( पारीत दिनांक :26/09/2014 )
(मा.अध्यक्ष श्री.प्रकाश एल.जाधव.)
1. अर्जदार हिने प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 12 अन्वये गैरअर्जदार यांच्या विरुध्द विमा दाव्याची रक्कम मिळण्याकरीता दाखल केली आहे.
2. अर्जदार हीची तक्रार अशी आहे की, तीचा मुलगा मयत संदीप साहेबदार कडु हा शेतकरी होता व त्यांचे नावे मौजा परसोडी ता.कारंजा(घा), जि.वर्धा येथे शेती होती. मयत संदीप साहेबदार कडु हा शेतीचा व्यवसाय करीत होता.
3. दिनांक 28/03/2012 रोजी रात्री 11.30 वाजता मयत संदीप साहेबदार कडु हा विजय देशमुख सोबत आपल्या मोटर सायकलनी हेटीकुंडी मार्गी घरी येत असतांना रस्त्यात उभा असलेल्या नादुरुस्त ट्रक क्र.जी.जे.19 टी-2227 याला ठोस लागल्याने मयत संदीप साहेबदार कडु हे जखमी झाले त्यामुळे त्यांना उपचाराकरीता शतायु हॉस्पीटल नागपुर येथे भर्ती केले, परंतु उपचारा दरम्यान त्यांचा दिनांक 30/03/2012 रोजी मृत्यु झाला. सदर अपघातासंबंधी पोलीस स्टेशन कारंजा(घा) जिल्हा वर्धा यांनी एफ.आय.आर. नोंदविला आहे तसेच घटनेच्या वेळेस ट्रक रस्त्यावर बिना इन्डीकेटर, टेललाईट, कोणताही इशारा व अडथळा न लावता रस्त्याच्या मधोमध उभा होता व त्यामुळेच सदर अपघात झाला.
4. अर्जदाराचे कथन असे आहे की, महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील शेतक-यांसाठी ‘शेतकरी जनता अपघात विमा योजना’ राबवित असुन महाराष्ट्रातील शेतकरी व त्यांच्या कुटूंबांच्या भविष्यासाठी अपघाती विमा रु.1,00,000/- गैरअर्जदार क्र.1 यांच्याकडे काढला होता. विमा काढते वेळी गैरअर्जदार क्र.1 यांच्याशी महाराष्ट्र शासनाने करारनामा केला होता. गैरअर्जदार क्र.2 हे शासनाचे विमा सल्लागार कंपनी/मध्यस्थ म्हणुन काम करीत होते. ‘शेतकरी जनता अपघात विमा योजना’ अंतर्गत विमा दावा तालुका कृषी अधिकारी यांचे मार्फत जमा करुन तालुक कृषी अधीकारी यांच्या कडे तपासण्याकरीता पाठविण्यात येत व लाभार्थीचा दावा पत्र व जोडलेले कागदपत्र हे गैरअर्जदार क्र.2 यांच्या मार्फत गैरअर्जदार क्र.1 विमा कंपनी यांना दावा निवारण करण्यासाठी पाठविण्यात येते.
5. अर्जदार ही मयत संदीप साहेबदार कडु यांची विधवा आई असुन दावा निराकरण करण्यासाठी लागणारे शासनाने निर्देशित व तालुका कृषी अधिकारी यांनी सुचविलेले कागदपत्रे तालुका कृषी अधिकारी कारंजा घाडगे यांच्या कडे दावा अर्जासोबत सादर केले. अर्जदार हिने मुळ दावा अर्जा सोबत 7/12, 8-अ, मृतकाचे ओळखपत्र, पोलीसांनी दिलेले सांक्षंकित कागदपत्र, पासबुकची प्रत, मृत्युप्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे जोडलेली होती. तालुका कृषी अधिकारी यांनी कागदपत्रे स्विकारुन दावा निवारण होण्याचे आश्वासन दिले होते. दिनांक 12/02/2013 रोजी गैरअर्जदार क्र.1 यांनी पत्राद्वारे अर्जदार हिला विमा दावा नामंजुर झाल्याबाबत कळविला. मयत हा वाहन चालवित असतांना दारुच्या नशेत असल्याचे कारण दर्शवित विमा दावा नामंजुर करण्यात आला आहे असे कळविले. अर्जदार हिचे असे म्हणणे आहे की, घटनेच्या वेळेस ट्रक ड्रायव्हरने रस्त्यावर बिना इन्डीकेटर, टेललाईट, कोणताही इशारा व अडथळा न लावता रस्त्याच्या मधोमध उभा होता व त्यामुळेच सदर अपघात झाला. दाव्या संबंधी कागदपत्रे प्राप्त झाल्यापासुन 30 दिवसांच्या आंत विमा दाव्याचे निराकरण गैरअर्जदार क्र.1 यांनी करावयास पाहीजे होते, परंतु खोटे कारण दाखवुन विधवा अर्जदार हिला विमा दाव्याची रक्कम रु.1,00,000/- त्यांनी दिली नाही, त्यामुळे अर्जदार हिला मानसिक व शारिरीक त्रास सहन करावा लागत आहे.
6. गैरअर्जदार क्र.1 यांनी विहीत मुदतीत विमा दावा रक्कम दिली नाही ही सेवेतील त्रृटी ठरते म्हणुन अर्जदार हिने सदरील अर्ज दाखल करुन विमा दाव्याची रक्कम रु.1,00,000/-, मानसिक व आर्थिक त्रासापाई नुकसान भरपाई रु.20,000/- व तक्रार खर्च रु.5000/- मिळण्याबाबत मंचास विनंती केली आहे.
7. गैरअर्जदार क्र.1 विमा कंपनी यांनी आपला लेखी जवाब नि.क्र.12 वर दाखल करुन कबुल केले आहे की, महाराष्ट्र शासनाने शेतक-यांसाठी ‘शेतकरी जनता अपघात विमा योजना’ लागू केली असुन महाराष्ट्रातील शेतकरी व त्यांच्या कुटूंबांच्या भविष्यासाठी अपघाती विमा रु.1,00,000/- गैरअर्जदार क्र.1 यांच्याकडे काढला होता. तसेच मयत संदीप साहेबदार कडु हे शेतकरी होते हि बाब कबुल केली असुन इतर बाबी अमान्य केल्या आहे. गैरअर्जदार क्र.1 यांनी कथन केले आहे की, मयत हा वाहन चालवित असतांना दारुच्या नशेत होता व त्यामुळे गैरअर्जदार क्र.1 यांनी विमा पॉलिसीचा भंग झाल्यामुळे अर्जदाराचा विमा दावा फेटाळला आहे. गैरअर्जदार यांनी कथन केले आहे की, झालेला अपघात हा मयताच्या चुकीमुळे झाला असल्याचे दिसुन येते. त्यामुळे अर्जदार हिने दाखल केलेला विमा दावा पुर्णतः खोटा असल्यामुळे खारीज करण्याची विनंती मंचास केली आहे.
8. गैरअर्जदार क्र.2 कबाल इंशुरन्स ब्रोकिंग सर्व्हिसेस प्रा.लि. नागपुर यांनी आपला लेखी जवाब नि.क्र.6 वर दाखल केला असुन त्यात नमुद केले आहे की, ते केवळ मध्यस्थ सल्लागार आहेत व शासनास विना मोबदला सहाय्य करतात. अर्जदाराला विमा दावा देण्याची जबाबदारी त्यांची नाही. केवळ कागदपत्राची छाननी करुन विमा दावा गैरअर्जदार क्र.1 कउे पाठविणे हीच त्यांची जबाबदारी आहे. मा.राज्य ग्राहक आयोग मुंबई यांच्या औरंगाबाद खंड पिठाने अपील क्र.1114/2008 मध्ये दिनांक 16/03/2009 रोजी पारीत केलेला आदेश आपल्या म्हणण्या पुष्ठयर्थ दाखल केला आहे. गैरअर्जदार क्र.2 ही ग्राहकांस सेवा देणारी कंपनी असल्यामुळे तसेच प्रस्तुत प्रकरणात त्यांनी कुठलीही त्रुटीची सेवा दिली नसल्यामुळे त्याच्या विरुध्दची तक्रार खारीज करण्याची विनंती मंचास केली आहे.
9. अर्जदाराने आपल्या म्हणण्या पुष्ठयर्थ स्वतःचे शपथपत्र व बरेच कागदपत्रे दाखल केली आहेत. गैरअर्जदार क्र.1 यांनी त्यांचे म्हणण्याचे पुष्ठयर्थ कुठलेही शपथपत्र दाखल केले नाही. अर्जदाराचे वकील व गैरअर्जदार क्र.1 यांच्या वकीलांचा मौखिक युक्तिवाद ऐकण्यात आला.
7. अर्जदार व गैरअर्जदारांचा वाद, प्रतिवाद, त्यांच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद पाहता आमच्या समोर खालील मुद्दे उपस्थित होतात. ते मुद्दे व त्यावरील उत्तरे पुढील कारणे मिमांसात नमुद केल्यानुसार खालीलप्रमाणे आहे.
1) मुद्दा क्रमांक 1 - गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी त्रुटीपुर्ण
सेवा व अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला आहे काय ?
उत्तर - होय फक्त गैरअर्जदार क्र.1 यांनी.
2) अर्जदार मागणीप्रमाणे लाभ मिळण्यास हक्कदार आहे
काय ?
उत्तर - होय.
3) अंतिम आदेश काय ? अंशतः मंजुर
// कारणे व निष्कर्ष //
मुद्दा क्र.1 व 2 ः अर्जदार ही मयत संदीप साहेबदार कडु यांची विधवा आई असुन मयत संदीप साहेबदार कडु हा शेतकरी होता व त्याचे नावे मौजा परसोडी ता.कारंजा(घा), जि.वर्धा येथे शेती आहे ही बाब वाद्ग्रस्त नाही. तसेच दिनांक 28/03/2012 रोजी रात्री 11.30 वाजता मयत संदीप साहेबदार कडु हा विजय देशमुख सोबत आपल्या मोटर सायकलनी हेटीकुंडी मार्गी घरी येत असतांना रस्त्यात उभा असलेल्या नादुरुस्त ट्रक क्र.जी.जे.19 टी-2227 याला ठोस लागल्याने मयत संदीप साहेबदार कडु हे जखमी झाले व उपचारा दरम्यान त्यांचा दिनांक 30/03/2012 रोजी मृत्यु झाला हे उभयंतांना कबुल आहे. नि.क्र.2/10 वर दाखल शवविच्छेदन अवहालाच्या छायांकीत प्रतीचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, अपघातात मयत संदीप साहेबदार कडुच्या डोक्याला मार लागल्याने झालेल्या जखमांमुळे मृत्यु झाला.
11. अर्जदाराच्या वकीलाने असा युक्तिवाद केला की, अर्जदाराचा मुलगा साहेबराव कडु दिनांक 28/03/012 रोजी झालेल्या मोटार अपघातात जखमी होवुन दिनांक 30/03/2012 रोजी मरण पावला. घटनेच्या वेळेस ट्रक रस्त्यावर बिना इन्डीकेटर, टेललाईट, कोणताही इशारा व अडथळा न लावता रस्त्याच्या मधोमध उभा होता व त्यामुळेच सदर अपघात झाला. अर्जदारच्या वि.वकीलाने असेही कथन केले आहे की, मयत संदीप साहेबराव कडु हा दारुची नशा करीता नव्हता, अपघातात डोक्याला जबर मार लागल्यामुळे त्याचा मृत्यु झाला. जर त्याने दारुचे सेवन केले असते तर तसे मयताच्या शवविच्छेदन अहवालात तसे नमुद असते. त्यामुळे अर्जदार विमा दावा रक्कम रु.1,00,000/- मिळण्यास पात्र आहे.
12. या उलट गैरअर्जदार क्र.1 च्या वकीलाने युक्तिवादात असे प्रतीपादन केले आहे की, मयताचे शवविच्छेदन हे दोन दिवसानंतर करण्यात आले व त्यामुळे मयताच्या पोटात न पचलेल्या अन्नात मादक द्रव्य आढळुन आले नाही. ‘शेतकरी जनता अपघात विमा योजना’ या त्रीपक्षी करारातील क्लॉज 8(III) मधील एक्लुसीव्ह क्लॉज (II) प्रमाणे ‘ मद्य प्राशनाने झालेल्या अपघातास विमा कंपनी जबाबदार नाही,’ पुढे असे नमुद आहे की, मयताने मद्यार्थ सेवन केले असल्याने मोटार व्हेइकल अॅक्ट च्या कलम 184 व 185 अंतर्गत गुन्हा मयताच्या विरुध्द नोंदविण्यात आला आहे त्यामुळे विमा कंपनी विमा दावा देण्यास जबाबदार नाही. हे सत्य आहे की, पोलीसांनी त्यांच्या फिर्यादीत अपघातावेळी मयत संदीप साहेबराव कडु हा दारुच्या नशेत होता व नशेत वाहन चालवित होता म्हणुन त्याचे विरुध्द गुन्हा नोंदविला आहे. परंतु असे दिसुन येते की, अपघातानंतर ताबोडदोब पोलीस घटनास्थळी पोहचले व त्यांनी जखमीस दवाखाण्यात हलविले व तीथे असे निदर्शनास आले की मयत दारुच्या नशेत होता. एफ.आय.आर. ची छायांकीत प्रत नि.क्र. 2/7 वर दाखल केली आहे. त्यावरुन असे दिसुन येते की, घटनेच्या वेळेस ट्रक रस्त्यावर बिना इन्डीकेटर, टेललाईट, कोणताही इशारा व अडथळा न लावता रस्त्याच्या मधोमध उभा होता व त्यामुळेच मोटार सायकलची ठोस लागली व अपघात झाला. सदर अपघात रात्री 11.30 वाजता झाला. जेंव्हा ट्रक हा नादुरुस्त होवुन रोडवर होता तर ट्रकच्या ड्रायव्हरची ही जबाबदारी होती की त्याने नादुरुस्त ट्रकला इन्डीकेटर, टेललाईट, कोणतातरी इशारा व अडथळा लावयास पाहीजे होता. परंतु त्याने तसे केल्याचे आढळुन येत नाही. ही बाब घटनास्थळ पंचनामा व एफ.आय.आर. वरुन दिसुन येते. पोलीसांनी फक्त मयत साहेबराव कडु यांचे वरच गुन्हा नोंदविलेला नसुन ट्रक ड्रायव्हर वर सुध्दा गुन्हा नोंदविलेला आहे. यावरुन असे स्पष्ट होते की अपघात हा दोघांच्याही चुकीने झालेला आहे.
13. अपघात दिनांक 28/03/2012 रोजी रात्री 11.30 वाजता झाला व मृत्यु दिनांक 30/03/2012 रोजी झाला व शवविच्छेदन दिनांक 30/03/2012 रोजी सकाळी 11 वाजता झाले. त्यामुळे निश्चितच मयताच्या पोटामधील मादक पदार्थाचा वास येणार नाही, परंतु फक्त पोलीसांची एफ.आय.आर. मध्ये तशी नोंद घेतली म्हणुन मयत हा मादक द्रव्याचे अमलाखाली होता असे म्हणता येणार नाही. फक्त एवढे म्हणता येईल की, मयताने मादक पदार्थाचे सेवन केले असावे. मादक पदार्थाचे सेवन करणे म्हणजेच मादक पदार्थाचे अमलाखाली असावा असे नाही. एखादा व्यक्तीने मादक पदार्थाचे अती सेवन केल्यास मादक पदार्थाच्या अमलाखली असतो, परंतु मयत संदीप साहेबराव कडु हा मादक पदार्थाच्या अमलाखाली होता असा एफ.आय.आर ची छायांकीत प्रत शिवाय दुसरा कुठलाही पुरावा नाही. जरी असे गृहीत धरले की मयत संदीप साहेबराव कडु याने अपघातावेळी मद्य प्राशन केले होते तरी सुध्दा अपघात हा फक्त मयत संदीप साहेबराव कडु यांच्या निष्काळजीपणा मुळेच झाला असे म्हणता येणार नाही. कारण ट्रक ड्रायव्हरने जी काळजी घ्यावयास पाहीजे होती ती त्याने घेतली नाही. जर ट्रक ड्रायव्हरने ट्रक नादुरुस्त अवस्थेत असल्याचे दर्शविण्यासाठी टेल लाईट किंवा इतर अडथडे लावले असते तर सदरील अपघात टाळता आला असता. मोटार वाहन कायद्याच्या कलम 185 अन्वये मादक पदार्थाचे अमलाखाली मोटारवाहन चालविले गून्हा ठरविला आहे Rत्यात ज्याच्या रक्तात मद्यार्काचे प्रमाणे 30 मी.ग्रॅ. प्रति 100 मी.लि. असेल असाच व्यक्ती मद्यार्काच्या अमलाखाली असल्याचे समजुन शिक्षेस पात्र ठरतो. प्रस्तुत प्रकरणात असे प्रमाण दर्शविणारा कोणताही पुरावा मंचासमक्ष दाखल केलेला नाही तसेच मद्यार्क सेवन हे अपघातास कारणीभुत होते असे म्हणता येत नाही व त्यामुळे गैरअर्जदार हे विमा दावा नाकारु शकत नाही.
14. शेतकरी अपधात विमा त्रीपक्षीय करारामधील क्लॉज 8(III) मधील एक्सक्लुसीव्ह क्लॉज (II) प्रमाणे ‘ मद्य प्राशनाने मद्यार्काच्या अमलीने झालेल्या मृत्युस विमा कंपनी नुकसान भरपाई देण्यास जबाबदार नाही’ असे नमुद आहे. परंतु सदरील एक्सक्लुसीव्ह क्लॉज मध्ये मादक द्रव्याच्या अमलाखाली वाहन चालवित अपघात झाल्यास व सदर अपघातात मृत्यु झाल्यास विमा कंपनी विमा दावा नाकारु शकतात असे नमुद नाही. मयताच्या शवविच्छेदन अवहालामध्ये असे नमुद आहे की, मयताच्या डोक्याला जखमा झाल्या होत्या. मृत्युचे कारण मादक पदार्थाचे सेवन किंवा त्याच्या अमलाखाली झाला असे नमुद नाही. म्हणुन गैरअर्जदार क्र.1 च्या वकीलांनी केलेला युक्तिवाद ग्राहय धरता येणार नाही.
15. वरील प्रमाणे उभयांताचा युक्तीवाद व उपलब्ध दस्तावेजांचा विचार करुन मंच या निष्कर्षास येते की, अर्जदार यांनी विमा दावा सादर केल्यानंतर, तसेच मयताने मादक पदार्थाचे सेवन केले नसल्यामुळे व अपघाताशी मादक पदार्थाच्या सेवनाचा संबंध येत नसल्यामुळे गैरअर्जदार क्र.1 यांचा विमा दावा नाकारण्याची कृती ही सेवेतील त्रुटी आहे.
16. प्रस्तुत प्रकरणात मयत संदीप साहेबराव कडु याचा मृत्यु अपघातात झाला असुन अर्जदाराने विमा दावा रक्कम मिळण्यासाठी मुदतीत अर्ज सादर केला, परंतु विमा कंपनीने योग्य कारण न दर्शविता अर्जदाराचा विमा दावा नाकारला. गैरअर्जदाराची विमा दावा नाकारण्याची कृती असमर्थनीय असल्यामुळे विमा दाव्याची रक्कम रु.1,00,000/- गैरअर्जदार क्र.1 विमा कंपनी यांनी सदर तक्रार दाखल दिनांकापासुन म्हणजेच दिनांक 17/12/2013 पासुन द.सा.द.शे. 6 टक्के व्याजासह अर्जदारास रक्कम अदा करावी असे मंचाचे मत आहे. गैरअर्जदार क्र.1 यांनी अर्जदाराला वेळेवर विमा दाव्यची रक्कम अदा केली नाही. त्यामुळे अर्जदाराला सहाजीकच मानसिक व शारिरीक त्रास सहन करावा लागला. म्हणुन अर्जदार ही तिला झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासाकरीता रु.5000/- गैरअर्जदार क्र.1 कडुन मिळण्यास पात्र आहे असे मंचास वाटते. तसेच गैरअर्जदार क्र.1 यांनी अर्जदार हिला विमा दाव्याची रक्कम रु.1,00,000/- न दिल्यामुळे तिला प्रस्तुत तक्रार मंचात दाखल करावी लागली व खर्च सोसावा लागला. सदर तक्रार खर्चाची रक्कम रु.1000/- गैरअर्जदार क्र.1 कडुन मिळण्यास अर्जदार हक्कदार आहे असे मंचाचे मत आहे.
17. वरील सर्वर विवेचनाचा आधार घेता उपरोक्त सर्व मुद्यांचे उत्तर होकारार्थी देण्यात येत आहे. त्यानुसार मंच खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
// आदेश //
- अर्जदार हिची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2) गैरअर्जदार क्र.1 यांनी अर्जदार हिला विमा दाव्याची रक्कम
रु.1,00,000/- तसेच सदर रकमेवर तक्रार दाखल
दिनांकापासुन म्हणजेच दिनांक 17/12/2013 पासुन
द.सा.द.शे. 6 % दराने संपुर्ण रक्कम प्राप्त होईस्तोवर
व्याज अदा करावे.
3) गैरअर्जदार क्र.1 यांनी अर्जदाराला झालेल्या शारीरिक व
मानसिक त्रासाबद्दल नुकसान भरपाई म्हणून रु.5,000/- व
तक्रारीचा खर्च म्हणून 1000/-रुपये द्यावे.
4) गैरअर्जदार क्र.1 यांनी उपरोक्त आदेशाची पुर्तता आदेश पारित
दिनांकापासून 30 दिवसाच्या आत करावी. अन्यथा उपरोक्त
आदेश क्र.2 च्या रक्कमेवर प्रस्तुत प्रकरण दाखल तारखे
पासून म्हणजेच दिनांक 17/12/2013 पासुन द.सा.द.शे. 6%
ऐवजी द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दराने संपुर्ण रक्कम प्राप्त
होईस्तोवर व्याज देण्यास गैरअर्जदार क्र.1 जबाबदार राहील.
5) गैरअर्जदार क्र.2 यांना प्रस्तुत प्रकरणातुन मुक्त करण्यात येत
आहे.
6) मा. सदस्यांसाठीच्या ‘ब’ व ‘क’ फाईल्स संबंधितांनी परत घेवून
जाव्यात.
7) निकालपत्राच्या प्रति सर्व संबंधित पक्षांना माहितीस्तव व
उचित कार्यवाही करिता पाठविण्यात याव्यात.