(आदेश पारित द्वारा मा. सदस्या, कु. वर्षा ओ. पाटील)
- आदेश -
तक्रारकर्तीचा शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा दावा विरूध्द पक्ष 1 यांनी मंजूर अथवा नामंजूर असे तक्रारकर्तीला न कळविल्यामुळे तक्रारकर्तीने शेतकरी व्यक्तिगत अपघात विम्याची रक्कम मिळण्याकरिता सदरहू तक्रार मंचात दाखल केली आहे. तक्रारकर्तीच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालीलप्रमाणेः-
2. तक्रारकर्ती ही मौजा मरारटोला, ता. जिल्हा गोंदीया येथील रहिवासी असून तक्रारकर्तीचे पती श्री. नऊ कोल्हु माने यांच्या मालकीची मौजा मरारटोला, तालुका व जिल्हा गोंदीया येथे सर्व्हे नंबर 468 ही शेत जमीन आहे आणि म्हणून ते शेतकरी व्यक्तिगत अपघात विम्याचे लाभधारक आहेत.
3. विरूध्द पक्ष 1 व 2 ही विमा कंपनी असून विरूध्द पक्ष 3 ही विमा सल्लागार कंपनी आहे. विरूध्द पक्ष 4 हे शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना राबविण्याचे काम करतात.
4. तक्रारकर्तीचे पती श्री. नऊ कोल्हू माने हे दिनांक 16/02/2013 रोजी बालाघाट कडून गोंदीया कडे जात असतांना समोरून येणा-या सुझुकी मोटरसायकलस्वाराने तक्रारकर्तीच्या पतीच्या मोटरसायकलला जोरदार धडक मारल्याने जखमी होऊन उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला.
5. तक्रारकर्तीचे पती शेतकरी असल्याने व अपघातात त्यांचा मृत्यु झाल्याने तक्रारकर्तीने विरूध्द पक्ष 4 यांच्याकडे दिनांक 14/05/2013 रोजी संपूर्ण कागदपत्रांसह रितसर अर्ज सादर केला. परंतु संपूर्ण कागदपत्रे दिल्यानंतरही विरूध्द पक्ष 1 यांनी तक्रारकर्तीच्या विमा दाव्याबाबत मंजूर किंवा नामंजूर असे तक्रारकर्तीला कळविले नाही.
6. विरूध्द पक्ष यांनी विमा पॉलीसीप्रमाणे तक्रारकर्तीला आवश्यक ती सेवा प्रदान करण्यामध्ये कसूर केल्याने तक्रारकर्तीने विमा दाव्याची रक्कम रू. 1,00,000/- मिळण्यासाठी तसेच मानसिक व शारीरिक त्रासापोटी नुकसानभरपाई म्हणून रू. 20,000/- व तक्रारीचा खर्च रू. 10,000/- असे एकूण रू. 1,30,000/- मिळण्यासाठी दिनांक 21/03/2014 रोजी न्याय मंचात तक्रार दाखल केली आहे.
7. तक्रारकर्तीची तक्रार विद्यमान न्याय मंचाने दिनांक 24/03/2014 रोजी दाखल करून घेतल्यानंतर विरूध्द पक्ष यांना दिनांक 28/03/2014 रोजी मंचामार्फत नोटीसेस बजावण्यात आल्या. विरूध्द पक्ष यांना नोटीस प्राप्त झाल्यानंतर विरूध्द पक्ष 1, 3 व 4 यांनी हजर होऊन त्यांचे लेखी जबाब दाखल केले आहेत. विरूध्द पक्ष 2 यांना सदरहू प्रकरणात मंचाची नोटीस प्राप्त होऊनही विरूध्द पक्ष 2 हे मंचासमक्ष हजर झाले नाहीत अथवा त्यांनी त्यांचा लेखी जबाब सुध्दा सदरहू प्रकरणात दाखल केलेला नाही. त्यामुळे विरूध्द पक्ष 2 यांच्याविरूध्द प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश दिनांक 18/10/2014 रोजी मंचाद्वारा पारित करण्यात आला.
8. विरूध्द पक्ष 1 यांनी सदरहू प्रकरणात त्यांचा जबाब दिनांक 25/08/2014 रोजी दाखल केला. विरूध्द पक्ष 1 यांनी त्यांच्या लेखी जबाबात तक्रारकर्तीच्या तक्रारीचे खंडन केले असून तक्रारकर्तीने आवश्यक ते दस्ताऐवज दाखल केलेले नाहीत असे म्हटले आहे. मृत्युविषयी कारणाचे कागदपत्र, व्हिसेरा रिपोर्टबद्दलचे मत दिल्या गेलेले नाही, या तक्रारीला अत्यावश्यक असलेले असे कोणतेही दस्ताऐवज तक्रारकर्तीने दाखल केलेले नाही असे त्यांनी आपल्या लेखी जबाबात म्हटले आहे. त्यामुळे विरूध्द पक्ष 1 हे नुकसानभरपाई देण्यास जबाबदार नाहीत तसेच तक्रारकर्तीचे पती हे स्वतःच्या निष्काळजीपणामुळे मरण पावले आणि स्वतःच्या निष्काळजीपणाबद्दल नुकसानभरपाई दावा करू शकत नाही असे त्यांनी आपल्या लेखी जबाबात म्हटले आहे. तो पृष्ठ क्र. 69 वर आहे.
9. विरूध्द पक्ष 3 यांनी सदरहू प्रकरणात त्यांचा लेखी जबाब दिनांक 30/05/2014 रोजी सादर केला असून तो पृष्ठ क्र. 59 वर आहे. विरूध्द पक्ष 3 यांनी आपल्या जबाबात असे म्हटले आहे की, तक्रारदार हे आमचे ग्राहक होऊ शकत नाहीत. परंतु ज्या विमा कंपनीने राज्य शासनाकडून विमा प्रिमियम न्यू इंडिया ऍश्युरन्स कंपनी लिमिटेड, मुंबई यांनी ही जोखीम स्विकारलेली आहे त्यांचेच हे ग्राहक होऊ शकतात. आम्ही केवळ मध्यस्थ सल्लागार आहोत व शासनास विना मोबदला सहाय्य करतो.
मयत नऊ कोल्हू माने, मौजा मरारटोला, ता. आमगाव, जिल्हा गोंदीया यांचा अपघात हा दिनांक 16/02/2013 रोजी झाला. सदरील प्रस्ताव हा जिल्हा अधिक्षक, कृषि अधिकारी, गोंदीया यांचेमार्फत कबाल नागपूर कार्यालयास दिनांक 06/12/2013 रोजी अपूर्ण प्राप्त झाल्यानंतर आहे त्या स्थितीत तो प्रस्ताव कबाल, नागपूर मार्फत न्यू इंडिया ऍश्युरन्स कंपनी, मुंबईला दिनांक 09/12/2013 ला पाठविला असता सदरील दावा न्यू इंडिया ऍश्युरन्स कंपनी, मुंबई यांनी त्यांच्या दिनांक 19/03/2014 रोजीच्या पत्रान्वये दावा नामंजूर केला असून तसे वारसदारास कळविण्यात आलेले आहे असे त्यांनी आपल्या लेखी जबाबात म्हटले आहे.
10. विरूध्द पक्ष 4 यांनी सदरहू प्रकरणात त्यांचा लेखी जबाब दिनांक 30/05/2014 रोजी दाखल केला असून तो पृष्ठ क्र. 65 वर आहे. आपल्या लेखी जबाबात त्यांनी असे म्हटले आहे की, तक्रारकर्तीने शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजनेचा प्रस्ताव हा तालुका कृषि अधिकारी, गोंदीया येथे सादर केलेला असल्यामुळे विरूध्द पक्ष 4 यांच्या संबंधात नाही.
11. तक्रारकर्तीने तक्रारीसोबत शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजनेअंतर्गत शासन निर्णय 2012-2013 पृष्ठ क्र. 15 वर, विमा योजना क्लेम फॉर्म पृष्ठ क्र. 20 वर, तलाठ्याचे प्रमाणपत्र पृष्ठ क्र. 21 वर, 7/12 उतारा पृष्ठ क्र. 25, 26, 27, 28, 29 वर, फेरफार पत्रक पृष्ठ क्र. 30, 31 वर, प्रथम खबर पृष्ठ क्र. 33 वर, घटनास्थळ पंचनामा पृष्ठ क्र. 38 वर, मरणान्वेषण प्रतिवृत्त पृष्ठ क्र. 40 वर, पोस्ट मार्टेम रिपोर्ट पृष्ठ क्र. 42 वर, मृत्यु प्रमाणपत्र पृष्ठ क्र. 50 वर, तक्रारकर्तीचे शपथपत्र पृष्ठ क्र. 70 वर, तक्रारकर्तीच्या वकिलांचा लेखी युक्तिवाद पृष्ठ क्र. 72 वर, विरूध्द पक्ष 1 चे शपथपत्र पृष्ठ क्र. 74 वर याप्रमाणे कागदपत्रे तक्रारीसोबत दाखल केलेली आहेत.
12. तक्रारकर्तीचे वकील ऍड. उदय क्षीरसागर यांनी लेखी युक्तिवाद दाखल केला असून तो पृष्ठ क्र. 72 वर आहे. तक्रारकर्तीच्या वकिलांनी असा तोंडी युक्तिवाद केला की, तक्रारकर्तीचा दावा विरूध्द पक्ष यांनी वर्षभरानंतरही मंजूर किंवा नामंजूर असे कळविले नाही आणि त्यांच्या उत्तरात देखील तसे नमूद केलेले नाही. तसेच तक्रारकर्तीचे पती रस्ते अपघातात मरण पावले असून पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये मरणाचे कारण स्पष्टपणे नमूद केले असून व्हिसेरा रासायनिक विश्लेषणासाठी पाठविल्याचे कुठेही नमूद नाही. तक्रारकर्तीचे पती अपघातात मरण पावले हे पोलीस स्टेशनच्या दस्ताऐवजावरून व वैद्यकीय दस्ताऐवजावरून सिध्द होते. तसेच विरूध्द पक्ष 1 यांनी सदर अपघाताबाबत कोणत्याही इन्व्हेस्टीगेटरची नेमणूक करून चौकशी केली नाही. म्हणून तक्रारकर्ती ही शेतकरी जनता अपघात विमा योजनेचा लाभ मिळण्यास पात्र असल्यामुळे तक्रारकर्तीचे सदरहू प्रकरण मंजूर करण्यात यावे.
13. विरूध्द पक्ष 1 यांच्यातर्फे ऍड. अनंत दिक्षीत यांनी असा युक्तिवाद केला की, तक्रारकर्तीला विरूध्द पक्षाच्या विरोधात तक्रार दाखल करण्यास कोणतेही कारण घडले नसून तक्रारकर्तीची संपूर्ण तक्रार खोटी व बनावट आहे. त्यांनी आपल्या युक्तिवादात असेही म्हटले की, अपघाताच्या वेळेस तक्रारकर्तीचे पती मोटरसायकल चालवित असतांना त्यावर तिघे जण बसून जात होते असे प्रथम खबरीमध्ये नमूद केलेले असून हे Motor Vehicle Act नुसार कायद्याने गुन्हा आहे. मोटरसायकलवर तिघे जण बसून असल्यामुळे त्यांचा गाडीवरचा ताबा सुटला आणि त्यांचा अपघात झाला. म्हणून तक्रारकर्ती ही कुठलाही मोबदला मिळण्यास पात्र नाही तसेच तक्रारकर्तीने आवश्यक ते दस्तऐवज दाखल केलेले नाहीत. मृत्युच्या कारणाचे कागदपत्र, व्हिसेरा रिपोर्टबद्दलचे मत नमूद केलेले नसून तक्रारकर्तीचे पती हे स्वतःच्या निष्काळजीपणाने मरण पावले आणि स्वतःच्या निष्काळजीपणाबद्दल नुकसानभरपाईचा दावा करू शकत नाही म्हणून तक्रारकर्तीची तक्रार खारीज करण्यात यावी.
14. तक्रारकर्तीचा तक्रारअर्ज, विरूध्द पक्ष यांचे लेखी जबाब, तक्रारकर्तीने तक्रारीसोबत दाखल केलेली कागदपत्रे, शपथपत्र तसेच दोन्ही पक्षाच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद यावरून खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ.क्र. | मुद्दे | निर्णय |
1. | तक्रारकर्तीची तक्रार मान्य होण्यास पात्र आहे काय? | होय |
2. | तक्रारकर्ती शेतकरी व्यक्तिगत अपघात विम्याचे पैसे मिळण्यास पात्र आहे काय? | होय |
3. | या तक्रारीचा अंतिम आदेश काय? | कारणमिमांसेप्रमाणे |
- कारणमिमांसा –
15. तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु दिनांक 16/02/2013 रोजी झाला. तक्रारकर्तीने विमा दावा अर्ज कागदपत्रांसह विरूध्द पक्ष यांच्याकडे सादर केला. परंतु विरूध्द पक्ष 1 यांनी तो दावा अर्ज मंजूर किंवा नामंजूर असे तक्रारकर्तीला कळविले नसल्यामुळे तक्रारकर्तीने विद्यमान मंचात आपली तक्रार दाखल केली. तक्रारकर्तीचे पती हे शेतकरी असल्यामुळे व त्यांची मौजा मरारटोला येथे भूमापन क्रमांक 468 ही शेतजमीन असल्यामुळे आणि महाराष्ट्र शासनाचे परिपत्रक असल्यामुळे ते शेतकरी व्यक्तिगत अपघात विम्याचे लाभधारक आहेत. म्हणून मुद्दा क्र. 1 होकारार्थी दर्शविण्यात येत आहे.
16. विरूध्द पक्ष 3 हे केवळ मध्यस्थ सल्लागार आहेत आणि ते शासनास विना मोबदला सहाय्य करतात म्हणून तक्रारदार हे आमचे ग्राहक होऊ शकत नाही असे त्यांनी आपल्या लेखी जबाबात म्हटले आहे.
विरूध्द पक्ष 4 यांचा सदरहू प्रकरणाशी संबंध नाही असे त्यांनी आपल्या लेखी जबाबात म्हटले आहे.
17. तक्रारकर्तीने तिच्या पतीच्या अपघाती मृत्युबाबत पोस्टमार्टेम रिपोर्ट, प्रथम खबर, मृत्यु प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे सदर प्रकरणात दाखल केलेली आहेत. त्यामुळे तक्रारकर्तीने दाखल केलेल्या संपूर्ण कागदपत्रांचा विचार करता तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु हा अपघाती मृत्यु आहे हे सिध्द होते आणि सर्व दस्तऐवज, पुरावे, शपथपत्र यांना ग्राह्य धरून तक्रारकर्ती ही महाराष्ट्र शासनामार्फत राबविण्यात येणा-या शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजनेचा लाभ मिळण्यास पात्र असून विरूध्द पक्ष 1 यांनी तक्रारकर्तीचा विमा दावा निकाली न काढणे ही विरूध्द पक्ष 1 यांची सेवेतील त्रुटी आहे. त्यामुळे तक्रारकर्तीचे सदरहू प्रकरण मंजूर होण्यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे.
करिता खालील आदेश.
-// अंतिम आदेश //-
1. तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. विरूध्द पक्ष 1 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्तीला तिच्या मृतक पतीच्या अपघात विम्याची रक्कम रू. 1,00,000/- द्यावी. या रकमेवर विमा दावा दाखल केल्याच्या दिनांकापासून म्हणजेच दिनांक 14/05/2013 पासून ते संपूर्ण रक्कम वसूल होईपर्यंत द. सा. द. शे. 9% दराने व्याज द्यावे.
3. विरूध्द पक्ष 1 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्तीला झालेल्या शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासाची नुकसानभरपाई म्हणून रू. 10,000/- तक्रारकर्तीला द्यावे.
4. विरूध्द पक्ष 1 यांना आदेश देण्यात येतो की, या तक्रारीचा खर्च म्हणून त्यांनी तक्रारकर्तीला रू. 5,000/- द्यावे.
5. विरूध्द पक्ष 1 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी या आदेशाचे पालन आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसांचे आंत करावे.
6. विरूध्द पक्ष 2, 3 व 4 च्या विरोधात ही तक्रार खारीज करण्यात येते.