ग्राहक तक्रार क्र. 157/2012
अर्ज दाखल तारीख : 05/07/2012
अर्ज निकाल तारीख: 05/11/2014
कालावधी: 02 वर्षे 04 महिने 01 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1) श्रीमती अनूजा अमोल खोसे,
वय-सज्ञान, धंदा – शेती व घरकाम,
रा.विजोरा ता. वाशी, जि. उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1) व्यवस्थापक,
दि. न्यु इंडिया इन्शुरन्स कंपनी लि. पुणे,
नाईक निवास, शिवाजी चौक, उस्मानाबाद.
2) डेक्कन इन्शुरन्स अॅड रि-इन्शुरन्स ब्रोकर्स प्रा.लि.
औरंगाबाद 6–परखडे बिल्डींग, भानुदास नगर, बिग बझार मागे,
आकाशवाणी चौक, औरंगाबाद.431001.
3) मे. तालूका कृषी अधिकारी,
तालूका कृषि अधिकारी कार्यालय,
वाशी, ता. वाशी, जि. उस्मानाबाद. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
२) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारातर्फे विधीज्ञ : श्री.व्ही.आर.खवले.
विरुध्द पक्षकार क्र.1 तर्फे विधीज्ञ : श्री.एस.पी. दानवे.
विरुध्द पक्षकार क्र.2 तर्फे विधीज्ञ : स्वत:.
विरुध्द पक्षकार क्र.3 तर्फे विधीज्ञ : स्वत:.
न्यायनिर्णय
मा. सदस्य श्री.मुकुंद बी.सस्ते यांचे व्दारा :
1) तक्रारदाराच्या तक्रारी अर्जाचे थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे :
तक्रारदार क्र.1 हीचे पती अमोल चांगदेव खोसे हे शेतकरी होते, यांचे नावे मौजे विजोरा शिवारात गट क्र.51/क क्षेत्र 0 हे.60 आर, गट क्र.1 क्षेत्र 0 हे.60 आर एवढी जमीन होती. दि.15/02/2012 रोजी सायंकाळी 7.30 वा. सुमारास सरमकुंडी ते विजोरा रोडवर यशवंडी शिवारात ट्रक क्र.टी.एन.52-8589 च्या चालकाने त्याच्या ताब्यातील ट्रक हयगय व निष्काळजीपणाने चालवून चुकीच्या दिशेने येवून अमोल खोसे यांच्या मोटारसायकलला धडक दिल्याने ते गंभीर जखमी होऊन उपचाराकामी नेत असतांना वाटते मयत झाले. त्या अनुषंगाने राजेंद्र खोसे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलीस स्टेशन वाशी येथे गु.रं.नं.18/2012 कलम 304(अ), 279, 184, 134 (अ) (ब) भादंवि नुसार नोंद झाली. म्हणून तक्रारदार यांनी दि.07/04/2012 रोजी सर्व कागदपत्रांसहित विप क्र.3 यांच्या कार्यालयात विमा दावा दाखल केला आहे. त्यांनतर विप यांनी नुकसान भरपाई दिली नाही किंवा त्रुटीबाबत काही न कळविता कोणतेही कायदेशीर कारण नमूद न करता दि.18/05/2012 रोजीच्या पत्राने दावा खारीज केल्याचे कळविले आहे. म्हणून सदर तक्रार दाखल करण्यात आली. म्हणून विपकडून विमा रक्कम रु.1,00,000/- व त्यावर अपघात तारखेपासून द.सा.द.शे.12 टक्के व्याजासह रु.5,000/- व प्रकरणाचा खर्च म्हणून रु.3,000/- मिळणे न्यायाचे आहे. अशी विनंती केली आहे.
तक्रारदाराने तक्रारीसोबत क्लेम फॉर्म अर्ज, कृषि अधिकारी यांना दिलेला अर्ज, 7/12 उतारा गट नं.51, फेर फार क्र.1071 व 1060, 8 अ. चा उतारा, तलाठयाचे प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, मतदान कार्ड, मृत्यू प्रमाणपत्र, एफ. आय.आर., घटनास्थळ पंचनामा, बँक पासबुक उतारा, मरणोत्तर पंचनामा, पोष्ट मार्टम रिपोर्ट, वाहन परवाना, गाव नमुना 6–क, विपने विमा दावा नाकारल्याचे पत्र इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
2) सदर प्रकरणात मंचामार्फत विरुध्द पक्षकार क्र.1 यांना नोटीस मिळाल्यानंतर त्यांनी दि.12/10/2012 रोजी आपले म्हणणे दाखल केलेले असून ते पुढीलप्रमाणे....
घटना दि.15/02/2012 व तथाकथीत विमा घेतल्याची तारीख दि.15/08/2010 व फेर क्र.1060 मंजूरीची तारीख दि.16/12/2011 लक्षात घेता विमा घेतेवेळी मयताचे नावे 7/12 नव्हता. मयत अमोल खोसे यांच्याकडे मोटारसायकल चालविण्याचा वाहन परवाना नव्हता व तो घटनेच्या वेळी बेकायदा वाहन चालवित असल्याने तथाकथीत अपघाती घटनेबाबतची जोखीम या विप ने केव्हाही स्विकारली नव्हती व नाही. तक्रारदाराने सदरील अपघाती घटनेची लेखी माहिती दिली नाही. मयत शेतकरी होता व त्याच्या नावे जमीन होती तसेच त्याचे वास्तव्याचे ठिकाण, विमा दावा, मृत्यू इ. तक्रारदाराने कागदपत्रासह सिध्द करावे. म्हणून तक्रारदाराची तक्रार चुकीची असून ती खर्चासह नामंजूर व्हावी असे नमूद केले आहे.
3) सदर प्रकरणात मंचामार्फत विरुध्द पक्षकार क्र.2 यांना नोटीस मिळाल्यानंतर त्यांनी दि.08/11/2014 रोजी आपले म्हणणे दाखल केलेले असून ते पुढीलप्रमाणे....
डेक्कन ब्रोकर्स यांनी अभिलेखावर लेखी म्हणणे दाखल केले आहे. त्यांच्या कथनाप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या विमा योजनेकरिता त्यांना सल्लागार म्हणून नियुक्त केले आहे. विमा कंपनीकडे विमा दावा सादर करण्यापूर्वी विहित कागदपत्रांसह मुदतीमध्ये दाखल करण्यासाठी छाननी करणे त्यांचे कार्य आहे. त्याकरिता त्यांनी महाराष्ट्र शासनाकडून शुल्क किंवा आर्थिक मदत स्वीकारलेली नाही. त्यामुळे त्यांना प्रकरणातून मुक्त करण्यात यावे, अशी विनंती त्यांनी केली आहे.
4) सदर प्रकरणात मंचामार्फत विरुध्द पक्षकार क्र.3 यांना नोटीस मिळाल्यानंतर त्यांनी दि.14/08/2012 रोजी आपले म्हणणे दाखल केलेले असून ते पुढीलप्रमाणे....
अ. शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजने अंतर्गत मयत शेतकरी अमोल चांगदेव खोसे रा. विजोरा ता.वाशी यांचा क्लेम फॉर्म व इतर आवश्यक कागदपत्रे अर्जदार क्र.1 श्रीमती अनुजा आमोल खासे रा. विजोरा ता. वाशी यांनी आमच्या कार्यालयास दि.07/04/2012 रोजी सादर केले.
ब. सदर प्रस्ताव या कार्यालयाने दि.09/04/2012 रोजी मा. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी उस्मानाबाद यांचे मार्फत में. डेक्कन इन्शुरन्स ब्रोकर्स प्रा.लि. औरंगाबाद यांना सादर करण्यात आला.
क. सदर प्रकरणी में. डेक्कन ब्रोकर्स प्रा. लि. यांनी या कार्यालयाशी कसलाही पत्र व्यवहार केल्याचे दिसुन येत नाही. तरी विनंती की, विप क्र.3 तालुका कृषि अधिकारी वाशी यांचे हददीत पत्र व्यवहार केल्याचे दिसुन येते नाही.
तरी विनंती की, विप क्र. 3 तालुका कृषि अधिकारी वाशी यांचे हददीत सदर अर्ज नामंजूर करण्यात यावा. असे नमूद केले आहे.
5) तक्रारदाराची तक्रार, त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे, गैरतक्रारदार यांचे म्हणणे, त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे, उभयतांचा लेखी युक्तीवाद इत्यादींचा विचार करता आम्ही निष्कर्षासाठी खालील मुद्ये उपस्थित करीत आहोत. त्यांचे निष्कर्ष खाली दिलेल्या कारणांसाठी देतो.
मुद्ये निष्कर्ष
1) विरुध्द पक्षकार यांनी सेवेत त्रुटी केली आहे काय ? होय.
2) तक्रारदार शेतकरी अपघात विमा रक्कम
मिळण्यास पात्र आहे काय ? होय.
3) काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे.
निष्कर्षाचे विवेचन
6) मुददा क्र.1 व 2 चे उत्तर:
तक्रारदार यांचे पती अमोल खोसे हे शेतकरी असून त्यांच्या मृत्यू नंतर शेतकरी अपघात विम्याचा लाभ त्यांना मिळाला नाही म्हणुन या न्यायमंचात तक्रार दाखल केली आहे. या संदर्भात विपचे दोन मुख्य मुदये / आक्षेप त्यानुसार मयताकडे मोटारसायकल चालविण्याचा वाहन परवाना नव्हता व दुसरा पॉलिसीच्या सुरवातीस म्हणजेच साल सन 2010 मध्ये तो सातबाराधारक शेतकरी नव्हता. याविषयी या मुददा क्र.1 च्या अनुषंगाने मयतावर आयपीसी कलम 279 नुसार गुन्हा नोंद आढळून येत नाही. व विपने विमा दावा नाकारतांना या मुदयाने तो नाकारलेला नाही. म्हणुन या मुदयाला जास्ती महत्व न देता मुददा क्र. 2 च्या अनुषंगाने अधीक स्पष्टीकरण देतांना या संदर्भातील दावा नाकारण्याचे विपचे पत्र पडताळले असता त्यांनी सातबारा उता-या मध्ये 6 ड मध्ये खोसे यांच्या नावे जमिन दि.15/08/2010 रोजी म्हणजे पॉलिसी सुरु झाण्याच्या दिवशी झालेली नसल्याने त्यांना दावा रक्कम देता येणार नाही. पॉलिसी कलम 8 (11) प्रमाणे दि.15/08/2012 रोजी जमिनधारक नसणा-या विमाधारकाला दावा रक्कम देता येणार नाही. या वाक्याच्या अनुषंगाने तक्रारदाराने दाखल केलेली कागदपत्रे पाहीली असता. फेरनक्कल 1060 चे अवलोकन केले असता. अमोल चांगदेव खोसे यांचे नाव सर्व्हे नं. 51 क मध्ये दि.16/12/2011 रोजी आलेले आहेत व तत्तपुर्वी सदरचा फेर मंजूरीसाठी दि.29/11/2011 रोजी पाठविलेला आहे. त्यामुळे दि.15/08/2012 रोजी मयत हा जमिनधारक होता हे सिध्द होते. 6-क मधील वारसा प्रकरणांच्या नोंदवहीनुसारही दि.15/03/2012 रोजी नोंद झालेले आहे. त्यामुळे मयत हा सातबाराधारक होता हे सिध्द होण्यासाठी काहीही अडचण दिसुन येत नाही व विपच्या म्हणण्यानुसार विमा पॉलिसीचे साल 2010-11 कालावधीमध्ये तो सातबाराधारक नव्हता यापुरता विचार केला तर फेर क्र.1060 च्या अनुषंगाने पाहिले असता 2007 मध्ये मयताच्या वडीलांचा मृत्यू झालेला असून त्या दिवसापासून तो वडीलांच्या मालमत्तेचा कायदेशीर वारसदार झालेला आहे व विपने सन 2008 पासून पुढे जे विमा दायीत्व स्विकारलेले आहे / होते ते मयत चांगदेव खोसे यांचे नसून पुढील कायदेशीर वारसांचेच होते. त्यानंतरच्या महसूलीच्या नोंदी हया कायदेशीर मालकी अथवा वारस स्पष्ट न करता ताबा किंवा मालकीचे संदर्भ स्पष्ट करतात व सदरच्या महसुल नोंदी हया आक्षेप घेतलेल्या कालावधितीलच आहेत. त्यामुळे विपने नाकारलेला विमा दावा ही सेवेतील त्रुटी असून तो तक्रारदारास मिळणे न्याय आहे याबाबत आमचे दुमत नाही. म्हणुन आम्ही मुद्या क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी देतो व खालीलप्रमाणे आदेश करतो.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते.
2) विप क्र.1 यांनी तक्रारदार यांना शेतकरी अपघात विम्याची रक्कम रु.1,00,000/-(रुपये एक लाख फक्त) द.सा.द.शे.9 टक्के दराने तक्रार दाखल तारखे पासून सदर रक्कम अदा होईपर्यंत दयावी.
3) विप क्र.1 व 2 ने तक्रारदारास दाव्याचा खर्च रु.5,000/- (रुपये पाच हजार) दयावा.
4) उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी विरुध्द पक्ष यांनी आदेश दिल्या तारखेपासुन तीस
दिवसात करुन विप यांनी तसा अहवाल 45 दिवसात मा.मंचासमोर सादर करावा,
सदरकामी उभय पक्षकारांनी मंचात हजर रहावे. सदर आदेशाची पुर्तता विप यांनी न
केल्यास तक्रारदाराने तसा अर्ज दयावा.
5) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (श्री.एम.व्ही.कुलकर्णी)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.