ग्राहक तक्रार अर्ज क्र.235/2011
तक्रार अर्ज दाखल दि.21/10/2011
अंतीम आदेश दि.27/02/2012
नाशिक जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, नाशिक
श्री.तान्हाजी खंडेराव जोंधळे, अर्जदार
उ.व.35 वर्षे, धंदा-शेती,व्यापार (अँड.पी.एम.घुलेपाटील)
रा.जऊळके, ता.दिंडोरी, नाशिक.
विरुध्द
न्यु इडिया इन्शुरन्स कं.लि. सामनेवाला
वासन हाऊस, मुंबई नाका, . (अँड.सी.डी.कुलकर्णी)
नाशिक.
(मा.अध्यक्ष, श्री.आर.एस.पैलवान यांनी निकालपत्र पारीत केले)
नि का ल प त्र
अर्जदार यांना टेम्पोचे नुकसानीपोटी सामनेवाला यांचेकडून रक्कम रु.50,000/-चा क्लेम मंजूर व्हावा, मानसिक त्रासापोटी रु.10,000/- मिळावेत, अर्जाचे खर्चापोटी रु.5000/- मिळावेत, या मागणीसाठी अर्जदार यांचा अर्ज आहे.
सामनेवाला यांनी पान क्र.22 लगत लेखी म्हणणे, पान क्र.29 लगत प्रतिज्ञापत्र दाखल केलेले आहे.
अर्जदार व सामनेवाला यांनी दाखल केलेले सर्व कागदपत्रांचा विचार होवून पुढील प्रमाणे मुद्दे विचारात घेतलेले आहेत.
मुद्देः
1) अर्जदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत काय? - होय.
2) सामनेवाला यांनी अर्जदार यांना सेवा देण्यात कमतरता केली आहे
काय?- होय.
3) अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून विमाक्लेमपोटी व्याजासह रक्कम
वसूल होवून मिळण्यास पात्र आहेत काय?- होय.
4) अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून मानसिक त्रासापोटी व अर्जाचे
तक्रार क्र.235/2011
खर्चापोटी रक्कम वसूल होवून मिळण्यास पात्र आहेत काय?- होय.
5) अंतीम आदेश?- अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला यांचेविरुध्द
अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
विवेचन
या कामी अर्जदार यांनी पान क्र.39 लगत लेखी युक्तीवाद सादर केलेला आहे.तसेच सामनेवाला यांनी पान क्र.37 लगत लेखी युक्तीवाद सादर केलेला आहे.
सामनेवाला यांनी त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रामध्ये, त्यांनी अर्जदार यांचे टेम्पोबाबत विमा पॉलिसी दिली होती ही बाब मान्य केलेली आहे. अर्जदार यांनी या कामी पान क्र.14 लगत विमापॉलीसी सर्टिफिकेट हजर केलेले आहे. पान क्र.14 चे कागदपत्रे व सामनेवाला यांचे लेखी म्हणणे याचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे.
सामनेवाला यांनी त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रामध्ये “अपघाताचे वेळी टेम्पो ड्रायव्हर रतन कारभारी आहेर यांचेजवळ टेम्पो ड्रायव्हींग करण्याचा योग्य तो परवाना नव्हता म्हणून सामनेवाला यांनी क्लेम नाकारलेला आहे. त्याबाबत अर्जदाराला सामनेवाला विरुध्द कोणतीही मागणी करण्याचा अधिकार नाही. सेवा देण्यात कमतरता केलेली नाही.” असे म्हटलेले आहे.
या कामी अर्जदार यांनी पान क्र.27 लगत वाहनचालकाचे लायसन्सची झेरॉक्स प्रत हजर केलेली आहे. या लायसन्सवरती लाईट मोटर व्हेयीकल ट्रान्सपोर्ट असा शेरा आहे. तसेच सदरचे लायसन्सवर नॉन ट्रान्सपोर्ट व्हॅलीड टिल दि.01/06/2016 व टान्सपोर्ट दि.13/02/2014 असे नमूद आहे. तसेच अर्जदार यांनी पान क्र.26 लगत वाहनाचे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट दाखल केलेले आहे. यामध्ये वाहनाचा प्रकार लाईट मोटार व्हेयीकल असाच दिलेला आहे.
सामनेवाला यांनी पान क्र.34 लगत अर्जदार यांचे ड्रायव्हर यांचे ड्रायव्हींग लायसन्सबाबत आर टी ओ नासिक यांनी दिलेला दाखला हजर केलेला आहे. यामध्येही नॉन ट्रान्सपोर्ट लायसन्स दि.01/06/2016 पर्यंत व्हॅलिड आहे व ट्रान्सपोंर्ट लायसन्स दि.13/03/2014 पर्यंत व्हॅलिड आहे असा उल्लेख आहे.
पान क्र.27 चे ड्रायव्हींग लायसन्स व पान क्र.26 चे रजिस्ट्रेशन आर सी बुक व पान क्र.34 लगतचा आर टी ओ यांचा दाखला याचा एकत्रीतरित्या विचार करीता अपघाताचे वेळी अपघातग्रस्त वाहनाचे ड्रायव्हर यांना वाहन चालविण्याचा योग्य तो परवाना होता ही बाब स्पष्ट होत आहे. वरील सर्व कारणांचा विचार होता सामनेवाला यांनी अर्जदार यांचा विमा क्लेम अयोग्य व चुकीचे कारण देवून
तक्रार क्र.235/2011
नाकारलेला आहे त्यायोगे सामनेवाला यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केलेली आहे असे या मंचाचे मत आहे.
अर्जदार यांनी सामनेवाला यांचेकडून वाहनाचे नुकसान भरपाईपोटी रक्कम रु.50,000/- मिळावेत अशी मागणी केलेली आहे. सामनेवाला यांनी या कामी सर्वे रिपोर्ट दाखल केलेला नाही. अर्जदार यांनी पान क्र.10 ते 13 लगत एकूण रक्कम रु.27,466/- रुपयांचे वाहन दुरुस्तीच्या खर्चाची बिले झेरॉक्स प्रती दाखल केलेल्या आहेत. ही कागदपत्रे सामनेवाला यांनी स्पष्ट पणे नाकारलेली नाहीत. पान क्र.10 ते पान क्र.13 लगतच्या बिलांचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून विमाक्लेमपोटी रक्कम रु.27,466/- अशी रक्कम वसूल होवून मिळण्यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.
सामनेवाला यांचेकडून अर्जदार यांना रक्कम रु.27,466/- इतकी मोठी रक्कम योग्य त्या वेळेत मिळालेली नाही. यामुळे अर्जदार यांना निश्चीतपणे आर्थीक नुकसान सहन करावे लागले आहे. याचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून आर्थीक नुकसान भरपाई म्हणून मंजूर रक्कम रु.27,466/- या रकमेवर क्लेम नाकारल्याचे पान क्र.7 चे पत्राची तारीख दि.23/06/2011 पासून संपुर्ण रक्कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.9 टक्के दराने व्याज मिळण्यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.
याबाबत मंचाचे वतीने पुढीलप्रमाणे वरीष्ठ कोर्टाचे निकालपत्रांचा आधार घेतलेला आहे.
1) 2 (2008) सी.पी.जे. राष्ट्रीय आयोग. पान क्र.186. ओरीएंन्टल इंन्शुरन्स कंपनी विरुध्द राजेंद्रप्रसाद बंन्सल.
2) 1 (2008) सी.पी.जे. राष्ट्रीय आयोग. पान क्र.265. संजीवकुमार विरुध्द न्यु इंडिया इंन्शुरन्स कंपनी.
सामनेवाला यांचेकडून विमाक्लेमची रक्कम वसूल होवून मिळावी म्हणून अर्जदार यांना सामनेवाला यांचेविरुध्द या मंचामध्ये दाद मागावी लागली आहे. वरील सर्व कारणामुळे निश्चीतपणे अर्जदार यांना मानसिक त्रास सहन करावा लागलेला आहे व तक्रार अर्ज दाखल करण्यासाठी खर्चही करावा लागलेला आहे. याचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून मानसिक त्रासापोटी रु.3500/- व अर्जाचे खर्चापोटी रु.1000/- अशी रक्कम वसूल होवून मिळण्यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.
तक्रार क्र.235/2011
सामनेवाला यांनी या कामी 2012 (1) टी ए सी हिमाचल प्रदेश उच्च न्यायालय पान 172 ओरीएंटल इन्शुरन्स कं लि. विरुध्द दयालसिंग व इतर हे वरीष्ठ कोर्टाचे निकालपत्र सादर केलेले आहे परंतु या वरीष्ठ कोर्टाचे निकालपत्रामधील हकिकत व प्रस्तुतचे तक्रार अर्जामधील हकिकत यामध्ये फरक आहे. प्रस्तुत तक्रार अर्जामध्ये पान क्र.26 नुसार वादातील वाहन हे लाईट मोटार व्हेयीकलच आहे हे स्पष्ट झालेले आहे. यामुळे सामनेवाला यांनी दाखल केलेले व वर उल्लेख केलेले वरीष्ठ कोर्टाचे निकालपत्र या कामी लागु होत नाही.
अर्जदार यांनी या कामी पान क्र.40 लगत मोटार व्हेयीकल कायदा कलम 1988 मधील कलम 14, कलम 2, कलम 3, याबाबत झेरॉक्स प्रत हजर केलेली आहे. त्याचा आधार या कामी घेतलेला आहे.
अर्जदार यांचा अर्ज, प्रतिज्ञापत्र, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, लेखी युक्तीवाद तसेच सामनेवाला यांचे लेखी म्हणणे, प्रतिज्ञापत्र, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, लेखी युक्तीवाद, मंचाचे वतीने आधार घेतलेली वरीष्ठ कोर्टाची निकालपत्रे आणि वरील सर्व विवेचन यांचा विचार होऊन पुढीलप्रमाणे आदेश करण्यात येत आहेः
आ दे श
1) अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला यांचे विरुध्द अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2) आजपासून 30 दिवसांचे आंत सामनेवाला यांनी अर्जदार यांना पुढीलप्रमाणे रकमा द्याव्यातः
अ) विमा क्लेमपोटी रक्कम रु.27,466/- व आर्थीक नुकसान भरपाई
म्हणून या मंजूर रकमेवरती दि.23/06/2011 पासून संपुर्ण रक्कम
फिटेपर्यंत द.सा.द.शे.9 टक्के दराने व्याज द्यावे.
ब) मानसिक त्रासापोटी रु.3500/- द्यावेत.
क) अर्जाचे खर्चापोटी रु.1000/- द्यावेत
(आर.एस.पैलवान) (अँड.सौ.व्ही.व्ही.दाणी)
अध्यक्ष सदस्या
ठिकाणः- नाशिक.
दिनांकः-27/02/2012