नि. 15 मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर तक्रार क्र. 216/2010 नोंदणी तारीख – 14/9/2010 निकाल तारीख – 6/1/2011 निकाल कालावधी – 142 दिवस श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्यक्ष श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या श्री सुनिल कापसे, सदस्य (श्री सुनिल कापसे, सदस्य यांनी न्यायनिर्णय पारीत केला) ------------------------------------------------------------------------------------ श्री पांडुरंग धोंडिबा चव्हाण रा.नारळवाडी, पो. मल्हारपेठ, ता.पाटण जि. सातारा ----- अर्जदार (अभियोक्ता श्री साईनाथ गरुड) विरुध्द विश्वास सदानंद दातार, मॅनेजर दी न्यू इंडिया एश्युरन्स कं.लि. 468/1, पोपटभाई पेट्रोल पंपासमोर, शनिवार पेठ, कराड ता.कराड जि. सातारा ----- जाबदार (अभियोक्ता श्री जी.एस.धनवडे) न्यायनिर्णय अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 नुसार केलेला आहे. अर्जदार यांचे अर्जातील कथन थोडक्यात खालीलप्रमाणे - 1. अर्जदार यांचे मालकीची टाटा कंपनीची ट्रॅव्हल्स होती व आहे. सदरचे वाहनाचा विमा त्यांनी जाबदार यांचेकडे उतरविलेला होता. सदरचे विमा पॉलिसीचे कालावधीत म्हणजे दि.12/6/2008 रोजी अर्जदार यांचे वाहनास अपघात होवून त्याचे नुकसान झाले. सदरचे अपघाताबाबत जाबदार यांना कळविलेनंतर जाबदार यांनी अधिकृत सर्व्हअर मार्फत वाहनाची पाहणी करवून घेतली आहे. त्यानंतर अर्जदार यांनी आवश्यक कागदपत्रे जाबदार यांचेकडे देवून नुकसान रकमेची मागणी केली. परंतु जाबदार यांनी अर्जदार यांचे वाहनास असलेला परवाना वैध नाही या कारणास्तव अर्जदार यांचा विमा दावा नाकारला आहे. वस्तुतः अर्जदारचे वाहन पुणेहून पाटणला येत असताना त्यामध्ये प्रवासी नव्हते. विनाप्रवासी गाडीचे वाहतुकीस परमिटची कायद्याने आवश्यकता नसते. त्यामुळे जाबदार यांनी चुकीचे व बेकायदेशीर कारण काढून विमा दावा नाकारला आहे. सबब जाबदार यांचेकडून नुकसानीची रक्कम रु.1,86,074/- व्याजासह मिळावेत, मानसिक त्रासापोटी व अर्जाचे खर्चापोटी रक्कम मिळावी यासाठी अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज दाखल केला आहे. 2. जाबदार यांनी प्रस्तुतचे कामी त्यांचे लेखी म्हणणे/कैफियत नि.11 ला दाखल केली आहे. त्यामध्ये त्यांनी अर्जदारचे तक्रारअर्जातील बहुतांश मजकूर नाकारलेला आहे. अर्जदार यांनी सादर केलेल्या कागदपत्रांची बारकाईने छाननी केली असता जाबदार यांना असे दिसून आले की अर्जदारचे वाहनास अपघातसमयी वाहन चालविण्याचा परवाना नव्हता. अर्जदार यांनी वाहनाचे जे परमिट सादर केले आहे त्याचा कालावधी हा दि.12/6/08 ते 13/6/2008 असा आहे. म्हणजे अर्जदार यांनी अपघात झालेनंतर परमिट काढलेले आहे. जाबदारकडून विमाक्लेमची रक्कम मिळावी म्हणून अर्जदार यांनी सदरचे परमिट काढले आहे. अशा प्रकारे परमिट नसलेने अर्जदारने पॉलिसीचे अटी व शर्तीचा भंग केल्यामुळे जाबदार यांनी अर्जदार यांचा विमादावा नाकारला आहे. कायद्याने सदरचे वाहनास परमिटची आवश्यकता असते. अपघातादिवशी वाहनामध्ये प्रवासी बसविले आहेत किंवा नाहीत याच्याशी त्याचा काहीही संबंध नाही. जाबदारने श्री एल.एस.कुदळे यांचेमार्फत वाहनाची तपासणी केली. सदरचे सर्व्हेअर यांचे अहवालामध्ये अर्जदारकडे अपघातसमयी परमिट नव्हते असे स्पष्ट नमूद केले आहे. अर्जदारने बिले सादर केलेनंतर जाबदार यांनी सर्व्हेअरमार्फत त्याचा बिलचेक रिपोर्ट तयार केला. सदरचे अहवालावरुन रु.1 लाख एवढी निव्वळ देय रक्कम निश्चित करण्यात आली. परंतु अर्जदार यांनी परमिटशिवाय वाहनाचा वापर केल्याने सदरची रक्कम मिळण्यास अर्जदार हे पात्र नाहीत. जाबदार यांनी सेवा देण्यामध्ये कोणतीही त्रुटी केलेली नाही. सबब तक्रारअर्ज फेटाळणेत यावा असे जाबदार यांनी त्यांचे कैफियतीमध्ये कथन केले आहे. 3. जाबदारतर्फे वकील श्री धनवडे यांनी केलेला युक्तिवाद ऐकला. तसेच अर्जदार व जाबदारतर्फे दाखल कागदपत्रे पाहिली. 4. प्रस्तुतचे कामी प्रामुख्याने खालीलप्रमाणे मुद्दे उपस्थित होत आहेत. हे मुद्दे व त्यांना दिलेली उत्तरे खालीलप्रमाणे आहेत. मुद्दे उत्तरे अ) अर्जदार व जाबदार यांचे दरम्यान ग्राहक व सेवा देणारे असे नाते आहे काय ? होय ब) जाबदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केली आहे काय ? नाही क) अंतिम आदेश - खाली दिलेल्या कारणास्तव अर्जदार यांचा तक्रारअर्ज नामंजूर करणेत येत आहे. कारणे 5. जाबदार यांनी त्यांचे कैफियतीमध्ये असे कथन केले आहे की, अपघातसमयी अर्जदारचे वाहनास परमिट नव्हते, सबब अर्जदार यांनी विमा पॉलिसीचे अटी व शर्तींचा भंग केल्यामुळे जाबदार यांनी अर्जदार यांचा विमादावा नाकारला आहे. याकामी अर्जदार यांनी नि.5 सोबत काही कागदपत्रे दाखल केली आहेत. सदरच्या कागदपत्रांमध्ये अनुक्रमांक 5 ला अर्जदार यांनी त्यांचे वाहनाचे परमिट दाखल केले आहे. सदरचे परमिटचा कालावधी हा दि.12/6/08 ते 13/6/08 असा आहे. परंतु अर्जदारचे वाहनास दि.12/6/2008 रोजी पहाटे अपघात झाला आहे. यावरुन अर्जदाराने वाहनास अपघात झालेनंतर त्याचदिवशी परमिट काढल्याचे दिसून येते. 6. जाबदार यांनी याकामी नि.13/2 ला श्री एल.एस.कुदळे यांचा सर्व्हे रिपोर्ट दाखल केला आहे. सदरचे रिपोर्टचे अवलोकन केले असता परमिट या सदराखाली - उपलब्ध नाही असे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. यावरुन वाहनाचा सर्व्हे करतेवेळी अर्जदार यांचेकडे परमिट नव्हते ही बाब स्पष्ट होते. 7. अर्जदारने त्यांचे तक्रारअर्जात असे कथन केले आहे की, विनाप्रवासी गाडीचे वाहतुकीस परमिटची कायद्याने आवश्यकता नसते. परंतु सदरचे कथनाशी प्रस्तुतचा मंच आजिबात सहमत होत नाही कारण कोणत्याही वाहनाची नोंदणी ही प्रवासी वाहतुकीसाठी केलेनंतर त्या वाहनास परमिट असणे कायद्याने आवश्यक आहे. अपघातसमयी सदरचे वाहनामध्ये प्रवासी बसले आहेत किंवा नाही ही बाब महत्वाची नाही. वरील सर्व कारणांचा विचार करता अर्जदार यांनी परमिटशिवाय वाहन चालवून विमा पॉलिसीचे अटी व शर्तींचा भंग केल्याचे स्पष्टपणे दिसून येते. सबब अर्जदार यांचा विमा दावा नाकारण्याचा जाबदार यांना निर्णय हा योग्य, संयुक्तिक व कायदेशीर आहे. अशा प्रकारे जाबदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कोणतीही त्रुटी केली नाही असे या मंचाचे मत आहे. 8. या सर्व कारणास्तव व वर नमूद मुद्दयांच्या दिलेल्या उत्तरास अनुसरुन अर्जदार यांचा तक्रारअर्ज नामंजूर करणेत येत आहे. आदेश 1. अर्जदार यांचा तक्रारअर्ज फेटाळणेत येत आहे. 2. खर्चाबाबत काहीही आदेश करणेत येत नाहीत. 3. सदरचा न्यायनिर्णय खुल्या न्यायमंचात जाहीर करणेत आला. सातारा दि. 6/1/2011 (सुनिल कापसे) (सुचेता मलवाडे) (विजयसिंह दि. देशमुख) सदस्य सदस्या अध्यक्ष
| Smt. S. A. Malwade, MEMBER | HONABLE MR. Vijaysinh D. Deshmukh, PRESIDENT | Mr. Sunil K Kapse, MEMBER | |