निकालपत्र
( पारीत दिनांक : 18/06/2013 )
( द्वारा मा. अध्यक्ष श्री.मिलींद भि.पवार(हिरुगुडे).)
01. अर्जदार यांनी प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 12 अन्वये गैरअर्जदार यांच्या विरुध्द दाखल केली असून, तीद्वारे पुढील प्रमाणे मागण्या केलेल्या आहेत.
1. गैरअर्जदारां ‘शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा’ योजने अंतर्गत
मिळणारी राशी रु.1,00,000/- ही दिनांक 29/09/2011 पासुन
18 टक्के व्याजदराने द्यावी.
2. मानसिक व शारिरीक त्रासाकरीता रु.20,000/-
3. तक्रारीचा खर्च रु. 10000/-
अर्जदाराच्या तक्रारीचा थोडक्यात आशय खालीलप्रमाणे आहे.
अर्जदारांनी सदर तक्रार अर्जामध्ये नमुद केले आहे की, अर्जदार मयत श्री प्रविण मधुकर वाघ याची पत्नी असून मयत श्री प्रविण मधुकर वाघ यांचे नावे मौजा पाचाडे, ता. आर्वी ,जि. वर्धा येथे भुमापन क्र. 155/6 अंतर्गत शेतजमीन आहे. शासनाने अपघातग्रस्त शेतक-यांस व त्याच्या कुटुंबियास लाभ देण्याकरीता 15 जुलै 2006 ते 14 जुलै 2007 या कालावधीकरिता ‘शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना’ काढली.
अर्जदार यांनी नमुद केले आहे की, मयत श्री प्रविण मधुकर वाघ हे दिनांक 02/09/2011 रोजी आर्वी पुलगांव मार्गावर मोटार सायकलने जात असतांना बसने धडक मारल्याने जखमी होऊन मरण पावले. अर्जदार यांनी पुढे नमुद केले आहे की, त्यानी ‘शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना’ अंतर्गत राशी मिळण्याकरीता गैरअर्जदार क्र.2 यांचेतर्फे गैरअर्जदार क्र.1 विमा कंपनीला विमा दाव्यासोबत कागतपत्रे सादर केले. त्यानंतर गैरअर्जदार क्र.1 यांनी दिनांक 14/06/2012 रोजी तक्रारकर्तीला पत्र पाठवुन तिच्या मयत पतीजवळ ड्रायविंग लायसन्स नसल्यामुळे विमा दावा नाकारण्यात येत असल्याचे कळविण्यात आले. तक्रारकर्तीने पुढे नमुद केले आहे की, तीच्या मयत पतीचे ड्रायविंग लायसन्स व वाहनाचे आर.सी पुस्तक अपघाताच्या वेळी हरविले होते तसेच अपघात हा बस चालकाच्या चुकीमुळे झालेला आहे व तशी नोंद ही पोलीसांनी एफ.आय.आर. मध्ये सुध्दा घेतलेली आहे, त्यामुळे सदर अपघात व ड्रायविंग लायसन्स यांचा संबंध नाही. त्यामुळे चुकीचे विश्लेषन करुन विमा दावा गैरअर्जदार यांनी नाकारला व सदर बाब ही गैरअर्जदार यांच्या सेवेतील त्रृटी असुन त्यांनी अनुचित व्यापार प्रणालीचा अवलंब केलेला आहे. त्यामुळे अर्जदारांनी गैरअर्जदारांविरुध्द प्रस्तुत तक्रार मंचामध्ये दाखल केली आहे व वरीलप्रमाणे मागणी केली आहे.
02. गैरअर्जदार क्र. 1 यांनी आपला लेखी जवाब दाखल केलेला आहे. त्यानुसार गैरअर्जदार क्र. 1 यांनी तक्रारीतील विपरित विधाने / आरोप अमान्य करुन पुढे असे नमुद केले की, अर्जदार हिचे मयत पतीजवळ वाहन चालविण्याचा कोणताही वैध परवाना नव्हता आणि विमा पॉलिसीच्या अटी व शर्तीनुसार, जर कोणतीही व्यक्ती वाहन चालविण्याचा परवाना नसतांना वाहन चालवित असेल आणि त्यामुळे जर त्या व्यक्तिचा अपघात झाला तर विमा कंपनी कोणत्याही परिस्थितीत व कधीही विमा पॉलीसीची रक्कम देण्याकरीता जबाबदार राहु शकत नाही. गैरअर्जदार क्र.1 यांनी पुढे नमुद केले आहे की, तक्रारकर्तीच्या मयत पतीने विमा पॉलिसीच्या नियमांचे उल्लंघन केले आहे व ही बाब तक्रारकर्तीला माहित असुनही तिने सदर तक्रार दाखल करुन गैरअर्जदार क्र.1 यांना हेतुपुरस्सर त्रास देण्याचा प्रयत्न केला असल्यामुळे तक्रारकर्ती हिची प्रस्तुत तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी अशी प्रार्थना गैरअर्जदार क्र.1 यांनी त्यांच्या लेखी उत्तरा्द्वारे मा.मंचास केलेली आहे. परंतु गैरअर्जदार क्र.1 यांनी त्यांचे लेखी उत्तरातील म्हणणे हे शपथपत्रावर दिले नसल्यामुळे ग्राहय धरता येणार नाही, असे मा.मंचाचे मत आहे.
गैरअर्जदार क्र.2 यांनी त्याचा लेखी जवाब दाखल केला असुन तक्रारीतील विपरित विधाने / आरोप अमान्य करुन पुढे असे नमुद केले की, कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हिसेस प्रा.लि. ही बीमा विनियामक आणी विकास प्राइज़ भारत सरकार यांची अनुज्ञत्पि प्राप्त विमा सल्लागार कंपनी आहे. गैरअर्जदार क्र.2 यांनी पुढे असे नमुद केले आहे की, ते महाराष्ट्र राज्य शासनाला सदरील विमा योजना राबवण्यासाठी विना मोबदला सहाय्य करतात. यामध्ये मुख्यत्वे शेतक-यांचा विमा दावा अर्ज तालुका कृषी अधिकारी/तहसीलदार याच्यामार्फत आल्यानंतर त्याची सहानिशा व तपासणी केल्यानंतर योग्य त्या विमा कंपनीकडे पाठवून देणे व विमा कंपनीकडुन दावा मंजूर होवुन आलेला धनादेश संबंधीत वारसदारांना देणे ऐवढेच काम गैरअर्जदार क्र.2 यांचे आहे. गैरअर्जदार क्र.2 यांनी पुढे नमुद केले आहे की, वरील सर्व कामांकरीता ते राज्य शासन किंवा शेतकरी यांच्याकडुन कोणताही मोबदला घेत नाही तसेच यासाठी कोणताही विमा प्रिमीअम घेतलेला नाही. सदर बाब ही मा.राज्य ग्राहक आयोग, औरंगाबाद खंडपीठ यांनी आमचे म्हणणे ग्राहय धरले असुन तसा आदेशही पारीत केलेला असल्याचे गैरअर्जदार क्र.2 यांचे म्हणणे आहे. गैरअर्जदार क्र.2 यांनी पुढे नमुद केले आहे की, त्यांच्याकडे आलेला प्रस्ताव त्यांनी गैरअर्जदार क्र.1 यांच्याकडे दिनांक 15/5/2012 रोजी पाठविला होता व सदर प्रस्ताव गैरअर्जदार क्र.1 यांनी नामंजुर केला व सदर बाब ही दिनांक 14/06/2012 रोजी तक्रारकर्तीला पत्राद्वारे कळविण्यात आली आहे. त्यामुळे सदरची तक्रारकर्तीची त्यांच्याविरुध्दची तक्रार खारीज करण्यात यावी अशी प्रार्थना गैरअर्जदार क्र.2 यांनी त्यांच्या लेखी उत्तरा्द्वारे मा.मंचास केलेली आहे. परंतु गैरअर्जदार क्र.2 यांनी त्यांचे लेखी उत्तरातील म्हणणे हे शपथपत्रावर दिले नसल्यामुळे ग्राहय धरता येणार नाही, असे मा.मंचाचे मत आहे.
03. अर्जदाराने प्रस्तुत तक्रार प्रतिज्ञापत्रावर दाखल केली असून, सोबत घटनास्थळ पंचनामा, एफ.आय.आर, पोस्ट मार्टम रिपोर्ट, गाव नमुना 7/12,गांव, इत्यादी एकुण 9 दस्तावेंजांच्या छायांकीत प्रती दाखल केलेल्या आहे तसेच लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी त्यांचा लेखी जवाब दाखल केला आहे.
-: कारणे व निष्कर्ष :-
प्रस्तुत प्रकरणात दोन्ही पक्षांतर्फे दाखल करण्यात आलेले सर्व दस्तावेज व प्रतिज्ञालेख बारकाईने पाहण्यात आले.
सदर प्रकरणातील विमा पॉलिसी ही महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतक-यांकरिता " गृप पर्सनल अक्सीडेंट पॉलिसी " अंतर्गत अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास शेतकरी व त्यांच्या वारसास नुकसान भरपाई मिळावी, या हेतुने महाराष्ट्र शासनाने विमा पॉलिसी काढली व सदर योजनेनुसार गैरअर्जदार क्र. 1 विमा कंपनीने उपरोक्त विमायोजनेनुसार जोखीम स्विकारली, या बद्दल वाद नाही.
अर्जदाराचे निवेदन तथा दाखल दस्तावेजांवरुन असे स्पष्ट दिसून येते की, अर्जदार यांनी, मयत श्री प्रविण मधुकर वाघ यांचे वारसदार या नात्याने, विमाधारक मयत श्री प्रविण मधुकर वाघ यांचा दिनांक 02/09/2011 रोजी आर्वी पुलगांव मार्गावर मोटार सायकलने जात असतांना बसने धडक मारल्याने जखमी होऊन मरण पावले व या कारणाने अर्जदार यांनी विमाधारकाचा अपघाती मृत्यू झाला या सदरा खाली शेतकरी अपघात विमा योजना अंतर्गत विमा रक्कमेची मागणी केलेली आहे. अर्जदारातर्फे दाखल दस्तऐवजांवरुन असे दिसून येते की, विमाधारक मयत श्री प्रविण मधुकर वाघ यांचा दिनांक 02/09/2011 रोजी आर्वी पुलगांव मार्गावर मोटार सायकलने जात असतांना बसने धडक मारल्याने जखमी होऊन मरण पावले. गैरअर्जदार क्र. 1 यांचा असा आक्षेप आहे की, अर्जदार हिचे मयत पतीजवळ वाहन चालविण्याचा कोणताही वैध परवाना नव्हता आणि विमा पॉलिसीच्या अटी व शर्तीनुसार, जर कोणतीही व्यक्ती वाहन चालविण्याचा परवाना नसतांना वाहन चालवित असेल आणि त्यामुळे जर त्या व्यक्तिचा अपघात झाला तर विमा कंपनी कोणत्याही परिस्थितीत व कधीही विमा पॉलीसीची रक्कम देण्याकरीता जबाबदार राहु शकत नाही.
प्रस्तुत प्रकरणात दोन्ही पक्षांतर्फे दाखल दस्तवेजांचे बारकाईने अवलोकन केले असता, असे स्पष्टपणे दिसून येते की, अर्जदाराने विमाधारकाचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर गैरअर्जदार क्र. 2 कडे दावा सादर केला. गैरअर्जदार क्र.2 यांनी दाखल सदर दावा गैरअर्जदार क्र.1 यांना सादर केला. परंतु गैरअर्जदार क्र.1 यांनी दिनांक 14/06/2012 रोजी तक्रारकर्तीला पत्र पाठवुन तिच्या मयत पतीजवळ ड्रायविंग लायसन्स नसल्यामुळे विमा दावा नाकारण्यात येत असल्याचे तिला कळविले, परंतु त्यापुर्वीच अर्जदाराने प्रतिज्ञापत्र लिहुन तीच्या मयत पतीच्या अपघातावेळी वाहनाचे कागदपत्र व वाहन परवाना हरविल्याबाबत गैरअर्जदार यांना कळविले होते हे तक्रारकर्तीने दाखल दस्तावेज क्र.4/6 वरुन दिसुन येते. सदर बाब गैरअर्जदार यांनी दुर्लक्षीत करुन मयत व्यक्तिजवळ वाहन परवाना नाही ही बाब दाखवुन अर्जदार हिचा विमा दावा नाकारलेला ही बाब पुर्णता चुकिची आहे कारण गैरअर्जदार यांनी नॉन स्टंडर्ड बेसीस वर सदर विमा दावा मंजुर करणे गरजेचे होते, कारण अपघात हा मयत व्यक्तिच्या चुकिमुळे झाला नव्हता तर दुसरे वाहनाच्या चालकाच्या चुकीने झाला आहे व सदर बाब ही पोलीस कागदपत्रावरुन सुध्दा सिध्द होते. याबाबत मा.छत्तीसगड राज्य आयोगाने 2011 (1 ) सीपीआर 309) मध्ये नमुद केले आहे की,
Consumer Protect Act, 1986 – Section 2(1)(g), 2(1)(o), 15 and 17 – Motor Vehicle Act,1988—Section 3—Insurance – Dismissal of claim for damages suffered to insured vehicle on the ground that driver was not having valid and effective licence—Vehicle in question was a transport vehicle—Transport vehicle has got a separate category and there was need to have a driving licence of that category by person, who was driving vehicle—Driver of vehicle was not having a licence at relevant time by which he was permitted to drive vehicle, which suffered road accident—However, Even if driver of vehicle in question, was not possessing a valid driving licence to drive a transport vehicle, even then considering fact that incident happened on account of negligence committed by someone else, Insurance Company should have considered claim of complainant on non-standard basis-Insurance Company has not considered case of complainant for payment of compensation on non standard basis and thus, committed deficiency in service.
यामध्ये नमुद केल्याप्रमाणे दुस-यांच्या चुकिमुळे अपघामुळे जरी मयताजवळ वाहन परवाना नसला तरी त्यास जबाबदार ठरवता येत नाही हे सिध्द होते. यामुळे वाहन परवाना नाही म्हणुन विमा दावा नाकारता येत नाही असे मा.मंचाचे मत आहे. वरील विवेचनावरुन आम्ही या निर्णयास आलो आहोत की, अर्जदार विमा रक्कम रुपये 1,00,000/- व त्यावर तक्रार दाखल तारखेपासून दरसाल दरशेकडा 15 टक्के दराने व्याज मिळण्यास पात्र आहे. तसेच मानसिक व शारीरिक त्रासापोटी रुपये 1000/- व तक्रार खर्च रुपये 500/- मिळण्यास पात्र आहे.
उपरोक्त सर्व विवेचनावरुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
// आदेश //
1) अर्जदार यांची तक्रार अंशतः मंजुर करण्यात येते.
2) गैरअर्जदार क्र. 1 द न्यु इंडीया अँसुरन्स कंपनी लिमिटेड यांनी निकाल प्राप्ती पासून 30 दिवसांचे आंत, अर्जदार यांना विमा रक्कम रुपयेः 1,00,000/- ( रुपये एक लाख फक्त ) द्यावे. तसेच या रक्कमेवर दिनांक 14/09/2012 (तक्रार दाखल दिनांक) पासून ते पुर्ण रक्कम अदा करे पर्यंत दरसाल दरशेकडा 15 टक्के दराने होणा-या व्याजाची रक्कम अर्जदार यांना देण्यात यावी. अन्यथा मुदतीनंतर उपरोक्त रुपये 1,00,000/- व या रक्कमेवर दिनांक 14/09/2012 पासून ते पुर्ण रक्कम प्राप्त होईपर्यंत दरसाल दरशेकडा 18 टक्के दराने दंडणीय व्याजासह रक्कम देण्यास गैरअर्जदार क्र. 1 जवाबदार राहतील.
3) अर्जदार यांना झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल गैरअर्जदार क्र. 1 यांनी अर्जदारास रुपये 1000/- ( रुपये एक हजार फक्त) व तक्रारीचा खर्च रुपयेः 500/- ( रुपये पाचशे फक्त) सदर निकाल प्राप्ती पासून तीस दिवसांचे आंत द्यावे.
4) मा.सदस्यांसाठीच्या ‘ब’ व ‘क’ फाईल्स संबंधीतांनी परत घेवुन जाव्यात.
5) निकालपत्राच्या प्रति सर्व संबंधीत पक्षांना माहितीस्तव व उचित कार्यवाहीकरीता पाठविण्यात याव्यात.
गैरअर्जदार क्र. 2 विरुध्द आदेश नाही.