नि. 24 मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर तक्रार क्र. 48/2011 नोंदणी तारीख – 14/03/2011 निकाल तारीख – 15/07/2011 निकाल कालावधी – 123 दिवस श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्यक्ष श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या श्री सुनिल कापसे, सदस्य (श्री सुनिल कापसे, सदस्य यांनी न्यायनिर्णय पारीत केला) ------------------------------------------------------------------------------------ श्री. उत्तम राजाराम पवार, रा. पारगांव, पो. खंडाळा, ता. खंडाळा, जि. सातारा ----- अर्जदार ( वकील श्री. शिंदे ) विरुध्द 1. दि न्यू इंडिया एश्योरन्स कं.लि., सातारा मंडल कार्यालय करीता मा. अतुल शहा, ‘जिवनतारा’ कलेक्टर ऑफीस समोर, सातारा 2. दि. न्यू इंडिया एश्योरन्स कं. लि., रा. 2396, “ धुमाळ बिल्डिंग”, सोनगीरवाडी, मुख्य पोष्ट ऑफीसजवळ, वाई, ता. वाई, जि. सातारा ----- जाबदार (वकील श्री. के. आर. माने) न्यायनिर्णय अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 नुसार केलेला आहे. अर्जदार यांचे अर्जातील कथन थोडक्यात खालीलप्रमाणे- 1. अर्जदार हा पारगांव, ता. खंडाळा, जि. सातारा येथील कायमचे रहिवासी असून त्याठिकाणी त्यांचा घडयाळांची विक्री व दुरुस्तीचा व्यवसाय आहे. सदरचा व्यवसाय हा अर्जदार स्वतःचे कुटूंबियांचे उदरनिर्वाहासाठी करतात. अर्जदार यांनी जाबदार कंपनीकडून घडयाळ विक्री व दुरुस्ती दुकानाचे भविष्यातील नैसर्गिक आपत्तीपासून होणा-या नुकसानीपासून संरक्षण मिळावे यासाठी सन 2009-2010 या साली कंपनीचे वाई शाखेकडून दि. 22/06/2009 ते दि.21/06/2009 या कालावधीकरीता पॉलीसी क्र. 151704/48/09/34/0000270 ने शॉपकिपर इन्श्यूरन्स पॉलीसी घेतली होती. त्यापोटी रक्कम रु. 1,020/- रकमेचा प्रिमियम जमा केला आहे. सदरची विमा पॉलीसी घेतेवेळी जाबदार कंपनीने वर्षभरात आग, चोरी इ. प्रकारची कोणतीही नैसर्गिक आपत्तीपासून होणा-या नुकसानीचीर भरपाई करणेचे आश्वासन दिले होते. अर्जदार यांचे दुकानास दि. 18/06/2010 रोजी रात्री 12.30 वाजताचे सुमारास विजेच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागली व या आगीत दुकानातील सर्व लाकडी फर्निचर सर्व प्रकारचे घडयाळे दुरुस्तीसाठी लागणारे सर्व साहित्य, स्पेअर पार्टस् , हत्यारे, दुकानातील सर्व फर्निचरची व साहित्याची बिले व इतर आवश्यक कागदपत्रे यासह सुमारे रु. 2,25,000/- इतक्या रकमेचे साहित्य जळून गेलेमुळे नुकसान झाले आहे. जाबदार कंपनीने अर्जदार यांचे दुकानाचा विमा रु.2,05,000/- इतक्या रकमेसाठी संरक्षित केली होता. अर्जदार यांनी घटना घडलेनंतर ताबडतोब आवश्यक असणा-या सर्व कागदपत्रांची पूर्तता करुन सदरचा क्लेम जाबदार कंपनीकडे मुळ प्रतीत सादर केला. त्यावेळी अर्जदार यांनी मालाच्या साहित्याची फर्निचरची सर्व मुळ बिले जाबदार कंपनीकडे दिलेली होती त्यामुळे या तक्रार अर्जासोबत बिलांच्या झोरॉक्स प्रती जोडलेल्या आहेत. जाबदार कंपनीकडे क्लेमबाबत वेळोवेळी विचारणा केली असता बेकायदेशिर खोटे व बनावट तोंडी कारणे सांगून सदरचा क्लम नाकारल्याने तक्रारदारांचा सदरचा तक्रारअर्ज दाखल केला आहे. सबब शॉपकिपर विमा पॉलीसी पोटी रक्कम रु.2,05,000/- व्याजासह मिळावेत तसेच मानसिक, शारिरिक त्रासापोटी व अर्जाचे खर्चापोटी एकूण रक्कम रु. 12,000/- मिळावेत म्हणून अर्जदार यांनी या मंचासमोर दाद मागितली आहे. 2. जाबदार यांनी नि.131 कडे म्हणणे देऊन तक्रारदारांची तक्रार नाकारली आहे. जाबदार यांचे कथनानुसार जाबदार कंपनी ही विमादाव्यापोटी काहीही रक्कम देणे लागत नाही. अर्जदार यांनी विमा पॉलीसी क्र. 151704/48/09/34/0000270 ने शॉपकिपर इन्श्यूरन्स पॉलीसी दि. 22/06/2009 ते दि.21/06/2009 या कालावधीकरीता घेतली होती. पॉलीसीच्या शर्ती व अटी अर्जदार यांनी मान्य केल्यानंतरच सदर पॉलीसी अर्जदार यांना दिलेली आहे. सदरच्या अटी व शर्तीचे पालन करणे जाबदार यांचेवर बंधनकारक आहे. अर्जदार यांनी अर्जदार यांनी विमा पॉलीसी क्र. 151704/48/09/34/0000270 ने शॉपकिपर इन्श्यूरन्स पॉलीसी दि. 22/06/2009 ते दि.21/06/2009 या कालावधीकरीता घेतली होती. अर्जदार यांनी क्लेम सादर केलेनंतर जाबदार कंपनीने अर्जदार यांचे क्लेमबाबत निर्णय घेतेवेळी आवश्यक असणारी अत्यंत महत्वाची कागदपत्रे उदा. बॅलन्सशीट, विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या मालाची खरेदी बिले, विक्रीची बिले, स्टॉक रजिस्टर, खरेदीविक्री रजिस्टर, शॉप अॅक्ट लायसेन्स, माल खरेदी करतेवेळी अर्जदार यांना कांही डिस्काऊंट मिळाला असल्यास त्याचा तपशिल, टॅक्स रिटर्नस्, बँक स्टटमेंट, ज्या दुकानातून अर्जदार यांनी माल खरेदी केला त्याचा तपशिल इ. कागदपत्रे जाबदार कंपनीला सादर केली नाहीत. त्यामुळे जाबदार कंपनीला क्लेमबाबत कोणताही निर्णय घेता आलेला नाही. निर्णय घेण्यापूर्वीच अर्जदार यांनी तक्रार दाखल केली आहे. जाबदार यांनी दि. 10/2/11 ला कागदपत्रे मागणी केलेनंतर अर्जदार यांनी सदर पत्रास दि 10/3/11 रोजी उत्तर देवूनकागदपत्रे जळून गेलेचे कथन केले आहे. दुकान जळालेनंतर त्याची पाहणी करण्याकरिता नेमणेत आलेल्या सर्व्हेअरच्या अहवालात अथवा पंचनाम्यात अथवा प्रथम खबरी जबाबात कागदपत्रे जळून गेल्याचे नमूद नाही. अर्जदार यांनी त्यांचे दुकानासाठी कायद्यानुसार व नियमानुसार आवश्यक असणारे शॉप अॅक्ट लायसेन्स काढलेले नाही त्यामुळे अर्जदार हे प्रचलित कायद्यातील तरतूदींचा भंग करुन दुकान चालवित होते. अर्जदार यांनी दुकानाला लागलेल्या आगीमुळे झालेल्या नुकसानीबाबत कळविलेनंतर जाबदार कंपनीने सर्व्हेअरची नेमणूक करुन पाहणी केली असता सर्व्हेअरच्या अहवालानुसार देय रक्कम रु. 69,000/- इतकी निश्चित केली असली तरी असली तरी आवश्यक कागदपत्रे वारंवार मागणी करुनही दिलेली नसल्यामुळे तक्रारदार कोणतीही रक्कम मिळणेस पात्र नाही. अर्जदार यांनी प्रस्तुतचा तक्रारअर्ज विनाकारण दाखल केल्यामुळे खर्चासह फेटाळणेत यावा असे जाबदार यांनी कथन केले आहे. 3 अर्जदारतर्फे अभियोक्ता श्री. शिंदे व जाबदारतर्फे वकील श्री. माने यांचा युक्तिवाद ऐकला. 4 अर्जदारतर्फे दाखल करण्यात आलेले शपथपत्र नि. 2 ला पाहिले. अर्जदारतर्फे दाखल केलेली नि. 5 सोबतची 5/1 ते 5/7 अशी 7 कागदपत्रे पाहिली. जाबदारतर्फे दाखल केलेले म्हणणे नि. 13 व शपथपत्र नि. 14 ला पाहिले. तसेच जाबदारतर्फे दाखल नि. 15 सोबतची 6 कागदपत्रे पाहिली. 5 प्रस्तुतचे कामी प्रामुख्याने खालीलप्रमाणे मुद्दे उपस्थित होत आहेत. हे मुद्दे व त्यांना दिलेली उत्तरे खालीलप्रमाणे आहेत. मुद्दे उत्तरे अ) अर्जदार व जाबदार यांचे दरम्यान ग्राहक व सेवा देणारे असे नाते आहे काय ? होय ब) जाबदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केली आहे काय ? नाही क) अंतिम आदेश - खाली दिलेल्या कारणास्तव अर्जदार यांचा तक्रारअर्ज नामंजूर करणेत येत आहे. कारणे 6. निर्वादितपणे जाबदार यांनी त्यांचे कैफियतीमध्ये अर्जदार यांनी विमा पॉलीसी क्र. 151704/48/09/34/0000270 ने शॉपकिपर इन्श्यूरन्स पॉलीसी दि. 22/06/2009 ते दि.21/06/2009 या कालावधीकरीता घेतली होती हे मान्य केले आहे. 7. जाबदार यांचे सर्व्हेअर श्री. नितिन लक्ष्मण जोशी यांनी या कामी नि. 15 सोबत प्रतिज्ञापत्र दाखल केले असून सदर प्रतिज्ञापत्रामध्ये नमूद केले आहे की, अर्जदार श्री पवार यांचे जळलेल्या पारगाव येथील जळालेल्या दुकानाचे दि. 18/06/10 रोजी जाऊन पाहणी केली करुन पॉलीसीच्या अटी व शर्तींचा विचार करुन सर्व्हेयर यांनी फायर सर्व्हे रिपोर्ट नं. 6694/एफएसआर/10-11 चा दि 24/01/11 रोजी दाखल केला आहे. सदरच्या अहवालानुसार निव्वळ देय रक्कम रु. 69,000/- इतकी नमूद केली आहे. अर्जदार यांनी घटना घडलेनंतर ताबडतोब आवश्यक असणा-या सर्व कागदपत्रांची पूर्तता करुन सदरचा क्लेम जाबदार कंपनीकडे मुळ प्रतीत सादर केला असे तक्रारअर्जात मोघमपणे नमूद केले आहे. परंतु अर्जदार यांनी क्लेमसोबत जाबदारांचे मागणी प्रमाणे कागदपत्रे सादर केली याबाबत कोणताही पुरावा सादर केला नाही.
8. जाबदार यांनी अर्जदार यांना क्लेम सादर केलेनंतर अर्जदार यांचे क्लेम निर्णय घेतेवेळी लागणारी कागदपत्रे मागणी करुनही सादर केली नाहीत. त्यामुळे जाबदार यांनी अर्जदार यांना दि. 10/2/11 रोजी स्मरणपत्र पाठविले होते. सदर पत्राची प्रत जाबदार यांनी नि 15 सोबत दाखल केली आहे. अर्जदार यांनी प्रस्तुतची तक्रार मे. मंचामध्ये दि. 14/03/2011 रोजी दाखल केली आहे. अर्जदार यांनी त्यांचे रिजॉइंडर/प्रतिउत्तरामध्ये दि.10/2/11 च्या पत्रानुसार कागदपत्रे जाबदार कंपनीकडे सादर केलेबाबत उल्लेख केला नाही व तसा पुरावाही दाखल केला नाही तसेच जाबदार यांचे दि. 10/2/11 रोजीचे पत्र नाकारलेले नाही. 9. जाबदार यांचे म्हणणेमध्ये व तोंडी युक्तीवादामध्ये प्रामुख्याने असे म्हणण्यात आले की, अर्जदार यांनी क्लेम सादर केलेनंतर जाबदार कंपनीने अर्जदार यांचे क्लेमबाबत निर्णय घेतेवेळी आवश्यक असणारी अत्यंत महत्वाची कागदपत्रे उदा. बॅलन्सशीट, विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या मालाची खरेदी बिले, विक्रीची बिले, स्टॉक रजिस्टर, खरेदीविक्री रजिस्टर, शॉप अॅक्ट लायसेन्स, माल खरेदी करतेवेळी अर्जदार यांना कांही डिस्काऊट मिळाला असल्यास त्याचा तपशिल, टॅक्स रिटर्नस्, बँक स्टटमेंट, ज्या दुकानातून अर्जदार यांनी माल खरेदी केला त्याचा तपशिल इ. कागदपत्रे जाबदार कंपनीला सादर केली नाहीत त्यामुळे जाबदार यांनी अर्जदार यांचा दुकान विमा क्लेमबाबत निर्णय अद्याप घेतलेला नसल्यामुळे अर्जदार यांचा विमा क्लेम जाबदार यांनी अद्याप मंजूर अथवा नामंजूर केलेला नाही. सबब अर्जदार यांना या मे. मंचात तक्रार दाखल करण्यास कोणतेही कारण घडलेले नाही असे या मे. मंचाचे स्पष्ट मत आहे. 10. जाबदार यांनी याप्रकरणी कांही वरिष्ठ न्यायालयांचे न्याय निवाडे दाखल केलेले आहेत. सदर न्यायनिवावाडयांचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, सदरचे निवाडयातील घटनाक्रम व प्रस्तुत प्रकरणातील घटनाक्रम हा भिन्न आहे. सबब जाबदार यांनी दाखल केलेले न्यायनिवाडे याकामी लागू होत नाहीत असे या मंचाचे स्पष्ट मत आहे. 11. या सर्व कारणास्तव व वर नमूद मुद्दयांच्या दिलेल्या उत्तरास अनुसरुन अर्जदार यांचा तक्रारअर्ज नामंजूर करणेत येत आहे. आदेश 1. अर्जदार यांचा तक्रारअर्ज जाबदार यांचेविरुध्द नामंजूर करणेत येत आहे. 2. खर्चाबाबत काहीही आदेश करणेत येत नाहीत. 3. सदरचा न्यायनिर्णय खुल्या न्यायमंचात जाहीर करणेत आला.
सातारा दि. 15/07/2011 (सुनिल कापसे) (श्रीमती सुचेता मलवाडे) (विजयसिंह दि. देशमुख) सदस्य सदस्या अध्यक्ष
| Smt. S. A. Malwade, MEMBER | HONABLE MR. Vijaysinh D. Deshmukh, PRESIDENT | Mr. Sunil K Kapse, MEMBER | |