(मंचाचे निर्णयान्वये, श्री विजय चं. प्रेमचंदानी, अध्यक्ष)
(पारीत दिनांक : 25 जुन 2014)
तक्रारकर्त्याने सदर तक्रार, ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12 अन्वये दाखल केली असून, तक्रारीचा आशय थोडक्यात येणे प्रमाणे.
1. तक्रारकर्ती हिचा पती निंबाजी शामराव आञाम यांच्या मालकीचे मौजा मुधोली रिठ, पो.मुधोली चक नं.2, ता.चामोर्शी येथे सर्व्हे नं.84 ही शेत जमीन होती व ते शेतीचा व्यवसाय करीत होते. शेतातील उत्पन्नावर कुंटूंबाचे पालनपोषण करीत होते. तक्रारकर्तीचा पती हे दि.26.2.2012 रोजी गिट्टीचे खोदकाम करण्यासाठी गेले असता, अचानक दरड कोसळून त्यांच्या अंगावर पडल्याने घटनास्थळीच त्यांचा मृत्यु झाला. शासनातर्फे तक्रारकर्तीच्या पतीचा शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा काढला असल्याने व तक्रारकर्तीचा पती शेतकरी असल्याने व अपघातात मृत्यु झाल्याने तक्रारकर्ती गैरअर्जदार क्र.1 कडून रुपये 1,00,000/- चा विमा रकमेसाठी पाञ होती. तक्रारकर्तीने गैरअर्जदार क्र.3 मार्फत विरुध्द पक्ष क्र.1 कडे विमा योजने अंतर्गत दि.19.4.2012 ला रितसर अर्ज केला, तसेच विरुध्द पक्षाचे मागणी प्रमाणे दस्ताऐवजाची पुर्तता केली. गैरअर्जदार क्र.1 ने दि. 27.5.2013 रोजी तक्रारकर्त्यास पञ पाठवून तक्रारकर्तीने 6-ड कागदपञ न दिल्याने दावा फेटाळला. वास्तविक, तक्रारकर्तीने गैरअर्जदारांना तिचा पती शेतकरी असल्याचे सर्व पुरावे दिले होते. तसेच, सास-याच्या नावाने जमीन होती व वारसान प्रमाणे ती तक्रारकर्तीच्या पतीच्या नावावर आली होती, यासंबंधात सर्व दस्ताऐवज वेळेत दिले होते. तक्रारकर्तीला तहसिलदाराकडे 6-ड हे कागदपञ उपलब्ध नसल्यामुळे दाखल करु शकली नाही. गैरअर्जदाराने तक्रारकर्तीचा दावा नामंजूर केल्याने सेवेमध्ये ञुटी केली आहे. त्यामुळे, गैरअर्जदारांनी विमा दाव्याची रक्कम रुपये 1,00,000/- दि.19.4.2012 पासून द.सा.द.शे. 18 % व्याजाने मिळण्याचे, तसेच मानसिक, शारिरीक व आर्थिक ञासापोटी रुपये 20,000/- व तक्रारीचे खर्चापोटी रुपये 10,000/- अर्जदारास गैरअर्जदार क्र.1 कडून मिळण्याचे आदेश व्हावे, अशी प्रार्थना केली.
2. अर्जदाराने नि.क्र.3 नुसार 14 झेरॉक्स दस्ताऐवज दाखल केले. अर्जदाराची तक्रार नोंदणीकरुन गैरअर्जदारास नोटीस काढण्यात आली. गैरअर्जदार क्र.1 ने नि.क्र.20 नुसार लेखी उत्तर दाखल केले. गैरअर्जदार क्र.2 ने नि.क्र.12 नुसार लेखी उत्तर दाखल केले. गैरअर्जदार क्र.3 ने नि.क्र.16 प्रमाणे लेखी उत्तर व दस्ताऐवज दाखल केले.
3. गैरअर्जदार क्र.1 ने नि.क्र.20 नुसार दाखल केलेल्या लेखी उत्तरात नमूद केले की, अर्जदाराने तक्रारीत गैरअर्जदार क्र.1 चे विरुध्द लावलेले सर्व आरोप खोटे व चुकीचे असल्याने त्यांना नाकबूल आहे. गैरअर्जदार क्र.1 ने पुढे असे कथन केले आहे की, मय्यत हा लक्ष देवून काम करीत नव्हता तसेच मय्यतने जर त्योच कामात लक्षे दिले असते तर तो अपघाताला टाळले असते. तसेच, मय्यत त्यावेळी शेतीचे काम करीत नव्हता, म्हणून अर्जदार ही विमा क्लेम घेण्यास पाञ नाही. गैरअर्जदार क्र.1 नी पुढे असे कथन केले आहे की, अर्जदाराचे शेतीचे सात/बाराचा उतारामध्ये इंशुरन्स क्लेम घेण्यास पाञ आहे, याबाबत दस्ताऐवज विमा कंपनीकडे दाखल केलेला नाही. म्हणून अर्जदाराची तक्रार खारीज करण्यात यावी अशी मागणी केलेली आहे.
4. गैरअर्जदार क्र.2 ने नि.क्र.12 नुसार दाखल केलेल्या लेखी उत्तरात नमूद केले की, तक्रारदार हे आमचे ग्राहक होऊ शकत नाही. ज्या विमा कंपनीने राज्य शासनाकडून विमा प्रिमियम स्विकारुन ही जोखीम स्विकारलेली आहे, त्याचेच ग्राहक होऊ शकतात. गैरअर्जदार क्र.2 केवळ मध्यस्थ सल्लागार आहे व शासनास विना मोबदला सहाय्य करतो. गैरअर्जदार क्र. 2 ने पुढे नमूद केले की, सदर प्रस्ताव हा जिल्हा अधिक्षक, कृषि अधिकारी, गडचिरोली मार्फत कबाल नागपूर कार्यालयास दि.5.11.2012 ला प्राप्त झाल्यानंतर तो प्रस्ताव कबाल नागपूर मार्फत न्यु इंडिया इन्शुरन्स कंपनी, मुंबईला दि.23.11.2012 ला पाठविला असता, सदर दावा न्यु इंडिया इंन्शुरंस कंपनी, मुंबईने दि.27.5.2013 च्या पञाव्दारे दावा नामंजूर केला असून तसे वारसदारास कळविण्यात आलेले आहे. त्यामुळे, कारण नसतानांही तक्रारीस सामोरे जाण्यास भाग पाडल्याने अर्जाचा खर्च रुपये 5000/- अर्जदाराकडून देण्याचा आदेश व्हावा, तसेच तक्रारीतून पूर्णपणे मुक्त करण्यात यावे अशी विनंती केली.
5. गैरअर्जदार क्र.3 ने नि.क्र.16 नुसार दाखल केलेल्या लेखी उत्तरात नमूद केले की, तक्रारकर्तीचा पती श्री निंबाजी शामराव आञाम हे दि.26.2.2012 रोजी गिट्टीचे खोदकाम करण्यासाठी गेले असता, अचानक त्यांचे अंगावर दरड कोसळून घटनास्थळीच मृत्यु झाला. अपघात विम्याचा प्रस्ताव या कार्यालयास दि.20.4.2013 रोजी प्राप्त झाला. त्यानुसार या कार्यालयाने पञ क्र.1188/2012 चामोर्शी, दि.21.4.2013 अन्वये जिल्हा अधिक्षक, कृषि अधिकारी, गडचिरोली यांना सादर केला. प्रस्तावामध्ये जिल्हा अधिक्षक, कृषि अधिकारी, गडचिरोली यांनी मृतकाचा 6-क जुना फेरफार व निंबाजी ऊर्फ बंडू शामराव आञाम ही एकच व्यक्ती असल्याबाबत प्रतिज्ञालेख पञ क्र.3207/012, दि.16.5.2012 अन्वये या कार्यालयास कळविण्यात आले. त्यानुसार संबंधीताकडून उपरोक्त कागदपञे प्राप्त करुन या कार्यालयाचे पञ क्र.4068/012 चामोर्शी, दि.289/2012 अन्वये स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञालेख व फेरफारची नोंदवही (जुना व नवीन) मा.अधिक्षक कृषि अधिकारी गडचिरोली यांचेकडे सादर करण्यात आले. सदर कागदपञे जिल्हा अधिक्षक, कृषि अधिकारी, गडचिरोली यांचे मार्फत पञ क्र.जिअकृअ/शेतकरी अपघात विमा/5267/012, दि.19.10.2012 अन्वये गैरअर्जदार क्र.2 कडे सादर झालेली आहेत. या प्रकरणात या कार्यालयानी वेळीच प्रस्ताव सादर करुन प्रस्तावातील ञुटयांची पुर्तता करुन वरीष्ठास सादर केलेले आहे. यात गैरअर्जदार क्र.3 यांची काहीही चुक नसल्याने दोष मुक्त करण्याची विनंती केली आहे.
6. अर्जदाराने नि.क्र.21 नुसार शपथपञ व नि.क्र.22 नुसार लेखी युक्तीवाद दाखल केला. गैरअर्जदार क्र.1 ने नि.क्र.23 नुसार शपथपञ व नि.क्र.25 नुसार 2 दस्ताऐवज व नि.क्र.26 नुसार लेखी युक्तीवाद दाखल केले. अर्जदार व गैरअर्जदार क्र.1 ते 3 यांनी दाखल केलेले लेखी बयान, तसेच अर्जदार व गैरअर्जदार क्र.1 ने दाखल केलेले दस्ताऐवज, शपथपञ, लेखी युक्तीवादावरुन खालील मुद्दे निघतात.
मुद्दे : निष्कर्ष
1) अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? : होय.
2) गैरअर्जदार क्र.1 ने लाभार्थ्याप्रती सेवेत न्युनतापूर्ण : होय.
व्यवहार केला आहे काय ?
3) अर्जदार हा गैरअर्जदार क्र.1 कडून विमा पॉलिसीचा लाभ : होय.
मिळण्यास पाञ आहे काय ?
4) आदेश काय ? : अंतिम आदेशाप्रमाणे
- कारण मिमांसा –
मुद्दा क्रमांक 1 बाबत :-
7. तक्रारकर्ती हिचा पती निंबाजी शामराव आञाम यांच्या मालकीचे मौजा मुधोली रिठ, पो.मुधोली चक नं.2, ता.चामोर्शी येथे सर्व्हे नं.84 ही शेत जमीन होती व ते शेतीचा व्यवसाय करीत होते. शेतातील उत्पन्नावर कुंटूंबाचे पालनपोषण करीत होते. तक्रारकर्तीचा पती हे दि.26.2.2012 रोजी गिट्टीचे खोदकाम करण्यासाठी गेले असता, अचानक दरड कोसळून त्यांच्या अंगावर पडल्याने घटनास्थळीच त्यांचा मृत्यु झाला. शासनातर्फे तक्रारकर्तीच्या पतीचा शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा काढला असल्याने व तक्रारकर्तीचा पती शेतकरी असल्याने व अपघातात मृत्यु झाल्याने तक्रारकर्ती गैरअर्जदार क्र.1 कडून रुपये 1,00,000/- चा विमा रकमेसाठी पाञ होती. यामुळे अर्जदार ही गैरअर्जदार क्र.1 ची ग्राहक आहे असे सिध्द होते. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी देण्यात येत आहे.
मुद्दा क्रमांक 2 बाबत :-
8. अर्जदाराने नि.क्र.3 वर दस्त क्र.4, 5, 6, 7, 8, 9 ची पडताळणी करतांना असे दिसले की, अपघाताचे वेळी अर्जदाराचे पती हे शेतकरी होते व त्याचे वारसदार शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमा रक्कम मिळण्यास पाञ होते.
मा.राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोग, नवी दिल्ली यांचे न्यायनिवाडयानुसार IV (2012) CPJ 51 (NC) , Reliance General Insurance Co.Ltd. –Vs.- Sakorba Hetubha Jadeja & Ors., Dicided on 27.8.2012.
Consumer Protection Act, 1986 – Sections 2(1)(g), 14(1)(d), 21(b)—Insurance – Accidental electrocution – Death of farmer—Legal heirs – Entitlement – District Forum allowed complaint – State Commission dismissed appeal – Hence revision – Death of ‘BJ’ was nearly five months before the date of entry, i.e.12.4.2002 – All his legal heirs became registered farmers immediately after death of their father – it was the only statutory process of registration of legal heirs in village record – ‘HJ’ became registered farmer in December, 2001, i.e., well before 26.1.2002, the date of inception of Insurance policy - Complainants entitled to receive the sum insured – Repudiation not justified.
9. अर्जदाराने नि.क्र.31 वर दस्त क्र.1 वर शेतकरी जनता अपघात विमा योजना 2009-10 महाराष्ट्र शासन निर्णय क्र.शेअवि-2009/प्र.क्र.268/11-अे, दि.12.8.2009 चा परिपञक दाखल केला आहे. त्या परिपञकामध्ये परिच्छेद क्र. इ) विमा कंपनी (5), (6), (7) मध्ये असे नमूद आहे की,
(5) प्रपञ-ड मध्ये नमूद केलेल्या कागदपञांच्या आधारेच विम्याची रक्कम अदा करावी. दुर्घटना सिध्द होत असेल व अपवादात्मक परिस्थितीत एखाद्या कागदपञाची पूर्तता होवू शकत नसेल तर पर्यायी दाखल्याबाबत आयुक्त (कृषि)/जिल्हाधिकारी यांचेशी विचार-विनिमय करुन पुर्तता करुन घेऊन विम्याची रक्कम अदा करावी.
(6) अपघातग्रत वाहन चालकाचे चुकीमुळे शेतक-यांचा मृत्यु झाल्यास/अपंगत्व आल्यास, दोषी वाहन चालक वगळता, सर्व अपघातग्रत शेतक-यांचे, केवळ अपघात झाला या कारणास्तव, विम्याचे दावे मंजूर करावेत.
(7) अपघाती मृत्यु संदर्भात दुर्घटना घडल्याचे सिध्द झाल्यास अनावश्यक धोका पत्करला या कारणास्तव एकही प्रकरण नाकारता येणार नाही.
10. अर्जदाराने नि.क्र.3 दस्त क्र.अ-3 वर विमा क्लेम मिळण्याबाबत अर्ज दस्ताऐवजासह दाखल केलेले आहेत, या दस्ताऐवजाचे पडताळणी करतांना असे दिसले की, अर्जदाराने विमा क्लेम मिळण्याबाबत अर्जासोबत वारसान प्रमाणपञ दाखल केलेले होते. वरील राष्ट्रीय आयोगाने दिलेल्या न्यायनिर्णयाचा अहवाल व महाराष्ट्र शासनाचे परिपञकामध्ये नोंदविलेले शेर्ती व अटी नुसार गैरअर्जदार क्र.1 ला अर्जदाराला विमा क्लेमची स्विकृत करुन विमा रक्कम दिली पाहिजे होती, परंतु गैरअर्जदार क्र.1 ने त्याला अस्विकृत करुन अर्जदाराप्रती न्युनतम सेवा दिली आहे असे सिध्द होत आहे. सबब मुद्दा क्र.2 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रमांक 3 बाबत :-
11. मुद्दा क्र.1 व 2 चे विवेचनावरुन अर्जदार हा गैरअर्जदार क्र.1 कडून खालील आदेशाप्रमाणे मागणीस पाञ आहे.
12. गैरअर्जदार क्र.2 व 3 यांनी शासना तर्फे अर्जदाराच्या पतीचा शेतकरी अपघात विमा विना मोबदला काढण्यासाठी मदत केली म्हणून गैरअर्जदार 2 व 3 विेरुध्द कोणताही आदेश नाही.
मुद्दा क्रमांक 4 बाबत :-
13. मुद्दा क्र.1 ते 3 चे विवेचनावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
- अंतिम आदेश -
(1) तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर.
(2) गैरअर्जदार क्र.1 नी तक्रारदाराला विमा दाव्याची रक्कम रुपये 1,00,000/- आदेशाच्या दिनांकापासून 30 दिवसाचे आंत द्यावी, विमा रक्कम 30 दिवसाचे आत न दिल्यास द.सा.द.शे. 9 टक्के व्याजासह अर्जदाराला द्यावे.
(3) गैरअर्जदार क्र.1 ने अर्जदाराला मानसिक व शारिरीक ञासापोटी रुपये 5000/- व तक्रारीचा खर्चापोटी रुपये 2000/- आदेशाच्या दिनांकापासून 30 दिवसाचे आत द्यावे.
(4) उभय पक्षांना आदेशाची प्रत विनामुल्य देण्यात यावी.
गडचिरोली.
दिनांक :-25/6/2014