Final Order / Judgement | निकालपत्र (पारित दिनांक 21 मार्च 2017) (मा. सदस्या, श्रीमती स्मिता एन. चांदेकर यांच्या आदेशान्वये) तक्रारकर्तीने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अन्वये प्रस्तुत तक्रार दाखल केलेली आहे. - तक्रारकर्तीच्या तक्रारीचा आशय थोडक्यात असा की, तक्रारकर्तीचे पती मयत अशोक तुकारामजी तळवेकर हे शेतकरी होते व त्याच्या नांवे मौजा कवठा, ता.जि.नागपूर येथे गट क्रं.53 अंतर्गत शेतजमीन आहे.
- शासनाने राज्यातील 10 ते 75 वर्ष वयोगटातील शेतक-यांकरिता शेतकरी जनता अपघात विमा योजने अंतर्गत विरुध्द पक्ष 1 कडे दि.15 ऑगस्ट 2012 ते 14 ऑगस्ट 2013 या कालावधीकरिता विमा उतरविला व विरुध्द पक्ष 1 ने सदर योजनेप्रमाणे शेतक-याचा अपघाती मृत्यु झाल्यास त्याचे लाभार्थ्यांना रुपये 1 लाख देण्याची हमी घेतली होती.
- तक्रारकर्तीने पुढे असे कथन केले आहे की, तिचे पती अशोक तुकारामजी तळवेकर हे दि.04.01.2013 रोजी बहिणीच्या अस्थी विसर्जनाकरिता मौजा पवनार येथे गेले असता धाम नदीमध्ये पाण्यात बुडून त्यांचा अपघाती मृत्यु झाला. त्यानंतर तलाठी कवठा यांनी दि.01.07.2014 रोजी तक्रारकर्तीला शेतकरी जनता अपघात विमा योजनेची माहिती दिली, त्यामुळे तक्रारकर्तीने शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे सर्व कागदपत्रांची जुळवाजुळव करुन कागदपत्रासह सदर योजने अंतर्गत विम्याचा लाभ मिळण्याकरिता विमा प्रस्ताव विरुध्द पक्ष 2 कडे दि. 26.09.2014 रोजी दाखल केला. विरुध्द पक्ष 2 ने विरुध्द पक्ष 3 व 4 मार्फत विरुध्द पक्ष 1 कडे सदर प्रस्ताव संपूर्ण कागदपत्रासह पाठवून विमाच्या रक्कमेची मागणी केली. तसेच वि.प. यांनी दर्शविलेल्या त्रुटींची त.क.च्या वतीने वि.प. 2 व 3 मार्फत योग्य त्या संपूर्ण कागदपत्रांची पूर्तता दि.05.12.2014 रोजी करण्यात आली. संपूर्ण त्रुटींची पूर्तता करुन ही विमा दाव्याची रक्कम प्राप्त न झाल्यामुळे तक्रारकर्तीने वारंवांर विरुध्द पक्ष क्रं. 2 च्या कार्यालयात विमा दाव्यासंबंधी चौकशी केली असता विरुध्द पक्ष 2 च्या कार्यालया मार्फत पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे, पण विमा कंपनीकडून माहिती प्राप्त व्हावयाची आहे असे उत्तर दिले. तक्रारकर्तीचा विमा दावा मंजूर झाला किंवा नाकारला यासंबंधी आजपर्यंत तक्रारकर्तीला कुठलीही माहिती कळविण्यात आलेली नाही. म्हणून तक्रारकर्तीने प्रस्तुत तक्रार दाखल करुन शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजने अंतर्गत मिळणारी रक्कम रुपये 1,00,000/- 18 टक्के दराने व्याजासह, तिला झालेल्या शारीरिक, मानसिक त्रासाबद्दल 10,000/-रुपये व तक्रारीचा खर्च म्हणून 5000/-रुपये मिळण्याची विनंती केली आहे.
- विरुध्द पक्ष 1 ने आपला लेखी जबाब नि.क्रं. 12 वर दाखल केला असून तक्रार अर्जास सक्त विरोध केला आहे. विरुध्द पक्षाचे म्हणणे असे की, तक्रारकर्तीचे पती अशोक तळवेकर याचा मृत्यु दि. 04.01.2013 रोजी बहिणीच्या अस्थी विसर्जनासाठी गेले असता धाम नदीमध्ये पाण्यात बुडून अपघाती मृत्यु झाला याबाबत विरुध्द पक्ष 1 ला कोणत्याही प्रकारची माहिती नाही. वि.प. 1 ने पुढे असे कथन केले की, त.क.चा सदर विमा दावा प्रस्ताव वि.प. 1 ला दि. 27.10.2014 रोजी प्राप्त झाले. परंतु सदर अर्जामध्ये विमा दावा उशिराने कां दाखल केला हयाचे कोणतेही सबळ कारण नमूद केले नाही. तसेच वारसांनाची नोंदवाही व फॉर्म 6 क देखील सोबत पाठविले नव्हते. त्यामुळे वि.प. 1 ने सदरचा दावा हा विहीत मुदतीमध्ये नसल्यामुळे नामंजूर केला असल्याचे आपल्या लेखी उत्तरात नमूद केले आहे. तसेच वि.प. 1 ने पुढें असे कथन केले की, सदरची घटना दि.04.01.2013 रोजी घडल्यानंतर तेथून 90 दिवसांच्या आंत व कट ऑफ डेटच्या आधी सदर दावा अर्ज दाखल करावा लागतो परंतु तक्रारकर्तीने तसे केलेले नाही व सदर अर्जामध्ये उशिराने अर्ज कां केला याबाबत कोणत्याही प्रकारचे कारण नमूद केलेले नाही तसेच सदरचा दावा अर्ज हा मुदतबाहय असल्यामुळे वि.प. 1 ने तशाप्रकारेचे पत्र तक्रारकर्तीला व वि.प. 4 व वि.प. 3 ला दि. 05.11.2014रोजी पाठवून सदरची फाईल बदं केल्याबाबत कळविले असे आपल्या लेखी उत्तरात नमूद केले आहे.विरुध्द पक्ष 1 ने पुढे असे कथन केले की, त.क.चा विमा दावा अर्ज सर्व कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर विमा दावा हा मुदतबाहय असल्यामुळे योग्य रितीने नामंजूर केलेला आहे. विरुध्द पक्ष 1 ने कुठलीही दोषपूर्ण सेवा दिलेली नसल्यामुळे व प्रस्तुत तक्रार मुदतीत नसल्यामुळे खारीज करण्यात यावी अशी विनंती केली आहे.
- विरुध्द पक्ष 2 व 3 ने त्याचा लेखी जबाब नि.क्रं. 6 वर दाखल केला असून असे कथन केले आहे की, वि.प. 2 व 3 हे महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार शेतकरी जनता अपघात योजना राबवितात. सदर योजनेचा कालावधी 15 ऑगस्ट 2012 ते 14 ऑगस्ट 2013 असा होता. सदर कालावधी संपल्यानंतर 90 दिवसाचे आंत विमा क्लेम सादर करणे आवश्यक आहे. त.क.च्या पतीचा दि.04.01.2013 रोजी धाम नदिच्या पाण्यात डुबुन मृत्यु झाला. त.क.चा अपघात विमा प्रस्ताव वि.प. 3 कडे दि.26.09.2014 रोजी संपूर्ण कागदपत्रासह वि.प. 2 चे कार्यालय सेलू आवक क्रं. 2966 दि. 29.09.2014 अन्वये प्राप्त झाला. संपूर्ण कागदपत्रांची पडताळणी करुन वि.प. 2 ने वि.प. 3 कडे सादर केली. वि.प. 3 ने वि.प. 4 यांच्याकडे दि.30.09.2014 रोजी पुढील कार्यवाहीसाठी सादर केली. सदर प्रस्ताव सादर करणे व पाठविण्यामधील कालावधीस त.क.ला सेवा देण्यात वि.प. 2 व 3 यांनी कोणतीही त्रुटी केलेली नाही. तसेच त.क.चा विमा प्रस्ताव नामंजूर होण्यास वि.प. 2 व 3 जबाबदार नाही. विरुध्द पक्ष 2 व 3 ने शासकीय निर्णयाप्रमाणे कार्यवाही पूर्ण केलेली आहे. त्यामुळे त्याच्या विरुध्दची तक्रार खारीज करण्यात यावी, अशी विनंती केली आहे.
- विरुध्द पक्ष 4 यांनी आपला लेखी जबाब नि.क्रं.16 वर दाखल केलेला आहे. त्यात सदर कंपनी ही राज्य शासनाकडून कोणतेही विमा प्रिमियम स्विकारत नाही आणि ती शासनाला विनामूल्य मध्यस्थ सल्लागार म्हणून सेवा देत असल्यामुळे तक्रारकर्त्यांचा विमा दावा देण्याची जबाबदारी विरुध्द पक्ष 3 ची नाही असे म्हटले आहे. केवळ महाराष्ट्र राज्य शासनाला सदरील विमा योजना राबविण्यासाठी विना मोबदला सहाय्य करते. यामध्ये मुख्यत्वे शेतक-यांचा विमा दावा अर्ज तालुका कृषी अधिकारी/जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे आल्यावर विमा दावा अर्ज मिळाल्यावर योग्य त्या विमा कंपनीकडे पाठविणे व विमा कंपनीकडून दावा मंजूर होऊन आलेला धनादेश संबंधीत वारसदारांना देणे, एवढेच काम आहे. या शिवाय राज्य ग्राहक तक्रार निवारण मंच, मुंबई यांच्या औरंगाबाद खंडपीठाने अपील क्रं.1114/2008 मधील दि.16.03.2009 चा आदेश आपल्या म्हणण्याच्या पृष्ठयर्थ दाखल केला आहे. त्याप्रमाणे विना मोबदला मध्यस्थ सेवा देणारी ही कंपनी विमा ग्राहकाला विमा दाव्याची रक्कम देण्यास जबाबदार नसल्याचा निर्णय दिला आहे.
- विरुध्द पक्ष 4 ने पुढे असे कथन केले आहे की, अशोकराव तुकारामजी तळवेकर हयांचा दि. 04.01.2013 रोजी अपघाती मृत्यु झाल्याचे दिसून येते. सदर प्रस्ताव वि.प. 3 जिल्हा कृषी अधिकारी वर्धाचे पत्र दि.30.09.2014 मार्फत वि.प. 4 ला अपूर्ण स्थितीत दि.14.10.2014 रोजी प्राप्त झाले. प्रस्ताव उशीरा व त्रुटी असल्याबद्दले नमूद केलेले पत्र दि.16.10.2014 रोजी वि.प. 3 ला पाठविण्यात आले होते व दाव्याच्या स्थितीबाबत कळविण्यात आले होते. सदर प्रस्ताव वि.प. 4 मार्फत वि.प. 1 कडे दि. 16.10.2014 ला पाठविला असता वि.प.1 ने दि.05.11.2014 च्या पत्रान्वये दावा नामंजूर करुन तसे वारसदारास कळविल्याचे नमूद केले आहे. वि.प. 4 ने पुढे असे नमूद केले की, त्यांना कारण नसतांना पक्षकार केलेले असल्यामुळे त्यांच्या विरुध्दची तक्रार खारीज करण्यात यावी अशी विनंती केलेली आहे.
- तक्रारकर्तीने तिच्या कथनाच्या पृष्ठयर्थ तिची तक्रार हीच प्रतिज्ञालेख समजण्यात यावा अशी पुरसीस नि.क्रं. 15 वर दाखल केली असून एकूण 12 कागदपत्रे वर्णन यादी नि.क्रं. 2 सोबत दाखल केलेली आहे. वर्णनयादी नि.क्रं.14 वर एकूण 3 कागदपत्र दाखल केली आहेत. विरुध्द पक्ष 1 ने काहीही पुरावा दाखल करावयाचा नाही अशी पुरसीस नि.क्रं. 18 वर दाखल केली. तक्रारकर्तीने तिचा लेखी युक्तिवाद नि.क्रं. 20 वर दाखल केलेला आहे. विरुध्द पक्ष 1 ने नि.क्रं. 21 वर लेखी युक्तिवाद दाखल केलेला आहे. त.क. व वि.प. 1 च्या वकिलांचा तोंडी युक्तिवाद ऐकून घेण्यात आला. इतर वि.प. युक्तिवादाच्या वेळेस गैरहजर.
- वरीलप्रमाणे तक्रारकर्ती व विरुध्द पक्ष यांचे परस्पर विरोधी विधानावरुन खालील मुद्दे मंचासमोर विचारार्थ काढून त्यावरील कारणमिमांसा पुढील प्रमाणे आहे.
अ.क्रं. | मुद्दे | उत्तर | 1 | विरुध्द पक्ष 1 ने तक्रारकर्तीचा विमा दावा नाकारुन दोषपूर्ण सेवा दिली आहे काय ? | होय | 2 | तक्रारकर्ती मागणीप्रमाणे लाभ मिळण्यास पात्र आहे काय ? | अंशतः होय | 3 | अंतिम आदेश काय ? | तक्रार अंशतः मंजूर. |
-: कारणमिमांसा :- - मुद्दा क्रं.1 व 2 बाबत , ः- तक्रारकर्तीचे पती अशोकराव तुकारामजी तळवेकर हे शेतकरी होते व त्यांच्या नांवे मौजा कवठा, ता. जि.नागपूर येथे भूमापन क्रं. 53 अंतर्गत शेतजमीन होती हे वादातीत नाही. नि.क्रं. 2(5) वर त.क.ने मौजा कवठा, गट क्रं. 53 च्या 7/12ची छायांकित प्रत दाखल केली असून त्यावरुन मृत्युच्या वेळेस मयत अशोक तुकारामजी तळवेकर हा शेतकरी होता हे सिध्द होते. त्याचप्रमाणे त.क.च्या पतीचा मृत्यु दि.04.01.2013 रोजी नदिमध्ये पाण्यात बुडून अपघाती मृत्यु झाला हे देखील वादातीत नाही.त.क. वर्णनयादी नि.क्रं. 2 नुसार मर्ग खबरी, मर्ग समरी, घटनास्थळ पंचनामा व पोस्ट मार्टम यांच्या छायांकित प्रती दाखल केल्या आहेत. सदर कागदपत्रांचे अवलोकन केले असता मयत अशोक तुकारामजी तळवेकर याचा पाण्यात बुडून अपघाती मृत्यु झाल्याचे स्पष्ट होते.
- महाराष्ट्र शासनाने राज्यातील 10 ते 75 वयोगटातील शेतक-यांकरिता 15 ऑगस्ट 2012 ते 14 ऑगस्ट 2013 या कालावधीकरिता शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना अंतर्गत विरुध्द पक्ष 1 कडे विमा उतरविला होता व विरुध्द पक्ष 1 ने शेतक-याचा अपघाती मृत्यु झाल्यास त्याच्या वारस व लाभार्थ्यांना रुपये 1 लाख देण्याची हमी घेतली होती हे वादातीत नाही. विरुध्द पक्ष 2 व 3 ने दाखल केलेल्या परिपत्रकावरुन सुध्दा ही बाब निदर्शनास येते. तक्रारकर्तीचे पती अशोक तळवेकर याचा धाम नदिच्या पाण्यात बुडून दि.04.01.2013 रोजी अपघाती मृत्यु झाला हे सुध्दा वादातीत नाही. तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु हा अपघाती मृत्यु होता व तो विमा कालावधीत झालेला आहे.
- तक्रारकर्तीची तक्रार अशी आहे की, तिच्या पतीच्या अपघाती मृत्युनंतर शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे सर्व कागदपत्रासह तिने विमा
दावा विरुध्द पक्ष 2 कडे दाखल केला व विरुध्द पक्ष 2 व 3 यांच्या तर्फे विरुध्द पक्ष 4 मार्फत विरुध्द पक्ष 1 कडे पाठविण्यात आला. तसेच तक्रारकर्तीने विरुध्द पक्षाने दर्शविलेल्या त्रृटींची पूर्तता देखील दि.05.12.2014 रोजी संपूर्ण कागदपत्र वि.प.2 व 3 यांच्याकडे देऊन केली असून ही तक्रारकर्तीला विमा दाव्याची रक्कम मिळाली नाही. विरुध्द पक्ष 1 च्या वकिलांनी त्यांच्या युक्तिवादात असे कथन केले आहे की, तक्रारकर्तीचा विमा दावा मुदतबाहय आहे व त.क.ने सदर प्रस्ताव उशिरा कां दाखल केला याबाबत कोणताही खुलासा केलेला नाही.त्याचप्रमाणे वि.प.2 व 3 यांनी वि.प. 4 मार्फत दि.16.10.2014 रोजी पाठविलेले कागदपत्र वि.प.1 यांना दि.27.10.2014 रोजी प्राप्त झाले. सदर कागदपत्रांच्या पडताळणी दरम्यान मुळ दावा उशिराने कां दाखल केला याचे कोणतेही कारण नमूद न केल्यामुळे , तसेच वारसांची नोंदवही व फॉर्म 6-क न दिल्यामुळे वि.प. 1 ने त.क.चा दावा दि.05.11.2014 रोजी नामंजूर केला आहे. तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु दि. 04.01.2013 रोजी झालेला आहे. नियमाप्रमाणे पॉलिसीच्या कालावधीनंतर 90 दिवसाच्या आत नुकसानभरपाई मिळण्यासाठी संबंधित व्यक्तीने क्लेम केला पाहिजे. परंतु तक्रारकर्तीने मुळ विमा दावा दि.26.09.2014 रोजी म्हणजेच 1 वर्ष 5 महिने 22 दिवस उशिराने दाखल केल्यामुळे तक्रारकर्तीचा तक्रार अर्ज हा मुदतीत नाही. - तक्रारकर्तीच्या कथनाप्रमाणे तिने शेतकरी अपघात विमा दाव्याची माहिती मिळाल्यानंतर विमा प्रस्ताव विरुध्द पक्ष 2 कडे सादर केला. विरुध्द पक्ष 2 व 3 ने विरुध्द पक्ष 4 मार्फत विरुध्द पक्ष 1 कडे पाठविला. तक्रारकर्ती ही विधवा स्त्री असून अशिक्षित आहे. त्यामुळे कदाचित तिला विमा प्रस्ताव दाखल करण्यासंबंधीची माहिती नसावी. त.क.ने तिच्या तक्रार अर्जात ही असे नमूद केले आहे की, तिच्या पतीच्या मृत्युनंतर तलाठी कवठा यांनी दि.1.7.2014 रोजी त.क.ला सदर विमा योजनेची माहिती देऊन त्याबाबतचा क्लेम फॉर्म भरुन दिला व त्यानंतर त.क.ने आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव करुन दि.26.09.2014 रोजी विरुध्द पक्ष 2 कडे विमा प्रस्ताव सादर केला. त्यानंतर विरुध्द पक्ष 3 यांच्या दि. 05.11.2014 च्या पत्रातील नमूद कागदपत्रांची पूर्तता तिने दि.05.12.2014 रोजी वि.प. 3 कडे केलेली आहे. तक्रारकर्तीने वर्णनयादी नि.क्रं.14 नुसार दाखल केलेल्या कागदपत्रावरुन असे दिसून येते की, वि.प. 3 यांनी दि.05.11.2014 रोजी वि.प.2 ला पत्र पाठवून त.क. च्या विमा प्रस्तावा सोबत 6 क, वयाचा दाखला सत्यप्रत, एफ.आय.आर. दाखल केले नसून प्रस्ताव उशिरा सादर करण्याचे कारण ही नमूद केले नाही तरी त्रुटींची पूर्तता करुन सदर कागदपत्र त्यांचे कार्यालयात सादर करण्यास कळविले आहे. त्यावरुन त.क.ने दि.05.12.2014 रोजी वि.प.3 कडे प्रतिज्ञापत्र सादर करुन प्रस्ताव उशिरा दाखल करण्याचे कारण नमूद केले आहे. त्यात तिने सदर योजनेबाबत तलाठी यांनी दि.01.07.2014 रोजी शेतकरी जनता अपघात विम्याची माहिती दिली, त्या अगोदर सदर योजनेबाबत तिला कुठलीही माहिती नव्हती, म्हणून तक्रारकर्तीला विमा प्रस्ताव दाखल करण्यास उशिर झाला आहे असे कारण नमूद केले आहे. त.क.ने तिच्या प्रतिज्ञापत्रात असे ही नमूद केलेले आहे की, मयताची वारस व लाभार्थी ठरविण्यासाठी 6 क ची मागणी करुन सुध्दा तलाठयानी ती उपलब्ध करुन दिली नाही. परंतु त.क. मयताचे वारस व लाभार्थी असल्याचे त्याच्या सही व शिक्कयानिशी दिलेला अस्सल फॉर्म भाग 2, तलाठी प्रमाणपत्र व नगर परिषद कार्यालय सिंदी रेल्वे यांचा अस्सल वारसा दाखला तिने तिच्या विमा प्रस्तावा सोबत दाखल केलेला आहे. त्याचप्रमाणे त.क.च्या मयत पतीचे वयाच्या दाखल्याचे कोणतेही कागदपत्र तिच्याकडे नसल्यामुळे मागणीनुसार त्याचे निवडणूक ओळखपत्र त.क.ने विमा प्रस्तावा सोबत सादर केलेले आहे. त.क.च्या पतीची अपघाती मृत्युची नोंद पोलिस स्टेशनमध्ये मर्ग क्रं. 4/2013 अन्वये घेण्यात आल्यामुळे तिने मर्ग खबरी व मर्ग समरीची प्रत प्रस्तावा सोबत दाखल केली असे तिच्या प्रतिज्ञालेखात नमूद केले आहे. वि.प.क्रं. 2 व 3यांनी त्याच्या लेखी उत्तरा सोबत त.क.ने सादर केलेल्या विमा प्रस्तावाच्या अर्जाची सत्यप्रत दाखल केली आहे, ती अभिलेखावरील पृष्ठ क्रं. 35 वर आहे. सदर अर्जाचे अवलोकन केले असता त.क.ने तिच्या विमा दाव्याच्या प्रस्तावा सोबत वरील प्रमाणे सर्व कागदपत्र वि.प. 2 कडे सादर केल्याचे दिसून येते. अभिलेखावरुन सदर प्रतिज्ञालेख हा वि.प.क्रं.3 यांना दि.05.12.2014 रोजी प्राप्त झाल्याचे दिसून येते. वि.प.क्रं. 4 यांनी त्यांच्या लेखी उत्तरात असे नमूद केले आहे की, त्यांनी दि.16.10.2014 रोजी त.क.चा विमा प्रस्ताव पाठविला असता सदरील दावा वि.प. 1 कंपनीने दि.05.11.2014 च्या पत्रान्वये नामंजूर करुन तसे वारसदारास कळविल्याचे दिसून येते. वि.प.4 यांनी आपल्या लेखी उत्तरा सोबत वि.प.क्रं. 1 च्या दि.05.11.2014 च्या पत्राची छायांकित प्रत दाखल केली असून त्यानुसार तक्रारकर्तीचा विमा दावा दि.05.11.2014 रोजी नामंजूर करण्यात आल्याचे स्पष्ट होते. त्याचप्रमाणे विरुध्द पक्ष क्रं. 4 यांनी दि.16.10.2014 रोजी विरुध्द पक्ष क्रं.3 यांना पत्र पाठवून तक्रारकर्तीच्या प्रस्तावातील त्रृटींची माहिती दिल्याचे दिसून येते. वि.प. क्रं.2 व 3 यांनी आपल्या लेखी उत्तरात त्यांनी दि.30.09.2014 रोजी त.क.चा विमा दावा संबंधीत कंपनीकडे सादर केला असे नमूद केले असून वि.प.4 यांनी दि.16.10.2014 रोजी त्यांना पाठविलेल्या पत्राचा उल्लेख आपल्या लेखी उत्तरात केलेला नाही. तसेच त.क.च्या म्हणण्यानुसार अभिलेखावरील कागदपत्रावरुन असे दिसून येते की, वि.प. 3 यांनी त.क.ला त्रृटींची पूर्तता करण्याकरिता दि. 05.11.2014 रोजी पत्र पाठवून कळविले होते. परंतु हयाबाबतचा उल्लेख ही वि.प. 2 व 3 यांनी आपल्या लेखी उत्तरात केलेला नाही. तसेच त.क.चा दावा वि.प. 1 ने दि.05.11.2014 रोजी नामंजूर केला याबाबत ही वि.प. 2 व 3 यांनी कुठलेही भाष्य केलेले नाही. त्यामुळे वि.प. 2 व 3 यांना त.क.च्या प्रस्तावातील त्रुटींची कल्पना असतांना ही त्याबाबतची माहिती त.क.ला उशिरा दिली व प्रस्तावा सोबत दाखल करावयाचे कागदपत्रांची पूर्तता करुन घेण्याची त्यांची जबाबदारी योग्य रितीने पार पाडली नसल्याचे दिसून येते. परंतु वि.प. 2 व 3 यांच्या चुकिमुळे त.क.ला झालेल्या उशिरासाठी जबाबदार धरता येणार नाही.
- शासनाच्या परिपत्रकात वि.प. 3 यांच्या जबाबदा-या व कर्तव्य नमूद केले आहेत. त्यानुसार क्लेम फॉर्म भरीत असतांना काही कागदपत्रांच्या त्रृटी असल्यास कृषि अधिकारी आणि कबाल इन्श्युरन्स कंपनी यांनी त्याबाबतची परिपूर्णता करुन तो फॉर्म इन्श्युरन्स कंपनीकडे पाठवावयाचा असतो. 6 क हा दाखला ज्यावर मृतकाचे व वारसदाराचे नांव समाविष्ट असते तो दाखल करणे गरजेचे आहे. परंतु परिपत्रकात असे ही नमूद आहे की, अपवादात्मक परिस्थितीमध्ये विमा प्रस्तावा सोबत काही कागदपत्रे सादर करावयाची राहिल्यास पर्यायी कागदपत्रे/चौकशीच्या आधारे प्रस्तावावर निर्णय घेण्यात यावा. त.क.ने तिच्या प्रस्तावा सोबत तलाठयाने दिलेल्या वारसाचा दाखला सादर केला होता. तसेच वयाच्या पुराव्याकरिता मयताचे निवडणूक ओळखपत्र सादर केले होते. वास्तविक विमा कंपनीने सदर पर्यायी कागदपत्रांचा विचार करुन निर्णय घेणे आवश्यक होते. परंतु वि.प. 1 ने प्रस्ताव उशिराने दाखल केला व कागदपत्र दिली नाही या तांत्रिक कारणावरुन त.क.चा विमा दावा नामंजूर केल्याचे दिसून येते. शासनाच्या परिपत्रकात अशा प्रकारच्या तांत्रिक कारणावरुन त.क.चा विमा प्रस्ताव नामंजूर करु नये असे ही नमूद केले आहे. अशा परिस्थितीत तक्रारकर्तीस विमा दावा उशिरा सादर केल्याबाबत दोष देता येणार नाही. म्हणून वि.प.क्रं. 1 ने तांत्रिक कारणावरुन त.क.चा विमा दावा नाकारणे ही वि.प.क्रं. 1 च्या सेवतेतील त्रुटी आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे.
- तक्रारकर्तीचे पती मृत्युच्या समयी शेतकरी होते व त्यांचा नदिच्या पाण्यात बुडून अपघाती मृत्यु झाला. शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु हा अपघाती मृत्यु आहे व तो विरुध्द पक्ष 1 कडे शासनाने उतरविलेल्या विमा कालावधीत झालेला आहे व विरुध्द पक्ष 1 ने शेतक-याचा अपघाती मृत्यु झाल्यास रुपये 1 लाख देण्याची हमी घेतली असल्यामुळे तक्रारकर्ती ही अशोक तुकारामजी तळवेकर याची विधवा पत्नी या नात्याने विम्याची रक्कम मिळण्यास हक्कदार आहे व विरुध्द पक्ष 1 ती देण्यास बांधिल आहे या निष्कर्षा प्रत मंच येते. तसेच केवळ तांत्रिक कारणावरुन त.क.चा विमा दावा नाकारल्यामुळे त.क. प्रस्तुत तक्रार मंचात दाखल केल्याच्या तारखेपासून द.सा.द.शे. 9 टक्के दराने सदर रक्कमेवर व्याज मिळण्यास हक्कदार आहे असे मंचाचे मत आहे. तसेच तक्रारकर्तीचा विरुध्द पक्ष 1 ने अयोग्य पध्दतीने विमा दावा नाकारल्यामुळे तिला निश्चितच मानसिक व शारीरिक त्रास झाल्याचे आढळून येत. म्हणून त.क. शारीरिक, मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई रुपये 5000/- व तक्रारीचा खर्च रुपये 3000/- मिळण्यास हक्कदार आहे, या निष्कर्षा प्रत मंच येते. म्हणून वरील मुद्दयाचे उत्तर त्याप्रमाणे देण्यात येते.
वरील निष्कर्षास अनुसरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे. आदेश 1 तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. 2 विरुध्द पक्ष क्रं. 1 यांनी तक्रारकर्तीला शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजने अंतर्गत मिळणा-या लाभाची रक्कम रु.1,00,000/- व त्यावर सदर तक्रार दाखल केल्याच्या तारखेपासून द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याजसह रक्कम आदेशाची प्रत प्राप्त झाल्याच्या तारखेपासून 30 दिवसाच्या आत द्यावी. 3 विरुध्द पक्ष 1 ने तक्रारकर्तीला शारीरिक, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रुपये 5,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 3000/- द्यावे. 4 विरुध्द पक्ष क्रं. 2, 3 व 4 यांना रक्कम देण्याच्या दायित्वातून मुक्त करण्यात येते. 5 मा.सदस्यांच्या ‘ब’ व ‘क’ फाईल्स संबंधितांनी परत घेवून जाव्यात. 6 निकालपत्राच्या प्रति सर्व संबंधित पक्षांना माहितीस्तव व उचित कार्यवाही करिता पाठविण्यात याव्यात . दि. 21.03.2017 | |