ग्राहक तक्रार क्र. : 142/2013
अर्ज दाखल तारीख : 10/10/2013
अर्ज निकाल तारीख : 16/05/2015
कालावधी: 01 वर्षे 07 महिने 07 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1. प्रेमिला भ्र. विष्णुपंत कुलकर्णी,
वय - 66 वर्षे, धंदा – घरकाम,
रा.चिलवडी, ता. जि.उस्मानाबाद.
ह.मु. परशुराम सोसायटी सांजा रोड, उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1. दि. न्यू इंडिया इन्शुरन्स कपंनी लि.पुणे,
व्दारा: शाखाधिकारी साहेब,
विभागीय कार्यालय दि. न्यु इंडिया
इन्शूरन्स कंपनी लि. शिवाजी चौक, उस्मानाबाद.
2. मा. कृषी अधिकारी,
तालूका कृषी अधिकारी कार्यालय,
जुनी जिल्हा परिषद उस्मानाबाद.
3. डेक्कन इन्शूरन्स अॅण्ड दि.इन्शुरन्स ब्रोकर्स प्रा.लि.
तर्फे महाव्यवस्थापक,
डेक्कन इन्शुरन्स अॅण्ड दि.इन्शुरन्स ब्रोकर्स प्रा.लि.
नाशिक. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्रीमती विदयुलता जे.दलभंजन. सदस्या.
3) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारातर्फे विधीज्ञ : श्री.मिलींद शं.पाटील.
विरुध्द पक्षकार क्र.1 तर्फे विधीज्ञ : श्री.ए.व्ही.मैंदरकर.
विरुध्द पक्षकार क्र.2 तर्फे विधीज्ञ : स्वत:.
विरुध्द पक्षकार क्र.3 तर्फे विधीज्ञ : स्वत:.
न्यायनिर्णय
मा. अध्यक्ष श्री. एम.व्ही. कुलकर्णी यांचे व्दारा.
अ) 1. आपल्या शेतकरी पतीच्या अपघाती मृत्यू नंतर शेतकरी अपघात विम्याची रक्कम देण्याचे नाकारुन विरुध्द पक्ष (विप) यांनी सेवेत त्रुटी केली म्हणून भरपाई मिळण्यासाठी तक्रारकर्ती (तक) हिने ही तक्रार दाखल केली आहे.
2. तक चे तक्रारीतील कथन थोडक्यात पुढीलप्रमाणे आहे. तक चे पती चिलवडी ता.जि. उस्मानाबाद हे देखील शेतकरी होते व तेथील गट क्र.291 2 हेक्टर 32 आर. व गट क्र.298 1 हे. 71 आर. या जमीनीचे मालक होते. त्यांचा शासनामार्फत विमा कंपनी विप क्र.1 कडे शेतकरी अपघात विमा उतरलेला होता. दि.22/11/2011 रोजी सदर विष्णुपंत सकाळी 8.15 वा. केंद्रीय प्राथमिक शाळा चिलवडी येथील रत्यावरुन पायी जात होते. स्कूल बस क्र. एम.एच. 15 डी.टी.9400 चा चालक बस मागे घेत होता. त्याने निष्काळजीपणाने बस विष्णुपंत यांचे अंगावर घातली व त्यांचा जागीच मृत्यू झाला. मुलगा शशीकांत यांनी पोलिस स्टेशन उस्मानाबाद ग्रामीण येथे बस चालका विरुध्द फिर्याद दिली. तपासी अधिका-याने घटनास्थळ पंचनामा इन्क्वेस्ट पंचनामा करुन घेतला व शवचिकित्सा करण्यात आली.
3. तक ने विप क्र.2 कडे शेतकरी अपघात विम्याचा क्लेमफॉर्म दि.22/11/2011 रोजी भरुन दिला. सोबत जरुर ते कागदपत्रे दिली. विप क्र.2 याने प्रथम उडवा उडवीची उत्तरे दिली शेवटी दि.17/07/2013 चे पत्र देऊन विमा कंपनीने प्रस्ताव मुदत बाहय असल्याच्या कारणावरुन न स्विकारल्याचे कळविले. अशाप्रकारे विप यांनी सेवेत त्रुटी केली आहे. तक ही शेतकरी अपघात विमा रक्कम विळण्यास पात्र आहे म्हणून विप यांनी शेतकरी अपघात विमा रक्कम रु.1,00,000/- तक ला देण्याचा आदेश करावा व त्यावर व्याज व तक्रारीचा खर्च मिळावा. अशी तक्रार तक ने दि.10/10/2013 रोजी दाखल केलेली आहे.
4. तक्रारीसोबत तक ने विप क्र.2 चे दि.17/07/2013 चे पत्र तलाठी दाखला, प्रतिज्ञापत्र, आठ अ उतारा, सातबारा उतारा, मृत्यू प्रमाणपत्र, एफ आय आर., इत्यादी कागदांच्या प्रती हजर केलेल्या आहेत.
ब) विप क्र.1 यांनी हजर होऊन आपल लेखी म्हणणे दाखल केलेले आहे ते पुढीलप्रमाणे.
1. तक हिचे पतीचे निधन दि.22/11/2011 रोजी झाले सदर विप व शासन याचेतील कराराप्रमाणे तेथपासून 90 दिवसांच्या आत तक हिने क्लेम दाखल करणे आवश्यक होते. दि.12/12/2012 रोजी दाखल केलेला क्लेम मुदत बाहय होता. विप क्र.3 यांनी विप क्र.2 कडून मिळालेला क्लेम मुदत बाहय असल्यामुळे विप क्र.2 कडे परत पाठविला आहे. तक हिने जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षते खालील तक्रार निवारण केंद्राकडे अर्ज दाखल करणे आवश्यक होते. मात्र तसे केले नाही. विप क्र.1 कडे तक चा क्लेम मिळाला नसल्याने विप क्र.1 तो मंजूर करणेस जबाबदार नाही. त्यामुळे तक ची तक्रार रद्द होण्यास पात्र आहे.
क) विप क्र.2 यांनी आपले म्हणणे दि.11/11/2013 रोजी दाखल केले आहे. त्याप्रमाणे तक चा प्रस्ताव कागदपत्रासहीत दि.12/12/2012 रोजी प्राप्त झाला. विप क्र.2 यानी तो जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांचेकडे दि.19/12/2012 रोजी पुढील कार्यवाहीसाठी पाठविला.
ड) विप क्र.3 यांनी दि.09/03/2015 रोजी आपले म्हणणे दाखल केलेले आहे. त्याप्रमाणे विप क्र.3 यांची ब्रोकर म्हणून नेमणूक असली तरीही कोणत्याही प्रकारची फी शासनाकडून मिळत नाही. विमा दावा विमा कंपनीस दाखल करणे व त्यासाठी आवश्यक कागदपत्रे गोळा करणे व विमा दाव्याचा पाठपुरावा करणे व मध्यस्थ म्हणून काम करणे एवढेच विप क्र.3 ची भुमीका आहे. त्यामुळे विप क्र.3 कोणत्याही प्रकार जबाबदार नाही असे नमूद केलेले आहे.
इ) तक ची तक्रार त्यांनी दिलेली कागदपत्रे व विप चे म्हणणे यांचे अवलोकन केले असता आमचे विचारार्थ खालील मुद्दे निघतात त्यांची उत्तरे आम्ही त्यांच्या समोर खाली दिलेल्या कारणांसाठी लिहिली आहेत.
मुद्दे उत्तरे
1) विप नी सेवेत त्रुटी केली आहे काय ? होय.
2) तक अनुतोषास पात्र आहे काय ? होय.
3) आदेश कोणता ? अंतिम आदेशाप्रमाणे.
फ) कारणमीमांसा
मुद्दा क्र.1 व 3 :
1. विप क्र.2 चे म्हणण्याप्रमाणे प्रस्ताव कागदपत्रासह दि.12/12/2012 रोजी त्याला प्राप्त झाला दि.19/12/012 रोजी तो जिल्हा अधिक्षक यांचेकडे सादर करण्यात आला. तक तर्फे विप क्र.2 चे दि.17/07/2013 चे पत्र हजर करण्यात आलले आहे. त्याप्रमाणे विमा कंपनीने प्रस्ताव मुदतबाहय असल्यामुळे स्विकारण्यास नकार दिला होता. विप क्र.1 चे म्हणणे आहे की प्रस्ताव त्यांचेकडे मिळालाच नाही. असे दिसते की प्रस्ताव कृषी अधिका-यांच्याकडून ब्रोकर यांचेकडे जायला पाहिजे ब्रोकर याचेकडून जरुर कागदपत्रासह तो विमा कंपनीकडे जायला पाहिजे. विप क्र.3 ब्रोकर यांनी त्याच्याकडे प्रस्तूत प्रस्ताव आला किंवा नाही याबद्दल खुलासा केलेला नाही. जर विप क्र.1 चे म्हणणे ग्राहय धरले तर त्याचा अर्थ विप क्र.3 ने विप क्र.1 कडे सदरचा प्रस्ताव पाठवला नाही.
2. विष्णुपंत यांचा सातबारा व आठ-अ उतारा हे दाखवतो की तो शेतकरी होता. एफ.आय.आर. असे दाखतो की विष्णुपंत पायी जात असतांना बसने धडक दिल्यामुळे मयत झाला. दोषारोप पत्र बस चालकाविरुध्द दाखल झाले आहे हे त्याच्या प्रतीवरुन दिसुन येते. शवचिकित्सा अहवालाप्रमाणे मृत्यू अपघातातील जखमामुळे झाला.
3. विप क्र.1 चा बचाव एवढाच आहे की प्रस्तावास उशीर झाला होता व प्रस्ताव पोहचलाच नाही. विप क्र.2 चे पत्राप्रमाणे विप क्र.1 ने प्रस्ताव स्विकारण्यास मुदतीच्या कारणांवरुन नकार दिला. असा प्रस्थापित केस लॉ आहे की 90 दिवसाची मुदत मँन्डेटरी नसून डायरेक्टरी आहे. त्यांनतर योग्य कारण दाखविल्यास उशीर माफ करता येतो. विप क्र.1 ने उशीर माफीच्या कारणांचा विचार केला नाही. तक ही 66 वर्षाची खेडेगावातील वृध्द स्त्री आहे त्यामुळे उशीराच्या तांत्रीक कारणावरुन विमा प्रस्ताव फेटाळून विप क्र.1 ने सेवेत त्रुटी केली व तक अनूतोषास पात्र आहे. असे आमचे मत आहे. त्यामुळे आम्ही मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी देतो व खालीलप्रमाणे आदेश करतो
आदेश
तक ची तक्रार खालीलप्रमाणे मंजूर करण्यात येते.
1) विप क्र.1 ने तक ला शेतकरी अपघात विम्याची रक्कम रु.1,00,000/- (रुपये एक लक्ष फक्त) दयावी.
2) विप क्र.1 ने वरील रकमेवर तक ला तक्रार दाखल तारखेपासून रक्कम फिटेपर्यत द.सा.द.शे.9 दराने व्याज दयावे.
3) विप क्र.1 ने तक ला तक्रारीचा खर्च म्हणून रु.5,000/-(रुपये पाच हजार फक्त) द्यावे.
4) उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी विरुध्द पक्ष यांनी आदेश दिल्या तारखेपासुन तीस
दिवसात करुन विप यांनी तसा अहवाल 45 दिवसात मा.मंचासमोर सादर करावा,
सदरकामी उभय पक्षकारांनी मंचात हजर रहावे. सदर आदेशाची पुर्तता विप यांनी न
केल्यास तक्रारदाराने तसा अर्ज दयावा
5) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
अध्यक्ष
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (सौ.विद्युलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.