(आदेश पारित द्वारा मा. अध्यक्ष, श्री. अतुल दि. आळशी)
- आदेश -
तक्रारकर्तीला विरूध्द पक्ष यांनी शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत नुकसानभरपाई न दिल्यामुळे तक्रारकर्तीने सदरहू तक्रार मंचात दाखल केली आहे. तक्रारकर्तीच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालीलप्रमाणेः-
2. तक्रारकर्तीचे पती श्री. रामेश्वर मोहन भारती यांच्या मालकीची शेत जमीन भूमापन क्रमांक 45/1, मौजा चांदणीटोला, जिल्हा गोंदीया येथे असल्यामुळे ते शेतकरी या व्याख्येमध्ये समाविष्ट होतात.
3. विरूध्द पक्ष 1 व 2 ही विमा कंपनी असून विरूध्द पक्ष 3 हे शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना राबविण्याचे काम करतात.
4. दिनांक 05/05/2013 रोजी शेतातील विहिरीत पाय घसरून पडल्यामुळे तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु झाला. त्यामुळे त्यांच्या मृत्युबद्दलचा विमा दावा मिळण्याबाबतचा रितसर अर्ज तक्रारकर्तीने दिनांक 29/07/2013 रोजी विरूध्द पक्ष 3 यांच्याकडे सादर केला. परंतु विरूध्द पक्ष 1 तक्रारकर्तीचा विमा दावा अर्ज निकाली न काढल्यामुळे तक्रारकर्तीने विरूध्द पक्ष यांना वकिलामार्फत दिनांक 03/03/2014 रोजी कायदेशीर नोटीस पाठविली. तरी सुध्दा विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्तीचा विमा दावा अर्ज निकाली न काढल्यामुळे तक्रारकर्तीने सदरहू तक्रार तक्रारीचे कारण दिनांक 04/03/2014 रोजी घडल्यापासून मुदतीत न्याय मंचाच्या अधिकारक्षेत्रात दाखल केलेली आहे.
5. तक्रारकर्तीची तक्रार विद्यमान न्याय मंचाने दिनांक 24/03/2014 रोजी दाखल करून घेतल्यानंतर विरूध्द पक्ष यांना दिनांक 28/03/2014 रोजी मंचामार्फत नोटीसेस बजावण्यात आल्या.
विरूध्द पक्ष यांना नोटीस प्राप्त झाल्यानंतर विरूध्द पक्ष 1 यांनी हजर होऊन त्यांचा लेखी जबाब दिनांक 25/08/2014 रोजी दाखल केला असून त्यात त्यांनी तक्रारकर्तीच्या तक्रारीचे खंडन केले आहे. तक्रारकर्तीने पोस्टमार्टेम रिपोर्ट व मृत्युचे कारण याबद्दल कुठलाही पुरावा दाखल न केल्यामुळे तसेच तक्रारकर्तीच्या पतीला झालेला अपघात हा तक्रारकर्तीच्या पतीच्या निष्काळजीपणामुळे झालेला असून त्याकरिता तो स्वतःच जबाबदार असल्यामुळे तक्रारकर्तीचा दावा अर्ज फेटाळण्यात यावा असे म्हटले आहे.
विरूध्द पक्ष 2 व 3 यांना नोटीस मिळूनही ते सदरहू प्रकरणात मंचासमक्ष हजर झाले नाहीत अथवा त्यांनी त्यांचा लेखी जबाब सुध्दा दाखल केला नाही. त्यामुळे विरूध्द पक्ष 2 व 3 यांच्याविरूध्द प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश दिनांक 18/10/2014 रोजी मंचाद्वारे पारित करण्यात आला.
6. तक्रारकर्तीने तक्रारीसोबत शेतकरी जनता अपघात विमा योजना 2012-2013 चे परिपत्रक पृष्ठ क्र. 14 वर दाखल केलेले असून तलाठ्याचे प्रमाणपत्र पृष्ठ क्र. 20 वर दाखल केले आहे. तसेच शेतीचा 7/12 पृष्ठ क्र. 24 वर, फेरफार पत्रक पृष्ठ क्र. 26 वर, मर्ग खबरी पृष्ठ क्र. 28 वर, इन्क्वेस्ट पंचनामा पृष्ठ क्र. 30 वर, Crime Detail Form पृष्ठ क्र. 32 वर, घटनास्थळ पंचनामा पृष्ठ क्र. 35 वर, पोस्ट मार्टेम रिपोर्ट पृष्ठ क्र. 40 वर, तक्रारकर्तीने विरूध्द पक्ष यांना वकिलामार्फत पाठविलेली नोटीस पृष्ठ क्र. 53 वर याप्रमाणे कागदपत्रे तक्रारीसोबत दाखल केलेली आहेत.
7. तक्रारकर्तीचे वकील ऍड. उदय क्षीरसागर यांनी असा युक्तिवाद केला की, तक्रारकर्तीने विरूध्द पक्ष यांच्याकडे संबंधित कागदपत्रानुसार नुकसानभरपाई मिळण्यासाठी विमा दावा दाखल केला होता. परंतु विरूध्द पक्ष 1 यांनी तो मंजूर अथवा नामंजूर केल्याबद्दलचे कुठलेही पत्र न दिल्यामुळे सदरहू तक्रारकर्तीने सदरहू तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारकर्तीने विरूध्द पक्ष यांच्याकडे दिलेली सर्व कागदपत्रे तक्रारीमध्ये दाखल केलेली आहेत. त्यावरून तक्रारकर्तीचा दावा मंजूर न करणे म्हणजे विरूध्द पक्ष 1 यांच्या सेवेतील त्रुटी होय.
8. विरूध्द पक्ष 1 यांच्यातर्फे ऍड. अनंत दिक्षीत यांनी युक्तिवाद केला की, तक्रारकर्तीचा दावा मुदतबाह्य असून तक्रारकर्तीने अपघात झाल्यापासून 90 दिवसांच्या आंत कागदपत्रे विरूध्द पक्ष यांच्याकडे सादर न केल्यामुळे तसेच तक्रारकर्तीच्या पतीच्या चुकीमुळे अपघात घडला असल्याने तक्रारकर्ती नुकसानभरपाईची रक्कम मिळण्यास पात्र नाही. करिता तक्रारकर्तीची तक्रार खारीज करण्यात यावी.
9. तक्रारकर्तीचा तक्रारअर्ज, विरूध्द पक्ष यांचा लेखी जबाब, तक्रारीसोबत दाखल केलेली कागदपत्रे तसेच दोन्ही बाजूच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद यावरून खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ.क्र. | मुद्दे | निर्णय |
1. | तक्रारकर्तीची तक्रार मान्य होण्यास पात्र आहे काय? | होय |
2. | तक्रारकर्ती शेतकरी वैयक्तिक अपघात विम्याचे पैसे मिळण्यास पात्र आहे काय? | होय |
3. | या तक्रारीचा अंतिम आदेश काय? | कारणमिमांसेप्रमाणे |
- कारणमिमांसा –
10. तक्रारकर्तीने शेतकरी जनता अपघात विमा योजना 2012-2013 चे परिपत्रक सदरहू प्रकरणात दाखल केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार जर विमा दावा दाखल करण्याकरिता झालेल्या विलंबाचे कारण संयुक्तिक असेल तर अपघात झाल्यानंतर 90 दिवसानंतर देखील दावा दाखल केल्या जाऊ शकतो. तक्रारकर्ती ही लहान गावात राहात असून तिची कौटुंबिक व शैक्षणिक परिस्थिती पाहता अपघाताच्या दिनांकापासून 90 दिवसानंतर दाखल केलेल्या विमा दाव्याच्या विलंबाचे कारण संयुक्तिक असल्यामुळे तक्रारकर्तीने दाखल केलेली तक्रार मुदतीच्या मुद्दयावर खारीज करण्यायोग्य नाही.
11. तक्रारकर्तीने तिच्या पतीच्या शेत जमिनीचा 7/12 सदरहू प्रकरणात दाखल केला असून फेरफाराच्या नोंदी देखील दाखल केलेल्या आहेत. त्यामधील नोंद क्रमांक 795 नुसार तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु झाल्यानंतर त्यांचे वारस शेत जमिनीचे मालक झालेले आहेत. तक्रारकर्तीने दाखल केलेल्या मर्ग खबरी, इन्क्वेस्ट पंचनामा तसेच पोस्टमार्टेम रिपोर्ट यावरून तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु चांदणीटोला येथील शेत सर्व्हे क्रमांक 68 मध्ये पाणी भरत असतांना विहिरीमध्ये पडून झाल्याबद्दल सिध्द होते. विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु हा अपघाती मृत्यु नसून दारूच्या नशेत पाण्यात उडी मारल्याने झाला याबद्दलचा कुठलाही Independent पुरावा दाखल केलेला नसून त्यांच्या म्हणण्याला कुठलाही संयुक्तिक पुरावा दाखल न केल्यामुळे विरूध्द पक्ष यांनी त्यांच्यावर असलेले Burden of Proof हे सिध्द न केल्यामुळे तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु हा पाण्यात बुडून झालेला अपघात आहे हे तक्रारकर्तीचे म्हणणे सकृतदर्शनी सिध्द होते.
करिता खालील आदेश.
-// अंतिम आदेश //-
1. तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. विरूध्द पक्ष 1 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्तीला तिच्या मृतक पतीच्या शेतकरी व्यक्तिगत अपघात विम्याची रक्कम रू. 1,00,000/- द्यावी. या रकमेवर तक्रार दाखल केल्याच्या दिनांकापासून म्हणजेच दिनांक 23/04/2014 पासून ते संपूर्ण रक्कम तक्रारकर्तीच्या हातात पडेपर्यंत द. सा. द. शे. 12% दराने व्याज द्यावे.
3. विरूध्द पक्ष 1 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्तीला झालेल्या शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासाची नुकसानभरपाई म्हणून रू. 10,000/- तक्रारकर्तीला द्यावे.
4. विरूध्द पक्ष 1 यांना आदेश देण्यात येतो की, या तक्रारीचा खर्च म्हणून त्यांनी तक्रारकर्तीला रू. 5,000/- द्यावे.
5. विरूध्द पक्ष 1 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी या आदेशाचे पालन आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसांचे आंत करावे.
6. विरूध्द पक्ष 2 व 3 च्या विरोधात ही तक्रार खारीज करण्यात येते.