नि.20
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – श्री ए.व्ही.देशपांडे
मा.सदस्य - श्री के.डी.कुबल
ग्राहक तक्रार अर्ज क्र. 464/2010
तक्रार नोंद तारीख : 09/09/2010
तक्रार दाखल तारीख : 13/09/2010
निकाल तारीख : 29/06/2013
----------------------------------------------
सौ.शोभाराणी मल्लिकार्जुन दिंडवार
वय वर्षे 45, धंदा – नोकरी,
रा.संख, ता.जत,
जि.सांगली. ....... तक्रारदार
विरुध्द
दि न्यू इंडिया एशोरन्स कं.लि.
तर्फे शाखाधिकारी,
श्री सिध्दिविनायक कॉम्प्लेक्स, टाटा पेट्रोल पंपाजवळ,
मिरज-सांगली रोड, सांगली. ...... जाबदार
तक्रारदार तर्फे : अॅड पी.सी.कोरे.
जाबदारतर्फे : अॅड श्री के.ए.मुरचिटे
- नि का ल प त्र -
द्वारा: मा. अध्यक्ष: श्री. ए.व्ही.देशपांडे
1. प्रस्तुत तक्रार, वर नमूद तक्रारदाराने जाबदारविरुध्द, ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12 अन्वये, जाबदाराने दिलेल्या दूषित सेवेबद्दल दाखल केलेली आहे.
2. थोडक्यात हकीकत अशी की, तक्रारदाराने तीने मौजे संख, ता.जत जिल्हा सांगली येथे प्राथमिक आरोग्य केंद्र संख याचे नजीक एक किराणा स्टेशनरी दुकान सुरु केले होते. सदर किराणा व स्टेशनरी दुकानामध्ये असलेल्या मालाचा तिने विमा काढला होता. सदर विमा जाबदार कंपनीकडून काढण्यात आलेला होता. सदरचे दुकान तक्रारदाराचे पती चालवित होते. दुकानामध्ये रक्कम रु.3 लाख पेक्षा जास्त किंमतीचा माल होता. सदर मालावर जाबदार यांचेकडे फायर इन्शुरन्स घेतला होता. सदर विमा 2004-05 सालापासून विविध पॉलिसी क्रमांकाने दि.23/12/08 पर्यंत होता. दि.24/12/07 ते 23/12/08 पर्यंतचा पॉलिसीचा क्रमांक 163301/48/07/00666 असा होता. सदर फायर इन्शुरन्स पॉलिसीचे हप्ते वेळेत व मुदतीत भरले होते. विमा उतरवून घेताना जाबदार विमा कंपनीने सदर किराणा व स्टेशनरी दुकानाचे व दुकानात असलेल्या मालाचे निरिक्षण व पाहणी करुन विमा उतरविला होता. दुकानात असलेल्या मालाचे स्टॉक स्टेटमेंट जाबदार कंपनीने तक्रादाराकडून घेतले होते. दि.3/9/08 रोजी रात्री 9.30 वा. सदर किराणा व स्टेशनरी दुकानास आग लागली व त्या आगीत दुकानात असलेला रक्कम रु.3 लाख पेक्षा जास्त किंमतीचा माल आगीत भस्मसात होवून नष्ट झाला. सदर आगीबद्दल तक्रारदाराने उमदी ता.जत जि.सांगली येथील पोलीस स्टेशनकडे रितसर फिर्याद दिली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा देखील केला. सदर घटनेबद्दल जाबदार विमा कंपनीला तक्रारदाराने त्वरित कळविले होते व आगीपासून झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई देण्यास लेखी व तोंडी कळविले होते. तथापि जाबदार विमा कंपनीने आजतागायत विम्याची रक्कम दिलेली नाही. दि.1/7/10 रोजी तक्रारदाराने जाबदार विमा कंपनीस नोटीस पाठवून नुकसान भरपाई मागितली तथापि त्यास खोटया मजकुराची उत्तरी नोटीस देवून आजतागायत तक्रारदारास झालेल्या नुकसानीची भरपाई जाबदार विमा कंपनीने दिलेली नाही. दि.3/8/09 रोजी रात्री 9.30 चे सुमारास तक्रारदार याचे किराणा व स्टेशनरी दुकानातील मालास आग लागून तक्रारदारांचे रु.3 लाखापेक्षा जास्त नुकसान झाले आहे. सदर मालाचा विमा उतरविला असतानाही व सदर पॉलिसी घटनेच्या दिवशी चालू असतानाही जाबदार यांनी नुकसान भरपाई देण्यास नकार दिला, त्या दिवशी दाव्यास कारण घडले व तेव्हापासून नित्य रोज घडत आहे. अशा कथनांवरुन तक्रारदाराने सदर किराणा व स्टेशनरी दुकानातील मालाची विम्याची रक्कम रु.3 लाख नुकसान भरपाई म्हणून जाबदार विमा कंपनीने द्यावी तसेच तक्रारदार यास आर्थिक व मानसिक त्रास दिल्याबद्दल रक्कम रु.1.50 लाख तक्रारदारास द्यावेत व या अर्जाचा खर्च रु.4,000/- तक्रारदारास द्यावेत असा आदेश व्हावा अशी विनंती केली आहे.
3. प्रस्तुत तक्रारीसोबत तक्रारदाराने नि.3 ला आपले शपथपत्र दाखल करुन नि.5 सोबत संबंधीत विमा पॉलिसी, दि.1/7/10 ची नोटीस, दि.22/7/10 ची जाबदार विमा कंपनीने पाठविलेली उत्तरी नोटीस यांच्या प्रती सादर केल्या आहेत.
4. जाबदार विमा कंपनीने हजर होवून आपली कैफियत नि.11 ला दाखल केली आहे व तक्रारअर्जातील संपुर्ण कथन अमान्य केले आहे. जाबदारचे कथनाप्रमाणे तक्रारदार यांनी जाबदार विमा कंपनीकडे मौजे संख ता.जत जि.सांगली येथील अ वर्ग इमारतीमधील दुकानातील किराणा मालासाठी पॉलिसी क्र.153301/48/07/34/00000667 अन्वये दि.24/12/07 ते 28/12/08 या कालावधीकरिता विमा उतरविला होता. विमा उतरवितेवेळी तक्रारदार यांनी त्यांच्या व्यवसायाचे दुकान हे ‘अ वर्ग ’ इमारतीमधील म्हणजे आर.सी.सी.स्वरुपातील असल्याचे सांगून शॉपिकिपर्स पॉलिसी जाबदार विमा कंपनीकडून घेतली. सदर पॉलिसीच्या अटी व शर्तीनुसार विमाकृत माल हा अ वर्ग इमारतीत ठेवणे आवश्यक आहे याची स्पष्ट कल्पना तक्रारदार यांना दिलेली होती. तथापि आगीचे सूचनेप्रमाणे सर्व्हेअर सच्छिदानंद पुजारी यांनी घटनास्थळी लगेचच भेट दिली असता त्यावेळी तथाकथित आग लागल्याचे ठिकाण हे 8 x 10 मापाचे पत्र्याचे व तकलादू शेड असल्याचे स्पष्ट दिसून आले. अशा प्रकारच्या पत्र्याच्या शेडमधील कोणत्याही मालाची जबाबदारी विमा पॉलिसीच्या अटीनुसार जाबदार विमा कंपनीवर येत नाही. तक्रारदार यांनी जाबदार यांना खोटी माहिती देवून त्या आधारे विमा पॉलिसी घेवून जाबदार यांची फसवणूक केली आहे व विमा पॉलिसीच्या महत्वाच्या अटीचा तक्रारदार यांनी भंग केला आहे. या कारणास्तव प्रस्तुत तक्रार चालू शकत नाही. सबब अ वर्ग इमारतीमध्ये विमाकृत माल न ठेवल्याचे कारणास्तव जाबदार विमा कंपनीने तक्रारदार यांचा विमादावा नाकारला आहे, तो योग्य व रास्त आहे. तक्रारदारांनी केवळ किराणा मालाचा विमा जाबदार विमा कंपनीकडे उतरविलेला होता तथापि तक्रार अर्जात नमूद केलेप्रमाणे किराणा मालासोबत इतर स्टेशनरी माल देखील सदर दुकानात ठेवलेला असल्याने व स्टेशनरी मालाचा समावेश किराणा मालात होत नसल्याने स्टेशनरी व इतर मालाची जबाबदारी जाबदार विमा कंपनीवर येवू शकत नाही. तक्रारदार यांनी विमा कंपनीकडून रक्कम उकळण्याच्या हेतूने खोटी तक्रार दाखल केली आहे. तक्रारदारांनी त्यांच्या दुकारात शॉप अॅक्ट अन्वये लायसेन्स घेणे आवश्यक होते, तसे न केल्याने व त्या कायदेशीर बाबींची पूर्तता न केल्याने तो व्यवसाय कायदेशीर व योग्य नव्हता व ही बाब विमा पॉलिसीच्या अटींचा भंग असल्याने देखील तक्रारदाराचा विमादावा जाबदार विमा कंपनीने नाकारला आहे. सर्व्हेअर यांनी तक्रारदाराकडून घेतलेली कागदपत्रे चार्टर्ड अकाऊंटंट श्री कुंभोजकर यांनी तपासून पाहिली असता असे दिसून आले की, तक्रारदारांनी त्यांच्या दुकानात असलेल्या तथाकथित मालासंबंधीचे दाखल केलेले नफा तोटा खाते, बॅलन्स शीट इ. वर कोणाही चार्टर्ड अकाऊंटंट यांच्या सहया नाहीत. तक्रारदार यांचे हिशेब व बँक खाते यांचा मेळ लागत नाही तसेच तक्रारदार यांनी सादर केलेली तथाकथित माल खरेदीची बिले, विक्री पावत्या इ. लेटर पॅडवर असल्याचे दिसून आले. त्यावरुन तक्रारदारांनी पश्चात बुध्दीने सदरची कागदपत्रे तयार करुन घेतल्याचे दिसते. या कारणास्तव तथाकथित झालेल्या मालाचा हिशेब सर्व्हेअर व चार्टर्ड अकाऊंटंट यांना मिळून आला नाही. उपलब्ध माहितीनुसार सर्व्हेअर यांनी जळीतमध्ये नुकसान झालेल्या मालाची मोजदाद केली व त्याचा अहवाल सादर केला. त्यानुसार झालेल्या मालाची किंमत एकूण रु.41,000/- इतकी होते. विमा पॉलिसीच्या अटीनुसार नुकसानीची देय रक्कम रु.10,000/- नुकसानीच्या रकमेतून सर्व्हेअर यांनी योग्य व रास्त वजावट केली आहे. तक्रारदार यांनी जाणीवपूर्वक उपलब्ध मालाचे रेकॉर्ड दिलेले नसल्याने मोजदाद केलेल्या नुकसानीच्या रकमेपैकी 15 टक्के रक्कम वजा करुन जास्तीत जास्त झालेली नुकसानीची रक्कम रु.41,000/- इतकी सर्व्हे रिपोर्टमध्ये नमूद केली आहे. प्रस्तुत प्रकरणात पॉलिसीच्या अटी व शर्तींचा भंग झालेला नाही असे या मंचाचे मत झाल्यास रक्कम रु.41,000/- व्यतिरिक्त कोणतीही रक्कम मागण्याचा तक्रारदार यांना अधिकार नाही. सर्व्हेअर यांचा रिपोर्ट तक्रारदार यांचेवर बंधनकारक आहे. तक्रारदार यांनी गैरफायदा घेण्याच्या हेतूने खोटया रकमेची, खोटया मजकुराची खोटी कागदपत्रे तयार करुन भरमसाठ नुकसानीची रक्कम मागणी केली आहे, ती जाबदारांना मान्य नाही. तक्रारदारांनी जाबदार विमा कंपनीकडून रक्कम उकळण्याच्या हेतूने खोटी व मोघम विधाने केली आहे. तक्रारदार यांना विमा पॉलिसीचा गैरफायदा घेण्याचा कोणताही अधिकार नाही. तक्रारदाराची तथाकथित नुकसानीची मागणी चुकीची, काल्पनिक व खोटी आहे. त्यामुळे तक्रारदारास कोणतीही रक्कम देण्यास विमा कंपनी जबाबदार नाही. अशा कथनांवरुन जाबदार विमा कंपनीने संपूर्ण तक्रार खर्चासह फेटाळून लावावी अशी मागणी केली आहे.
5. जाबदारांनी आपल्या लेखी कैफियतीच्या पुष्ठयर्थ जाबदार विमा कंपनीने विभागीय व्यवस्थापक यांचे शपथपत्र दाखल केले असून नि.12 या फेरिस्त सोबत संबंधीत विमा पॉलिसी सर्व्हेअर यांचे दि.18/3/2009 चा रिपोर्ट, त्यांचे दि.18/2/09 चे पत्र, चार्टर्ड अकाऊंटंट श्री कुंभोजकर यांचा दि.18/2/09 चा रिपोर्ट व वाद मिळकतीचे जळीताचे एकूण 6 फोटो दाखल केले आहेत.
6. तक्रारदाराने आपले सरतपासाचे शपथपत्र नि.13 ला दाखल केले असून आपली लेखी युक्तिवाद नि.14 ला दाखल केला आहे. जाबदार विमा कंपनीकडून कोणताही पुरावा दाखल करण्यात आलेला नाही. तथापि जाबदार विमा कंपनीने आपला लेखी युक्तिवाद नि.15 ला दाखल केला आहे. दोन्ही पक्षकारांच्या विद्वान वकीलांनी आपला मौखिक युक्तिवाददेखील सादर केला आहे.
7. प्रस्तुत प्रकरणी खालील मुद्दे आमच्या निष्कर्षाकरिता उपस्थित होतात.
मुद्दे उत्तरे
1. तक्रारदार हे जाबदार विमा कंपनीचे ग्राहक होतात काय ? होय.
2. जाबदेणार विमा कंपनीने त्यास दूषित सेवा दिली हे तक्रारदाराने
शाबीत केले आहे काय ? होय.
3. तक्रारदारास अर्जात मागणी केल्याप्रमाणे रक्कम मिळणेस तो
पात्र आहे काय ? होय.
4. अंतिम आदेश खालीलप्रमाणे.
8. आमच्या वरील निष्कर्षांची कारणे खालीलप्रमाणे आहेत.
- कारणे -
मुद्दा क्र.1
9. प्रस्तुत प्रकरणात तक्रारदाराने आपले दुकानाचा विमा, जाबदार विमा कंपनीकडे उतरविलेला होता व ती विमा पॉलिसी, घटनेच्या दिवशी म्हणजे दि.03/09/2008 रोजी अस्तित्वात होती, ही बाब जाबदाराने मान्य केली आहे. तसेच सदर आगीत झालेल्या नुकसानीकरीता, तक्रारदाराने विमा दावा दाखल केला होता व तो विमा दावा, जाबदाराने नाकारला होता, ही बाबदेखील जाबदारांनी मान्य केली आहे. हयावरुन तक्रारदार ही जाबदार विमा कंपनीची ग्राहक होते व जाबदार विमा कंपनी सेवा देणारी होते ही बाब आपोआप सिध्द होते. करीता वर नमूद मुद्दा क्र.1 हयाचे उत्तर होकारार्थी द्यावे लागेल. तसे ते आम्ही दिलेले आहे.
मुद्दा क्र.2
10. हे वर नमूद केलेच आहे की, तक्रारदाराने दाखल केलेला विमा दावा जाबदार विमा कंपनीने नाकारलेला आहे. जाबदार विमा कंपनीचे म्हणणेप्रमाणे शॉपकिपर्स पॉलिसीचे अटी व शर्थींप्रमाणे विमाकृत माल “अ” वर्ग इमारतीमध्ये ठेवणे आवश्यक असतांना तक्रारदाराने तो 8 x 10 फूट मापाच्या तात्पुरत्या व तकलादू शेडमध्ये ठेवले असल्याचे निदर्शनास आल्याने तक्रारदाराचा विमा दावा नाकारण्यात आला होता व तो रास्त व योग्य आहे. जाबदारांचे दुसरे म्हणणे असेही आहे की, तक्रारदारांनी केवळ दुकानातील किराणा मालाचा विमा उतरविलेला होता पण तिच्या दुकानात स्टेशनरी मालही ठेवणेत आलेला होता. स्टेशनरी मालाची जबाबदारी विमा कंपनीवर येत नव्हती. तथापी केवळ विमा कंपनी कडून जास्त रकमा उकळण्याकरीता, तक्रारदाराने स्टेशनरी मालाच्या नुकसानीची देखील मागणी जाबदार कंपनीकडून केल्यानेदेखील सदर विमा दावा नाकारण्यात आलेला होता.
11. जाबदारांचे दुसरे कथन आधी विचारात घेता हे दिसते, जाबदारांनीच दाखल केलेल्या विमा पॉलिसीमध्ये (नि.12/1) तक्रारदाराचे किराणा दुकानात ठेवलेल्या सर्व मालाचा विमा जाबदार विमा कंपनीने उतरविलेला होता. त्यात किराणा सामान आणि स्टेशनरी सामान असा भेद करण्यात आलेला नव्हता. आग किंवा इतर कारणाने नुकसान झाल्यास रोख रक्कम आणि इतर मौल्यवान वस्तू सोडून दुकानात असणा-या सर्व स्टॉक इन ट्रेडची जबाबदारी विमा कंपनीने घेतल्याची विमा पॉलिसीचा परिच्छेद 1 ब वरुन दिसते. तसेच परिच्छेद 2 मध्ये देखील चोरी किंवा घरफोडी झाल्यास सदर दुकानात असणा-या सर्व वस्तूंची जबाबदारी विमा कंपनीने घेतल्याचे दिसते. त्यामुळे विमा कंपनीला आगीचे घटनेच्यावेळेला तक्रारदाराचे दुकानात किराणा मालाशिवाय स्टेशनरी सामानदेखील असल्याने विमा दावा स्विकारता येत नव्हता असे म्हणता येत नाही. करीता त्या कारणावरुन जर विमा दावा फेटाळला असेल तर तो विमा कंपनीने दिलेली अयोग्य / दूषीत सेवा आहे.
12. जाबदार विमा कंपनीचे पहिले कथन की, तक्रारदाराने विमाकृत वस्तू “अ” वर्ग इमारतीत ठेवलेल्या नव्हत्या व तीचे दुकान हे केवळ 8 x 10 फूट मोजमापाचे तात्पुरते शेड होते. त्यामुळे विमा पॉलिसीच्या अटीचा भंग झाल्याने विमा दावा फेटाळण्यात आला, हे म्हणणेदेखील योग्य वाटते. विमा पॉलिसीमध्ये कोठेही अशी अट नमूद नाही की, विमाधारक फक्त “अ” वर्ग इमारतीमध्येच विमाकृत माल ठेवू शकतो. जाबदार कंपनीने नि.12 सोबत शॉपकिपर्स पॉलिसीच्या अटी, शर्थी दाखल केलेल्या आहेत. त्यामध्ये भाग 1 मध्ये इमारत / विमाकृत मालासंबंधीचे काही प्रावधान आहे. त्यामध्ये सुरुवातीलाच इमारत ही फक्त “अ” वर्ग बांधकामाची असावी आणि इमारत किंवा त्यात ठेवलेल्या मालाची किंमत ही रु.10,00,000/- पेक्षा जास्त नसावी असे नमूद केले आहे. जाबदार विमा कंपनीतर्फे सदर वाक्यावर भर देण्यात आलेला आहे. तथापी, सदर अटी व शर्थींमधील कंसात लिहीलेले हे वाक्य विमा पॉलिसीची अट आणि शर्थ आहे किंवा नाही हे जाबदारतर्फे त्यांचे वकिलांनी स्पष्ट केलेले नाही. इथे ही बाब उल्लेखनीय आहे की, तक्रारदाराने आपले तक्रारअर्जात हे स्पष्टपणे नमूद केले आहे की, सदर दुकानाचा विमा तीने जाबदार विमा कंपनीकडे सतत आणि सलगपणे सन 2004-05 पासून उतरविलेला होता. ही बाब जाबदारांनी नाकारलेली नाही किंबहूना ती मान्यच केली आहे. तक्रारदाराचे दुकानाचे स्वरुप हे सुरुवातीपासून तसेच असावे हे गृहीत धरण्यास बराच वाव आहे. जाबदार विमा कंपनी किंवा तक्रारदाराची अशी कोठेही केस नाही की तक्रारदारांचे दुकान सुरुवातीला बांधीव इमारतीमध्ये होते परंतु काही काळानंतर ते आगीत भस्मसात झालेल्या छोटया शेडमध्ये सुरु करणेत आलेले होते. तसेच जाबदार कंपनीने असा कोणताही पुरावा हया मंचासमोर आणलेला नाही, जो हे शाबित करेल की विमा पॉलिसी घेताना तक्रारदाराने आपले दुकान “अ” वर्ग इमारतीमध्ये सुरु असल्याचे विमा कंपनीला कळविले होते व तसे कळवून विमा कंपनीची फसगत तक्रारदाराने केलेली होती. उलटपक्षी तक्रारदारांचे असे स्पष्ट कथन आहे की विमा उतरविताना जाबदार विमा कंपनीने तिच्या दुकानाची पहाणी करुन विमा उतरविलेला होता. मग जर असे असेल तर आणि जरी तक्रारदाराचे दुकान एका 8 x 10 फूटाच्या साध्या शेडमध्ये होते तरी जाबदार विमा कंपनीने त्याचा विमा उतरविलेला होता व त्याचे वेळोवेळी नूतनीकरण केले होते, तर विमा कंपनीला आता असे म्हणता येत नाही की तक्रारदाराचे दुकान व त्यातील विमाकृत माल “अ” वर्ग इमारतीमध्ये नसलेने तक्रारदाराचा विमा दावा विमा कंपनीने योग्य कारणास्तव फेटाळलेला आहे. जाबदाराचे विद्वान वकिलांनी आपले युक्तिवादादरम्यान हे कबूल केले की विमा उतरविताना तक्रारदाराचे दुकानाची पहाणी केलेली नव्हती आणि तक्रारदाराच तात्पुरत्या शेडमध्ये असलेल्या दुकानाचा विमा सातत्याने उतरवित गेल्याने जाबदार विमा कंपनीला तक्रारदाराचा विमा दावा तिचे दुकान “अ” वर्ग इमारतीमध्ये नसल्याचे कारणावरुन फेटाळता येवू शकत नव्हता. हयावरुन हे सिध्द होते की जाबदार विमा कंपनीने तक्रारदाराचा विमा दावा अयोग्य कारणावरुन फेटाळून लावलेला आहे व त्यायोगे तक्रारदारास दूषीत सेवा दिली आहे. सबब, तक्रारदाराने तीस जाबदार विमा कंपनीने दूषीत सेवा दिलेचे शाबित केले आहे असे या मंचाचे मत आहे.
13. जाबदार विमा कंपनीने आपल्या लेखी कैफियतीत तक्रारदाराचा विमा दावा फेटाळण्याकरीता आणखीन काही कारणांचा उल्लेख केलेला आहे. जसे की, तक्रारदाराच्या दुकानाच्या हिशेबाच्या वहया चार्टर्ड अकाऊंटंट कडून पडताळून पाहिल्या नव्हत्या. सादर केलेली कागदपत्रे, किंमती व सर्व्हेअरने पहाणी करुन दाखल केलेल्या अहवालात नुकसानीची रक्कम हयात तफावत असलेने तक्रारदाराचा विमा दावा फेटाळून लावण्यात आला होता. एकतर विमा कंपनीने सदरचा सर्व्हेअर हया याकामी साक्षीदार म्हणून तपासलेले नाही किंवा त्याचे शपथपत्र दाखल केलेले नाही. त्यामुळे त्याने दाखल केलेला तथाकथीत अहवाल या प्रकरणीत शाबित झालेला नाही. दुसरे असे की, हया सर्व गोष्टींचे पालन करावे लागेल अशी अट व शर्थ तक्रारदारास समजावून सांगण्यात आली होती व तिने ती मान्य केली होती असा कोणताही पुरावा जाबदार विमा कंपनीने प्रस्तुत प्रकरणात दिलेला नाही. तक्रारदाराने दाखल केलेल्या विमा पॉलिसीच्या प्रतीमध्ये हया अटींचा उल्लेख नाही. हया तथाकथीत अटी व शर्थी जाबदार विमा कंपनीने नि.12 सोबत दाखल केलेल्या कागदपत्रांत दिसून येतात. परंतु त्या अटी व शर्थी तक्रारदारास समजावून सांगण्यात आल्या होत्या व तिने त्या मान्य केलेल्या होत्या हे शाबित करणारा कोणताही पुरावा हया प्रकरणात जाबदार विमा कंपनीने दाखल केलेला नाही. सबब हया सर्व बाबी दोन्ही पक्षातील कराराचा भाग होवू शकत नाहीत. विमा पॉलिसीच्या अटी व शर्थी स्वतःचे ताब्यात ठेवून त्या विमा पॉलिसीधारकांना न दाखवता, न समजावून सांगता व त्यांची मान्यता न घेता सदर अटी व शर्थी विमाधारकावर बंधनकारक आहेत आणि त्यांचे पालन न केलेस विमा दावा फेटाळून लावता येतो असे जाबदार विमा कंपनीस म्हणता येत नाही. त्यामुळे सदर कारणावरुन जर तक्रारदाराचा विमा दावा फेटाळून लावला असेल तर ती एकप्रकारे तक्रारदारास दिलेली दूषीत सेवा आहे असे या मंचाचे मत आहे. सबब, तक्रारदाराचा विमा दावा अयोग्य कारणावरुन फेटाळून तिला दूषीत सेवा दिलेचे शाबित झाले आहे असे या मंचाचे मत झालेने मुद्दा क्र.2 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
मुद्दा क्र.3 व 4
14. तक्रारदाराने आगीचे घटनेत तिचे एकूण रु.3,00,000/- पेक्षा जास्त माल आगीत भस्मसात झालेने नुकसान झाल्याबद्दल तेवढया रकमेचा विमा दावा जाबदार विमा कंपनीकडे दाखल केला होता असे कथन केलेले आहे, ही बाब जाबदार विमा कंपनीने नाकारलेली नाही. तथापी तो दावा जाबदार विमा कंपनीने फेटाळला आहे असे म्हटलेले आहे. जाबदार विमा कंपनीने वैकल्पिकरित्या सर्व्हे रिपोर्टवर अवलंबून राहून तक्रारदाराचे जास्तीत जास्त नुकसान रु.41,000/- झाले आहे असे आपल्या कैफियतीमध्ये नमूद केले आहे. सदर विधान जाबदार विमा कंपनीने सर्व्हेअरला तपासून शाबित केलेले नाही. सर्व्हेअरचा अहवाल व त्याने घटनास्थळाचे काढलेले फोटो हयाकामी नि.12 सोबत जाबदार विमा कंपनीने दाखल केलेले आहेत. तथापी, योग्य त्या पुराव्याअभावी व त्या दस्तऐवजांच्या शाबितीकरणाअभावी ही कागदपत्रे विचारात घेता येत नाहीत. तक्रारदाराचे दुकानामध्ये किराणा माल व स्टेशनरी माल घटनेवेळी होता व तो आगीत जळून भस्मसात झाला तसेच त्या दुकानाची शेडदेखील भस्मसात झाली ही बाब जाबदार विमा कंपनीने नाकारलेली नाही. जाबदाराच्या लेखी कैफियतीतून असे दिसते की घटनास्थळी तक्रारदाराचे दुकानात एक जळालेला डि.व्ही.डी.प्लेअर देखील होता. याचा अर्थ तक्रारदाराचे दुकानामध्ये किराणामालाशिवाय व स्टेशनरी मालाशिवाय इलेक्ट्रिक वस्तूदेखील होत्या. अशा परिस्थितीत तक्रारदाराचे कथन की तिचे एकूण नुकसान रु.3,00,000/- इतके झाले हे स्वाभाविक व विश्वासार्ह वाटते. त्यामुळे तक्रारदाराचे कथनावर विसंबून ही बाब शाबित झालेल्या निष्कर्षाप्रत हे मंच आलेले आहे. सबब, तक्रारदाराची जाबदार विमा कंपनीकडून रु.3,00,000/- झालेल्या नुकसानीची मागणी शाबित झालेली आहे असे आमचे मत झाले आहे.
15. तक्रारदाराने तिचा विमा दावा विमा अयोग्य कारणाकरीता फेटाळलेने तिला मानसिक व शारिरिक त्रास झालेचे कथन करुन तिने रु.1,50,000/- ची मागणी केलेली आहे. तसेच या तक्रारअर्जाचा खर्च रु.4,000/- ची मागणी जाबदारकडून केलेली आहे. प्रस्तुत प्रकरणातील एकूण परिस्थितीचा विचार करता तक्रारदाराची रु.1,50,000/- मागणी अवास्तव वाटते. हया प्रकरणात तिला मानसिक व शरिरिक त्रासापोटी रु.75,000/- मिळणेस तक्रारदार पात्र आहे असे या मंचाचे मत झाले आहे. त्याचप्रमाणे प्रस्तुत तक्रार अर्जाचा खर्च रु.2,000/- मिळणेस तक्रारदार पात्र आहे असे या मंचाचे मत झाले आहे. करीता मुद्दा क्र.3 व 4 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत व खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
1. प्रस्तुत तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2. जाबदार विमा कंपनीने तक्रारदारास आगीमुळे झालेल्या तिच्या नुकसानीदाखल रक्कम
रु.3,00,000/- विम्याची रक्कम तक्रारदारास द्यावी.
3. जाबदार विमा कंपनीने तक्रारदारास मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्कम रु.75,000/-
द्यावेत, तसेच, या तक्रार अर्जाचा खर्च म्हणून रक्कम रु.2,000/- द्यावेत.
4. वरील सर्व रकमा हया या आदेशाच्या तारखेपासून 45 दिवसांत तक्रारदारास द्याव्यात
अन्यथा आदेशाचे तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष हातात मिळेपर्यंत तक्रारदारास द.सा.द.शे.8.5
टक्के दराने वरील सर्व रकमांवर व्याज द्यावे.
5. विहीत कालावधीत रकमांची वसूली न झाल्यास तक्रारदारांना ग्राहक संरक्षण कायद्यातील
कलम 25 अथवा कलम 27 खाली कारवाई करता येईल.
सांगली
दि. 29/06/2013
( के.डी.कुबल ) ( ए.व्ही.देशपांडे )
सदस्य अध्यक्ष