ORDER | निकालपत्र ( पारित दिनांक :02/01/2015) ( मा. अध्यक्ष, श्री. प्रकाश एल. जाधव यांच्या आदेशान्वये) तक्रारकर्तीने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अन्वये प्रस्तुत तक्रार दाखल केलेली आहे. - तक्रारकर्तीच्या तक्रारीचा आशय थोडक्यात असा की, त.क. चे पती मृतक प्रविण केशवराव अढाळे हे शेतकरी होते व त्यांची मौजा-कोरी, ता.समुद्रपूर, जि. वर्धा येथे शेत सर्व्हे नं. 101/3 ही शेतजमीन आहे व तो शेतीचा व्यवसाय करीत होता आणि शेतीच्या उत्पन्नावर कुटुंबाचे पालनपोषन करीत होता. महाराष्ट्र शासनाच्या शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना अंतर्गत त.क.च्या पतीचा रु.1,00,000/-चा विमा वि.प. 4 तर्फे वि.प. 1 व 2 कडे उतरविण्यात आला होता. त.क. ही मयत प्रविण केशवराव अढाळे यांची पत्नी असल्याने सदर विमाची लाभधारक आहे.
- त.क.ने पुढे असे कथन केले आहे की, दि. 06.01.2012 रोजी तिचे पती प्रविण अढाळे हे त्याच्या मित्रा सोबत मोटरसायकलवर मागे बसून जात असतांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने जखमी होऊन मृत पावले. त्यामुळे शासना तर्फे त.क.च्या पतीचा शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा काढला असल्याने व अपघात झाल्याने तक्रारकर्ती विरुध्द पक्ष क्रं.1 व 2 कडून रु.1,00,000/-ची विमा रक्कम मिळण्यास पात्र आहे.
- त.क.ने पुढे असे कथन केले आहे की, तिने दि. 13.08.2012 रोजी सदर अपघात विम्याचा लाभ मिळावा म्हणून आवश्यक कागदपत्रासह प्रकरण वि.प. 3 मार्फत वि.प.क्रं. 1 व 2 कडे पाठविले व वेळावेळी वि.प.ने मागितलेल्या दस्ताऐवजाची पूर्तता केली. परंतु वि.प. 1 ने दि. 04.10.2013 रोजी त.क.ला पत्र पाठवून अपघाताच्या वेळी तिचे पती नशेत असल्याच्या कारणावरुन तिचा विमा दावा फेटाळला. वास्तविकतः त.क.चे पती अपघाताच्या वेळेस नशेत असल्याबद्दल कुठलाही पुरावा नसतांना वि.प. 1 ने अकारण दावा फेटाळला आहे. त्यामुळे वि.प.चे कृत्य ही सेवेतील त्रृटी आहे. म्हणून तक्रारकर्तीने प्रस्तुत तक्रार दाखल केली असून त्यात विमा दाव्याची रक्कम रुपये 1,00,000/-, शारीरिक मानसिक त्रासाबद्दल 20,000/-रुपये व तक्रारीचा खर्च 10,000/-रुपये मिळावा अशी विनंती केली आहे.
- वि.प. 1 दी न्यू इंडिया एन्श्योरन्स कंपनी यांनी आपला लेखी जबाब नि.क्रं. 9 वर दाखल केला असून त्यांनी तक्रार अर्जास सक्त विरोध केला आहे. वि.प. 1 व 2 विमा कंपनी असून वि.प. 3 विमा सल्लागार कंपनी आहे हे मान्य केले असून इतर सर्व आक्षेप अमान्य केलेले आहे. वि.प. 1 चे म्हणणे असे की, त.क.चा पती हा अपघाताच्या वेळेस खूप दारु पिऊन होता आणि दारुच्या नशेत वाहनावर बसून प्रवास करीत होता. विमा पॉलिसीच्या तरतुदीप्रमाणे जर कोणीही वाहनावरील स्वार नशेत जर वाहन चालवित असेल तर व त्या परिस्थितीत अपघात झाल्यास विमा पॉलिसीच्या अटींचा भंग होतो आणि अशा परिस्थितीत मृतकाचे वारस कुठल्याही प्रकारच्या नुकसानभरपाईस पात्र होत नाही आणि म्हणूनच वि.प. 1 ने दि. 04.10.2012 रोजी पत्राप्रमाणे ते कळविले होते की, शवविच्छेदनाच्या अहवालामुळे मयत हा दारुच्या नशेत असल्यामुळे दावा फेटाळण्यात आला आहे. वि.प. 1 ने सेवेत कुठलीही त्रृटीपूर्ण व्यवहार केलेला नाही. त.क.चा तक्रार अर्ज चुकिचा असल्यामुळे तो खारीज करण्याची विनंती केली आहे.
- वि.प. 2 यांना नोटीस मिळून सुध्दा ते या प्रकरणात हजर झाले नाही. म्हणून दि. 17.11.2014 रोजी त्यांच्या विरुध्द प्रकरण एकतर्फा चालविण्याचा आदेश पारित करण्यात आला.
- वि.प. 3 कबाल इन्श्योरन्स ब्रोकिंग सर्व्हिसेस यांनी आपला लेखी जबाब नि.क्रं.10 वर दाखल केलेला आहे. त्यात सदर कंपनी ही राज्य शासनाकडून कोणतेही विमा प्रिमियम स्विकारत नाही आणि ती शासनाला विनामूल्य मध्यस्थ सल्लागार म्हणून सेवा देत असल्यामुळे त.क.चा विमा दावा देण्याची जबाबदारी वि.प. 3 ची नाही असे म्हटले आहे. केवळ महाराष्ट्र राज्य शासनाला सदरील विमा योजना राबविण्यासाठी विना मोबदला सहाय्य करते. यामध्ये मुख्यत्वे शेतक-यांचा विमा दावा अर्ज तालुका कृषी अधिकारी/जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे आल्यावर विमा दावा अर्ज मिळाल्यावर योग्य त्या विमा कंपनीकडे पाठविणे व विमा कंपनीकडून दावा मंजूर होवून आलेला धनादेश संबंधीत वारसदारांना देणे, एवढेच काम आहे. या शिवाय राज्य ग्राहक तक्रार निवारण मंच, मुंबई यांच्या औरंगाबाद खंडपीठाने अपील क्रं.1114/2008 मधील दि.16.03.2009 चा आदेश आपल्या म्हणण्याच्या पृष्ठयर्थ दाखल केला आहे. त्याप्रमाणे विना मोबदला मध्यस्थ सेवा देणारी ही कंपनी विमा ग्राहकाला विमा दाव्याची रक्कम देण्यास जबाबदार नसल्याचा निर्णय दिला आहे.
- वि.प. 4 यांनी आपला लेखी जबाब नि.क्रं. 14 वर दाखल केला असून असे कथन केले की, शेतकरी प्रविण केशवराव अढाळे यांचा मृत्यु दि.06.01.2012 रोजी झाला. वारसदार शेतकरी यांचा जनता अपघात विषयक प्रस्ताव या कार्यालयास प्राप्त झाला व सदर प्रस्ताव त्यांच्या कार्यालयामार्फत पत्र क्रं. 3094/12, दि. 14.05.2012 अन्वये जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी वर्धा यांना पुढील कार्यवाहीकरिता सादर करण्यात आला. त्यानंतर दि. 28.05.2012 ला सदर प्रस्तावा संबंधीत त्रृटीबद्दल वर्धा यांच्या कार्यालयातून पत्र प्राप्त झाले. त्याप्रमाणे सदर पत्राबाबत मंडळ कृषी अधिकारी यांना दि. 11.06.2012 च्या पत्राप्रमाणे पूर्तता करण्याबाबत कळविण्यात आले व दि. 13.08.2012 ला जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी वर्धा यांच्या कार्यालयाने त्रृटीची पूर्तता करुन पाठविले. सदर जनता विमा योजना ही शासन स्तरावर राबविण्यात येते व आलेला प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास सादर करणे व त्यांच्याकडून पुढील कार्यवाहीस विमा कंपनीकडे सादर करण्यात येते. त्यामुळे वि.प. 4 चा कोणताही कसूर नसून विमा दावा मंजूर किंवा नामंजूर करण्यास वि.प. 4 प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे संबंध येत नाही. वि.प. 1 ते 3 हे सर्वस्वी जबाबदार आहेत. म्हणून वि.प. 4 च्या विरुध्दची तक्रार खारीज करण्यात यावी अशी विनंती केली आहे.
- त.क.ने तिच्या कथनाच्या पृष्ठयर्थ स्वतःचे शपथपत्र किंवा तोंडी पुरावा दाखल केलेला नाही. तसे पुरसीस नि.क्रं. 17 वर दाखल केले आहे व वर्णन यादी नि.क्रं. 2 सोबत एकूण 13 कागदपत्रे दाखल केली आहे.
- वि.प. 1 ने आपल्या कथनाच्या पृष्ठयर्थ सिध्दार्थ गणपत पाटील यांचे शपथपत्र नि.क्रं. 15 वर दाखल केले असून महाराष्ट्र शासनाचे शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजनाचे परिपत्रक व पॉलिसीची नक्कल वर्णन यादी नि.क्रं. 19 सोबत दाखल केलेली आहे. त.क. व वि.प.ने लेखी युक्तिवाद दाखल केलेला नाही. तक्रारकर्ती व वि.प. 1 च्या वकिलांचा तोंडी युक्तिवाद ऐकून घेण्यात आला.
- वरीलप्रमाणे तक्रारकर्ती व वि.प. यांचे परस्पर विरोधी विधानावरुन खालील मुद्दे मंचासमोर विचारार्थ काढून त्यावरील कारणमिमांसा पुढील प्रमाणे आहे.
अ.क्रं. | मुद्दे | उत्तर | 1 | विरुध्द पक्ष क्रं. 1 व 2 ने तक्रारकर्तीचा विमा दावा नाकारुन सेवेत त्रृटीपूर्ण व्यवहार व अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला आहे काय ? | होय | 2 | तक्रारकर्ती मागणीप्रमाणे लाभ मिळण्यास पात्र आहे काय ? | अंशतः | 3 | अंतिम आदेश काय ? | तक्रार अंशतः मंजूर. |
-: कारणमिमांसा :- - मुद्दा क्रं.1 व 2 बाबत , ः- त.क. चे पती मयत प्रविण केशवराव अढाळे हे शेतकरी होते व त्यांच्या नांवे मौजा कोरी, ता.समुद्रपूर, जि. वर्धा येथे शेत सर्व्हे नं. 101/3 ही शेतजमीन आहे व त.क.च्या पतीचा दि.06.01.2012 रोजी झालेल्या वाहन अपघातात जखमी होऊन मृत्यु झाला हे वादातीत नाही. त.क.ने दाखल केलेला 7/12 चा उतारा व शेता संबंधी दाखल केलेले इतर कागदपत्रावरुन हे सिध्द होते की, मृत्यु समयी प्रविण केशवराव अढाळे यांच्या नांवाने शेती होती व त्याचा शेतीचा व्यवसाय होता. तसेच महाराष्ट्र शासनाने शेतक-यांकरिता व्यक्तिगत अपघात विमा योजना अंतर्गत त.क.च्या पतीचा रु.1,00,000/-विमा वि.प. 4 मार्फत वि.प. 1 व 2 कंपनीकडे उतरविला होता हे सुध्दा वादातीत नाही. वि.प. 3 व 4 यांच्या कथनानुसार व त.क.ने दाखल केलेल्या कागदपत्रावरुन असे निदर्शनास येते की, तक्रारकर्तीने सर्व कागदपत्रांची पूर्तता करुन तिच्या पतीच्या मृत्युनंतर विमा योजने अंतर्गत तिला मिळणा-या लाभाची रक्कम मिळण्यासाठी वि.प. 3 मार्फत वि.प. 1 विमा कंपनीला पाठविले. तसेच वेळोवेळी मागणीप्रमाणे कागदपत्रांची पूर्तता केली. त.क.ने दाखल केलेल्या नि.क्रं. 2 (1) चे पत्रावरुन असे दिसून येते की, वि.प. 1 कडून त.क. चा विमा दावा शवविच्छेदन अहवालावरुन त.क.चे पती अपघाताच्या वेळेस मद्यार्क पदार्थाचे सेवन केलेले होते म्हणून त.क.चा विमा दावा नाकारण्यात आला आहे.
- त.क. च्या अधिवक्ता यांनी आपल्या युक्तिवाद असे प्रतिपादन केले की, दि. 06.01.2012 रोजी त.क.चे पती आपल्या मित्रांसोबत मोटरसायकलवर मागे बसून जात असतांना अज्ञात वाहनाने त्या मोटरसायकलला धडक दिली व त्यामुळे जखमी होऊन मरण पावले. त.क.च्या पतीने कसल्याही मद्यार्क पदार्थाचे सेवन केलेले नव्हते किंवा ते नशेत नव्हते. त्यामुळे वि.प. 1 ने चुकिने व गैरकायदेशीररित्या विमा दावा फेटाळला आहे. तक्रारकर्ती ही मयत प्रविण केशवराव अढाळे यांची पत्नी या नात्याने विमा दाव्याची रक्कम मिळण्यास पात्र आहे.
- या उलट वि.प. 1 चे अधिवक्ता यांनी असा युक्तिवाद केला की, पोस्ट मार्टम रिपोर्ट (शवविच्छेदन अहवाल) वरुन हे सिध्द होते की, त.क.चे पती प्रविण अढाळे हे अपघाताच्या वेळेस दारुच्या नशेत होते, त्यामुळे अपघात झाला आणि प्रविण अढाळे यांनी स्वतःहून जखम करुन घेतली. त्यामुळे वि.प. 1 ने विमा दावा फेटाळला आहे व तो योग्य आहे. वि.प.ने त.क.ला कोणतीही त्रृटीपूर्ण सेवा दिलेली नाही.
- त.क.ने पोलिसांनी चौकशी केलेली कागदपत्रे वर्णन यादी 2(7) वर दाखल केलेली आहे. त्याचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, त.क.चे पती व त्याचे मित्र दि. 06.01.2012 रोजी मोटरसायकलने मौजा जसापूर शिवार, राष्ट्रीय महामार्ग क्रं. 6, ता.जि. नागपूर या मार्गने प्रवास करीत असतांना अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटरसायकलला धडक दिली व अपघात झाला. त्यात त.क.चे पती व त्याचे मित्र अमोल रामभाऊ काळे हे जखमी झाले व दवाखान्यात मृत्यु पावले. पोलिस तपासात असे कुठेही निष्पन्न झाले नाही की, त.क.चे पती प्रविण अढाळे हे अपघाताच्या वेळेस मोटरसायकल चालवित होते व ते दारुच्या नशेत होते व त्यामुळे हा अपघात झाला आहे. या उलट तपास अधिका-याने त्याच्या अहवालात प्रत्यक्ष दर्शनी साक्षीदारांचे जबाब नोंदविल्याचे नमूद केलेले आहे व त्यांच्या जबाबावरुन तपास अधिकारी या निष्कर्षा प्रत आले की, अज्ञात वाहनाने त.क.चे पती प्रवास करीत असलेल्या मोटरसायकलला धडक दिली व अपघात झाला. तसेच तपासात असे कुठेही आढळून आले नाही की, त.क.चे पती हे अपघाताच्या वेळी मोटरसायकल चालवित होते. पंचनाम्याचे काळजीपूर्वक अवलोकन केले असता, डिव्हायडरला ठोस देऊन अपघात झाला असे दिसून येत नाही जर डिव्हायडरला ठोस देऊन अपघात झाला असता तर नक्कीच डिव्हायडरला त्याचे खून आढळून आले असते परंतु तसे दिसून येत नाही. जरी पंचनामा शवविच्छेदन अहवालामध्ये डिव्हायडरला मोटरसोयकल धडक होऊन अपघात झाला असे नमूद केले असले तरी तपासात तसे निष्पन्न झालेले नाही.व दोन्ही दस्ताऐवजामध्ये मयत प्रविण अढाळे हे पाठिमागे बसले होते असे नमूद केलेले आहे. त्यामुळे अपघात त.क.च्या पतीच्या चुकिमुळे झाला व त्याला झालेली जखम स्वतःमुळे झाली असे म्हणता येणार नाही.
- वि.प.चे विद्यमान वकिलानी पोस्ट मार्टम रिपोर्टवर मंचाचे लक्ष वेधित केले होते व असे दाखविण्याचा प्रयत्न केला की, मयत प्रविण अढाळे हे दारुच्या नशेत होते. शवविच्छेदनाचा अहवाल वर्णन यादी नि.क्रं.2(8) वर दाखल करण्यात आले आहे. त्याचे अवलोकन केले असता मयताच्या पोटात अल्कोहोलाचे प्रमाण आढळून आले परंतु मयत हा अमली पदार्थाचे किंवा मद्यार्क पदार्थाचे अमलाखाली होता असे कुठेही नमूद नाही. या उलट शवविच्छेदन अहवालावरुन प्रविण अढाळेचा मृत्यु हा डोक्यावर जखम झाल्याने झाला असे नमूद केलेले आहे. तसेच शेतकरी विम्याचे त्रिपक्षीय करारातील क्लॉज 8 (iii) मधील एक्सक्लयुजन क्लॉज 11 प्रमाणे मद्यार्क पदार्थाच्या अंमलाखाली मृत्यु झाल्यास विमा दावा देण्यास विमा कंपनी जबाबदार नाही असे नमूद आहे. परंतु शवविच्छेन अहवालात असे कुठेही दर्शवित नाही की, मयत प्रविण अढाळेचा मृत्यु मद्यार्क पदार्थाचे सेवन केल्यामुळे किंवा मद्यार्क अमलीपदार्थाच्या अंमलाखाली असल्यामुळे झाला. त्यामुळे दाखल केलेल्या कागदपत्रावरुन मंच या निष्कर्षा प्रत येते की, त.क.चे पतीचा मृत्यु अज्ञात वाहनाने मोटरसायकलला धडक दिल्यामुळे जखमी होऊन झाला आहे.
- वरील प्रमाणे उभय पक्षांचा युक्तिवाद व उपलब्ध दस्ताऐवजांचे विवेचनावरुन मंच या निष्कर्षा प्रत येते की, त.क. ने विमा दावा वि.प.क्रं.4 तर्फे सर्व कागदपत्रासह मुदतीच्या आत सादर केला. तसेच अपघाताच्या वेळेस मयत प्रविण अढाळे हे मद्यार्क अमलाखाली नसलयाचे व त्याचे मद्यार्क द्रव्याच्या सेवनाचा अपघाताशी कोणताही संबंध नसल्याने तक्रारकर्तीचा विमा दावा नाकारण्याची वि.प. 1 विमा कंपनीची कृती ही विमा लाभार्थ्या प्रती सेवेतील न्यूनता आहे. म्हणून तक्रारकर्तीचा विमा दावा नाकारण्याच्या वि.प. विमा कंपनीची कृती असमर्थनीय आहे. म्हणून वि.प. 1 व 2 यांनी तक्रारकर्तीला विमा दाव्याची रक्कम रुपये 1,00,000/- सदर तक्रार दाखल तारखेपासून तर प्रत्यक्ष रक्कम तक्रारकर्तीच्या हातात पडेपर्यंत द.सा.द.शे. 9टक्के दराने व्याजासह देण्याचा आदेश देणे योग्य होईल. तसेच विमा दावा नाकारल्यामुळे त.क.ला मंचासमोर यावे लागले. त्यामुळे निश्चितच तक्रारकर्तीला मानसिक व शारीरिक त्रास झालेला आहे. त्याचे स्वरुप पाहता त.क. ला या सदराखाली रु.5,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 2,000/- देण्याचा आदेश होणे न्यायसंगत होईल. वि.प. क्रं. 3 व4 यांनी तक्रारकर्तीचे सर्व कागदपत्रासह विमा दावा मिळण्यासाठी वि.प. कडे पाठविली व त्यांनी कुठलीही सेवेत त्रृटीपूर्ण व्यवहार केला नसल्यामुळे व वि.प. 3 ही विना मोबदला सेवा करणारी कंपनी असल्यामुळे विमा दावा देण्याची त्यांच्यावर कोणतीही जबाबदार नाही. त्यामुळे त्यांच्या विरुध्द ची प्रस्तुत तक्रार खारीज होण्यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे. म्हणून मुद्दा क्रमांक 1 व 2 वरील निष्कर्ष त्याप्रमाणे नोंदविला आहे.
वरील निष्कर्षास अनुसरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे. आदेश 1 तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. 2 विरुध्द पक्ष क्रं. 1 व 2 दी न्यू इंडिया इन्श्योरन्स कंपनी लिमिटेड यांनी तक्रारकर्तीला तिचे पती मृतक प्रविण केशवराव अढाळे यांच्या मृत्युबाबत शेतकरी व्यक्तिगत अपघात विम्याची रक्कम रु.1,00,000/- तक्रार दाखल तारखेपासून प्रत्यक्ष रक्कम तक्रारकर्तीच्या हातात पडेपर्यंत द.सा.द.शे. 9% व्याजासह द्यावी. 3 विरुध्द पक्ष क्रं. 1 व 2 ने तक्रारकर्तीस झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल रुपये 5,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून रु.2,000/- द्यावेत. 4 विरुध्द पक्ष क्रं. 3 व 4 यांना रक्कम देण्याच्या दायित्वातून मुक्त करण्यात येते. वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्त झाल्याच्या तारखेपासून एक महिन्याच्या आत वि.प.क्रं. 1 व 2 ने करावी. 5 मा.सदस्यांसाठीच्या ‘ब’ व ‘क’ फाईल्स संबंधितांनी परत घेवून जाव्यात. 6 निकालपत्राच्या प्रति सर्व संबंधित पक्षांना माहितीस्तव व उचित कार्यवाही करिता पाठविण्यात याव्यात. | |