द्वारा - श्री.शि.भि.धुमाळ : मा.अध्यक्ष
1) ग्राहक वाद संक्षिप्त स्वरुपात खालील प्रमाणे -
तक्रारदारांनी महिंन्द्रा आणि महिंन्द्रा कंपनीतून सन् 2001 साली स्वेच्छा निवृत्ती घेतल्यानंतर स्वतःसाठी टाटा स्पेसिओ जीप, रजि.नं.MH-04AY-8083 विकत घेतली. वरील वाहनासाठी त्यांनी सामनेवाला यांचेकडून विमा पॉलिसी नं.110900/31/07/01/00002841 ही दि.18/07/07 ते 17/07/08 या कालावधीसाठी घेतली. वरील पॉलिसीमध्ये सामनेवाला यांनी तक्रारदारांना त्यांच्या वाहनासाठी आश्वासित रक्कम रु.1,80,000/- देण्यात आले. तक्रारदारांनी वरील विमा पॉलिसी सर्टिफीकेट तक्रारअर्जासोबत नि.‘ब’ला दाखल केले आहे.
2) तक्रारदारांचे म्हणण्याप्रमाणे त्यांचे मित्र श्री.संतोष वसंत सकपाळ यांनी त्यांचे कुटुंबीयांसह संगमेश्वरला जाण्याचे ठरवले म्हणून श्री.सकपाळ यांनी तक्रारदार यांचे वर नमूद केलेली जीप मागितली. तक्रारदारांनी सदरचे वाहन त्यांचे मित्राला विना मोबदला संगमेश्वरला जाण्यासाठी दिले. दि.07/05/08 रोजी सकाळी 3.30 चे दरम्यान समोरुन वेगाने येणा-या ट्रक नं.ST-03-AT-4304 ने तक्रारदारांच्या वाहनाला धडक दिली. सदर ट्रकच्या धडकेमध्ये तक्रारदारांच्या वाहनामध्ये बसलेली त्यांच्या मित्राची मुलगी कु.स्मिता संतोष सकपाळ, वय वर्षे 13, ही जागेवरच ठार झाली. वाहनामध्ये बसलेल्या इतर लोकांना जखमा झाल्या व त्या भीषण अपघातात तक्रारदारांच्या वाहनाचे संपूर्ण नुकसान झाले. सदर अपघाताचे वेळी वाहन चालविणारा चालक श्री.अरुण चंद्रकांत शिंदे यांचेकडे वाहन चालविणेचा वैध परवाना होता. अपघातात वाहनाचे 100 टक्के नुकसान झाले व त्या अवस्थेत तिची दुरुस्ती करण्यापलिकडची अवस्था होती. म्हणून तक्रारदारांनी सामनेवाला यांचेकडे दि.05/01/2009 रोजी क्लेम सादर करुन विमा पॉलिसीपोटी नुकसानभरपाई म्हणून रक्कम रु.1,80,000/- ची मागणी केली. त्या क्लेम फॉर्मसोबत तक्रारदारांनी आवश्यक ती कागदपत्र दाखल केली. सामनेवाला यांनी चुकीच्या कारणावरुन तक्रारदारांचा क्लेम मंजूर करण्यास टाळाटाळ केली. सामनेवाला यांच्या म्हणण्याप्रमाणे तक्रारदारांनी अपघाताच्या वेळी सदरचे वाहन श्री.संतोष सकपाळ यांना भाडयाने दिले होते. श्री.संतोष सकपाळ यांनीM.A.C.T., Ratnagiri यांचेकडे वरील अपघातासंबधी क्लेम अर्ज क्र.59/2008, दि.02/12/08 रोजी दाखल केला व त्यामध्ये तक्रारदारांनी केवळ मित्रत्वाच्या नात्याने सदरचे वाहन त्यांना वापरण्यास दिले होते असे स्पष्टपणे म्हटले आहे. सामनेवाला यांनी तक्रारदारांचा क्लेम चुकीच्या कारणावरुन दि.21/01/2010 रोजीचे पत्राने नाकारला. त्या पत्राची छायांकीत प्रत तक्रारदारांनी तक्रारअर्जासोबत नि.‘फ’ ला दाखल केली आहे.
3) सामनेवाला यांनी तक्रारदारांचा क्लेम चुकीच्या कारणावरुन नाकारला म्हणून तक्रारदारांनी सदरचा तक्रारअर्ज या मंचासमोर दाखल केला आहे. सामनेवाला यांनी तक्रारदारांना त्यांच्या वाहनाच्या नुकसानीपोटी रक्कम रु.1,80,000/- द्यावेत असा आदेश सामनेवाला यांना करावा अशी विनंती केली आहे. तक्रारदारांनी वरील रकमेवर 18 टक्के दराने व्याज जानेवारी, 2009 पासून संपूर्ण रक्कम तक्रारदारांना मिळेपर्यंत द्यावेत असे म्हटले आहे व इतर योग्य ती दाद मिळावी अशी तक्रारदारांची विनंती आहे.
4) तक्रारदारांनी तक्रारअर्जात यादीप्रमाणे कागदपत्रे दाखल केली आहेत.
5) सामनेवाला यांनी कैफीयत दाखल करुन तक्रारदारांची मागणी अमान्य केली. सामनेवाला यांच्या म्हणण्याप्रमाणे तक्रारदारांच्या वरील जीपला दि.07/05/08 रोजी रात्री 3.30 वा. अपघात झाला परंतु त्या अपघाताची माहिती तक्रारदारांनी सामनेवाला यांना दि.05/01/09 रोजी क्लेमफॉर्म सादर केला त्यावेळी दिली. तक्रारदारांच्या क्लेमबाबत चौकशी केल्यानंतर सामनेवाला यांनी दि.21/01/2010 च्या पत्राने तक्रारदारांचा क्लेम सामनेवाला यांचा सर्व्हेरिपोर्ट व इन्व्हेस्टिगेशनचा रिपोर्ट विचारात घेवून नाकारला. सामनेवाला यांच्या म्हणण्याप्रमाणे संबंधीत कालावधीत तक्रारदारांनी त्यांचे वाहन भाडयाने श्री.संतोष वसंत सकपाळ यांना दिले होते. खाजगी वाहनाचा वापर भाडयाने किंवा मेहरबाणीखातर करणे ही विमा पॉलिसीच्या अटी व शर्तींचा भंग करणारी बाब आहे.
6) तक्रारदारांच्या वाहनाला सामनेवाला यांनी तक्रारअर्जात नमूद केलेली पॉलिसी दिलेली होती परंतु सदर विमा पॉलिसीतील अटी व शर्ती तक्रारदारांचेवर बंधनकारक होत्या. तक्रारदारांनी सामनेवाला यांचेकडून घेतलेली विमा पॉलिसी ही खाजगी वाहनासाठी होती. तथापि, तक्रारदारांनी त्या पॉलिसीतील अटी व शर्तींचा भंग करुन ती जीप श्री.संतोष सकपाळ यांना भाडयाने दिली म्हणून सामनेवाला यांनी तक्रारदारांचा क्लेम नाकारला आहे. निव्वळ क्लेम नाकारला म्हणून सामनेवाला यांच्या सेवेत कमतरता आहे असे म्हणता येणार नाही. तक्रारअर्जातील आरोप सामनेवाला यांनी नाकारले असून तक्रारअर्ज खर्चासहित रद्द करणेत यावा अशी विनंती केली आहे.
7) तक्रारदारांनी प्रतिउत्तर दाखल करुन सामनेवाला यांच्या कैफीयतमधील आरोप नाकारले आहेत. याकामी तक्रारदारांनी लेखी युक्तीवाद दाखल केला आहे. तक्रारदारांचे वकील श्री.ए.पी.सिंग व सामनेवाला यांचे वकील सुवर्णलता चौधरी h/f वकील कल्पना त्रिवेदी यांचा तोंडी युक्तीवाद ऐकण्यात आला व सदर प्रकरण निकालासाठी ठेवण्यात आले.
8) निकालासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात -
मुद्दा क्र.1 - तक्रारदार हे सामनेवाला यांचे सेवेत कमतरता आहे हे सिध्द करतात काय ?
उत्तर - होय.
मुद्दा क्र.2 - तक्रारदार यांना सामनेवाला यांचेकडून रक्कम रु.1,80,000/- व त्यावर व्याज व नुकसानभरपाई इ. सामनेवाला यांचेकडून वसुल करता येईल काय ?
उत्तर - अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिमांसा -
मुद्दा क्र.1 - सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदाराचे टाटा स्पेसिओ जीप, रजि.नं.MH-04AY-8083 साठी तक्रारअर्जात नमूद केलेली विमा पॉलिसी दिली होती. सदर विमा पॉलिसी दि.18/07/07 ते 17/07/08 या कालावधीसाठी होती. तक्रारदारांनी वरील विमा पॉलिसीची छायांकित प्रत तक्रारअर्जासोबत दाखल केली असून त्यामध्ये तक्रारदारांच्या जीपची IDV रु.1,80,000/- नमूद करण्यात आली आहे. वरील विमा पॉलिसीच्या कालावधीत तक्रारदारांच्या जीपला संगमेश्वरला जात असताना दि.07/05/08 रोजी सकाळी 3.30 वाजता समोरुन वेगाने येणा-या ट्रकने जोरात धडक दिली व सदर जीपमधील प्रवासी कु.स्मिता संतोष सकपाळ, वय वर्ष 13 हिचा जागेवरच मृत्यु झाला. वाहनामध्ये बसलेल्या इतर लोकांना जखमा झाल्या व त्या भीषण अपघातात तक्रारदारांच्या वाहनाचे संपूर्ण नुकसान झाले असे तक्रारदारांचे म्हणणे आहे.
सामनेवाला यांच्या कैफीयतमधील मजकूरावरुन असे दिसून येते की, सामनेवाला यांना अपघाताची माहिती मिळाल्यानंतर सामनेवाला यांनी सर्व्हेअर/इन्व्हेस्टीगेटरची नेमणूक केली होती. परंतु सामनेवाला यांनी सर्व्हेअर/इन्व्हेस्टीगेटरचा रिपोर्ट या कामी दाखल केलेला नाही. सामनेवाला यांनी तक्रारदारांच्या जीपचे अपघातात संपूर्ण नुकसान झाले हे तक्रारदारांचे म्हणणे नाकारलेले नाही. वरील परिस्थिती विचारात घेता वरील अपघातात त्याच्या जीपचे संपूर्ण नुकसान झाले यावर विश्वास ठेवण्यास हरकत नाही.
सामनेवाला यांनी तक्रारदारांच्या वाहनास खाजगी वाहन म्हणून पॉलिसी दिली होती. असे असताना सुध्दा तक्रारदारांनी सदर वाहन भाडयाने दिले होते त्यामुळे तक्रारदारांनी पॉलिसीच्या मुलभूत अटी व शर्तींचा भंग केला त्यामुळे सदर क्लेम नाकारलेला आहे. तक्रारदारांच्या म्हणण्याप्रमाणे श्री.संतोष वसंत सकपाळ हे त्यांचे मित्र असून श्री.सकपाळ यांना त्यांच्या कुटुंबियासमवेत संगमेश्वरला जायचे होते म्हणून तक्रारदारांनी त्यांची जीप श्री.संतोष सकपाळ यांना विना मोबदला वापरण्यास दिली. सामनेवाला यांनी सदरची जीप तक्रारदारांनी भाडयाने दिली होती असे दाखविणारा कोणताही पुरावा या मंचासमोर दाखल केलेला नाही. वरील अपघातानंतर श्री.संतोष सकपाळ व श्रीमती स्वाती संतोष सकपाळ यांनी रत्नागिरी येथील M.A.C.T., समोर वरील अपघातासंबधी नुकसानभरपाईसाठी क्लेम अर्ज क्र.59/2008, दि.02/12/08 रोजी दाखल केला असून त्या अर्जाची छायांकित प्रत तक्रारदारांनी याकामी दाखल केली आहे. सदर अर्जामध्ये तक्रारदार/अर्जदार श्री.संतोष वसंत सकपाळ यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे की, अपघातातील टाटा स्पेसिओ जीप त्यांच्या मित्राकडून कोणत्याही प्रकारचे भाडे न देता वापरवयास घेतली होती. या कामी सामनेवाला यांनी सर्व्हेअर/इन्व्हेस्टीगेटरचा अहवाल सुध्दा दाखल केलेला नाही किंवा तक्रारदारांनी त्यांची जीप भाडयाने दिली होती असे दाखविणारा कोणताही पुरावा या कामी दाखल केलेला नाही. तक्रारदारांनी विमा पॉलिसीतील अटी व शर्तींचा भंग केला या कारणावरुन तक्रारदारांचा क्लेम नाकारला आहे, परंतु सामेनवाला यांनी क्लेम नाकारण्यासाठी घेतलेल्या निर्णयाचे समर्थन करण्यासाठी कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. उलटपक्षी तक्रारदारांनी दाखल केलेल्या पुराव्यावरुन तक्रारदारांनी टाटा स्पेसिओ जीप त्यांचे मित्र श्री.संतोष वं.सकपाळ यांना विना मोबदला दिली असे दिसते. सामनेवाला यांनी चुकीच्या कारणारवरुन तक्रारदारांचा क्लेम नाकारला त्यामुळे ती सामनेवाला यांच्या सेवेतील कमतरता आहे असे म्हणावे लागते. सबब मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी देणेत येते.
मुद्दा क्र.2 - वर नमूद केल्याप्रमाणे दि.07/05/2008 रोजी झालेल्या अपघातामध्ये तक्रारदारांच्या टाटा जीपचे संपूर्ण नुकसान झाल्याचे दिसून येते. विमा पॉलिसीमध्ये सदर वाहनाचे I.D.V. रु.1,80,000/- नमूद केल्याचे दिसून येते. म्हणून सामनेवाला यांनी तक्रारदारांना रक्कम रु.1,80,000/- द्यावेत असा आदेश करणे योग्य होईल.
तक्रारदारांनी वरील रक्कम रु.1,80,000/- यावर जानेवारी, 2009 पासून द.सा.द.शे. 18 टक्के दराने व्याज संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत द्यावी अशी विनंती केली आहे. तक्रारदारांनी केलेली व्याजाची मागणी जादा दराने केली आहे. सामनेवाला यांनी तक्रारदारांचा क्लेम दि.21/01/2010 चे पत्राने चुकीच्या कारणावरुन नाकारला आहे. सबब सामनेवाला यांनी तक्रारदारांना दि.21/01/2010 पासून रक्कम रु.1,80,000/- यावर 10 टक्के दराने व्याज संपूर्ण रक्कम तक्रारदारांना मिळेपर्यंत द्यावेत असा आदेश करणे योग्य होईल. तसेच सामनेवाला यांनी तक्रारदारांना या अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रु.2,000/- द्यावेत असा आदेश करणे योग्य होईल. सबब मुद्दा क्र.2 चे उत्तर त्याप्रमाणे देण्यात येते. सबब सदरचा तक्रारअर्ज सामनेवाला विरुध्द अंशतः मंजूर करण्यात येवून खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करणेत येत आहे -
अं ति म आ दे श
1. तक्रार क्रमांक 72/2010 अंशतः मंजूर करणेत येतो.
2. सामनेवाला यांनी तक्रारदारांना रक्कम रु.1,80,000/-(रु.एक लाख ऐंशी हजार मात्र) यावर दि.21/01/2010 पासून द.सा.द.शे. 10 टक्के दराने व्याज संपूर्ण रक्कम तक्रारदारांना मिळेपर्यंत द्यावेत.
3. सामनेवाला यांनी तक्रारदारांना या अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रु.2,000/-(रु.दोन हजार मात्र) द्यावेत.
4. सामनेवाला यांनी वरील आदेशाची अंमलबजावणी प्रस्तुत आदेशाची प्रत त्यांना मिळाल्यापासून 30 दिवसांचे आत करावी.
5. सदर आदेशाची प्रमाणित प्रत उभय पक्षकारांना देणेत यावी.