंपनीने अर्जदाराचा विमा दावा विचारात घेतलेला नाही. गैरअर्जदार क्र.1 यांनी पुढे नमुद केले आहे की, अर्जदाराच्या पतीचा दिनांक 30/06/2012 रोजी पावसाळयात चिंचेचे झाड मुळासहित अंगावर पडल्याने मृत्यु झाला हे अमान्य केले आहे. अर्जदाराने मयताचे इतर वारसांना पक्ष केले नाही हा आक्षेप सुध्दा घेतला आहे. अर्जदाराचा सदरहु विमा दावा हा कागदपत्रांची पुर्तता न केल्यामुळे दिनांक 29/05/2013 रोजी खारीज करण्यात आलेला आहे. गैरअर्जदार क्र.1 यांची तर्फे काहीही चुक झालेली नसल्यामुळे अर्जदाराची त्यांच्या विरुध्दची प्रस्तुत तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी अशी प्रार्थना गैरअर्जदार क्र.1 यांनी त्यांच्या लेखी उत्तरा्द्वारे मा.मंचास केलेली आहे.
03. गैरअर्जदार क्र.3 तालुका कृषी अधिकारी यांनी त्याचा लेखी जवाब दाखल केला असुन त्यांनी नमुद केले आहे की, अर्जदार हिने दिनांक 31/7/2012 रोजी विमा दावा मिळण्यासाठी अर्ज दाखल केला, परंतु सादर केलेल्या दस्तावेजांमध्ये जोडलेले 6-ड अयोग्य असल्याचे गैरअर्जदार क्र.1 विमा कंपनीने कळविल्यानंतर सदर बाब अर्जदार हिला कळविण्यात आली व त्या अनुषंगाने अर्जदार हिने दिनांक 1/2/2013 रोजी परत सर्व कागदपत्रांची पुर्तता केली व जिल्हा कृषी अधिकारी यांना पाठविण्यात आली. गैरअर्जदार क्र.3 यांनी पुढे नमुद केले आहे की, गैरअर्जदार क्र.3 यांची तर्फे प्रस्तत प्रकरणात काहीही चुक झालेली नसल्यामुळे अर्जदाराची त्यांच्या विरुध्दची प्रस्तुत तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी अशी प्रार्थना गैरअर्जदार क्र.3 यांनी त्यांच्या लेखी उत्तरा्द्वारे मा.मंचास केलेली आहे.
04. गैरअर्जदार क्र. 2 कबाल इन्शुरन्स ब्रोकींग कंपनी यांनी त्याचा लेखी जवाब दाखल केला असुन तक्रारीतील विपरित विधाने / आरोप अमान्य करुन पुढे असे नमुद केले की, कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हिसेस प्रा.लि. ही बीमा विनियामक आणी विकास प्राइज़ भारत सरकार यांची अनुज्ञत्पि प्राप्त विमा सल्लागार कंपनी आहे. गैरअर्जदार क्र.2 यांनी पुढे असे नमुद केले आहे की, ते महाराष्ट्र राज्य शासनाला सदरील विमा योजना राबवण्यासाठी विना मोबदला सहाय्य करतात. यामध्ये मुख्यत्वे शेतक-यांचा विमा दावा अर्ज तालुका कृषी अधिकारी/तहसीलदार याच्यामार्फत आल्यानंतर त्याची सहानिशा व तपासणी केल्यानंतर योग्य त्या विमा कंपनीकडे पाठवून देणे व विमा कंपनीकडुन दावा मंजूर होवुन आलेला धनादेश संबंधीत वारसदारांना देणे ऐवढेच काम गैरअर्जदार क्र.2 यांचे आहे. गैरअर्जदार क्र.2 यांनी पुढे नमुद केले आहे की, वरील सर्व कामांकरीता ते राज्य शासन किंवा शेतकरी यांच्याकडुन कोणताही मोबदला घेत नाही तसेच यासाठी कोणताही विमा प्रिमीअम घेतलेला नाही. सदर बाब ही मा.राज्य ग्राहक आयोग, औरंगाबाद खंडपीठ यांनी आमचे म्हणणे ग्राहय धरले असुन तसा आदेशही पारीत केलेला असल्याचे गैरअर्जदार क्र.2 यांचे म्हणणे आहे. गैरअर्जदार क्र.2 यांनी पुढे नमुद केले आहे की, मयत श्री साहेबराव बारकुजी चतुर यांचा दिनांक 30/06/2012 रोजी पावसाळयात चिंचेचे झाड मुळासहित अंगावर पडल्याने मृत्यु झाला व सदरील प्रस्ताव जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांच्या मार्फत त्यांच्याकडे दिनांक 30/10/2012 रोजी प्राप्त झाला. त्यानंतर सदर प्रस्ताव हा पुढील कार्यवाहीकरीता गैरअर्जदार क्र.1/विमा कंपनीकडे दिनांक 12/11/2012 रोजी पाठविण्यात आला. गैरअर्जदार क्र.1/विमा कंपनीने सदरील प्रस्ताव आवश्यक कागदपत्रे प्राप्त न झाल्यामुळे दिनांक 29/05/2013 रोजी नामंजुर केला असुन त्याबाबत अर्जदार यांना कळविण्यात आलेले आहे. गैरअर्जदार क्र.2 यांनी नमुद केले आहे की, त्यांनी त्यांच्या सेवेत कुठलीही चुक केलेली नसल्यामुळे सदरची अर्जदाराची त्यांच्याविरुध्दची तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी अशी प्रार्थना गैरअर्जदार क्र.2 यांनी त्यांच्या लेखी उत्तरा्द्वारे मा.मंचास केलेली आहे.
03. अर्जदाराने प्रस्तुत तक्रार प्रतिज्ञापत्रावर दाखल केली असून, सोबत घटनास्थळ पंचनामा, इन्क्वेस्ट पंचनामा, पी.एम.रिपोर्ट, फेरफार, गाव नमुना 7/12,गांव, शेतकरी अपघात विमा योजना परीपत्रक, गैरअर्जदार क्र.1 यांनी विमा दावा फेटाळण्याचे पत्र, गैरअर्जदार यांच्याशी केलेला पत्र व्यवहार, मयतचे वैद्यकीय प्रमाणपत्र, मृत्यु प्रमाणपत्र इत्यादी एकुण 17 दस्तावेंजांच्या छायांकीत प्रती दाखल केलेल्या आहे. नि.क्र.12 कडे मयताची मर्ग खबरी दाखल केली आहे. गैरअर्जदार क्र.3 यांनी नि.क्र.7 कडे लेखी उत्तर, 7/12 उतारा, फेरफार मोजणी, नमुना 6-ड इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
गैरअर्जदार 1 ते 3 यांनी त्यांचा लेखी जवाब प्रतिज्ञापत्रावर दाखल केला आहे.
-: कारणे व निष्कर्ष :-
प्रस्तुत प्रकरणात दोन्ही पक्षांतर्फे दाखल करण्यात आलेले सर्व दस्तावेज व प्रतिज्ञालेख बारकाईने पाहण्यात आले.
4. सदर प्रकरणातील विमा पॉलिसी ही महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतक-यांकरिता " गृप पर्सनल अक्सीडेंट पॉलिसी " अंतर्गत अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास शेतकरी व त्यांच्या वारसास नुकसान भरपाई मिळावी, या हेतुने महाराष्ट्र शासनाने विमा पॉलिसी काढली व सदर योजनेनुसार गैरअर्जदार क्र. 1 विमा कंपनीने उपरोक्त विमायोजनेनुसार जोखीम स्विकारली, या बद्दल वाद नाही.
5. अर्जदाराचे निवेदन तथा दाखल दस्तावेजांवरुन असे स्पष्ट दिसून येते की, अर्जदार यांनी, मयत श्री साहेबराव बारकुजी चतुर यांचे वारसदार या नात्याने, विमाधारक मयत श्री साहेबराव बारकुजी चतुर यांचा दिनांक 30/06/2012 रोजी पावसाळयात चिंचेचे झाड मुळासहित अंगावर पडल्याने मृत्यु झाला व या कारणाने अर्जदार यांनी विमाधारकाचा अपघाती मृत्यू झाला या सदरा खाली शेतकरी अपघात विमा योजना अंतर्गत विमा रक्कमेची मागणी केलेली आहे. अर्जदारातर्फे नि.क्र.2/3 ते 2/15 वरील दाखल दस्तऐवजांवरुन असे दिसून येते की, विमाधारक मयत श्री साहेबराव बारकुजी चतुर यांचा दिनांक 30/06/2012 रोजी पावसाळयात चिंचेचे झाड मुळासहित अंगावर पडल्याने मृत्यु झाला हे सिध्द होते.
06. मयत श्री साहेबराव बारकुजी चतुर हे शेतकरी होते या पुष्ठर्थ भुमापन क्र.12 मध्ये शेरपुर,ता.आष्टी येथील 7/12 उतारा निशानी क्र..2/10 कडे दाखल करण्यात आला आहे. यावरुन मयत श्री साहेबराव बारकुजी चतुर हे शेतकरी होते व त्यांचा, शासन निर्णया नुसार दिनांक 15 ऑगस्ट 2011 ते 14 ऑगस्ट 2012 या कालावधी करीता शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा काढण्यात आला होता ही बाब स्पष्ट दिसुन येते.
07. गैरअर्जदार क्र.2 कबाल इंश्युरन्स यांचे लेखी उत्तरावरुन मयत श्री साहेबराव बारकुजी चतुर यांचा अपघाती मृत्यु झाला व त्यांच्या वारसांना कृषि विमा अपघात योजने अंतर्गत विमा अर्ज दिनांक 30/10/2012 रोजी प्राप्त झाला व सदर प्रस्ताव त्यांचे गैरअर्जदार क्र.1 यांचे कार्यालयास सादर केला. परंतु सदर प्रस्ताव गैरअर्जदार क्र.1 यांनी नामंजुर केला आहे. सदर बाब गैरअर्जदार क्र.1 विमा कंपनी यांनी सुध्दा त्यांचे लेखी जवाबामध्ये नमुद केले आहे की, अर्जदार यांनी वेळेत कागदपत्रे दिली नाही म्हणुन सदर प्रस्ताव फेटाळला आहे. सदर विमा प्रस्ताव वेळेत गैरअर्जदार क्र.3 यांचे कार्यालयात सादर झाला हे नि.क्र.7 कडील गैरअर्जदार क्र.3 यांचे कागदपत्रांवरुन दिसते. त्याकरीता आवश्यक कागदपत्रांची पुर्तता गैरअर्जदार क्र.2 यांचे सांगण्यावरुन गैरअर्जदार क्र.3 व अर्जदार यांनी केली असल्याचे नि.क्र.7 वरील व नि.क.2/4, नि.क्र.2/5 वरील कागदपत्रांवरुन दिसुन येते. गैरअर्जदार क्र.1 विमा कंपनी यांचे नि.क्र.2/3 चे पत्राचे अवलोकन केले असता ते दिनांक 26/12/2012 चे आहे ज्यामध्ये त्यांनी कागदपत्रे मागीतली होती त्याप्रमाणे अर्जदार यांनी दिनांक 2/11/2013 म्हणजेच गैरअर्जदार क्र.1 यांनी पत्र पाठविले पासुन 25 दिवसांच्या आंत पुर्तता केली असल्याचे नि.क्र.2/4 व नि.क्र.2/5 वरुन दिसुन येते व त्यानंतर पुढे नि.क्र.7 वरील कागदपत्रावरुन सुध्दा पुर्तता झाली असल्याचे दिसुन येते. अशी वस्तुस्थिती असतांना गैरअर्जदार क्र.1 यांनी त्यानंतर म्हणजे तब्बल चार महिने नंतर म्हणजेच दिनांक 29/5/2013 रोजी कागदपत्रे मिळाले नाही म्हणुन अर्जदार यांचा विमा दावा नामंजुर केला. जेंव्हा की सर्व आवश्यक कागदपत्रांची पुर्तता अर्जदार व गैरअर्जदार क्र.3 यांनी वेळेत केली होती.
गैरअर्जदार क्र.1 विमा कंपनीने अर्जदार यांनी कागदपत्रे दिली नव्हती तर तो नामंजुर करेपर्यंत म्हणजेच दिनांक 29/5/2013 रोजी पर्यंत अर्जदार किंवा गैरअर्जदार क्र.2 व 3 यांचेशी काय पत्रव्यवहार केला याचा कोणताही कागदोपत्री पुरावा या कामी दाखल केला नाही.
गैरअर्जदार क्र.1 विमा कंपनी यांनी प्रस्तुत कामी एक आक्षेप घेतला आहे की मयत श्री साहेबराव बारकुजी चतुर यांना इतर वारस सुध्दा आहेत. मात्र अर्जदार यांची पत्नी या नात्याने एकटीनेच तक्रार दाखल केली आहे. मात्र या बाबत शेतकरी अपघात विमा योजनेची परीपत्रक पाहिले असता मयत शेतक-याचे अपघाती मृत्यु नंतर प्रथमतः प्राधान्याने पत्नीच वारस आहे व त्यानंतर इतर वारस आहे. ज्यावेळी पत्नी विमा दावा करते त्यावेळी इतर वारसांचा प्रश्नच उद्भवत नाही व त्यामुळे गैरअर्जदार क्र.1 यांचा सदर आक्षेप तथ्यहीन ठरतो.
10. प्रस्तुत प्रकरणातील हकीकत व परिस्थितीवरुन असे दिसुन येते की, मयत श्री साहेबराव बारकुजी चतुर यांचा अपघाती मृत्यु झालेला आहे. या शिवाय गैरअर्जदार क्र.1 यांच्याकडे अर्जदाराचा विमा प्रस्ताव योग्य मार्गाने गैरअर्जदार क्र. 2 व 3 मार्फत पोहचविण्यात आला तरीही गैरअर्जदार क्र.1 यांनी तो असमर्थनिय कारणास्तव नामंजुर केला व त्यामुळे अर्जदार यांना विमा लाभ मिळाला नाही. म्हणुन अश्या परिस्थितीत, अर्जदारास विमा योजनेतील लाभापासुन वंचित ठेवणे हे न्यायोचित होणार नाही.
11. उपरोक्त सर्व दस्ताऐवज, पुरावे व प्रतिज्ञालेखावरील पुरावे ग्राहय धरुन आम्ही या निर्णयास आलो आहोत की, अर्जदार महाराष्ट्र शासनामार्फत राबविण्यात येणा-या वैयक्तिक शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत मिळणारे लाभ रु.1,00,000/- (रुपये एक लाख) मिळण्यास पात्र आहे, असे मंचास वाटते.
12. गैरअर्जदार क्र.2 व 3 यांनी अर्जदाराचा प्रस्ताव वेळेत गैरअर्जदार क्र.1 यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविला व आपले कर्तव्य पार पाडले आहे, त्यामुळे गैरअर्जदार क्र.2 व 3 यांना प्रस्तुत प्रकरणातुन मुक्त करणे न्यायोचित ठरेल.
13. गैरअर्जदार क्र.1 यांनी आपल्या कर्तव्यात निष्काळजीपणा व हलगर्जीपणा केला, म्हणुन अर्जदारास विमा योजनेतील लाभांपासुन वंचित राहावे लागले, तसेच सदर प्रकरण दाखल करावे लागले ही बाब ग्राहय धरुन आम्ही या निर्णयास आलो आहोत की, अर्जदार, गैरअर्जदार क्र.1 कडुन मानसिक व शारीरीक त्रासापोटी रुपये 1500/- व तक्रारीचा खर्च रुपये 1000/- मिळण्यास पात्र आहे.
उपरोक्त सर्व विवेचनांवरुन आम्ही खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहोत.
// आदेश //
अर्जदार यांची तक्रार अंशतः मंजुरकरण्यात येते.
गैरअर्जदार क्र.1 विमा कंपनी यांनी अर्जदार यांना
विमा रक्कम रुपयेः 1,00,000/- ( रुपये एक लाख फक्त )
सदर निकालाची प्रत प्राप्त झाल्यापासुन 30 दिवसांच्या आंत
द्यावे, तसेच या रक्कमेवर दिनांक 18/11/2013 (तक्रार
दाखल दिनांक) पासून ते पुर्ण रक्कम अदा करे पर्यंत
दरसाल दरशेकडा 12 टक्के दराने होणा-या व्याजाची रक्कम
अर्जदार यांना देण्यात यावी.
वरील आदेशाचे पालन आदेशाची प्रत प्राप्त झालेल्या
दिनांकापासुन 30 दिवसांच्या आंत करावे. मुदतीत आदेशाचे
पालन न केल्यास, मुदतीनंतर उपरोक्त रुपये 1,00,000/-
व या रक्कमेवर दिनांक 18/11/2013 (तक्रार दाखल
दिनांक) पासून ते पुर्ण रक्कम प्राप्त होईपर्यंत दरसाल
दरशेकडा 18 टक्के दराने दंडणीय व्याजासह रक्कम देण्यास
गैरअर्जदार क्र.1 जवाबदार राहतील.
अर्जदार यांना झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल
गैरअर्जदार क्र.1 यांनी अर्जदारास रुपये 1500/- ( रुपये
एक हजार पाचशे फक्त) व तक्रारीचा खर्च रुपयेः 1000/-
( एक हजार फक्त) सदर निकाल प्राप्ती पासून तीस
दिवसांचे आंत द्यावे.
5) मा.सदस्यांसाठीच्या ‘ब’ व ‘क’ फाईल्स संबंधीतांनी परत
घेवुन जाव्यात.
निकालपत्राच्या प्रति सर्व संबंधीत पक्षांना माहितीस्तव व
उचित कार्यवाहीकरीता पाठविण्यात याव्यात.
गैरअर्जदार क्र. 2 व 3 विरुध्द आदेश नाही.