(आदेश पारित द्वारा मा. सदस्या, कु. वर्षा ओ. पाटील)
- आदेश -
(पारित दि. 29 जानेवारी, 2015)
तक्रारकर्तीचा शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा दावा विरूध्द पक्ष 1 यांनी नामंजूर केल्यामुळे तक्रारकर्तीने शेतकरी व्यक्तिगत अपघात विम्याची रक्कम मिळण्याकरिता सदरहू तक्रार मंचात दाखल केली आहे. तक्रारकर्तीच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालीलप्रमाणेः-
2. तक्रारकर्ती ही मौजा लटोरी, पो. कोटजांभोरा, तालुका सालेकसा, जिल्हा गोंदीया येथील रहिवासी असून तक्रारकर्तीचे पती श्री. मुलचंद नयनदास नागपुरे यांच्या मालकीची मौजा कोटजांभोरा, तालुका सालेकसा, जिल्हा गोंदीया येथे भूमापन क्रमांक 80 या वर्णनाची शेतजमीन असल्यामुळे ते शेतकरी व्यक्तिगत अपघात विम्याचे लाभधारक आहेत.
3. विरूध्द पक्ष 1 व 2 ही विमा कंपनी असून विरूध्द पक्ष 3 हे शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना राबविण्याचे काम करतात.
4. तक्रारकर्तीचे पती श्री. मुलचंद नयनदास नागपुरे हे दिनांक 18/09/2013 रोजी त्यांच्या घरी इलेक्ट्रीक वायरिंग तपासत असतांना विद्युत तारांचा धक्का लागून मृत्यु झाला.
5. तक्रारकर्तीचे पती शेतकरी असल्याने व अपघातात त्यांचा मृत्यु झाल्याने तक्रारकर्तीने विरूध्द पक्ष 3 यांच्याकडे दिनांक 30/11/2013 रोजी संपूर्ण कागदपत्रांसह रितसर अर्ज सादर केला व वेळोवेळी दस्तऐवजांची पूर्तता केली. परंतु आवश्यक ते दस्तऐवज दिल्यानंतरही विरूध्द पक्ष 1 यांनी दिनांक 30/03/2014 रोजी तक्रारकर्ती महिलेचा दावा, "दिलेल्या कागदपत्रानुसार मृतक हा वायरमन असल्याचा पुरावा दिलेला नाही त्यामुळे हा दावा नामंजूर करण्यात येत आहे" ह्या शे-यासह फेटाळल्यामुळे तक्रारकर्तीने विमा दाव्याची रक्कम रू. 1,00,000/- मिळण्यासाठी तसेच शारीरिक व मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई म्हणून रू. 30,000/- आणि तक्रारीचा खर्च रू. 10,000/- मिळण्यासाठी दिनांक 07/07/2014 रोजी मंचात तक्रार दाखल केली.
6. तक्रारकर्तीची तक्रार विद्यमान न्याय मंचाने दिनांक 31/07/2014 रोजी दाखल करून घेतल्यानंतर विरूध्द पक्ष यांना दिनांक 12/08/2014 रोजी मंचामार्फत नोटीसेस बजावण्यात आल्या. विरूध्द पक्ष यांना नोटीस प्राप्त झाल्यानंतर विरूध्द पक्ष 1, 2 व 3 यांनी हजर होऊन त्यांचे लेखी जबाब दाखल केले आहेत.
7. विरूध्द पक्ष 1 व 2 यांनी सदरहू प्रकरणात त्यांचा जबाब दिनांक 10/11/2014 रोजी दाखल केला व तो पृष्ठ क्र. 56 वर आहे. विरूध्द पक्ष 1 व 2 यांनी त्यांच्या लेखी जबाबात तक्रारकर्तीच्या तक्रारीचे खंडन केले असून असे म्हटले आहे की, तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु हा त्यांच्या स्वतःच्या निष्काळजीपणामुळे झाला. त्यांचा मृत्यु त्यांनी स्वतः ओढवला आणि त्यांच्या मृत्युस ते सर्वस्वी जबाबदार आहेत. कारण ते त्यांच्या घरी विद्युत पुरवठ्याची तपासणी करीत असतांना त्यांना विजेचा धक्का लागला आणि त्यांचा मृत्यु झाला. यासाठी तक्रारकर्तीच्या पतीने विद्युत माहिती संबंधीत कुठलेही प्रशिक्षण घेतलेले नव्हते किंवा त्यांच्याकडे असे कुठलेही प्रमाणपत्र नव्हते म्हणून तक्रारकर्तीची तक्रार मान्य होण्यास पात्र नाही आणि विरूध्द पक्ष 1 व 2 यांनी कुठेही आपल्या सेवेत त्रुटी केलेली नाही.
8. विरूध्द पक्ष 3 यांनी आपला लेखी जबाब दिनांक 11/09/2014 रोजी दाखल केला असून तो पृष्ठ क्र. 51 वर आहे. त्यात त्यांनी असे म्हटले आहे की, तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु दिनांक 18/09/2013 रोजी घरी इलेक्ट्रीक वायरिंग तपासत असतांना झाला आणि त्यांचा शेतकरी जनता अपघात विम्याबाबतचा प्रस्ताव सर्व कागदपत्रांसह दिनांक 30/11/2013 रोजी प्राप्त झाल्यावर त्याच दिवशी म्हणजेच दिनांक 30/11/2013 रोजी वरिष्ठ कार्यालय गोंदीया येथे पुढील कार्यवाहीकरिता पाठविण्यात आला.
9. तक्रारकर्तीने तक्रारीसोबत शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना 2012-13 पृष्ठ क्र. 12 वर, विमा दावा नामंजूर केल्याचे पत्र पृष्ठ क्र. 16 वर, शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना क्लेम फॉर्म पृष्ठ क्र. 17 वर, गाव नमुना 7/12 पृष्ठ क्र. 22 व 23 वर, फेरफाराची नोंदवही पृष्ठ क्र. 24, 25 वर, मर्ग खबरी पृष्ठ क्र. 28 वर, घटनास्थळ पंचनामा पृष्ठ क्र. 30 वर, इन्क्वेस्ट पंचनामा पृष्ठ क्र. 34 वर, पोस्ट मार्टेम रिपोर्ट पृष्ठ क्र. 36 वर, मृत्यु प्रमाणपत्र पृष्ठ क्र. 43 वर, वारस प्रमाणपत्र पृष्ठ क्र. 44 वर, तक्रारकर्तीचे शपथपत्र पृष्ठ क्र. 59 वर आणि तक्रारकर्तीच्या वकिलांचा लेखी युक्तिवाद पृष्ठ क्र. 61 वर याप्रमाणे कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
10. तक्रारकर्तीचे वकील ऍड. उदय क्षीरसागर यांनी सदरहू प्रकरणात लेखी युक्तिवाद पृष्ठ क्र. 61 वर दाखल केला असून त्यात त्यांनी असे म्हटले आहे की, विरूध्द पक्ष 1 यांनी दिनांक 30/03/2014 रोजी तक्रारकर्ती महिलेचा दावा "दिलेल्या कागदपत्रानुसार मृतक हा वायरमन असल्याचा पुरावा दिलेला नाही त्यामुळे हा दावा नामंजूर करण्यात येत आहे" ह्या शे-यासह फेटाळला. परंतु शेतकरी जनता अपघात विमा योजनेच्या शासन निर्णयातील अटी व शर्तीनुसार शेतक-याच्या अपघाताबाबत केवळ अपघात झाला ह्या कारणास्तव दावा मंजूर करावा व अनावश्यक धोका पत्करला ह्या कारणास्तव दावा नाकारता येणार नाही असे स्पष्ट नमूद केलेले आहे. म्हणून तक्रारकर्तीची तक्रार मंजूर करण्यात यावी.
11. विरूध्द पक्ष 1 व 2 च्या वकील ऍड. श्रीमती इंदिरा बघेले यांनी सदरहू प्रकरणात दाखल केलेला त्यांचा लेखी जबाब हाच त्यांचा युक्तिवाद समजण्यात यावा अशा आशयाची पुरसिस दिनांक 23/12/2014 रोजी दाखल केली ती पृष्ठ क्र. 77 वर आहे. परंतु त्यानंतर दिनांक 16/01/2015 रोजी त्यांनी आपला लेखी युक्तिवाद दाखल केला तो पृष्ठ क्र. 78 वर आहे. आपल्या लेखी युक्तिवादात त्यांनी असे म्हटले की, तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु हा त्यांच्या घरी विद्युत तारेची तपासणी करीत असतांना विजेचा धक्का (करंट) लागून झाला. हा मृत्यु त्यांच्या स्वतःच्या निष्काळजीपणाने झालेला आहे. त्यांनी विद्युत माहितीसंबंधीत कुठलेही प्रशिक्षण घेतलेले नाही किंवा तसे प्रमाणपत्र देखील त्यांच्याकडे नाही आणि ते सदरहू प्रकरणात दाखलही केलेले नाही. म्हणून विरूध्द पक्ष यांच्या सेवेमध्ये कुठलीही त्रुटी नाही. करिता सदरहू तक्रार खारीज करण्यात यावी.
12. तक्रारकर्तीचा तक्रारअर्ज, विरूध्द पक्ष यांचे लेखी जबाब, तक्रारकर्तीने तक्रारीसोबत दाखल केलेली कागदपत्रे तसेच दोन्ही पक्षांचा लेखी व तोंडी युक्तिवाद यावरून खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ.क्र. | मुद्दे | निर्णय |
1. | तक्रारकर्तीची तक्रार मान्य होण्यास पात्र आहे काय? | होय |
2. | तक्रारकर्ती शेतकरी जनता अपघात विम्याचे पैसे मिळण्यास पात्र आहे काय? | होय |
3. | या तक्रारीचा अंतिम आदेश काय? | कारणमिमांसेप्रमाणे |
- कारणमिमांसा –
13. तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु दिनांक 18/09/2013 रोजी त्यांच्या घरी इलेक्ट्रीक वायरिंगची तपासणी करीत असतांना विजेचा धक्का (करंट) लागून झाला. तक्रारकर्तीच्या पतीच्या मालकीची मौजा कोटजांभोरा, तालुका सालेकसा, जिल्हा गोंदीया येथे भूमापन क्रमांक 80 ह्या वर्णनाची शेती असल्यामुळे ते शेतकरी जनता अपघात विम्याचे लाभधारक आहेत आणि तक्रारकर्तीचे पती शेतकरी असल्याने तक्रारकर्तीने विमा दावा मिळण्यासाठी विरूध्द पक्ष 3 यांच्याकडे संपूर्ण कागदपत्रांसह रितसर अर्ज सादर केला.
14. तक्रारकर्तीने सदर प्रकरणात फेरफार पत्रक, 7/12 उतारा, घटनास्थळ पंचनामा, पोस्ट मॉर्टेम रिपोर्ट, मरणान्वेषण प्रतिवृत्त हे दस्तऐवज दाखल केलेले आहेत.
15. विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्तीने तिच्या पतीच्या मृत्युच्या अनुषंगाने विद्युत संबंधित प्रशिक्षणाचे कुठलेही दस्तऐवज दाखल केलेले नाहीत. म्हणून तक्रारकर्तीचा दावा खारीज करण्यात यावा असे लेखी व तोंडी युक्तिवादात म्हटले. परंतु तक्रारकर्तीचे पती हे शेतकरी होते व महाराष्ट्र शासन निर्णय, शेतकरी जनता अपघात विमा योजना पृष्ठ क्र. 71 मुद्दा क्र. 5 नुसार अपघाती मृत्युसंदर्भात दुर्घटना घडल्याचे सिध्द झाल्यास अनावश्यक धोका पत्करला या कारणास्तव एकही प्रकरण नाकारता येणार नाही असे स्पष्टपणे नमूद करण्यात आलेले आहे. त्यामुळे तक्रारकर्तीची तक्रार मंजूर होण्यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे.
करिता खालील आदेश.
-// अंतिम आदेश //-
1. तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. विरूध्द पक्ष 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्तीला तिच्या मृतक पतीच्या अपघात विम्याची रक्कम रू. 1,00,000/- द्यावी. या रकमेवर विमा दावा दाखल केल्याच्या दिनांकापासून म्हणजेच दिनांक 30/11/2013 पासून ते संपूर्ण रक्कम वसूल होईपर्यंत द. सा. द. शे. 9% दराने व्याज द्यावे.
3. विरूध्द पक्ष 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्तीला झालेल्या शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासाची नुकसानभरपाई म्हणून रू. 10,000/- तक्रारकर्तीला द्यावे.
4. विरूध्द पक्ष 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, या तक्रारीचा खर्च म्हणून त्यांनी तक्रारकर्तीला रू. 5,000/- द्यावे.
5. विरूध्द पक्ष 1 व 2 यांनी उपरोक्त आदेश क्र. 2, 3, 4 चे पालन संयुक्तिकरित्या अथवा वैयक्तिकरित्या करावे.
6. विरूध्द पक्ष 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी या आदेशाचे पालन आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसांचे आंत करावे.
7. विरूध्द पक्ष 3 च्या विरोधात ही तक्रार खारीज करण्यात येते.