निकालपत्र प्रेरणा रा.काळुंखे, सदस्या यांनी पारीत केले
नि का ल प त्र
तक्रारदार यांनी ग्राहक संरक्षण कायदा 1986 (यापुढे संक्षेपासाठी ग्रा.स.कायदा) च्या कलम 12 नुसार प्रस्तूत तक्रार दाखल केलेली आहे.
2. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी की, त्यांची आजी झेलाबाई सहादू माळी यांचा दि.28/10/2012 रोजी रस्ता अपघातात मृत्यु झाला. मृत्युसमयी त्या शेतकरी होत्या. त्यामुळे त्यांचे वडील एकनाथ सहादू माळी यांनी शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत तालुका कृषी अधिकारी मालेगांव यांच्यामार्फत विमा प्रस्ताव दाखल केला होता. एकनाथ सहादू माळी यांचा दि.27/01/2013 रोजी मृत्यु झाला. त्यामुळे विमा दाव्याची रक्कम मयताच्या वारसांना मिळावी या संबंधीचा संमतीपत्राचा दस्त त्यांनी दि.21/04/2014 रोजी सामनेवाल्यांना दिलेला आहे. मात्र सामनेवाल्यांनी त्यांना विमा प्रस्तावाप्रमाणे विमा दाव्याची रक्कम न देवून सेवेत कमतरता केलेली आहे. त्यामुळे विमा दाव्याचे रु.1,00,000/- व्याजासह मिळावेत. शारिरीक व मानसिक त्रासापोटी रु.50,000/- व अर्जाचा खर्च रु.5000/- मिळावेत, अशा मागण्या त्यांनी मंचाकडे केलेल्या आहेत.
3. तक्रारदार यांनी तक्रारीच्या पुष्ठयर्थ नि.5 दस्तऐवज यादी लगत फिर्याद, घटनास्थळ पंचनामा, मरणोत्तर पंचनामा, पी.एम.रिपोर्ट, 6 ड ची नोंद, सात बारा उतारा, ग्राम पंचायत झोडगे यांचेकडील मयताच्या वयाचा दाखला, वारसांचे संमतीपत्र, पोहोच पावती, क्लेम फॉर्म इ. कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
4. सामनेवाला क्र.1 व 3 यांना मंचाची नोटीस मिळुनही हजर न झाल्याने प्रस्तुत तक्रार त्यांच्या विरुध्द एकतर्फा चालविण्यात आली.
5. सामनेवाला क्र.2 यांनी जबाब नि.14 दाखल करुन प्रस्तूत अर्जास विरोध केला. त्यांच्या मते, मयताचे वय मृत्यु समयी 75 वर्षांपेक्षा जास्त होते. तक्रारदार मयताचे वारस नाहीत. त्यांनी मयतांच्या वारसांना दि.5/3/2014, 1/9/2014 व 19/9/2014 रोजी पत्र पाठवून आवश्यक ती कागदपत्रे मागितली. परंतु मयताच्या वारसांनी ती कागदपत्रे आणून दिली नाहीत. त्यामुळे त्यांनी सेवा देण्यात कोणतीही कमतरता केलेली नाही. त्यामुळे तक्रारदाराचा तक्रार अर्ज रद्द करण्यात यावा, अशी विनंती त्यांनी मंचास केलेली आहे.
6. सामनेवाला क्र.2 यांनी त्यांच्या बचावा पुष्ठयर्थ नि.16 लगत विमा पॉलीसी तसेच तक्रारदारास पाठविलेली पत्र इ. कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
7. तक्रारदार यांचे वकील अॅड.शिंदे यांचा लेखी युक्तीवाद नि.19 सह सामनेवाला क्र.2 यांचे वकील अॅड.अभ्यंकर यांचा तोंडी युक्तीवाद ऐकण्यात व विचारात घेण्यात आला.
8. निष्कर्षांसाठीचे मुद्दे व त्यावरील आमचे निष्कर्ष कारणांसहीत खालीलप्रमाणे आहेत.
मुद्दे निष्कर्ष
1. सामनेवाला यांनी तक्रारदारास
सेवा देण्यात कमतरता केली काय? सामनेवाला क्र.2
करीता होय.
2. आदेशाबाबत काय? अंतीम आदेशाप्रमाणे
का र ण मि मां सा
मुद्दा क्र.1 बाबतः
9. मालेगांव तालुका पोलीस ठाणे यांच्याकडील फिर्याद नि.5/1 नुसार झेलाबाई सहादू माळी यांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मृत्यु झाल्याचे स्पष्ट होते. तसेच 7/12 उतारा नि.5/7 नुसार त्या अपघात समयी शेतकरी होत्या, ही बाब देखील स्पष्ट होते. मृत्यु समयी मयत झेलाबाई यांचे वय 75 वर्षापेक्षा जास्त होते, असा सामनेवाला क्र.2 यांचा बचाव असला तरी, त्यांनी त्या बाबतीत कोणताही ठोस पुरावा दाखल केलेला नाही. सादर पुराव्यांवरुन झेलाबाई यांचे मृत्युसमयी वय 65 असल्याचे स्पष्ट होते. तक्रारदार हे मयताचे वारस नाहीत,असा सामनेवाला क्र. 2 यांचे वकील अॅड. अभ्यंकर यांचा युक्तीवाद असला तरी संमतीपत्र नि.5/11 नुसार तक्रारदार मयताचे वारस असल्याचे स्पष्ट होते. सदर संमतीपत्राची प्रत सामनेवाला क्र.2 यांना मिळाल्याचे त्यांनीच दाखल केलेली पत्र नि.16/3 वरुन स्पष्ट होते. असे असतांनाही सामनेवाला क्र. 2 यांनी तक्रारदारास विमादाव्याची रक्कम दिली नाही, ही बाब सेवेतील कमतरता ठरते असे आमचे मत आहे. यास्तव मुद्दा क्र.1 चा निष्कर्ष आम्ही सामनेवाला क्र.2 यांच्या बाबतीत होकारार्थी तर सामनेवाला क्र.1 व 3 च्या बाबतीत नकारार्थी देत आहोत.
मुद्दा क्र.2 बाबतः
10. मुद्दा क्र.1 चा निष्कर्ष स्पष्ट करतो की, सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदारास विम्याची रक्कम दिलेली नसल्याने सेवा देण्यात कमतरता केलेली आहे. त्यामुळे तक्रारदार विमा दाव्याची रक्कम रु.1,00,000/- तक्रार अर्ज दाखल केल्याच्या तारखेपासून म्हणजेच दि.05/09/2014 पासून प्रत्यक्ष रक्कम हाती मिळेपावेतो द.सा.द.शे.10% व्याजासह मिळण्यास पात्र आहेत. त्याचप्रमाणे तक्रारदारास झालेल्या मानसिक त्रासापोटी रु.7,000/- व अर्ज खर्चापोटी रु.3000/- मिळण्यास देखील तक्रारदार पात्र आहेत, असे आमचे मत आहे. प्रस्तुत प्रकरणात सामनेवाला क्र.1 व 3 यांची भुमिका विनामुल्य सेवा देण्याची असल्यामुळे त्यांच्या विरुध्द कोणतेही आदेश दिले जावु शकत नाहीत. त्यांना प्रस्तुत तक्रारीमधून मुक्त करण्याचे आदेश न्यायसंगत ठरतील असे आमचे मत आहे. यास्तव मुद्दा क्र.2 च्या निष्कर्षापोटी आम्ही खालील आदेश देत आहोत.
आ दे श
1. सामनेवाला क्र.1 व 3 विरुध्दची तक्रार रद्द करण्यात येत आहे.
2. सामनेवाला क्र.2 आदेशीत करण्यात येते की, त्यांनी तक्रारदार यांना विमा दाव्याची रक्कम रु.1,00,000/-, दि.05/09/2014 पासून प्रत्यक्ष रक्कम हाती मिळेपावेतो द.सा.द.शे.10% व्याजासह परत करावेत.
3. सामनेवाला क्र.2 यांना आदेशीत करण्यात येते की, त्यांने तक्रारदारास मानसिक व आर्थीक त्रासापोटी भरपाई म्हणून रक्कम रु.7,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रक्कम रु.3000/- अदा करावेत.
4. निकालपत्राच्या प्रती उभय पक्षास विनामुल्य देण्यात याव्यात.
नाशिक
दिनांकः09/03/2015