(आदेश पारित द्वारा मा. सदस्य, श्री. वामन वि. चौधरी)
- आदेश -
तक्रारकर्तीने तिचे पती श्री. घुडन रूखा नागपुरे यांच्या अपघाती मृत्युबद्दल दाखल केलेला विमा दावा विरूध्द पक्ष यांनी खारीज केल्यामुळे तक्रारकर्तीने सदर तक्रार विद्यमान न्याय मंच गोंदीया येथे दाखल केलेली आहे. तक्रारकर्तीच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालीलप्रमाणेः-
2. तक्रारकर्ती ही मौजा मोहनटोला, तालुका आमगांव, जिल्हा गोंदीया येथील रहिवासी असून तक्रारकर्तीच्या पतीच्या मालकीची मौजा आमगांव, ता. आमगाव, जिल्हा गोंदीया येथे सर्व्हे नंबर 881/अ-1 या वर्णनाची शेत जमीन असल्यामुळे ते शेतकरी या व्याख्येमध्ये समाविष्ट होतात.
3. विरूध्द पक्ष 1 व 2 ही विमा कंपनी असून विरूध्द पक्ष 3 ही विमा सल्लागार कंपनी आहे. विरूध्द पक्ष 4 हे शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना राबविण्याचे काम करतात.
4. तक्रारकर्तीचे पती श्री. घुडन रूखा नागपुरे हे दिनांक 10/01/2012 रोजी शेतातील झाडाच्या फांद्या कापत असतांना झाडावरून खाली पडल्याने मार लागून त्यांचा मृत्यु झाला.
5. तक्रारकर्तीने विरूध्द पक्ष 4 यांच्याकडे दिनांक 24/05/2012 रोजी विमा दावा मिळण्याकरिता सर्व कागदपत्रांसह रितसर अर्ज सादर केला. परंतु विरूध्द पक्ष 1 यांनी विमा दावा कागदोपत्री पुराव्या अभावी व असमर्थनीय असल्यामुळे तक्रारकर्तीचा दावा खारीज केला. त्यामुळे तक्रारकर्तीने विमा दावा रक्कम रू. 1,00,000/- मिळण्यासाठी तसेच मानसिक व शारीरिक त्रासापोटी नुकसानभरपाई म्हणून रू. 20,000/- व तक्रारीचा खर्च रू. 10,000/- मिळण्यासाठी दिनांक 20/03/2014 रोजी न्याय मंचात तक्रार दाखल केली आहे.
6. तक्रारकर्तीची तक्रार विद्यमान न्याय मंचाने दिनांक 20/03/2014 रोजी दाखल करून घेतल्यानंतर विरूध्द पक्ष यांना दिनांक 28/03/2014 रोजी मंचामार्फत नोटीसेस बजावण्यात आल्या. विरूध्द पक्ष यांना नोटीस प्राप्त झाल्यानंतर विरूध्द पक्ष 1 यांनी हजर होऊन त्यांचे लेखी जबाब दाखल केले आहेत. विरूध्द पक्ष 3 व 4 यांचे लेखी जबाब दिनांक 30/05/2014 रोजी पोस्टाद्वारे प्राप्त झाले आहेत. विरूध्द पक्ष 2 यांना सदरहू प्रकरणात मंचाची नोटीस प्राप्त होऊनही विरूध्द पक्ष 2 हे मंचासमक्ष हजर झाले नाहीत अथवा त्यांनी त्यांचा लेखी जबाब सुध्दा सदरहू प्रकरणात दाखल केलेला नाही. त्यामुळे विरूध्द पक्ष 2 यांच्याविरूध्द प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश दिनांक 18/10/2014 रोजी मंचाद्वारा पारित करण्यात आला.
7. विरूध्द पक्ष 1 यांनी सदरहू प्रकरणात त्यांचा जबाब दिनांक 25/08/2014 रोजी दाखल केला. विरूध्द पक्ष 1 यांनी त्यांच्या लेखी जबाबात असे म्हटले आहे की, मृत्युच्या सबळ पुराव्यादाखल सादर केलेले कागदपत्र हे अपूर्ण असून पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये मृत्युचे कारण नमूद केलेले नाही. व्हिसेरा केमिकल ऍनालिसिस रिपोर्टमध्ये सुध्दा मृत्युचे कारण दिले नाही. त्यामुळे तक्रारकर्ती ही दाव्यापोटी नुकसानभरपाई मिळण्यास पात्र नाही. तसेच कायदेशीर कागदपत्रांअभावी सदर प्रकरणातील दावा असमर्थनीय असल्यामुळे तो फेटाळण्यात यावा.
8. विरूध्द पक्ष 3 यांनी त्यांचा लेखी जबाब दिनांक 30/05/2014 रोजी सादर केला असून त्यात त्यांनी असे म्हटले आहे की, विरूध्द पक्ष 3 हे महाराष्ट्र शासनाचे सल्लागार असल्यामुळे व कुठलाही मोबदला न घेता ते काम करीत असल्यामुळे त्यांच्याविरूध्द कुठलाही आदेश पारित न करता पूर्णपणे मुक्तता करावी. तसेच कारण नसतांना तक्रारीस सामोरे जाण्यास भाग पाडल्यामुळे खर्चाची रक्कम रू. 5,000/- दावाकर्त्याकडून देण्यात यावी असे उत्तरात म्हटले आहे.
9. विरूध्द पक्ष 4 यांनी त्यांचा लेखी जबाब दिनांक 30/05/2014 रोजी सादर केला. त्यांच्या लेखी जबाबात त्यांनी असे म्हटले आहे की, तक्रारकर्तीचा विमा दाव्याबाबतचा प्रस्ताव संपूर्ण कागदपत्रांची शहानिशा करून तो योग्य असल्याची खातरजमा केल्यानंतर विरूध्द पक्ष 1 यांच्याकडे दाव्याच्या रकमेचे भुगतान करण्याकरिता पाठविण्यात आला. विरूध्द पक्ष 4 यांनी त्यांच्या जबाबात श्री. घुडन रूखा नागपुरे हे दिनांक 10/01/2012 रोजी शेतातील झाडावरून खाली पडल्याने त्यांचा मृत्यु झाला हे कबूल केले असून विरूध्द पक्ष 4 यांच्या सेवेत त्रुटी नसल्यामुळे तक्रारकर्तीने केलेला आक्षेप खारीज करण्यात यावा असे म्हटले आहे.
10. तक्रारकर्तीने सदर तक्रारीसोबत विरूध्द पक्ष 1, 2, 3 यांनी तक्रारीत जोडण्याची परवानगी मिळणेबाबतचा अर्ज पृष्ठ क्र. 5 वर दाखल केला असून सात/बाराचा उतारा पृष्ठ क्र. 29 वर दाखल केलेला आहे. वारसा प्रकरणाची नोंद नमूना 6-क पृष्ठ क्र. 32 वर, F.I.R. पृष्ठ क्र. 35 वर, क्राईम डिटेल फॉर्म पृष्ठ क्र. 38 वर, पोस्ट मार्टेम रिपोर्ट पृष्ठ क्र. 42 ते 49 वर, मृत्यु प्रमाणपत्र पृष्ठ क्र. 50 वर, व्हिसेरा रासायनिक पृथःकरण अहवाल पृष्ठ क्र. 53 ते 56 वर, याप्रमाणे कागदपत्रे तक्रारीसोबत दाखल केलेली आहेत.
11. तक्रारकर्तीचे वकील ऍड. उदय क्षीरसागर यांनी असा युक्तिवाद केला की, तक्रारकर्तीचे पती हे शेतकरी असून त्यांनी सदर प्रकरणात सात/बाराचा उतारा व फेरफार नक्कल दाखल केली आहे. वारासाच्या नावाची फेरफार दाखल केली असून तक्रारकर्ती ही अपघात विम्याचा लाभ मिळण्यासाठी शेतकरी या संज्ञेत मोडते. सदर प्रकरणात शासनाचे अध्यादेशाची प्रत सोबत जोडली असून अध्यादेशाच्या अंतर्गत अटी व शर्तीनुसार तक्रारकर्तीला वारसदार म्हणून नुकसानभरपाई देण्यात यावी.
12. विरूध्द पक्ष 1 व 2 यांच्यातर्फे ऍड. अनंत दिक्षीत यांनी असा युक्तिवाद केला की, मृत्युच्या सबळ पुराव्यादाखल सादर केलेली कागदपत्रे ही अपूर्ण असून पोस्ट मार्टेम रिपोर्टमध्ये मृत्युचे कारण नमूद केले नाही. व्हिसेरा अहवालामध्ये सुध्दा मृत्युचे कारण नमूद केले नाही. त्यामुळे सदर दावा हा असमर्थनीय असल्यामुळे विमा दावा फेटाळण्यात यावा.
13. तक्रारकर्तीचा तक्रारअर्ज, विरूध्द पक्ष यांचे लेखी जबाब, तक्रारकर्तीने तक्रारीसोबत दाखल केलेली कागदपत्रे तसेच दोन्ही पक्षाच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद यावरून खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ.क्र. | मुद्दे | निर्णय |
1. | तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु हा अपघाती मृत्यु आहे काय? | होय |
2. | तक्रारकर्ती शेतकरी जनता अपघात विम्याचे पैसे मिळण्यास पात्र आहे काय? | होय |
3. | या तक्रारीचा अंतिम आदेश काय? | कारणमिमांसेप्रमाणे |
- कारणमिमांसा –
14. तक्रारकर्तीने दाखल केलेला पोलीस स्टेशन आमगांव, ता. आमगाव, जिल्हा गोंदीया येथील अकस्मात मृत्यु खबर, इन्क्वेस्ट पंचनामा, घटनास्थळ पंचनामा यावरून असे सिध्द होते की, तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु दिनांक 10/01/2012 रोजी शेतातील झाडाच्या फांद्या कापत असतांना झाडावरून खाली पडल्याने मार लागून झाला असून सदर मृत्यु हा अपघाती मृत्यु आहे. करिता मुद्दा क्र. 1 चे उत्तर होकारार्थी आहे.
15. तक्रारकर्तीने विरूध्द पक्ष 4 यांच्याकडे दिनांक 24/05/2012 रोजी विमा दावा दाखल केला. सदर प्रस्ताव विरूध्द पक्ष 4 यांनी विरूध्द पक्ष 1 यांचेकडे दावा मंजुरीकरिता संपूर्ण कागदपत्रांसह पाठविला व तक्रारकर्तीस दाव्याची रक्कम मिळणेस त्यांचा कुठलाही आक्षेप नसून मुद्दा क्र. 5 अन्वये तक्रारकर्तीचे पती शेतकरी असल्याने व त्यांचा अपघाती मृत्यु झाल्याने विरूध्द पक्ष 1 यांनी दावा निकाली काढून तक्रारकर्तीस रक्कम भुगतान करावी असे विरूध्द पक्ष 4 यांनी विरूध्द पक्ष 1 यांना कळविले आहे.
16. तक्रारकर्तीने शेतीचा 7/12 उतारा पृष्ठ क्र. 29 वर, वारसदार नोंदी पृष्ठ क्र. 32 वर दाखल केलेले आहेत. त्यामुळे तक्रारकर्ती ही शेतकरी व्यक्तिगत अपघात विम्याचे पैसे मिळण्यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे.
करिता खालील आदेश.
-// अंतिम आदेश //-
1. तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. विरूध्द पक्ष 1 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्तीला तिच्या मृतक पतीच्या अपघात विम्याची रक्कम रू. 1,00,000/- द्यावी. या रकमेवर तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु झाल्याच्या दिनांकापासून म्हणजेच दिनांक 10/01/2012 पासून ते संपूर्ण रक्कम वसूल होईपर्यंत द. सा. द. शे. 9% दराने व्याज द्यावे.
3. विरूध्द पक्ष 1 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्तीला झालेल्या शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासाची नुकसानभरपाई म्हणून रू. 10,000/- तक्रारकर्तीला द्यावे.
4. विरूध्द पक्ष 1 यांना आदेश देण्यात येतो की, या तक्रारीचा खर्च म्हणून त्यांनी तक्रारकर्तीला रू. 5,000/- द्यावे.
5. विरूध्द पक्ष 1 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी या आदेशाचे पालन आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसांचे आंत करावे.
6. विरूध्द पक्ष 2, 3 व 4 च्या विरोधात ही तक्रार खारीज करण्यात येते.